कवी, समीक्षक. सकस जीवनानुभव आणि प्रत्ययकारी प्रतिमांनी समृदध ्अशी ओजस्वी शब्दकळा यांमुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर घणाघाती प्रहार करते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीने समाजवास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान महत्त्वाचे आहे.
‘उत्थानगुंफा’, ‘काव्यभीमायन’, ‘मूर्तिभंजन’, ‘जीवनायन’, ‘प्रतीक्षायन’, ‘अग्नीचा आदिबंध’, ‘स्वप्नसंहिता’, ‘युगमुद्रा’, ‘बाबासाहेब’ इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. ‘दलित साहित्य : सिद्धांत आणि स्वरूप’, ‘स्वाद आणि चिकित्सा’, ‘समाज आणि साहित्य समीक्षा’, ‘नवे साहित्यशास्त्र’, ‘परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये’ इत्यादी समीक्षात्मक पुस्तके. ‘रमाई’, ‘मी यशोधरा’ इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित.
‘स्वप्नसंहिता’ या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘कवी कुसुमाग्रज पुरस्कार’ इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित. कवीला भोवतालच्या जगात विषमतांचे जाळे आढळते. एकीकडे पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्ये आणि वागण्यात संधिसाधुपणा, अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे अशा अंतर्विरोधांनी कवीच्या जीवाचा उडतो. या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळण्यासाठी कवी ‘शब्दांचा’ आधार घेतात. त्यांची कविता सर्वदिशांनी झेपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले, भोगलेले त्यांच्या कवितेतून प्रकटते.