शिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल. - Shivcharitramala - history of Shivaji Maharaj

Information world
0

शिवाजीराजांनी यावर्षी (दि। २ 3 ते 3 ० एप्रिल १६५७ ) एका अत्यंत अवघड अशा धाडसी राजकारणात हात घातला. मोगलांसारख्या दैत्य बळाच्या सत्तेविरुद्ध पहिला हल्ला केला. मोगली ठाणी मारली. औरंगजेबानं सर्व पाताळयंत्री डाव आणि ढोंगबाजी करून दिल्ली कब्जात घेतली. त्याने बापाला आग्ऱ्याला कैदेत ठेवले. तो ‘ आलमगीर ‘ बनला. म्हणजे जगाचा सत्ताधीश! या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला ? राजांवर दहशत बसली का ? छे! पण ते खिन्नतेने बहुदा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला.

पण इराणच्या बादशाहवर मात्र परिणाम झाला. याचे नाव होते शहा अब्बास सानी. त्याला औरंगजेबाचा राग आला. तिरस्कार वाटला आणि कीवही. पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिले. त्यांत शहा अब्बास लिहितो : ‘ अरे! तू आलमगीर केव्हा झालास ? जगाचा सत्ताधीश! आलमगीर ? तो दक्षिणेकडे ( म्हणजे महाराष्ट्रात) असलेला शिवाजी तुला हैराण करतोय. त्याचा बंदोबस्त तुझ्याने होईना आणि तू आलमगीर ?’ म्हणजे या आणि पुढच्या काळात शिवाजीराजांच्या धुमाकुळाची रणधुमाळी इराणच्या तेहरान राजधानीपर्यंत पोहोचली.

शिवचरित्रमाला  [ मराठी ] आइकन

शिवाजीराजांच्या राज्यकराभारात आणि रणकारभारात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून येते। ती म्हणजे स्वावलंबन. कुठेही , कुणाकडेही मदतीच्या-भिक्षेच्या आशाळभूतपणाने ते बघत नाहीत. अन्नधान्य , युद्ध साहित्य , गडकोटांची बांधणी , दारूगोळा आणि आथिर्क खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे ,

 हा त्यांचा कडक आग्रह होता. स्वराज्याला कधीही आथिर्क कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही. यात अनेक गोष्टी प्रकर्षानं नजरेत भरतात. आवश्यक तेवढा खर्च , आवश्यक ती काटकसर , उधळपट्टीला पुरता पायबंद , शिस्त चिरेबंद , भ्रष्टाचारी , गुन्हेगारी पक्की जेरबंद. एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की , रयतेची दु:खे आणि तेवढेच शाप राज्यर्कत्याला सोसावे लागतात हे राजांनी पक्कं जाणलं होतं.

 ‘ रयतेस आजार देऊ नये. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. रयत दु:खी झाली तर म्हणू लागेल की , यापेक्षा मोगल बरे! मग मराठीयांची इज्जत वाचणार नाही. ‘ हा महाराजांचा राज्यकारभार. राज्यसंसार. एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराज करीत होते. न्याय चोख होता. अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या. कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करीत होते.

म्हणूनच जुन्या पत्रांत राजांच्याबद्दल शब्द येतात बेलाफुलासारख्या भक्तीचे , तुळशी- दवण्यासारख्या अन् चाफा-बकुळीसारख्या सुगंधांचे। हे बघा ना! ‘ राजश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी ‘, ‘ हे श्रींचे राज्य आहे ‘, ‘ हे श्रींच्या वरदेचे राज्य आहे.

‘ शिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते। गुणी आणि कष्टाळू परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संतसज्जनांचे ते नम्र भक्त होते. कोणत्याही धर्माच्या , पंथांच्या वा जातीच्या ईश्वरभक्तापुढे ते हात जोडून होते. पण कोणत्याही राजकारणात वा राज्यकारभारात त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्याही संतांनी फक्त देवभक्ती , लोकजागृती आणि लोकसेवाच केली. यात कोणीही सरकारी संत नव्हताच.

शिवाजीराजा एक माणूस होता। तो अवतार नव्हता. आपण शिवाजीराजांच्या दैदिप्यमान पराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो. आपले डोळे भक्तीभावाने मिटतात. नको! ते डोळे उघडण्याची आवश्यकता आहे.

शिवाजीमहाराजांनी अचूक संधी साधून , आपल्या कर्दनकाळासारख्या महाभयंकर असलेल्या सत्तेवर जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी ठाण्यांवर हत्यार चालविले , हे पाहून औरंगजेबाचे डोळे खाडकन उघडले. वटारले गेले. तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता। पण दिल्ली ताब्यात आल्यावर स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणार होता. त्यावेळचाही फायदा घेणार होते. शिवाजीराजे! त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे कोकणातले उत्तर ठाणे जिल्ह्यातले काही किल्ले घेतलेच. राजांच्यासारखा अचूक संधीसाधू राष्ट्राला नेहमीच हवा असतो.

याचवेळी ( इ। स. १६५७ उत्तरार्ध) राजांनी कोकणात आपला घोडा उतरविला. कारण त्यांना संपूर्ण कोकण समुदासकट स्वराज्याच्या कब्जात हवे होते. राजांनी दादाजी रांझेकर आणि सखो कृष्ण लोहोकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण आणि भिवंडी जिंकावयास रवाना केले , जिंकले. या दोघांनीही एकाच दिवशी कल्याण , भिवंडी काबीज केली. या दिवशी दिवाळीतील वसुबारस होती. 

(दि. २४ ऑक्टो. १६५७ ) दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लागला. इथे भूमीगत धन हंडे भरून राजांना मिळाले. लक्ष्मीपूजन सार्थ झाले. कल्याणच्या खाडीत मराठी आरमाराचा शुभारंभ झाला. आगरी , भंडारी आणि कोळी जवान सागरलाटेसारखे महाराजांच्याकडे धावत आले. आरमार सजू लागले. पैशात किंमतच करता येणार नाही , हिऱ्यामाणकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी , कोळी , भंडारी माणसं आरमारावर दाखल झाली

. कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली. आंबा पिकत होता , रस गळत होता पण कोकणचा राजा उपाशीपोटीच झोपत होता. आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या. नारळी सुपारी चवरीसारख्या डुलणार होत्या. कोकणचा हा उष:काल होता.

कल्याण भिवंडीपासून दक्षिणेकडे कोकणवर महाराजांची मोहीम सुरू झाली. एकेक ठाणं भगव्या झेंड्याखाली येऊ लागलं.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)