शिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.
छत्रसाल बुंदेला शिवाजीराजांना भेटाव
यास आला त्यावेळी महाराजांची छावणी कृष्णा नदीच्या काठावर नजिक होती , असा गोरेलाल तिवारीने उल्लेख केला आहे. एकूण अभ्यास करता असे वाटते की , ही छावणी कुरुंदवाड , मिरज , सांगली अशा परिसरात असावी. गोरेलाल तिवारीने नेमक्या ठिकाणाचा उल्लेख केलेला नाही.छत्रसाल बुंदेला आपल्याला भेटावयास येत आहे हे महाराजांना समजताच त्यांना आनंदच झाला. छत्रसालाचे त्यांनी अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले. आपल्या तंबूत त्याला महाराजांनी आपल्या शेजारी बसविले. त्यावेळी गोरेलाल तिवारी हा छत्रसालाचा सहकारी प्रत्यक्ष हजर होता. यानेच नंतर ‘ छत्रप्रकाश ‘ नावाचा गंथ लिहिला. (हा ग्रंथ दिल्ली विद्यापीठाने प्रकाशित केला आहे.) त्यात गोरेलालने छत्रसालाच्या या भेटीचा तपशील दिला आहे.
महाराजांनी आगत स्वागतानंतर छत्रसालाला ‘ आपण कोणती अपेक्षा धरून आमच्याकडे येणे केले आहे ?’ असे विचारले. तेव्हा छत्रसालाने दिलेले उत्तर फारच उत्कृष्ट आहे ते मुळातच वाचले पाहिजे. पण सारांश असा की , ‘ महाराज , मला औरंगजेबाची चाकरी करण्याची इच्छाच नाही. या गुलामगिरीची मला शिसारी येते. महाराज , मला आपण आपल्या राज्यात सैनिक म्हणून नोकरी करण्याची इच्छा आहे. ‘
त्यावर महाराज म्हणाले , ‘ छत्रसालजी , तुमच्यासारखा सिंहाचा छावा आम्हाला सेवक म्हणून लाभला , तर ती आनंदाची आणि सन्मानाचीच गोष्ट ठरेल. पण आपण नोकरी कशाकरता करता ? आपण स्वतंत्र राज्य स्थापन करावे. जे मी इथं केलं , तेच आपण बुंदेलखंडत करा सारा मोगली मुलुख काबीज करा. ‘
छत्रसालाच्या मनात या स्वातंत्र्याच्या विचाराने गोड कल्लोळ उसळला. आजपर्यंत असा विचार सांगायला त्याला कुणी भेटलाच नव्हता. सर्वात विशेष गोष्ट इथं लक्षात येते की , त्यांनी छत्रसालाला पूर्ण स्वावलंबनाने व पूर्ण स्वत:च्या हिमतीवर हे नवे बुंदेली स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. महाराज त्याच्याशी जे विचार बोलले , त्याचा सारांश असा , ‘ छत्रसालजी , आपण मनात आणा. आपण स्वराज्य निर्माण करू शकाल. सैन्य आणि युद्धसाहित्य नक्कीच उभे करू शकाल. आत्मविश्वासाने काम करा. आपली कुलदेवता विंध्यवासिनी भवानी आणि आपले आराध्य दैवत तो ब्रजनाथ श्रीकृष्ण आपल्या पाठीशी आशीर्वादास उभे आहेत ‘
केवढा विलक्षण मंत्र हा ? याचे सार्मथ्य संजीवनी मंत्राहूनही मोठे नाही काय!
महाराजांनी छत्रसालास त्याच्या सर्व सहकाऱ्यांसह एक महिनाभर ठेवून घेतले. छावणीतून महाराज राजगडी परतले. गडावर महाराजांच्या सहवासात छत्रसालास खूपच बघायला , ऐकायला अन् शिकायला मिळाले. छत्रसाल यावेळी अगदी तरुण होता. एका कर्तबगार तरुणाशी नेता कसा वागतो किंवा कसे वागावे हे महाराजांच्या या छत्रसाल भेटीच्या महिनाभरात दिसून येते. एक तेजस्वी अन् उत्तुंग महत्त्वाकांक्षा अंत:करणात घेऊन छत्रसाल निघाला. महाराजांनी त्याला अतिशय प्रेमादराने वागविले. व तेवढ्याच प्रेमादराने त्याला प्रेरणा देऊन निरोप दिला.
औरंगजेबाविरुद्ध बुंदेलखंडात एका नव्या स्वातंत्र्याचे बंड महाराजांनी शिलगावले. एक नवी युवा शक्ती हिरीरीने स्वार झाली.
आता आमची विचार करण्याची पद्धत बघा. या छत्रसाल भेटीतून शिवाजीराजांनी छत्रसालाला ‘ डिस्करेज ‘ केले आणि त्याला परत पाठवून दिले , असा अर्थ एका थोर इतिहासकाराने आपल्या इंग्रजी गंथात लावला आहे. गंथाचे नाव ‘ स्द्धद्ब१ड्डद्भद्ब ड्डठ्ठस्त्र द्धद्बह्य ह्लद्बद्वद्गह्य ‘
महाराजांनी छत्रसालाला राजगडावरून निरोप देताना त्याच्या आदरसत्कार केला. महाराजांनी त्याला एक उत्कृष्ट दर्जाची तलवार अर्पण केली. ही तलवार , छत्रसालचे आजचे वंशज पन्ना येथे असतात त्यांनी त्यांच्या म्युझियममध्ये ठेवलेली आहे.
छत्रसालाने परत आल्यावर बंुदेलखंड आणि विंध्याचल या प्रदेशात मोगलांच्या विरुद्ध अगदी शिवाजीमहाराजांच्या सारखेच स्वातंत्र्ययुद्ध पुकारले. लढत लढत काही वर्षांत त्याने बुंदेलखंड स्वतंत्र केला. एक नवे हिंदवी स्वराज्य मध्यप्रदेशात जन्मास आले. छत्रसालाची असंख्य पत्रे व अन्य ऐतिहासिक साहित्य उपलब्ध आहे. त्याने आपल्या हिरदेसा नावाच्या मुलाला लिहिलेेले एक पत्र फार सुंदर आहे. आपण तरुणपणी शिवाजीराजांना कसे भेटलो , त्यांच्या सहवासात कसे शिकलो आणि कसे हे बुंदेलीराज्य निर्माण केले हे त्याने हिरदेसाला लिहिले आहे.
छत्रसालास तीन पुत्र होते. हिरदेसा , जगतराय आणि हिंदुपत ही त्यांची नावे. छत्रसाल सुमारे ऐंशी वषेर् जगला. त्याने एक आदर्श स्वराज्य निर्माण केले. त्याच्या अखेरच्या काळात ( इ. स. १७ 3 ०चा सुमार) मोहम्मदखान बंगश याने बुंदेलखंडावर स्वारी केली. त्यावेळी छत्रसाल वयाने थकलेला होता. मुले शूर होती. पण तरीही त्यांनी मोठ्या विश्वासाने व आशेने थोरल्या बाजीराव पेशव्यांस मदतीस बोलाविले. बाजीराव पेशव्यांनीही मदतीसाठी धाव घेतली आणि बंगशाचा पराभव केला. बुंदेलखंडी स्वराज्य संकटातून वाचले.
छत्रसाल बुंदेल्यावर गोरेलाल तिवारी उर्फ लालजी पुरोहित या त्याच्या सहकाऱ्याने ‘ छत्रप्रकाश ‘ हा गंथ लिहिला. शिवकालीन व छत्रसालकालीनही प्रख्यात कवी भूषण यानेही छत्रसालावर काही काव्य लिहिले आहे. अलिकडे डॉ. घनश्यामदास गुप्ता यांनी छत्रसालाचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. डॉ. गुप्ता हे झांसी येथे असतात
|| शिवचरित्रमाला ||
|| शिवचरित्रमाला || |
शिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.
सुरतेवरच्या दुसऱ्या स्वारीनंतर महाराजांना वाटेतच वणी दिंडोरीला मोगली सरदारांनी अडविले. (दि. १६ ऑक्टोबर १६७० ) या युद्धात महाराजांचा प्रचंड विजय झाला.
आता महाराजांचे लक्ष गेले , एका कारंज्यावर. हे कारंजे वऱ्हाडात होते. कारंजे हे अपार संपत्तीचे शहर होते. ‘ लाड ‘ आडनावांची अनेक घराणी. कारंज्यात होती. म्हणून त्याला लाडाचे कारंजे असे म्हणत. अन् या लाडांना कारंज्याचे लाड म्हणत. कारंज्यात व्यापार फार मोठ्या प्रमाणावर चाले. इंग्रज , डच आणि अन्य युरोपीय व्यापारी सुरतेहून खानदेशात आणि वऱ्हाडात मुख्यत: कापसाच्या खरेदीसाठी सतत येत. खानदेशातील नंदुरबार हे शहरही असेच प्रख्यात होते. शिवाय धरणगाव आणि बुऱ्हाणपूरही खूप श्रीमंत होते.
अर्थात सत्ता होती इथं औरंगजेबाची. यावेळी बुऱ्हाणपुरास सुभेदार म्हणून होता जसवंत सिंह राठोड. हा जोधपूरचा सरदार. तो महाराजांचा कडवा शत्रू होता आणि औरंगजेबाचा कडवा सेवक होता. अचलपूर उर्फ इरिचपूर येथेही खान-ए- जाम या नावाचा मोगल सरदार फौजबंद होता. हा सारा नकाशा महाराजांना उत्तम माहीत होता. महाराजांनी पहिला छापा लाडाच्या कारंजावर घालायचे ठरविले.
तारीख सापडत नाही पण महाराज फौजेनिशी (बहुधा पुणे- संगमनेर-विंचूर-आदिलाबाद या मार्गाने) एकदम लाडाच्या कारंज्यावर आले. या क्षणी कारंज्यात उडालेल्या गोंधळ अन् पळापळ चक्रीवादळासारखी झाली. एवढ्या मोठ्या व्यापारी शहराच्या संरक्षणाची व्यवस्था काहीच नव्हती. खान जमानबरोबर लष्कराची छावणी होती. पण ती अचलपूरला , जवळजवळ ७० कि. मी. दूर. महाराज कारंज्यात शिरले. त्यावेळी काही इंग्रज व्यापारी आणि दलाल खरेदीसाठी कारंज्यात आले होते. सुरतेतील अनुभवाने शहाणे झालेले हे इंग्रज ताबडतोब मराठी हल्ल्याने सावध झाले. त्यांनी आपल्या बचावासाठी काय केले ? त्यांनी स्त्रियांचे कपडे (म्हणजे बहुदा साड्या , ओढण्या , बुरखे इत्यादी असावे) पेहेरले. कारण त्यांना अनुभवाने हे माहीत होते की , हे मराठे स्त्रियांच्या वाटेला कधीही जात नाहीत. त्यांचा अपमानही ते कधी करीत नाहीत. या वेषांतरामुळे इंग्रज बचावले. बाकीची व्यापारपेठ मराठ्यांच्या तडाख्यातून सुटली नाही. मोठी संपत्ती ( नक्की आकडा माहीत नाही) मराठ्यांनी मिळवली.
या हल्ल्याची बातमी खान जमानला अचलपुरात समजली. तो अजिबात डगमगला नाही. आपली फौज घेऊन कारंज्याकडे अगदी शांत आणि संथपणे तो निघाला. कारण मराठ्यांचा पाठलाग करण्याचेही पुण्य मिळवायचे आणि मराठ्यांशी मारामारी करण्याची अवघड भानगडही टाळायची असा त्याचा दूरदशीर् मनसुबा होता. मराठ्यांची गाठच पडणार नाही अशा वेगाने तो येत होता. आला. पण त्यावेळी मराठे घ्यायचे तेवढे घेऊन केव्हाच पसार झाले होते.
महाराजांची इच्छा बुऱ्हाणपुरावरही छापा घालण्याची होती. पण जसवंतसिंह तेथे होता. तो कडवा प्रतिकार करील अन् बुऱ्हाणपुरातून त्यामुळे आपल्याला फार काही मिळणार नाही असा व्यापारी हिशेब करून महाराजांनी बुऱ्हाणपुरावर न जाता नजीकच्या बहादुरपुऱ्यावरच फक्त छापा टाकला आणि मिळाले तेवढे घेऊन महाराज परतले. कारण बुऱ्हाणपूर जिंकणे हा काही महाराजांचा हेतू नव्हता.
महाराजांना संपत्ती हवी होती. म्हणून ते मोगली श्रीमंत ठाण्यांवर हल्ले चढवीत होते. यावेळी त्यांनी उत्तर खानदेशातील किंवा पश्चिम वऱ्हाडातील एकही किल्ला किंवा मोगली ठाणी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
हा पैसा त्यांना कशाकरता हवा होता ? तो हवा होता स्वराज्याच्या सर्वांगीण बळकटीसाठी. भावी आक्रमणांना तोंड देण्यासाठी. युद्धसाहित्यासाठी आणि लष्करासाठी. महाराजांना कोण परत पाठवणार होतं ? मोठेमोठे व्यापार उभारून स्वराज्यासाठी पैसा मिळवावा तर एवढा वेळ आणि स्वस्थता नव्हती. याच श्रीमंत शहरातील हे श्रीमंत व्यापारी दिल्लीहून बादशाहाने खूण केली तरी सक्तीचे नजराणे पाठवीत होते. मग महाराजांनीही पण असेच सक्तीचे नजराणे स्वराज्यासाठी वसूल केले तर काय हरकत होती. महाराजांनी सुरतेवर स्वारी केली आणि खंडण्या घेतल्या. म्हणून का रागवायचे ? हीच सुरत महाराजांच्या आधी पोर्तुगीजांनी लुटली. तेव्हा किंवा नंतरही कोणी काहीही बोलले नाही.
या लुटीचीही शिस्त आणि कडक नियम महाराजांनी घालून दिलेले होते. गडगंज श्रीमंतांकडूनच ते त्यांच्या संपत्तीच्या प्रमाणात म्हणजे तीन टक्के किंवा पाच टक्के अशा पद्धतीने खंडणी मागत. ती मिळाली की पावत्या देत आणि ग्वाही देत की आम्ही पुन्हा तुमच्याकडे खंडणी मागणार नाही. ‘ लूट ‘ या शब्दाचा अनेकांनी जाणूनबुजून बदनामी करण्याकरिता हवा तो अर्थ लावला. मोगली आणि त्यापुढील निरनिराळ्या सुलतानांनी , पोर्तुगीजांनी , हबश्यांनी , आणि पाळीव पेंढाऱ्यांनी महाराष्ट्राची वेळोवेळी अक्षरश: बेचिराख धूळधाण उडवली , त्याबद्दल कोणीही बोलत नाही. खरे म्हणजे या सर्व गोष्टींचे मोल स्वराज्याच्या अर्थकारणात आहे. त्याचा अभ्यास झाला पाहिजे.
शिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.
स. १६७० हे वर्ष स्वराज्याला
रणधुमाळीचे गेले. पुढचे ही वर्ष तसेच जाणार होते. एकाच वेळी दोन आघाड्या न उघडण्याचे महाराजांचे धोरण होते. पण दोन शत्रूंनी जर स्वराज्यावरती वेगवेगळ्या आघाड्यांवर चाल केली , तर लढावेच लागणार ना! जंजिऱ्याचा सिद्दी आकाराने लांडग्याएवढा होता. पण समुदामुळे त्याचे बळ हत्तीएवढे होते. जंजिऱ्याचे सिद्दी एकूण तीन. सिद्दी संबूळ , खैरत आणि कासिम. या तिघांचाही एकमेकांवर अभेद्य विश्वास होता. त्यांची एकी पोलादी होती. त्यांच्यावर त्यांच्या सैन्याचा असाच विश्वास आणि अशीच निष्ठा होती. त्यांची महत्त्वाकांक्षा समुद आणि कोकणपट्टी आपल्या सत्तेत ठेवण्याची होती. महाराजांना हे तीन सिद्दी म्हणजे असाध्य दुखणे झाले होते. औरंगजेब तर कायमचाच खवळलेला होता. पोर्तुगीज संधी शोधत होते. यावेळी जंजिरेकरांचे भावी चढाईचे डाव ओळखून महाराजांनी जंजिऱ्याविरुद्ध आपणच मोहिम निश्चित केली. महाराज मोठ्या ईषेर्ने आपल्या कोकणी सरदारांना म्हणाले , ‘ खुद्द जंजिऱ्यावरच आपले निशाण लागले पाहिजे. जो कोणी निशाण लावील त्याला एक मण सोने बक्षीस! ‘
हे बक्षीस ईषेर्करता होतं. एक मण सोनं म्हणजे आजचे ३४५६ ग्रॅम्स , म्हणजे महाराजांनी ठरविलेले हे शाबासकीचे सोने भरगच्च होते पण अवास्तव नव्हते. महाराज रायगडावरून लष्कर घेऊन उतरले. रायगडापासून सुमारे १२ – १३ किलोमीटरवर महाराज थांबले. मोहिमेआधीच्या काही योजना पूर्ण करण्याचा त्यांचा विचार असावा. रात्रीचा मुक्काम पडला. ही रात्र होळी पौणिर्मेची होती.
याचवेळी राजपुरीच्या किल्ल्यात शिमग्याची होळी पेटली होती. कोकणचे जवान होळी भोवती खेळत होते , नाचत होते. गाणी गात होते. राजपुरीच्या तटाबुरुजांवर गस्त नेहमीप्रमाणेच कडक होती.
या पौणिर्मेच्याच दिवशी जंजिऱ्याच्या सिद्दी खैरत आणि सिद्दी कासिम या दोघांनी एक विलक्षण डाव योजला. मराठ्यांच्या ताब्यात असलेली राजपुरी जिंकून घ्यायचीच असा तो डाव होता. त्याकरता त्यांनी राजपुरीच्या उत्तर दरवाज्यावर खैरत सिद्दीने सैन्यानिशी हल्ला चढवायचा आणि राजपुरीच्या नैऋत्य दिशेने , म्हणजे पश्चिम आणि दक्षिण या दिशांच्या साधारणत: मध्यबाजूने सिद्दी कासिमने सैन्यानिशी शिड्यांवरून तटावर चढायचे अन् किल्ल्यात घुसायचे असे ठरविले. राजपुरीचा कोट हा काहीसा उंचट टेकडीवर होता. जंजिऱ्याच्या किल्ल्याच्या पूवेर्स समुद आणि किनाऱ्यावर हा राजपुरीचा कोट होता. थोडक्यात म्हणजे मुरुडच्या किनाऱ्यावर राजपुरीचा किल्ला. किल्ल्याला पश्चिमेस समुद अन् समुद अवघ्या सहा किमीवर जंजिरा.
अंधार पडल्यावर खैरतने सुमारे पाचशे सिद्दी सैनिक होडग्यांतून आणि सिद्दी कासिमने सुमारे तेवढेच सैनिक होडग्यांतून राजपुरीच्या रोखाने जाण्याकरता काढले. एकूण सिद्दी सैन्य किती होते हे माहीत नाही. पण अंदाजे एवढे असावे.
समुदातून खैरतची टोळी बहुदा लांबचा वळसा घेऊन दबत दबत होडीतून उतरून राजपुरीच्या उत्तर दरवाजाच्या रोखाने सरकू लागली. त्याचप्रमाणे सिद्दी कासिमने ही राजपुरीच्या पिछाडीच्या म्हणजे नैऋत्तेच्या तटावर दबत दबत चाल सुरू केली. राजपुरीवर उत्तर आणि दक्षिण बाजूने सिद्दींचे सैन्य सरकू लागले. किल्ल्यातील मराठे होळीचा खेळ खेळण्यात दंग झाले होते.
राजपुरीच्या तटांवरच्या पहारेकऱ्यांनाही या येणाऱ्या दोन्ही बाजूच्या हल्ल्यांची कल्पना आली नाही. सिद्दी खैरतने उत्तरेकडून चाल केली. कासिमनेही ठरल्याप्रमाणे पिछाडीकडून चाल केली.
होळीभोवती गाण्यानाचण्यात दंग असलेल्या मराठी सैनिकांना आधी उत्तरेच्या दरवाज्याच्याबाजूने येत असलेल्या हल्ल्याची चाहूल लागली आणि त्या हल्ल्याचा प्रतिकार करण्याकरता अगदी स्वाभाविकपणे उत्तरेकडे किल्ल्यातले मराठे धावत सुटले. पिछाडीकडूनही असा आणखी एक हल्ला येत आहे याचे त्यांना भान राहिले नाही. त्यांचे सर्व लक्ष आणि बळ उत्तरेकडे धावले. गोळाबारी सुरू झाली.
पिछाडीकडून सिद्दी कासिमने शिड्यांवरून चढावयास सुरुवात केली. त्या बाजूला सिद्द्यांना प्रतिकार करण्यासाठी मराठे सैनिक अल्पसंख्येने होते. त्यामुळे कासिमने सैन्यानिशी झपाट्याने तटावर चढून किल्ल्यात प्रवेश मिळविला. झटापट सुरूच झाली. उत्तरेकडूनही सिद्दींचा मारा चालू झाला होता.
किल्ल्यातील मराठ्यांचे दारूगोळ्यांचे कोठार दक्षिणेचे बाजूस होते. त्या कोठारातून दारूगोळा काढून वापरण्यासाठी मराठे त्वरा करू लागले. सिद्दी खैरतचे लोकही मोठ्या जिद्दीने शिड्या लावून उत्तरेकडून तटावर चढू लागले. होळीप्रमाणेच लढाई धडाडून पेटली.
एवढ्यांत कसे घडले कोण जाणे! पण दक्षिण बाजूस असलेल्या दारूगोळ्याच्या कोठारावर ठिणगी पडली आणि एका क्षणात प्रचंड स्फोट होऊन मराठ्यांचा सारा दारूगोळा कोठारासकट उडाला. धूर उसळला. काहीच दिसेना. अनेक मराठे आणि कोठाराजवळ पोहोचलेले कासिमचे काही सैनिक चिंधड्या उडून खलास झाले. कासिम जिवंत होता. त्याने मोठमोठ्याने ओरडून आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी युद्धघोषणा सुरू केल्या. उत्तरेकडीलही सिद्दी खैरतचा हल्ला यशस्वी झाला. खैरत किल्ल्यात घुसला. भयंकर रणकंदन सुरू झाले होते. दारूगोळ्याचा भडका उडून मराठ्यांचे सारे बळ संपले होते. सिद्दीचा एल्गार फत्ते झाला होता. राजपुरी खैरत आणि कासिम यांनी काबीज केली. भगवा झेंडा उडाला. सिद्दीचे निशाण लागले. त्यांचे नगारे उडू लागले. दांडा-राजपुरी सिद्दींच्या कब्जात गेली.
आता समुद किनाऱ्यावरचा राजपुरीचा किल्लाच हातातून गेल्यावर खुद्द जंजिऱ्याच्या किल्ल्यावर मोहीम कशी करणार ? हल्ला करायला तळच उरला नाही. हा प्रकार दि. १० फेब्रुवारी १६७१ या दिवशी घडला. महाराज या दिवशी रायगडपासून एका मजलेवर तळ ठोकून राहिले होते.
शिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.
राजपुरीच्या किल्ल्यावर मध्यरात्री दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट झाला. मराठी सैन्य मारले गेले. जे कोणी मराठे सिद्दींना जिवंत सापडले त्यांचेही मरण अटळच होते. किनाऱ्यावर वा सागरात एखाद्या गलबतावर सिद्दींना कुणी मराठे सैनिक जिवंत सापडले , तर त्यांना हे सिद्दी कधीही सोडत नसत. त्यांना ते भयंकररीतीने ठार मारत असत. शिवाजी महाराजांचे सैनिक होणे हे एक खडतर व्रतच होते. हे व्रत शिवसैनिकांनी तान्हाजीप्रमाणे , बाजी प्रभूप्रमाणे , बाजी पासलकरांप्रमाणे , येसबा दाभाड्यांप्रमाणे आणि गडकोटांच्या तटाबुरुजांप्रमाणे सांभाळलं.
एक विलक्षण गोष्ट या राजपुरीच्या भयंकर रात्री घडली. शिवाजी महाराज हे रायगडापासून एक मजल अंतरावर या रात्री छावणीत होते. मध्यरात्रीचा हा सुमार. महाराजांना गाढ झोप लागली होती. एवढ्यात अचानक महाराज दचकून जागे झाले. पहाऱ्यावर असलेली भोवतीची मराठी माणसे झटकन जवळ आली. महाराज एकदम का जागे झाले अन् का बेचैन झाले हे त्यांना समजेना. महाराज त्यांना म्हणाले , ‘ काहीतरी भयंकर घोटाळा झाला आहे. ताबडतोब दांडा राजपुरीकडे स्वार पाठवा. खबर आणा. ‘
एक दोन स्वार राजपुरीच्या रोखाने दौडत गेले. राजपुरीच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच त्यांना समजले की , रात्री राजपुरीवर सिद्द्यांचा हल्ला झाला. दारूगोळ्याचं कोठार उडालं. राजपुरी गेली. सिद्द्यांचे निशाण लागले. स्वार परतले. महाराजांना ही खबर त्यांनी सांगितली. हा एक फार मोठा धक्काच होता. दु:खही होते. पण उपाय काय ? जंजिऱ्याची मोहिम महाराजांनी तहकूब केली. ते रायगडास खिन्न मनाने परतले. राजपुरीचे अपयश कुणामुळे ? या खबरा इंग्रजास समजल्या. त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे अर्थ लावला की , मराठी सैनिक राजपुरीस दारू पिऊन चैनीत नाचगाणी करीत होते. त्यामुळे हा पराभव मराठ्यांचा झाला. पण ही शक्यता वाटत नाही. कारण लष्करी छावणीत आणि किल्लेकोटांत ताडी , माडी , दारू वा अमलीपदार्थ यांना सक्त बंदी होती. राजपुरीसारख्या जंजिऱ्याच्या ऐन तोंडावर असलेल्या या मराठी ठाण्यांत अशी दारूबाजी घडणे संभवनीय वाटतच नाही. शिवकालीन स्वराज्याच्या इतिहासात अशा गाफीलपणाने वा व्यसनबाजीने आत्मघात झाल्याचे एकही उदाहरण अजून तरी सापडलेले नाही. हा व्यसनबाजीचा आरोप महाराजांनीही केल्याची नोंद नाही.
हा केवळ त्रयस्थांनी केलेला तर्क आहे. मात्र शत्रूचेही कौतुक केले पाहिजे की त्यांनी मराठ्यांइतकेच कुशलतेने गनिमी काव्याचे युद्धतंत्र वापरून हा अवघड डाव फत्ते केला. यातूनही खूप शिकण्यासारखे असते. शत्रूचे डावपेच कसे असू शकतात याचाही धडा मिळतो. राजपुरीमुळे जंजिऱ्याची मोहीम स्थगित करावी लागली आणि महाराजांनी मोर्चा वळविला मोगलांकडे. यापूवीर् कोकण किनाऱ्याचा महाराज किती गंभीरपणे विचार करीत होते हेही लक्षात घेण्यासारखे आहे. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांचे वास्तव्य सर्वांत जास्त दिवस कोकण भागात झाले. कोकणात किल्ले दोन प्रकारचे. सागरी आणि किनारी. सागरी किल्ला बेटावर बांधलेला असायचा. त्याला म्हणायचे जंजिरा आणि किनाऱ्यावरचा किल्ला हा एका किंवा दोन बाजूंनी जमीन असलेला आणि एका बाजूनी समुद असलेला असा असायचा. महाराष्ट्राच्या एकूण सागरी किनाऱ्यावर सागरी आणि किनारी अशा किल्ल्यांची संख्या सुमारे ६५ होती. त्यापैकी खांदेली उंदेली , दुर्गाडी , अलिबागपासून ते तेरेखोलपर्यंत बहुसंख्य किल्ले महाराजांनी काबीज केलेले होते. काही थोडेसेच किल्ले जंजिरेकर सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज यांच्या ताब्यात होते. मुंबईचा किल्ला , ज्याला आपण आज फोर्ट म्हणतो , तो इंग्रजांनीच बांधला. माहिमपासून थेटवर सुरतेपर्यंत कोकण किनाऱ्यावर महाराजांची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. हा भाग मुख्यत: पोर्तुगीज , इंग्रज आणि मोगल यांच्या कब्जात होता.
महाराजांचे आरमार उत्तम होते. यात शंका नाही. साठ किंवा काही साठाहूनही अधिक टन वजनाची गलबते स्वराज्यात होती.
आरमारावरील माणसे उत्तम दर्जाची लढाऊ होती. खरोखर त्यांच्या शौर्याला तोड नव्हती. स्वराज्यात असलेले किनाऱ्यावरचे एकही ठाणे शत्रूला कधीच जिंकता आले नाही. यातच या सागरी समाजांचे म्हणजे आगरी , कोळी , भंडारी आणि कोकणी मराठे यांचे सार्मथ्य अन् निष्ठा व्यक्त झाली होती. पुढच्या काळात तर औरंगजेबाला महाराष्ट्राशी पंचवीस वर्ष अव्याहत झुंजूनही कोकणात अजिबात यश मिळाले नव्हते. शाहजादा अजीम , शहाबुद्दीन खान आणि सरदारखान यांच्यासारख्या उत्तम मोगली सेनापतींनाही कोकण किनाऱ्यावर यश मिळाले नव्हते. उलट त्यांनी मारच खाल्ला होता. क्वचित कल्याण भिवंडीसारखे खाडीवरचे मराठी ठाणे मोगलांनी जिंकले. पण ते पुन्हा मराठ्यांनी थोड्याच अवधीत काबीज केले , असे दिसून येते.
कोकणात स्वराज्य आल्यानंतर एक गोष्ट निश्चित प्रभावीपणे दिसून येत गेली की , कोकणी गावांना व जनतेला चाचे लोकांचा आणि फिरंगी घुसखोरांचा उपदव झाला नाही. तो बंदच झाला. कोकणातील जनतेला फार हाल सहन करावे लागत होते. ते पूर्ण बंद झाले. महाराजांनी आता तर राजधानीच कोकणात आणली. रायगड हा कोकण आणि मावळ यांच्या घाटमाथ्यावरच उभा आहे. महाराजांनी सर्वात जास्त उपयोग करून घेतला , कोकणातील मनगटांचा आणि बुद्धीमत्तेचा. राष्ट्र उभे करायचे असेल तर सोन्याच्या कणाकणाप्रमाणे गुणी , कष्टाळू , प्रामाणिक आणि हुशार माणसे वेचावी लागतात. त्यात जातीपातींचा भेदभाव करून चालत नाही. तो केल्यास राष्ट्र कधीही समर्थ होत नाही. संपन्नही होत नाही. गुणी माणसे हाताशी धरून ती घडवावी लागतात. महाराजांनी अशी माणसे घडविली.
दौलतखान , लायजी सरपाटील , मायनाक भंडारी , सिदी मिस्त्रीखान , इब्राहिम खान , वल्लभदास , सुंदरजी परभुज , बाळाजी आवजी चित्रे , रामाजी अनंत सुभेदार , दादंभट उपाध्ये , विश्वनाथ भट्ट हडप , बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर , सुभानजी नाईक , कृष्णाजी नाईक , अडिवरेकर तावडे , दसपटीकर शिंदे मोकाशी , खानविलकर , सावंत , धुळप , शिकेर् , केशव पंडित पुरोहित , आंगे , दर्यासारंग आणखी किती नावं सांगावीत ? शाई पुरणार नाही. कागद पुरणार नाही. महाराजांचे मन मात्र अशी माणसे जमविताना पुरून उरत होतं. म्हणूनच कोकणपट्टा अजिंक्य बनला. ही सांगितलेली यादी मुख्यत: कोकणातील कर्तबगार घराण्यांचीच आहे.
शिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन
शिवकालातील हिंदुस्थानच्या राजकीय स्थितीचा विचार मनात येतोच. महाराष्ट्रात शिवाजीमहाराजांनी स्वातंत्र्यासाठी शत्रूविरुद्ध उठाव केला. त्यांना एकच शत्रू नव्हता. विजापूरचा आदिलशाह , दिल्लीचा औरंगजेब , जंजिऱ्याचा सिद्दी , गोव्याचा पोर्तुगीज , मुंबईचा इंग्रज , गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि अंतर्गत अनेक स्वकीय संधी साधून स्वराज्याला विरोध करत होते , त्यांचीही संख्या थोडी नव्हती. यातील गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाशी प्रत्यक्ष संघर्ष फारसा घडला नाही. पण बाकी सर्वांशी महाराजांना झुंज द्यावी लागत होती.
डच , फेंच , अरब इत्यादी परकीय त्यामानाने लहानलहान असलेले महत्त्वाकांक्षी व्यापारीही थोडा थोडा त्रास देतच होते. या सर्व शत्रूंत काही सागरी शत्रू होते. बाकीचे भुईशत्रू होते. एवढ्या या अफाट शत्रूबळाशी झुंजत झुंजत महाराजांना स्वराज्याचा विस्तार आणि संरक्षण करण्याचा उद्योग किती कष्टमय पडला असेल याचा विचार आपल्या मनात येतच नाही. आपण फक्त शिवचरित्रातील नाट्यमय घटनांवर लुब्ध होतो अन् पुस्तक मिटवून आपल्या संसारात लगेच मग्नही होऊन जातो.
या साऱ्या राजकीय संकटांच्या वणव्यात उभ्या असलेल्या पण तरीही स्वातंत्र्यांच्या ईश्वरी कार्यात तन्मय झालेल्या शिवाजीराजांच्या जीवनकार्याचा आपण सर्व बाजूंनी विचार , मनात आणि अनुकरणही करण्याचा प्रयत्न केला नाही , तर करमणुकीशिवाय आपल्या पदरात काहीही पडणार नाही.
वर्तमानकालीन म्हणजेच आजची आपल्या देशाची आणि संपूर्ण भारतीय जनतेची मनस्थिती आणि कृती पाहिली की , मन चिंतेने काळवंडून जाते. स्वार्थ , व्यसनाधीनता , जातीद्वेष , भाषाद्वेष , प्रांतद्वेष , धर्मद्वेष , बेशिस्त आणि बेकायदेशीर वागणूक , एक का दोन ? अनंत आत्मघातकी व्यक्तिगत आणि सामूहिक कृत्यांचे पुरावे म्हणजे आमची रोजची वृत्तपत्रे. आम्ही आमच्या अविवेकी वर्तनाचा कधी विचारच करणार नाही का ? उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो गावांना वणवण करावी लागते अन् अनेक राष्ट्रीय जलाशयातले पाणी आणि वीज आम्ही चोरून वापरतो. अनेक जलायश फुटतात अन् पाणी स्वैर वाहून जाते.
एक की दोन ? किती यातना सांगाव्यात! वास्तविक जीर्णशीर्ण अवस्थेत शेकडो वषेर् गुलामगिरी भोगून सुदैवाने स्वतंत्र झालेल्या या देशाच्या पहिल्या दोन पिढ्यांना चंगळवादी जीवन जगण्याचा अधिकारच नाही. कष्ट , शिस्त , योजनाबद्धता , प्रामाणिक व्यवहार आणि उदात्त महत्त्वाकांक्षा हीच आमची आचारसंहिता असायला हवी ना! मग आम्ही शिवचरित्रातून काय किंवा अन्य आदर्शांतून काय , शिकलोच काय ? आम्ही भारावलेल्या मनाने तात्पुरते चांगले असतो. स्मशानवैराग्य आणि हे चांगलेपण सारखेच. तात्पुरतेच.
एकदा एक असाच तात्पुरता भारावलेला एक भक्त स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीस (दर्शनास!) गेला. अन् म्हणाला , ‘ स्वामीजी , मला देवासाठी , समाजासाठी अन् देशासाठी खूप काहीतरी चांगले करावेसे वाटते. मी काय करू ? तुम्ही सांगाल ते मी करीन. ‘
यावर स्वामीजी अगदी शांतपणे म्हणाले , ‘ तू , फक्त एकच माणूस ‘ चांगला ‘ बनविण्यासाठी सतत प्रयत्न कर. बस्स! हीच ईश्वरसेवा आहे. ‘
त्यावर त्या माणसाने विचारले , ‘ कोणाच्या माणसाला मी चांगला करू ? असा माणूस मला नेमका कुठे भेटेल ?’
त्यावर स्वामीजी म्हणाले , ‘ तो माणूस तुझ्या अगदीच जवळ आहे. तो तूच आहेच. तू स्वत:ला ‘ चांगलं ‘ बनविण्याचा प्रयत्न कर. ‘
असा प्रयत्न मी स्वत: खरंच करतो का ?
आळस , अज्ञान , मोह अन् स्वार्थ याचीच नकळत वा कळूनही मी आराधना करीत तर नाही ना! अखेर ही आराधना दुर्गुणाचीच ठरेल. ही आराधना करवंटीची ठरेल. शिवचरित्राचा प्रत्येक ‘ मी ‘ ने मनापासून विचार केला तर स्वामी रामकृष्णांच्या शब्दांप्रमाणेच चांगला होण्यासाठी तो ‘ एक माणूस ‘ त्याला स्वत:तच सापडेल. तो त्यातला ‘ माणूस ‘ त्यालाच दाखवून देण्याचं काम करावं लागेल आईला , वडिलांना आणि शाळा कॉलेजातील सरांना.
शिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.
शिवाजी महाराजांनी इ. स. १६७० च्या प्रारंभापासून औरंगजेबाविरुद्ध सुरू केलेली मोहीम विलक्षण वादळी होती. एक शिवनेरी सोडला , तर पूर्वी तहात मोगलांना दिलेले तेवीसही किल्ले महाराजांनी परत घेतले. इतकेच नव्हे तर नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग महाराजांनी बहुतांशी स्वराज्यात आणला. महाराजांची ही मोहीम अतिशय अभ्यासनीय आहे. यातच दुसऱ्यांदा सुरतेवरचा खंडणी छापा होता. एक गोष्ट येथेही लक्षात येते की , महाराज सह्यादीच्या आश्रयाने स्वराज्याचा विस्तार करीत होते. कारण सह्यादीतील किल्ले हे संरक्षणाचे उत्कृष्ट साधन होते. येवले , मालेगाव आणि खानदेशचा पूर्व भाग हा सपाटीचा होता.
हा भाग आणि त्यालाच जोडून असलेला मराठवाडा व वऱ्हाड हे सपाटीचे भाग जर जिंकून घ्यावयाचे ठरविले , तर आत्ता घेता येतील. पण त्याच्या संरक्षणाकरिता भुईकोट किल्ले , जास्तीतजास्त फौज , तोफखाना आणि युद्धसाहित्य आता आपल्यापाशी मोगलांच्या मानाने खूपच कमी आहे , हे ओळखून महाराज सह्यादीवरील बळकट किल्ल्यांचा आश्रय घेत होते. किल्ले हेच आपले सर्वात मोठे बळ आहे , हे त्यांनी ओळखले होते. म्हणजेच आपल्या भौगोलिक बळाचा आणि गनिमी काव्याच्या क्रांतीकारक तंत्राचा उपयोग महाराजांनी अगदी हृदयाशी घट्ट धरला होता.
थोडं अधिक सांगतो. पाहा पटतं का. पेशवाईच्या अखेरच्या काळात याच किल्ल्यांचा आणि याच भौगोलिक प्रदेशाचा उपयोग जर पेशवे , शिंदे , पवार , होळकर इत्यादी सरदारांनी आणि बापू गोखले , यशवंतराव होळकर , कुंजीर , विंचूरकर , दाभाडे , त्र्यंबकजी डेंगळे , जिवबा दादा बक्षी आणि अशा कितीतरी कमालीच्या शूर सरदारांनी इंग्रजांच्या विरुद्ध केला असता , ही शिवयुद्धपद्धती आणि शिवयुद्धनीती एकवटून वापरली असती तर इंग्रजांना मंुबई सांभाळणेही अशक्य झाले असते. त्यांना अगदी खऱ्या अर्थाने पळता भुई थोडी झाली असती. व्हिएतनाममध्ये आत्ता आत्ता अमेरिकेसारख्या अतिबलाढ्य अन् जय्यत सुसज्ज अशा पैसेवाल्या देशाचीही दाणादाण एका हो ची मिन्ह या सेनापतीने उडवली तशी आम्ही मराठ्यांनी इंग्रजांची उडविली असती. पण आम्ही त्याकाळी शिवचरित्राचा अभ्यास केलाच नाही.
भूगोलाचे महत्त्व ओळखलेच नाही , राष्ट्रीय ऐक्याचा आम्हाला कधी गंधही लागला नाही. आमचा शनिवारवाडा गंुंतून पडला ‘ कामिनी काव्या ‘ त आणि सारे सरदार आपसांत भांडत बसले क्षुल्लक दाव्यात. फावले महाधूर्त शकुनी इंग्रजांचे. हा हा म्हणता आम्ही गुलाम बनलो. ऐक्याचे बळ , राष्ट्रीय अस्मितांचा अभिमान , अनुशासन , योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध संस्था , सहकारी कारखाने , शिक्षणसंस्था आणि निदान स्वत:चे खासगी संसार तरी आम्ही धड चालविले असते ना! पण आम्ही आजही सगळे आजारीच पडलो आहोत. कारखाने आजारी , विद्यालये , महाविद्यालये आजारी , समाज आजारी , नेते आजारी , सरकार आजारी , सगळेच आजारी. त्यामुळे आमचा टीव्ही , रेडिओ आणि वृत्तपत्रे रोज कण्हतच असतात.
यावर एकच औषध आहे. शिवचरित्र. तेवढे शिवचरित्र शिका आणि शिकवा. सारे रोग बरे होतील. सारं नैराश्य संपेल.
हं! तर काय सांगत होतो! इ. स. १६७० पासूनची महाराजांची मोगल आणि आदिलशाहीविरुद्ध सुरू झालेली चढाई विलक्षण अभ्यासनीय आहे. क्वचित झालेले पराभव महाराजांनी उलटवून लावून विजय मिळवले आहेत.
आता औरंगजेबाची प्रतिक्रियाही लक्षात घेतली पाहिजे. त्यानेही महाराजांच्याविरुद्ध केलेल्या योजना आणि चढाया नि:संशय अचूक होत्या. त्याचे सरदार तरबेज अनुभवी होते. दाऊदखान कुरेशी , जसवंतसिंह राठोड , महाबतखान , बहाद्दूरखान , मोहकमसिंग , दिलेरखान इत्यादी. युद्धसाहित्याला तोटा नव्हताच. औरंगजेबाने ही इ. स. १६७० पासून पुढे तीन वषेर् राबविलेली आपली चढाईची योजना अशी होती की , खानदेशापासून ते पुरंदर तालुक्यापर्यंत असलेला , शिवाजी महाराजांच्या कब्जात गेलेला , संपूर्ण मुलुख जिंकून घ्यावयाचा. परंतु , एकच गोष्ट प्रथमच सांगून टाकावयास हरकत नाही की , त्याच्या सरदारांत एकोपा नव्हता.
त्यामुळे समन्वय कधीच साधला गेला नाही. सर्वत्र पराक्रमाची शर्थ करूनही मोगलांचे हे सेनापती पराभूत झाले. औरंगजेबाला दिल्लीत बसून या दक्षिणेतील मोहिमांची सूत्रे नीट चालविता आली नाहीत. तो चालत्या मोहिमेतून कधी जसवंतसिंहाला दिल्लीत बोलावून घेतो आहे तर कधी दिलेरखानसारख्या मोठ्या सेनापतीची दुसरीकडेच बदली करतो आहे. त्यातच त्याचेही दक्षिणेतील सेनापती आपसांतील मतभेदांमुळे वेगवेगळेच डावपेच खेळताहेत.
यातीलच एक प्रकार पाहा. अहिवंतगड (नाशिक जिल्हा) घेण्याकरिता महाबतखान आणि दाऊदखान कुरेशी हे एकवटून मराठ्यांविरुद्ध नेटाने तीन महिने झुंजले. अखेर मोठ्या शथीर्ने दाऊदखान अहिवंतगडात घुसू शकला. त्याने मराठ्यांचा पराभव करून गड जिंकला. हा गड जिंकण्याचे श्रेय महाबतखानाला मिळवायचे होते. पण दाऊदखान प्रथम किल्ल्यात शिरल्यामुळे विजयाचे श्रेय त्यालाच मिळाले आणि महाबतखान नाराज झाला. तो चिडला आणि सुरतेच्या दक्षिणेस असलेल्या पारनेरा नावाच्या किल्ल्यावर जाऊन बसला. ( जून १६७१ ) संपूर्ण पावसाळा तो तिथेच राहिला. या पावसाळ्यात त्याच्या सैन्याचे रोगराईमुळे व योग्य खाणेपिणे न मिळाल्यामुळे अतिशय हाल झाले. जनावरे फार मेली. पण स्वत: महाबतखान किल्ल्यात चैन करीत होता. त्याच्याबरोबर निरनिराळ्या देशांतून आणलेल्या चारशे सुंदर बायकांचा जनानखाना होता. अहिवंतगडाच्या विजयाचे श्रेय न मिळाल्यामुळे निराश झालेला महाबतखान पारनेरा गडावर अशी चैन करीत होता. आता सांगा!
असे बेजबाबदार सरदार लाभले तर तो औरंगजेब तरी काय करणार ? औरंगजेबाचे पराभव आणि महाराजांचे विजय अभ्यासले तर आजही आपल्याला यातून खूपखूपच शिकायला आणि आमची प्रांतिक राज्ये अन् सहकारी संस्था नीट चालवायला खूप अक्कल मिळणार आहे.
शिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना
नाशिक प्रांताच्या उत्तर भागात हे साल्हेर आणि मुल्हेर किल्ले आहेत. आपल्याला एक नवलाची गोष्ट सांगतो. साल्हेर , मुल्हेर आणि बागलाण हा डोंगरी प्रदेश मोहिते घराण्याच्या सत्तेखाली इ. स. १६३० पर्यंत पूर्णपणे सार्वभौम स्वातंत्र्यात होता. बाकी सारा प्रदेश बहमनी , फरुकशाही आणि मोगल सुलतानांच्या ताब्यात गेला होता. सह्यादीच्या रांगेतील , विशेषत: कोकण बाजूचा काही काही भाग शत्रूला झटकन कधीच मिळाला नाही. तेथील असह्य शौर्य असलेले मराठे शत्रूशी झुंजतच राहिले. जवळजवळ , अल्लाउद्दीन खलजीच्या नंतर दीडशे वषेर् हा भाग झुंजत झुंजत ‘ स्वराज्य ‘ करीत होता. नंतर वेळोवेळी ही राज्ये सुलतानांच्या कब्जात गेली. पण बागलाणचे मोहिते शहाजहानपर्यंत स्वातंत्र्य टिकवून होते. अखेर शहाजहानने बागलाण घेतला.
इथे लक्षात येते सह्यादीची ताकद. इथल्या माणसांची कणखर मने आणि मनगटे. सह्यादीच्या आश्रयाने राक्षसी शत्रूच्या विरुद्धही शतकशतक झुंजता येते आणि राज्य टिकविता येते हे यातून लक्षात येते. हेच सह्यादीचे वर्म शिवाजीराजांनी ओळखले. हे वर्म पुढच्या काळात इंग्रजांच्या विरुद्ध लढताना पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरंजामदार सरदारांच्या लक्षात आले नाही. आपल्याच भूगोलाचे महत्त्व किती मोठे आहे हे जर समजले नाही , तर काय होते याचे नमुने हिमालयाच्या , हिंदुकुश पर्वताच्या , विंध्याचलाच्या , अरवलीच्या आणि सह्यादीच्याही प्रदेशात दिसून आलेच की! मग आमच्यातलेही थोर राष्ट्रपुरुष सहज बोलून जातात की , अमक्या प्रदेशाला कसले महत्त्व आहे , तेथे गवताची काडीही उगवत नाही. अन् मग घडतो तो पराभवाचा इतिहास.
शिवाजी महाराजांनी आपल्या भूगोलाचे महत्त्व नेमके ओळखले. आपल्या इतिहासाचे सार्मथ्य आणि आमच्याच घातपातांनी घडलेले दुदैर्वी पराभव महाराजांनी असेच नेमके ओळखले आणि स्वराज्याची संपूर्ण उभारणी सह्यादीच्या आश्रयाने त्यांनी केली. शिवकालीन स्वराज्याचा नकाशा आपण पाहिला , तर महाराजांनी सह्यादीच्या आश्रयाने राज्यविस्तार दक्षिणोत्तर मुख्यत: केलेला दिसेल. ते तेथेच थांबणार नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र , किंबहुना संपूर्ण भारतवर्षच जिंकून घेण्याचं स्वप्न ते पाहात होते. पण प्रारंभी त्यांनी डोके टेकले सह्यादीच्या पावलांवर. अन् निशाण लावले सह्यादीच्या शिखरावर. मृत्युनेच महाराजांना थांबविले. नाहीतर स्वराज्याच्या सीमा त्यांच्या हयातीत चंबळ ओलांडून यमुनेपर्यंत तरी खास पोहोचल्या असत्या.
तर सांगत होतो बागलाणची महती. साल्हेर , मुल्हेर स्वराज्यात दाखल झाले. या विजयाच्या बातम्या रायगडावर आल्या. साल्हेर म्हणजे विजयी पानपतच ठरले. लाखासव्वालाखांच्या मोगली फौजा उघड्या मैदानावर समोरासमोर झुंजून मराठ्यांनी उधळून लावल्या. या विजयाला तोड नाही. आस्मानी फत्ते जहाली. दिलेरखानासारखा अफगाणी सिपहसालार परास्त जाहला. ही गोष्ट असामान्य झाली. सिंहगडावर सुरू झालेली मोहीम साल्हेर गडापर्यंत विजयाचा झेंडा घेऊन फत्ते पावली. महाराज बहुत प्रसन्न जाहले.
महाराज रायगडावर आपल्या काही महत्त्वाच्या सौंगड्यांबरोबर बोलत बसले होते. सुदैवाने या त्यांच्या बैठकीची तारीखही सापडली आहे. हा दिवस होता ६ जानेवारी १६७२ . नाशिक प्रांतातील विजयाच्या आनंददायी बातम्या आलेल्या होत्या. महाराज सुखावले होते. स्वराज्याचे सुख , प्रजेचे कल्याण आणि स्वराज्याकरिता दिलेल्या लढायांत विजय मिळणे यातच महाराजांचे स्वत:चे सुख साठवलेले असायचे. नाशिककडच्या बातम्या विजयाच्या होत्या. आता युद्ध म्हटल्यानंतर त्याच्या जोडीला दु:खाचे आघातही सोसावेच लागतात. सूर्याजी काकडे याच्यासारखा योद्धा मारला गेला हे अपार दु:खच होते. पण उपाय काय ? हा युद्धधर्मच आहे. एका डोळ्याने हसायचे आणि हजार डोळ्यांनी रडायचे. दु:ख झाकून ठेवायचे आणि सहकाऱ्यांपुढे नव्या महत्त्वाकांक्षा मांडायच्या. याही वेळी महाराज आपल्यासमोर बसलेल्या सौंगड्यांना म्हणाले , ‘ तुंगभदेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गडकोट कब्जा झाले. दौलत वाढली. परंतु एक सल मनात राहिलाय. माझा पन्हाळगड अद्यापपावेतो मिळाला नाही. पन्हाळा म्हणजे दख्खनचा दरवाजाच. आपल्याला पन्हाळगड पाहिजे. पन्हाळ्याचा दुरावा जीवी सोसवत नाही. ‘
खरोखर पन्हाळ्याकरिता महाराज रोज दोन घास उपाशीच राहात असावेत , असा हा दुरावा होता. तेरा वर्षांपूवीर् (दि. २२ सप्टें. १६६० ) पन्हाळा विजापूरच्या आदिलशाहास तहात देऊन टाकावा लागला. तो परत मिळावा याकरिता महाराज तळमळत होते. पण संधी मिळत नव्हती. योग जुळत नव्हता. आग्ऱ्यास जाण्याच्या पूवीर् दि. १६ जाने. १६६६ या दिवशी महाराजांनी सुमारे तीन हजार सैन्यानिशी मध्यरात्री पन्हाळ्यावर छापा चढविला. पण बेत फसला. महाराजांचा छापा पन्हाळ्याच्या शाही किल्लेदाराने उधळून लावला. सुमारे एक हजार मराठी माना पन्हाळ्याच्या चार दरवाज्यावर तुटून पडल्या. पराभव झाला. महाराजांना माघार घ्यावी लागली. उरल्या सैन्यानिशी निरुपायाने ते विशाळगडाकडे दौडत सुटले. त्यांना या पराभवाचे सल वमीर् सलत राहिले. दु:खाचे अश्रु त्यांच्या काळजातून गळत होते. तेरा वषेर् वनवासात वणवणणाऱ्या दौपदीप्रमाणे महाराज बेचैन होते.
आज तेरा वर्षांनंतर महाराजांची मनातली ऊमीर् अचानक उसळून आली. समोरच्या खेळगड्यांशी बोलता बोलता ते पटकन बोलून गेले , ‘ कोण घेतो पन्हाळा ? कोण ? कोण ?
हा अचानक पडलेला सवाल समोरच्या साऱ्याच शिलेदारांनी छातीवर झेलला. पुढे बसलेल्यातील मोत्याजी मामा खळेकर म्हणाले , महाराज , मला सांगा. मी घेतो पन्हाळा. अन् असे शब्द प्रत्येकाच्याच तोंडून बाहेर पडले. त्यात होते गणोजी , अण्णाजी दत्तो , आणखीन कुणी कुणी. अन् एक मर्दानी मनगटाचा मराठा गडी. म्यानातून तलवार सपकन् बाहेर पडावी , तसा जबाब त्याच्या तोंडून बाहेर पडला. अन् तो म्हणाला , ‘ महाराज , म्या घेतो पन्हाळा. माझ्यावर सोपवा. आत्ताच निघतो. पन्हाळा घेतलाच समजा. ‘
या आशयाचे बोलणे सहज बसलेल्या बैठकीत निघाले अन् जागच्याजागी आपोआपच अग्निहोत्र शिलगांव , पेटावं अन् फुलावं तसा मराठी अग्नी पेटला. या समशेरीच्या पात्याचं नाव होतं कोंडाजी फर्जंद.
घरासंसाराचे , तहानभूकेचे , हजार अडचणींचे अन् दहा हजार गुंतवळ्याचे साऱ्या साऱ्या आकाराविकाराचे मनातले विचार पाचोळ्यासारखे साऱ्यांच्याच मनातून उडून गेले आणि एकच विचार मनांत बारुदासारखा ठिणगी पडून भडकला. पन्हाळा , पन्हाळा , पन्हाळा!
शिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच
कोंडाजी फर्जंदाने महाराजांच्या मनी सलणारे पन्हाळ्याचे सल अलगद काट्यासारखे उचकून काढले. अन् तो म्हणाला , ‘ पन्हाळा मी घेतो. हुकूम करा. ‘ महाराजांनी कोंडाजीची शाबासकी केली. सगळेच तयार झाले होते. सगळेच मोठ्या लायकीचे होते , नायकीचे होते. महाराजांनी लगेच कोंडाजीवरच पन्हाळ्याची मोहीम नामजाद केली अन् काय सांगावं , मराठी मनामनगटाची ल्हायकी , कोंडाजी उठलाच आणि त्याच क्षणाला त्याला महाराजांनी पुसले , ‘ किती सैन्य हवं तुला ?’ बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे ? महाराजांनी दि. १६ जाने. १६६६ ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो ? म्हणजे याचा हा विचार की अविचार!
विचारच. याचा अर्थ गनिमी काव्याच्या पद्धतीने शक्ती आणि युक्ती लढवून कोंडाजी पन्हाळ्यासारखा बलाढ्य अंगापिंडाचा गड घारीसारखी झडप घालून उचलू पाहात होता. हेच ते शिवशाहीचे अचानक छाप्याचे युद्धतंत्र पण तेही फार सावध बुद्धीने केले तरच यश पावते.
कोंडाजी रायगडावरून तीनशे हशम (सैनिक) घेऊन त्याचदिवशी गडावरून निघाला. तेव्हा एक विलक्षण हृदयवेधी घटना घडली. कोंडाजी महाराजांना निरोपाचा मुजरा करून निघत असतानाच महाराजांनी त्याला थांबविले आणि त्याच्या उजव्या हातात सोन्याचे कडे घातले. तोही चपापला. पाहणारेही चपापलेच असतील. कारण अजून तर मोहिमेला सुरुवातही नाही अन् महाराज निघायच्या आधीच कोंडाजीला सोन्याचं कड घालताहेत!
याचा काय अर्थ असावा ? महाराजांना नक्की असं वाटलं असावं का ? मोहिमेच्या आधीच याचं कौतुक करावं. मला तान्हाजीचं कौतुक करता आलं नाही. बाजी पासलकरांचं , बाजी प्रभूंचं , मुरार बाजींचं , कावजी मल्हारचं , सूर्याजी काकडेचं अन् अशाच मुजरे करून कामगिऱ्यांवर गेलेल्या माझ्या जिवलगांचं कौतुक करायला मला मिळालं नाही. त्यांची साध्या कौतुकानं पाठ थोपटायलाही मिळाली नाही. म्हणून मोहिमेच्या आधीच या कोंडाजीचं कौतुक करून घ्यावं. इथेच महाराजांची मानसिकता इतिहासाला दिसून येते. युद्धधर्म अवघड आहे.
भरोसा देता येत नाही. पण हा माझा कोंड्या पन्हाळा नक्की नक्की फत्ते करील. हरगीज फत्ते करील असा ठाम विश्वास महाराजांना वाटत होता. तीनशे गड्यांची पागा संगती घेऊन कोंडाजी निघाला. अण्णाजी दत्तो , मोत्याजी मामा , गणोजी हे ही कोंडाजीच्या सांगाती निघाले. कोंडाजी कोकणातूनच महाड , पोलादपूर , चिपळून , खेड अन् थेट राजापूर या मार्गाने निघाला. राजापुरास पोहोचला. तिथेच त्याने तळ टाकला. अगदी गुपचूप बिनबोभाट.
कोंडाजीने राजापुरातून चोरट्या पावलांनी जाऊन पन्हाळ्याचा वेध घेतला. राजापूर ते पन्हाळा हे अंतर त्यामानाने आणि जंगली डोंगरी वाटाघाटांनी जरा जवळच. सुमारे ७० कि.मी.
कोंडाजीने गुप्त हेरगिरीने पन्हाळ्याची अचूक माहिती मिळविण्यास सुरुवात केली. त्याने काय काय सोंग ढोंग केली ते इतिहासाला माहीत नाही. त्याने वाघ्यामुरळीचा जागर घातला की , शाहीर गोंधळी बनून गडावर प्रवेश मिळविला. की यल्लम्माचा जग जोगतिणीसारखा डोईवर घेतला की फकीर अवलिया बनून मोरपिसाचा कुंचा गडावरच्या विरह व्याकुळ हशमांच्या डोक्यावरून फिरवला ते माहीत नाही.
‘ भेदे करोन ‘ पन्हाळगडाची लष्करी तबियत त्याने अचूक तपासली , यात मात्र शंका नाही. पन्हाळ्याची नाडी त्याला सापडली. गडाच्या दक्षिणेच्या बाजूनी त्याने कडा चढून गडात प्रवेश मिळविण्याचा बेत नक्की केला. ही जागा नेमकी कोणची हे बोट ठेवून आज सांगता येत नाही. पण पुसाटीचा बुरुज आणि तीन दरवाजा अन् अंधारबावडी याच्या दक्षिणांगाने असलेला कडा रातोरात चढून गडात शिरायचा बेत त्याने केला. बेत अर्थात काळोख्या मध्यरात्रीचा. यावेळी गडावर सुमारे दोन हजार शाही सैनिक होते. बाबूखान या नावाचा एक जबर तलवारीचा बहाद्दूर किल्लेदार होता.
अन् अशा बंदोबस्त असलेल्या किल्ल्याचा नागे पंडित नावाचा सबनीस होता. कोंडाजीने चढाईचा मुहूर्त धरला फाल्गुन वद्य त्रयोदशी , मध्यरात्रीचा. (दि. ६ मार्च १६७३ ) राजापूरची तीनशे मावळ्यांची टोळी घेऊन , अंधारातून कोंडाजी रान तुडवीत पन्हाळ्यानजीक येऊन पोहोचला.
फाल्गुन वद्य १३ ची ती काळोखी रात्र , सारी जमीन अन् अस्मान काळ्या काजळात बुडून गेले होते. कोंडाजीने आपल्या बरोबरच्या तीनशे सैनिकांपैकी फक्त साठ सैनिकच बाजूला काढले. अण्णाजी दत्तो यांनासुद्धा त्याने या साठात न घेता , दोनशेचाळीस मराठे हशम त्याने जागीच ठेवले. म्हणजे फक्त साठच लोकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्यावर झडप घालणार होता की काय ?
शिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.
होय. फक्त साठच सैनिकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्याकडे निघाला. आता मात्र कमाल झाली. फक्त साठ हत्यारबंद ? पन्हाळ्यावर होते आदिलशाहीचे जवळजवळ दोन हजार हशम. पूर्वी (दि. १६ जाने. १६६६ ) प्रत्यक्ष महाराजांनी आपल्या सुमारे तीन हजार मावळ्यांनिशी पूवेर्च्या बाजूने पन्हाळ्यावर मुसंडी मारली होती. ती साधली नाही.
फार मोठी हानी पत्करून त्यांना माघार घ्यावी लागली. फार पूवीर् इ. १६६० ( मार्च ते सप्टेंबर) सिद्दी जौहराने पन्हाळ्याला केवढा प्रचंड गराडा घातला होता , आठवतो ना! त्याही वेळी जौहरला गड फोडता आला नाही. अशी या पन्हाळ्याची ताकद. त्या पन्हाळ्यावर आता कोंडाजी अवघी साठ मनगटं घेऊन चाल करणार होता! आश्चर्य. कोंडाजीने मागे ठेवलेली मराठी टोळी गडापासून सुमारे आठ कि.मी. वर बांदिवडे गाव अन् नवरानवरीचा डोंगर यांच्या जवळपास ठेवली असावी.
कोंडाजी निघाला. त्याच्या साठांच्या मुठीत हत्यारं होतीच शिवाय अनेकांच्यापाशी कणेर् होते. कर्णा म्हणजे धोत्र्याच्या फुलासारखे किंवा सनईच्या आकारासारखे सुमारे पाच-सहा फूट लांबीचे पितळी वाद्य. शिंगासारखेच ते फुंकायचे. त्याचा आवाज भोम् भोम् भोम् भोम् भोम् असा होतो. हे रणवाद्यच आहे. याला भेरी असेही म्हणतात. आवाज मोठा होतो. अंगावर शहारे आणणारा.
अगदी योजून कोंडाजीने हे कर्णे बरोबर घेतले त्याने मागच्या आपल्या टोळीला राखीव फौजेसारखे ( रिर्झव्ह फोर्स) ठेवले. जणू अंधार पोखरीत कोंडाजी पन्हाळगडाच्या दक्षिण बाजूकडे निघाला. घडीभरात पोहोचला. समोर अंधारात पन्हाळा काळाकभिन्न दिसत होता. सरळ कडा. आपल्या सैनिकांना सर्व सूचना आणि इशारे त्याने देऊन ठेवले होते. कोंडाजीने तो कडा चढावयास सुरुवात केली. मागोमाग साठांची माळही हातापायांच्या बोटांचा खाचीकपारीत उपयोग करून वर चढू लागली. हा हा म्हणता साठांची ही ‘ प्रचंड फौज ‘ गडाच्या माथ्यावर पोहोचली. या बाजूला गडावर शाही हशमांचे पहारेच नव्हते. गड सुसरीसारखा सुस्तावला होता. सर्वजण वर पोहोचल्यावर ठरविल्याप्रमाणे कोंडाजीने गडाच्या मुख्य म्हणजे पूर्व बाजूस हल्ला चढविण्यासाठी आपल्या लोकांना , विशेषत: कणेर्वाल्या अनेक हशमांना इशारा केला , फुंका. फुंका. म्हणून कर्णे फुंकण्याचा.
फुंका ? अहो गडावर दोन हजार माणसांचा शत्रू. अन् कोंडाजी आपल्या साठांना म्हणतोय फुंका , फुंका ? अन् मग त्या दोन हजारांनी फुंकलं तर ? पण कोंडाजीचा शवच अतोनात धाडसी आणि कणेर् वाजायला सुरुवात झाली. बाकीचे सैनिकही गर्जू लागले , हर हर महादेव! हर हर महादेव! ज्योतिबाचा चांगभलं! तुळजाभवानी की जय! येळकोट येळकोट जयमल्हार! आणि हे सारे मराठे गडावरच्या दिसेल त्या अन् असेल तिथल्या शत्रू सैनिकांवर वादळासारखे तुटून पडले. आवाज भणाणत होता. गर्जना टिपेला जात होत्या. गड खडबडून उठला. या अचानक आलेल्या हल्ल्याने ते गोंधळलेच. भर रात्री वाद्य वाजवीत गनीम गडात घुसला तरी कसा ? आवाज तर फार मोठा होतोय. म्हणजे मराठे आहेत तरी किती ? या साऱ्याच शंकांनी शत्रूचं सैन्य गडबडलं. कापाकापी जत्रेसारखी सुरू झाली. एकच बेशिस्त गोंधळ अन् पळापळ सुरू झाली. गडाचा किल्लेदार बाबूखान एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर निर्धास्त आरामात होता. त्याला हा अचानक उडालेला गोंधळ आणि र्कण्यांच्या आवाज ऐकू आला. तो उठला. महालाच्या झरोक्यातून बाहेर डोकावला. आणि त्याने मोठमोठ्याने ओरडून विचारायला सुरुवात केली.
‘ कौन सिंग फुंकता है ? कौन ? कौन ?’
आता कोण सांगणार. शत्रू आलाय हे उघड होतं. स्वत: बाबूखान हत्यारानिशी त्या हवेलीतून धावत सुटला. अन् युद्धाच्या गदीर्वर तो आला. झुंजू लागला.
याचवेळी गडाचा मुख्य सबनीस नागो पंडित गडावर प्रारंभी झुंजत होता. पण तो मराठ्यांचा आवेश पाहून त्या अंधारात तो गडबडलाच. त्याला आणि खरं म्हणजे सर्वच बादशाही सैनिकांना वाटू लागलं की , मराठे संख्येनं खूप असावेत. नागो पंडित तर पळतच सुटला. एकटाच नव्हे तर आपल्याबरोबरचा सारा शाही सैनिकांचा जमाव घेऊन पळत सुटला. सुमारे चारशे सैनिक त्याच्याबरोबर होते. हा नागोबा आपल्या सैनिकांना उद्देशून ओरडत होता , ‘ पळा , पळा , गनीम अफाट आहे. जीव वाचवा. पळा. ‘
याचा परिणाम बाकीच्याही असंख्य सैनिकांवर झाला. तेही पळत सुटले , गडाच्या पूर्व दरवाजाकडे. ऐन रणांगणात गडावरच्या तोफांचा उपयोग अशावेळी कसा करणार अन् कोण करणार.
आता गाठ पडली कोंडाजीची बाबूखानाशी. बाबूखानशाही इमानाने लढत होता. या साऱ्या अचानक प्रकाराने त्याची मनस्थिती आता केवळ लढता लढता मरायचेच असं ठरविल्यासारखी झाली होती. आपली शाही फौज सावरून मराठ्यांवर हल्ला करावा हे जमणे आता केवळ अशक्य होते. या अचानक हल्ल्याचा म्हणजेच गनिमी काव्यातील ‘ सरप्राईज अॅटॅक ‘ चा हा अचूक परिणाम. कोंडाजीला साधला होता. बाबूखानाच्या दुदैर्वी अन् कमनशिबी किल्लेदारीवर कोसळला होता. त्यातच त्याच्या इमानी पण दुदैर्वी नशिबाने घात केला. बाबूखान कोंडाजी फर्जंदाच्या हातून ठार मारला गेला.
ठरले होते त्याचप्रमाणे कोंडाजीचे डाव सर होत गेले. आता तो आणि त्याचे साथीदार मराठे मोठमोठ्याने ओरडून शत्रू सैनिकांना दरडावून म्हणू लागले , ‘ हत्यारं टाका. नाहीतर आमची मागून फार मोठी मराठी फौज येतेच आहे. तुम्हा सर्वांची कत्तल उडेल. मुकाट हत्यारं टाका. ‘
या साऱ्या प्रकारचा परिणाम शत्रूवर झालाच. त्यांचा किल्लेदारही पडला होता. आणि ते सैनिक खरोखरच हत्यारं टाकून शरण येऊ लागले. निशस्त्र झालेल्या सैनिकांचीही संख्या या साठांच्या मानाने खूपच होती का! तरीही हत्यारं टाकून अंधारात ते बाजूला झाले. त्यांच्या नशिबी अंधारच होता. पन्हाळगड काबीज झाला होता.
मागे ठेवलेली दोनशेचाळीस मराठ्यांची ‘ प्रचंड ‘ फौज निरोप जाताच पन्हाळगडावर आली.
उजाडत गेले आणि मग निशस्त्र झालेल्या पण मोठ्या संख्येने असलेल्या या हतबल शाही हशमांना दिसून आले की , मूठभर लोकांनी आपला फजितवाडा केला. आपल्याला बावळट बनविले. किल्ला पूर्णपणे कब्जात आला होता. झेंडे लागले होते. कणेर् वाजतच होते. कोंडाजीने रायगडाकडे ही विजयाची बातमी कळविण्यासाठी महाराजांकडे घोडेस्वार पिटाळला.
केवढी युक्तीबाज शक्ती कोंडाजीने दाखविली. अवघ्या , ‘ साठी लोकांनसी कोंडाजी फर्जंदाने भेदेकरोन पन्हाळा कब्जा केला. ‘ हे गनिमी काव्याचे बळ. हे स्वराज्यनिष्ठेचे बळ. हे महत्त्वाकांक्षेचे बळ. खरोखरच या महत्त्वाकांक्षेपुढे ते उंच उंच गगन ठेंगणे पडत होते. आजच्या काळातल्या अग्निबाणासारखे ते सुसाट सुटून ग्रहनक्षत्रांचा वेध घेऊ पाहात होते.
|| शिवचरित्रमाला || |
शिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.
कोंडाजी फर्जंद याने पन्हाळ्यासारखा अती अती अवघड गड अवघ्या एकाच हल्ल्यात फक्त साठ सैनिकांच्यानिशी काबीज केला. पन्हाळगडावरच्या या कोंडाजी फर्जंदाच्या झडपेला नाव द्यावेसे वाटते ‘ ऑपरेशन पन्हाळगड ‘! चिमूटभर मराठी फौजेनिशी , परातभर शत्रूचा , कमीतकमी वेळेत पराभव करून कोंडाजीने पन्हाळ्यासारखा महाजबरदस्त डोंगरी किल्ला काबीज केला , हा केवळ चमत्कार आहे. पुढच्या शतकातील एका इंग्रजी सेनापतीने फार मोठा पराक्रम गाजवून त्रिचनापल्लीचा किल्ला टिपू सुलतानाच्या हातून जिंकून घेतला.
लॉर्ड कॉर्नवॉलीसने अवघ्या शंभर इंग्रजांच्यानिशी हा महाबळकट त्रिचनापल्लीचा गड जिंकला. (इ. १७९२ ) खरोखर ही लॉर्ड कॉर्नवॉलीसच्या कौतुकाचीच गोष्ट होती. त्याचे कौतुकही इस्ट इंडिया कंपनीच्या हिंदुस्थानातील छावण्या-छावण्यांत तर झालेच , पण इंग्लंडमध्येही वृत्तपत्रांत , पार्लमेंटातही त्याचे अपार कौतुक झाले. ते योग्यच होते. अवघ्या शंभरांनी हा अचाट चमत्कार करून दाखवला होता. पण अवघ्या साठांच्यानिशी पन्हाळ्यासारखा बुलंद आणि महाअवघड गड आमच्या कोंडाजी फर्जंद मावळ्याने तासा- दीडतासांत जिंकला , हे आजच्या आम्हा मराठी माणसांनाही माहीत नसावं हा आमचा विस्मरणाचा केवढा महापराक्रम! किती करावे आमचेच आम्ही कौतुक!
पन्हाळगडावर आम्ही आज जातो , तेव्हा हा इतिहास सांगायला कुणी अभ्यासू गाईडही सापडत नाही. जो गाईड सापडतो , त्याच्याकडून कोणच्या पिक्चरचे शूटिंग कुठे झाले अन् कोणच्या नट-नट्या कसकसा रोमान्स करीत होत्या , हेच ऐकायला मिळते. अन् जिकडेतिकडे कोणत्या तरी नामवंत सिगारेटच्या जाहिराती! महाराजांच्या , कोंडाजी फर्जंदाच्या छत्रपती ताराराणीसाहेबांच्या आणि राजषिर् शाहू छत्रपतींच्या हरविलेल्या ‘ पन्हाळगडा ‘ चा आम्हाला पन्हाळगडावर हिंडूनही पत्ता लागत नाही. एक आमचे मुरलीधर गुळवणी मास्तर होते. ते छातीतला खोकला अन् दम्याची धाप सावरीत सावरीत पोराबाळांना पन्हाळा समजावून सांगत होते.
कधीकधी तर पन्हाळ्यापासून विशाळगडापर्यंत महाराज आणि बाजीप्रभू आपल्या मावळ्यांच्यानिशी धोधो पावसातून , रात्री , कसे निसटले हे आमचे गुळवणीमास्तर स्वत: पोरांच्याबरोबर त्या बिकटवाटेने चालत जाऊन समजावून सांगत असत. आता गुळवणीमास्तर नाहीत. धार लागेपर्यंत मास्तरांनी पन्हाळ्यावर लोकांना इतिहास सांगितला. जमविलेली ऐतिहासिक कागदपत्रे आणि गंजलेल्या तलवारी अन् गवसलेल्या बंदुकीच्या शिशाच्या गोळ्या आमच्या पोराबाळांना जडजवाहिऱ्याच्या थाटात वर्णन करून दाखवल्या.
आज आमचे मास्तर नाहीत. पन्हाळ्याचा जणू हा शेवटचा किल्लेदार स्वगीर् निघून गेलाय. खरोखर असं वाटतं की , महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत असे एकेक तरी गुळवणीमास्तर असावेत. आमची पोरंबाळं शहाणी होतील हो! पन्हाळगडाचा पिकनिक स्पॉट होता कामा नये. कोंडाजी फर्जंदाने महाराष्ट्राच्या लष्करी इतिहासात एक सोन्याचं पान दाखल केलं , यात शंका नाही. खरोखर जगाच्या इतिहासात या कोंडाजीच्या लढाईची खास नोंद करावी लागेल.
पन्हाळगड कोंडाजीने काबीज केल्याची खबर शिवाजीमहाराजांना ऐन पाडव्याच्या दिवशी रायगडावर समजली. (दि. ९ मार्च १६७३ ) ज्या घोडेस्वाराने दौडत येऊन रायगडावर महाराजांना ही खबर दिली , त्या घोडे स्वाराच्या तोंडात महाराजांनी स्वत:च्या हाताने साखरेची चिमूट कौतुकाने घातली. ही कौतुकाची चिमूट कोंडाजीच्या आणि त्याच्या साठ मर्दांच्या मुखातच महाराज घालीत होते. महाराज ताबडतोब रायगडावरून पन्हाळगडाकडे निघालेच. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना घेऊन निघाले. बरोबर फौज घेतली सुमारे पंधरा हजार. नक्की आकडा माहीत नाही. पण अंदाज चुकीचा न ठरावा. म्हणजे बघा. पन्हाळगड जिंकला साठ मावळ्यांनी अन् महाराज कोंडाजीचं कौतुक करायला निघाले होते , सरसेनापतीसह काही हजार मावळ्यांच्यानिशी. महाराज जणू कोंडाजीला ही लष्करी सलामीच द्यायला चालले होते.
महाराजांनी रायगडावरून निघताना मातोश्री जिजाऊसाहेबांना दंडवत करायला पिंड्ये या नावाचा एक विद्वान कवी आलेला होता. त्याने ही नोंद करून ठेवली आहे. इतकेच नव्हे तर पन्हाळगड कसा काबीज केला आहे हे त्याने सविस्तर लिहून ठेविले आहे. या प्रकरणाचे नाव ‘ पर्णाल पर्वतग्रहणाख्यान ‘. म्हणजे पन्हाळागड कसा जिंकला याची हकीकत.
महाराज दि. १२ मार्च १६७३ रोजी पन्हाळगडावर पोहोचले. दक्षिणेच्या ‘ तीन दरवाजा ‘ नावाच्या भव्य दरवाजाने गडात प्रवेशले. कोंडाजीचे आणि त्याच्या मर्दांचे हे साक्षात सोनेरी कौतुक तीन दरवाज्यांत झळाळत होते. तेरा वर्षांनंतर पुन्हा पन्हाळा स्वराज्यात दाखल झाला होता. केवढा आनंद! रणवाद्यांच्या आणि रणघोषणांच्या दणदणाटात महाराजांनी पन्हाळा पाहिला. त्यांनी सोमेश्वर महादेवाची स्वत: पूजा केली. त्यावेळी सैनिकांनी गडावरील सोनचाफ्याची फुले पूजेसाठी महाराजांपुढे आणून ठेवली. महाराजांनी सोमेश्वराला सोनचाफ्याचा लक्ष वाहिला.
हा झाला इतिहास. गनिमी काव्याचे युद्धतंत्र महाराजांप्रमाणेच त्यांच्या सरदारांनीही किती अचूक आत्मसात केले होते , ते येथे प्रत्ययास आले. आणखी एक गोष्ट. ऐन फाल्गुनी अमावस्येच्या अगदी तोंडावर म्हणजे वद्य त्रयोदशीच्या मध्यरात्री कोंडाजीने काळोख्या मुहुर्तावर ही जबर लढाई दिली.
अवसेच्या अंधाराची वा अशुभ दिवसाची त्याला भीती वाटली नाही. आठवणही झाली नाही. स्वराज्याच्या पवित्र कामाला काळोखी रात्रच काय आमावस्या असली तरीही ती पौणिर्मेहूनही मंगलच. या वषीर्च्या फाल्गुनी अवसेच्या गर्भात चैत्राचा गुढीपाडवा दडलेला होता. अंधश्रद्धा उधळून लावता येते खऱ्या श्रद्धेनेच.
महाराजांनी पन्हाळ्यावर सरसेनापती प्रतापराव गुजर यांना एक अत्यंत महत्त्वाची लष्करी कामगिरी सांगितली. ‘ सरनौबत , एक करा. पन्हाळगड आपण घेतल्याची खबर विजापुरास आदिलशाही दरबारास नक्कीच समजली असणार. हा पन्हाळगड आणि भोवतीचा आपल्या ताब्यात आलेला प्रदेश पुन्हा जिंकून घेण्याकरिता विजापुराहून नक्कीच कुणीतरी महत्त्वाचा सरदार किंवा शाही सेनापती लौकरच चाल करून येणार. जो कुणी येईल , त्याला तुम्ही आपल्या फौजेनिशी सरहद्दीवरच अडवा. बुडवा. तुडवा. पुन्हा करवीरच्या मुलुखात बादशाही फौजेची टाप पडता कामा नये. ‘
सरनौबत प्रतापराव गुजर सुमारे (नक्की आकडा माहीत नाही) १५ हजार फौज घेऊन पूवेर्च्या दिशेने सरहद्दीकडे निघाले.
शिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.
पन्हाळगड म्हणजे दख्खनचा दरवाजा. या दरवाज्यावर तेरा वर्षानंतर पुन्हा स्वराज्याचा झेंडा लागला. पन्हाळगड आणि गडाच्या पूवेर्कडचा कागलपट्टा स्वराज्यात मराठ्यांनी घेतला याच्या खबरा विजापुरास वाऱ्याच्या वेगाने पोहोचल्याच. यावेळी विजापुरात बादशाह होता सिकंदर बिन अलिआदिलशाह. या सिकंदरचे वय होते चार वर्षाचे. अंगठा चोखण्याचे हे वय. सारा राज्यकारभार पठाणी सरदारांच्या वर्चस्वाखाली गेला होता. वजीरी मात्र खवासखानाकडे होती. विजापूरची अवस्था खंगलेल्या क्षयरोग्यासारखी झाली होती. अशी अवस्था झाली असूनही दरबारात पठाणी पक्ष आणि दक्षिणीपक्ष असे दोन पक्ष निर्माण झाले होते. या पक्षांतील स्पर्धा महाराजांनी अचूक टिपली होती. स्वराज्याच्या विस्ताराला ही भांडणे पथ्यावर पडत होती.
वजीर खवासखानाने कोल्हापूर प्रांत आणि पन्हाळगड पुन्हा जिंकून घेण्याकरता दरबारातील सरदारांस एकत्र बोलावून आवाहन केले. या सरदारांना वजीराने मोठ्या कळकळीने म्हटले , ‘ यह नातवान बादशाह खुदाने आपके सुपूर्द किया है। पहले जिस तरह आपने सल्तनत जिंदा रखी थी , उसी तरह आगे भी रखो! ‘
या आवाहनाने सारे सरदार गंभीर झाले. या सरदारांतील एक सरदार तर खरोखरच बेचैन झाला. तेवढाच तो मराठ्यांवर संतप्तही झाला. हा सरदार उत्तम योद्धा होता. उत्कृष्ट सेनापती होता. तो थोडाफार मुत्सद्दीही होता. पण या परिस्थितीने तो भावनाविवश झाला. कारण तो जरी मूळचा अफगाणी पठाण होता तरीही त्याची सिकंदर आदिलशाहासारख्या दख्खनी बादशाहावर अपार निष्ठा होती. या पठाण सरदाराचे नाव होते , अब्दुल करीम बहलोलखान. पन्हाळगड आणि कोल्हापूर प्रांताचा बराचसा भाग बहलोलखानच्या जहागिरीतच समाविष्ट होता. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष फार मोठे नुकसान झाले होते. त्याने ही पन्हाळगडची मोहीम आपल्या शिरावर घेतली. बाकीच्या सरदारांनीही बहलोलची मनापासून तारीफ केली.
बहलोलनेही स्वारीवर निघण्याकरता अगदी तातडीने तयारी सुरू केली. निघण्यापूवीर् त्या छोट्या बादशाह सिकंदर आदिलशाहच्या हस्ते बहलोलला मानाचे विडे आणि दोन हत्ती अन् चार घोडे गौरवार्थ बहाल करण्यात आले. फार मोठी फौज घेऊन बहलोल निघाला. त्याची फौज नक्की किती होती , ते समजत नाही. पण अंदाजे ती वीस हजारांपर्यंत असावी. त्यात सहा हत्ती आणि घोडदळ , पायदळ होते. तोफखाना त्याच्या सांगाती नसावा असे दिसते. असल्याची नोंदही नाही.
बहलोल विजापुराहून तिकोटा ते जत या मार्गाने निघाला. तो बहुदा दि. १३ मार्च १६७३ या दिवशी निघालेला असावा. त्याची ही मोहीम मोठ्या इषेर्ची होती. जणू काही दुसरा अफझलखानच मराठी मुलुखावर निघाला होता. तो जतच्या जवळील डफळापूर , उमराणीच्या रोखाने जल्दीने कूच करीत होता. तो दि. १६ मार्च १६७३ च्या मध्यरात्री उमराणीजवळच्या परिसरात येऊन पोहोचला. शुद्ध सप्तमीचा चंद आभाळात कललेला होता. बहलोलने आपल्या दमलेल्या सैन्याला थोडी विश्रांती मिळावी या हेतूने उमराणीच्या त्या उंचसखल मैदानावर मुक्काम करण्याचा हुकुम दिला. हे मैदान खुरट्या झुडपांचे आणि लहानसहान टेकडांचे होते. याच मैदानावर त्याचे सैन्य उतरले. अन् आराम करण्याकरता पहुडले. फार तर तीन-चार तास मुक्काम करून पुढे कोल्हापूरच्या दिशेने निघण्याचा त्याचा इरादा होता.
बहलोलखान पठाण उमराणीच्या रोखाने येत असल्याची खबर प्रतापराव सरनौबत यांना त्यांच्या बातमीदारांनी कळविली. कायमचेच ताजेतवाने असलेले मराठी सैन्य आणि प्रतापराव बहलोलच्या रोखाने उमराणीकडे धावले. प्रतापरावांनी अचूक डाव साधला. बहलोलचे सैन्य आराम करीत होते. त्या सैन्याच्या तळाभोवती आपल्या मराठी सैन्याचा गराडा टाकून त्यांनी बहलोलला कोंडीत गाठले. बहलोलला याची कल्पनाही नव्हती की आपण मराठ्यांच्या जाळ्यात अचूक अडकलो आहोत. प्रतापरावांनी या शाही सैन्यावर यावेळी (दि. १६ मार्चची पहाट) अजिबात हल्ला चढविला नाही. शिकार खेळावी , तसाच डाव रावांनी टाकला. कारण एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट इथे घडली होती की , बहलोलखान बिनपाण्याच्या रखरखीत प्रदेशात ऐन मार्चच्या उन्हाळ्यात अडकला गेला होता. जवळच एक लहानशी नदी होती , आजही आहे , तिचे नाव डोण. या नदीला कसंबसं झुरुमुरु पाणी होते. पण ही नदी प्रतापरावांनी ओलांडून पैलतीरावर आपला गराडा टाकला होता. त्यामुळे या नदीचाही बहलोलशी संपर्क रावांनी तोडला होता.
जरा पहाट झाली. छावणी अजून बहलोलभोवती विश्रांती घेतच होती. शाही सैन्यातले सहा हत्ती या पहाटे डोण नदीच्या पाण्यावर नेण्याकरिता माहुतांनी चालविले. खरं म्हणजे हे माहुतही पेंगुळलेले होते. हत्ती घेऊन माहूत डोणच्या रोखाने येत होते. थोड्याच वेळात त्यातील कोणा माहुताला अंधुकशा उजेडात समोर पसरलेल्या मराठी स्वारांची चाहूल दिसली. त्याचे धाबेच दणाणले. मराठे! शत्रू समोर दिसताच तो माहूत अन् लगेच बाकीचेही माहूत सावध होऊन मोठमोठ्याने ओरडू लागले.
‘ गनीम , गनीम! ‘ हत्ती पुन्हा तळाकडे वळवीत ते माहूत ओरडतच होते , ‘ गनीम , गनीम! ‘ हत्तीही चीत्कारत होते. पळत होते. हा कल्लोळ खानाच्या बेसावध तळावर काही क्षणातच पोहोचला. सारं शाही सैन्य खडबडून उठलं. बहलोल उठला. अन् बघतात तो त्या उजाडत्या प्रकाशात त्यांना दिसलं की , आपण मराठ्यांच्या गराड्यात सर्वबाजूंनी वेढले गेलेेलो आहोत.
बहलोलचे डोळे खाडकन उघडले गेेले. त्याला त्याची चूक आणि मराठ्यांनी साधलेला डाव क्षणात लक्षात आला. आता ? ही मराठी कोंडी फोडून बाहेर पडण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. कारण हा सारा रखरखीत बिनपाण्याचा उन्हाळा आणि ती इवलीशी नदीसुद्धा मराठ्यांच्या कब्जात. आता ?
आता निकराचे युद्धच. नाहीतर पाण्यावाचून मृत्यु. त्या परिसरात खोल गेलेल्या चिमूटभर विहिरींना पाणी कितीसे असणार ?
एक लहानशी चूक , बहलोलला किती महागात पडत होती पाहा. रात्री तळ टाकताना त्याने फक्त दमलेल्यांच्या विश्रांतीचा विचार केला. पण त्याचवेळी तळाभोवती आपल्या गस्तवाल्या सैनिकांची गस्त ठेवली नाही. गाढ झोपले आणि हे सगळे मासे आता पाण्यावाचून तडफडायला लागले. जेवढी माणसे तेवढीच जनावरे अन् पाणी नाही अशी अवस्था.
खानाने ताबडतोब बेधुंद अवस्थेत आपल्या साऱ्या सैन्याला ही कोंडी फोडून बाहेर पडण्याचा इशारा दिला. एल्गार , एल्गार , एल्गार!
शिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.
बहलोलखान पठाणाने आपली फौज प्रतापरावांच्या गराड्यावर सोडली. मराठ्यांची कोंडी फोडण्याकरता बहलोलची फौज मराठ्यांवर निकराने तुटून पडली. मराठ्यांनी शाही फौज अचूक कोंडली होती. बाहेर पडायला शत्रूला वाट मिळेना , फट मिळेना बहलोलचे सारे हल्ले मराठ्यांनी परतवून लावले. फौज पुन्हा कोंडली गेली. सूर्य माथ्यावर तळपत तळपत चढत होता. पाणी ? जर आपण लौकरात लौकर या गळफासातून बाहेर पडलो नाही तर पाण्यावाचून मरायची वेळ येणार आहे , हे बहलोलला समजत होते.
त्या मानानं प्रतापरावांचे सैनिक सुखरूप झुंजत होते. त्यांना पाणी मिळण्याच्या वाटा आणि ती चिमुकली डोण नदी मोकळी होती. खरोखर प्रतापरावांनी या बहलोली सैन्याला गराडा टाकण्याच्या वेळीच जर झोपेतच त्यांच्यावर घाव घालून तोडातोडी केली असती , तर तासा दीड तासातच हे युद्ध रावांनी जिंकलं असतं. पण शाही फौजेला मराठी तडाखा दाखविण्यासाठी राव शिकारीसारखा खेळ मांडून बसले होते.
एक दिवस उलटला , दोन दिवस उलटले , तीन-चार- पाच तरीही कोंडी फुटत नव्हती. मराठे हटत नव्हते. बहलोलची अवस्था व्याकूळ झाली होती. विजापुराहून मदत मागवावी , तरीही अशक्य होतं. रस्तेच मराठ्यांनी बंद करून टाकले होते. यावेळी मोगलांचा सरदार खानजहान बहाद्दूर बहाद्दूरखान कोकलताश हा मिरजेपाशी होता. त्याने बहलोलच्या मदतीस नव्हे , पण मराठ्यांच्या विरुद्ध हल्ला करण्याकरता एकदा चाल केली. पण मराठ्यांनी त्याचा हल्ला पाचोळ्यासारखा उधळून लावला. तो पुन्हा आलाच नाही.
वैऱ्यावरही येऊ नये अशी वेळ बहलोलवर येऊन पडली होती. पाणी नाही , पाणी नाही.
आता पाण्याविना बहलोलची घोडी तडफडू लागली. मरू लागली. पाणी नाही. आडातच नाही तर पोहोऱ्यात कुठून येणार! अपुरे पाणी किती पुरविणार ? पाणी होते. पुरेपूर होते , ते फक्त मराठ्यांच्या तलवारीत.
पंधरा दिवस उलटले. बहलोेलची काय अवस्था झाली असेल ? त्याची तर अशी उमेद होती की , कोल्हापूर अन् पन्हाळा तर जिंकतोच , पण कोकणातही उतरतो. अन् दर्यावर आदिलशाहीचा शाही शिक्का उमटवतो. पण पाणीच नाही.
वीस दिवस उलटले. बहलोलची जनावरेच काय पण आता माणसेही पाण्यावाचून तडफडू लागली.
यावेळी महाराज शिवाजीराजे पन्हाळगडावरच होते. त्यांना नितांत खात्री होती की , माझा डाव फत्ते पावणार. शत्रूचे डंके आणि झेंडेच काय , पण प्रत्यक्ष शत्रूच्या सरदारांना आणि सेनापतीला ही आमचे राव गिरफ्तार करतील. कब्जात घेतील.
प्रतापरावांना समोर दिसणारी बहलोलची पाण्याविना दाणादाण समजत होती. पण सेनापतीच्या कठोर मनानं ते शत्रू सैन्याचा सर्व बाजूंनी गळा आवळून उभे होते.
हा इतिहास म्हणजे केवळ योगायोग का ? केवळ नशीबाचा खेळ का ? गेली तीनशे वर्ष सुलतानांच्या गुलामगिरीत केविलवाणे कण्हत अन् रडत मराठी माणसं जगत होती. पण आपल्या मनगटाच्या बळावर आज मराठी माणसं अशी जिद्द गाजवीत होती. महाराजांनीच त्यांना शिकवलं होतं की मनात आणा , तुम्ही वाट्टेल ते करू शकाल. अफगाणिस्तानातल्या एका नामवंत पठाणाला एका मराठी प्रतापवंताने चिमट्यात पकडले होते. आता आपले होणार तरी काय , हे बहलोलला समजत नव्हते. उभी असलेली माणसं त्याच्या डोळ्यादेखत पाणी पाणी करीत कोसळत होती. उंटांच्या पोटातही पाणी उरले नव्हते.
प्रतापराव या साऱ्या पठाणी फौजेची कत्तल करणार होते का ? त्यांनी तशी शत्रूची कत्तल करावी असे महाराजांना वाटत होते का ?
नाही! ती मराठी संस्कृतीच नव्हती. पण शत्रूचे सेनापती मराठी झेंड्याच्या पायाशी शरण यावेत , त्यांनी या झेंड्याच्या सावलीत खुशाल जगावं , शत्रूत्त्व सोडावं , स्वराज्याची सेवा करावी अशीच महाराजांची इच्छा आजपर्यंत दिसून आली नव्हती काय ? इथं या उमराणीच्या रणांगणावर शत्रूचा सेनापती हा शरण येऊन आपल्या पुढे दाखल व्हावा हीच इच्छा महाराजांची होती.
महाराज त्या विजयाच्या वार्तेची वाट पाहात होते. आणि मग ?
शिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .
नेतोजी पालकर औरंगजेबाच्या हाती लागला तेव्हा नेतोजीचा काका कोंडाजी पालकर , पुत्र जानोजी पालकर आणि नेतोजीच्या दोन बायका याही शाही बंधनात पडल्या. नेतोजीची आणखी एक बायको होती. ती मात्र निसटली. तिचे पुढे काय झाले , ते इतिहासास माहीत नाही. नेतोजीला एक पुत्र होता जानोजी पालकर. त्याचे वय यावेळी फक्त तीन वर्षाचे होते. औरंगजेबाने या पकडलेल्या संपूर्ण पालकर कुटुंबाला धर्मांतरीत केले.
इ. १६६७ ते इ. १६७६ प्रारंभापर्यंत नेतोजी आणि जानोजी हे अफगाणिस्तानात मोगली छावणीत होते. नेतोजीच्या इतर कुटुंबियांचे काय झाले ते समजत नाही. दौंड ते अहमदनगर या रस्त्यावर काष्टी आणि तांदळी या नावाची दोन गावे आहेत. पालकरांचे घराणे इथलेच. शिवाजी महाराजांच्या एक राणीसाहेब. पुतळाबाईसाहेब यांचे माहेर पालकर घराण्यातील होते. पण नेतोजींचे आणि पुतळा बाईसाहेबांचे नेमके काय नाते होते , ते समजत नाही.
सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यांत वादळी पराक्रम गाजविणारा एक जबरदस्त योद्धा औरंगजेबाच्या तडाख्यात सापडल्यामुळे कुठल्याकुठे अफगाणिस्तानात फेकला गेला. पालकर घराण्याची एक शाखा नांदेड जिल्ह्यात आहे. परंतु नांदेड , काष्टी तांदळी , नागपूर इत्यादी ठिकाणी आज अस्तित्त्वात असलेल्या पालकर घराण्यांचे परस्परसंबंध काय होते ते कागदोपत्री सापडत नाही. अधिक संशोधनाची गरज आहे.
इ. १६७३ मध्ये काशी क्षेत्रातील एक थोर विद्वान पंडित काशीहून महाराष्ट्रात आला. या पंडिताचे नाव गंगाधरभट्ट उर्फ गागाभट्ट असे होते. त्यांचे आडनांव ‘ भट्ट ‘ हेच होते. हे विश्वामित्र गोत्री देशस्य ऋग्वेदी ब्राह्माण घराणे मूळचे पैठणचे. या घराण्यात परंपरेने अनेक ग्रंथ लिहिले गेले. बहमनी सुलतानांच्या प्रारंभकाळात हे घराणे पैठण सोडून बाहेर पडले. शेवटी हे स्थिरावले काशी क्षेत्रात श्रीगंगेच्या काठी.
गागाभट्ट हे महाराष्ट्रीय पंडित. ते शिकाळात इ. स. १६६३ – ६४ या काळात काशीहून महाराष्ट्रात काही महिन्यांपुरते येऊन राहिले होते. शिवाजी महाराजांचा व त्यांचा परिचय त्याचकाळातला. काही धामिर्क प्रश्ानंच्या सोडवणुकीसंदर्भात शिवाजी महाराजांनी एक , धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानांची समिती नेमली. या समितीचे प्रमुखपद महाराजांनी सात वषेर् वयाच्या युवराज संभाजीराजे हे उत्तम संस्कृतज्ञ भाषापंडित झाले. संभाजीराजांनी पुढे बुधभूषण , नायिकाभेद आणि आत्मचरित्र कथन करणारे एक विस्तृत संस्कृत दानपत्रही लिहिलेले उपलब्ध आहे.
संभाजी महाराजांची पुढच्या काळात जयपूरच्या महाराजा रामसिंगला लिहिलेली संस्कृत भाषेतील पत्रेही सापडलेली आहेत. म्हणजेच युवराज संभाजीराजांच्या अभ्यासू वृत्तीचा प्रारंभ इतक्या लहानपणी शिवाजी महाराजांनी करून दिलेला दिसतो. त्यातून महाराजांचे आपल्या पुत्राच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे किती लक्ष होते , हे ही लक्षात येते. युवराज संभाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल बखरकारांनी व दंतकथा लेखकांनी पुढच्या काळात किती विपरित चित्र रंगविणे हे पाहिले आणि संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतील हा अभ्यासप्रवास पाहिला की , सारे गैरसमज आपोआप विरघळून पडतात.
गागाभट्ट महाराष्ट्रात आले ( इ. १६६३ – ६४ ) त्यावेळी त्यांनी काही धामिर्क , सामाजिक समस्यांवरती जे लेखन केले आणि धामिर्क निर्णय दिले , ते आज उपलब्ध आहेत. तसेच इ. १६७३ पासून पुढे त्यांचे जे काही वास्तव्य स्वराज्यात घडले , त्याही काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले , राजाभिषेक प्रयोग , शिवाकोर्दय , समयनय हे ग्रंथ त्यापैकीच होत. समयनय हा ग्रंथ उपदेशात्मक संस्कृत भाषेतील आहे. तो सुभाषितांसारख्या वचनांनी परिपृत आहे.
गागाभट्ट हे शिवाजीमहाराजांच्या दर्शनासाठी येत होते. मूळ नोंदीत ‘ दर्शन ‘ हाच शब्द वापरला आहे. त्यावरून त्यांच्या मनात महाराजांचेबद्दल असलेली केवळ आदराचीच नव्हे , तर भक्तिची भावना व्यक्त होते.
काशी क्षेत्रातील या भट्ट घराण्याची वंशावळ उपलब्ध आहे. गागाभट्ट हे बहुदा अविवाहित वेदाभ्यासी आणि पारमाथिर्क जीवनच जगले , असे दिसते. त्यांनी लिहिलेल्या संस्कृत प्रकांड गंथांची यादी बरीच मोठी आहे. त्यांना काशीक्षेत्रातील विद्वत् मंडळात अग्रपूजेचा मान होता. श्री काशीविश्वनाथ आणि श्री बिंदुमाधव ही दोन दैवते त्यांची आराध्यदैवते होती. असे हे मूळ महाराष्ट्रीय पैठणचे पंडित कमीतकमी दहा वषेर् आधीपासूनच महाराजांच्या परिचयाचे होते. ते आता महाराजांच्या दर्शनासाठी रायगडची वाट चालत होते.
शिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…
समुदाला रत्नाकर म्हणतात. समुदाच्या पोटात अगणित मौल्यवान रत्ने असतात म्हणे. शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुळाजी आंग्रे , दौलतखान , सिद्दी मिस्त्री , दर्यासारंग इत्यादी देवमासे आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते. खरोखर कोकणात रत्नाकर होता आणि रत्नागिरीही होता. कोकणच्या भूमीवर गाजलेली घराणी अनेक होती. शिर्के , राजे , सुर्वे , शिंदे , मोरे , तावडे , धुळप , सावंत , नाडकर , चित्रे , मांडकर , जाधव आणि कितीतरी , यातच काही समाजचे समाज आरमारावर स्वार झाले होते.
आगरी , कोळी , भंडारी , गावित , कुणबी , वगैरे. याशिवाय गलबते बांधणारी कामगार मंडळीही अनेक होती. संगमिरी हा युद्ध गलबताचा नवीनच प्रभावी प्रकार. याच कामगारांनी आरमारात आणला. या साऱ्यांचाच संसारापेक्षा समुदावरच अधिक प्रेम होते , निष्ठा होती. अन् शिवाजी महाराजांचेही या सर्वांवर अतुल प्रेम आणि अपार निष्ठा होती. महाराजांच्या आयुष्यातील (दि. १९ फेब्रुवारी १६६० ते ३ एप्रिल १६८० ) सर्वात जास्त दिवस महाराजांचे कोकणात वास्तव्य घडले आहे. कोकणच्या भूमीवर त्यांचे आईसारखे प्रेम होते. कोकणातली माणसं त्यांना कलमी आंब्याइतकी , बरक्या फणसाइतकी आणि मिठागरातील खडेमिठाइतकी आवडीची होती. त्यातीलच हा पाहा एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं , लायजी सरपाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा. विलक्षण धाडसी , शूर आणि विश्वासू.
मुरुडचा जंजिरा सिद्द्यांकडून कायमचा काबीज करण्यासाठी महाराजांचा जीव मासळीसारखाच तळमळत होता. जंजिऱ्यावरील एक मोहीम त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांवर सोपवली. मोरोपंत कोकणी आणि घाटी हशमांची फौज घेऊन तळघोसाळे आणि मुरुड केळशीच्या परिसरात दाखल झाले. जंजिऱ्यावरची मोहिम कशी करावी याचे आराखडे ते आखीत होते. पाण्यातली लढाई , कशीही करायची म्हटली तरी अवघडच. मोरोपंत विचार करीत होते.
त्यातच या लायजी पाटील कोळ्याच्या डोक्यात एक मासळी सळसळून गेली. त्याचा मोहिमेचा विचार असा की , जंजिरा किल्ल्याच्या तटालाच समुदातून शिड्या लावाव्यात आणि एखाद्या मध्यरात्रीच्या गडद अंधारात होड्यामचव्यांतून मराठी लष्कर या तटाला लावल्या जाणाऱ्या शिड्यांपाशी पोहोचवावे. अन् मग शिड्यांवरून चढून जाऊन लष्कराने ऐन किल्ल्याच्या आतच उड्या घ्याव्यात. हबश्यांवर हल्ला चढवावा. अन् जंजिरा आपल्या शौर्याच्या लाटेने बुडवावा. ही कल्पना अचाट होती. कोंडाजीने पन्हाळगड घ्यावा किंवा तानाजीने सिंहगड घ्यावा , अशी ही अफलातून कल्पना , लायजीच्या मनात आली. हे काम सोपं होतं की काय ? कारण जंजिऱ्याच्या तटाबुरुजांवर अहोरात्र हबशांचा जागता फिरता पहारा होता.
अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं ? मुळात समुदात शिड्या लावायच्या तरी कशा ? आवाज होणार , हबशांना चाहूल लागणार. होड्यांत शिडी उभी करून तटाला भिडवली की , दर्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार , शिड्या हलणार. वर गनीम जागा असणार. तो काय गप्प बसेल ? त्यांच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्या , र्वच्या , बंदुकांखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड , अशक्यच होता , तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यानरात्री करायचं ठरविलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजविला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं , ‘ आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही वेगीवेगी मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. ‘
मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या. जंजिऱ्याच्या तटांवर रास्त घालणारे धिप्पाड हबशी भुतासारखे येरझाऱ्या घालीत होते. लाय पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली , तर ? मरणच.
लाय पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावून होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेचनात. त्या भयंकर अंधारात लायपाटील क्षणक्षण मोजीत होता.
किती तरी वेळ गेला , काय झालं , कोणास ठावूक ? ते इतिहासासही माहीत नाही. पण मोरोपंत आलेच नाहीत. लाय पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळुहळू अंधार कमी होत जाणार आणि ‘ प्रभात ‘ होत जाणार. (मूळ ऐतिहासिक कागदांत ‘ प्रभात ‘ हाच शब्द वापरलेला आहे.) अन् मग उजेडामुळे आपला डाव हबश्यांच्या नजरेस पडणार. अन् मग घातच! पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं ? लायजीला काही कळेचना. त्याच्या जिवाची केवढी उलघाल त्यावेळी झाली असेल , याची कल्पनाच केलेली बरी.
अखेर लाय पाटील निराश झाला. हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारांसह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दु:ख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला , योजना का फसली हे आज कोणालाच माहीत नाही. पण एक विलक्षण आरमारी डाव वाया गेला अन् लायजीची करामत पाण्यात विरघळली.
एका कोळियाने जाळे फेकियले. परि ते वाया गेले.
हा सारा प्रकार शिवाजी महाराजांस रायगडावर समजला. आणि मग ?
शिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.
लायजी सरपाटलाची अचाट धाडसी मोहीम न घडताच वाया गेली. शिवाजी महाराजांना जंजिऱ्याचा हा अफलातून पण वाया गेलेला डाव रायगडावर समजला. मोरोपंतांनी हा डाव आपल्या हातून का तडीला गेला नाही , याचे उत्तर महाराजांना काय दिले ते इतिहासात उपलब्ध नाही. पण महाराज मोरोपंतांवर नाराज झाले , यात शंकाच नाही. कदाचित मोरोपंतांची अगतिकता महाराजांच्या थोडीफार लक्षात आलीही असेल ; पण महाराज नाराज झाले हे अगदी सत्य. ते मोरोपंतांना म्हणाले , ‘ पंत , तुम्ही कोताई केली. मोहीम फसली. ‘
लायपाटलांच्या या प्रकरणाच्या बाबतीत अधिक माहिती संशोधनाने मिळेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत काहीच सांगता येत नाही.
पण याही प्रकरणात महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर एक सूर्यकिरण झळकन् झळकून गेला. महाराजांनी कुलाब्यास आज्ञा पाठवून लायजी सरपाटलास रायगडावर बोलावून घेतले.
या जंजिऱ्याच्या प्रकरणाची रायगडावर केवढी कुजबूज चालू असेल नाही यावेळी ?
महाराजांनी भर सदरेवर लायजीस बोलावले. तो आला. उभा राहिला. त्याला पाहून महाराज भरल्या आवाजात म्हणाले , ‘ शाबास! लायजी तू केवढी मोठी कामगिरी केली , शाबास. जंजिऱ्यास सिड्या लावल्या. ‘
लायजीला याचा अर्थच क्षणभर कळला नसेल. तो गोंधळलाही असेल. एका फसलेल्या करामतीचे महाराज कौतुक करतात ही गोष्ट मोठ्या नवलाचीच. महाराज आपल्या कारभारी अधिकाऱ्याला म्हणाले , ‘ लायजी सरपाटलांना पालखीचा मान द्या. ‘ हे ऐकून सारी राजसदर चपापली असेल नाही ? पण लायजी पाटील नक्कीच चपापला. तो म्हणाला , ‘ महाराज , मोहिम तर फते झालीच नाही. मग मला पालखीचा एवढा मोठा मान कशाकरिता ? मला नको ‘ त्यावर महाराज म्हणाले , ‘ नाही लायजी , हा तुझ्या बहाद्दुरीचा मान आहे. जंजिऱ्यासारख्या भयंकर अवघड लंकेस तू शिड्या लावल्यास ही गोष्ट सामान्य नव्हे. शाबास. म्हणून हा पालखीचा मान. ‘
तरीही लायजी म्हणत होता , मला पालखी नको. मान नको.
लायजीच्या या मनाच्या मोठेपणाची आणि खोलीची मोजमापं कशानं घ्यावीत ? हा त्याग आहे. ही स्वराज्यनिष्ठा आहे. यालाच आम्ही राष्ट्रीय चारित्र्य म्हणतो आहोत. यावर अधिक काही भाष्य करण्यासाठी आमच्या शिलकीत शब्द नाहीत.
महाराज लायजीचे हे मन पाहून लगेच आपल्या अधिकाऱ्यास म्हणाले , ‘ लायजी सरपाटलांस एक गलबत द्या आणि त्या गलबताचे नाव ‘ पालखी ‘ ठेवा. ‘ त्याप्रमाणे लायजीस एक गलबत बक्षीस देण्याची व्यवस्था झाली.
हे आणि असे शिवकाळातील प्रसंग पाहिले , की लक्षात येते की , हिंदवी स्वराज्य औरंगजेबाला पुरून कसे उभे राहिले. केल्या कामाचेच मोल घ्यावे ; समाजाचे आणि स्वदेशाचे काम म्हणजे ईश्वरी काम आहे , हीच भावना मनांत ठेवावी. ही शिकवण अगदी नकळत शिवकाळात शिलेदारांच्या मनांत रुजत गेली.
वास्तविक लायजी पाटलासारख्या , येसबा कामठेसारख्या , येसाजी कंकासारख्या शिवसैनिकांवर छोटेमोठे चित्रपट निघायला हवेत. स्वराज्याचे राजेपण प्राप्त झाले असूनही विरक्त जीवन अनेक चित्रपटांत चित्रित केले गेले पाहिजे. ते साधार असावे. अभ्यासपूर्वक केलेले असावे. जर हे घडेल तर आमची पोरेबाळे अशा धनिकांना आणि कलाकारांना भरभरून आशीर्वाद देतील. महाराष्ट्रात अशी कितीतरी ऐतिहासिक ठिकाणे उजाड पडली आहेत की , जिथे स्वराज्य निमिर्तीचा इतिहास घडला. कितीतरी संतसत्पुरुषांच्या समाध्या विपन्नावस्थेत उदासवाणी पडल्या आहेत. त्यांची देखभाल तर राहोच. पण निदान त्यावर माहितीपट काढून या लोकसेवक संतांची ओळख आमच्या नव्या पिढीला होईल. माणसं अंतर्मुख होतील. स्वत:च्या आणि स्वदेशाच्याही चारित्र्याचा विचार करतील. अशी चरित्रे आणि अशी ऐतिहासिक ठिकाणे महाराष्ट्रात रानोमाळ पडली आहेत. पाश्चात्य देशात अगदी लहानसान वास्तूची जपणूक केली जाते. लहानसान चरित्रावरही सुंदर साहित्य निर्माण होते. ब्रिटिश देशात हिंडताना अशी संुदर जपणूक केलेली ठिकाणे पाहिली की , आनंद होतो. पण आमच्याकडे सिंहगडावरच्या तानाजीपासून ते नंदूरबारच्या शिरीषकुमार शहापर्यंत सर्वांचीच आबाळ.
|| शिवचरित्रमाला || |
शिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.
जीवनातील कोणतीही गोष्ट करताना शिवाजी महाराज असा विचार करत असत की , या गोष्टीचा स्वराज्यावर कोणचा परिणाम होईल ? निदान वाईट परिणाम तर होणार नाही ना ? मग ती गोष्ट राजकीय , धार्मिक , आर्थिक किंवा अगदी कौटुंबिकही असो. महाराजांची स्वत:ची एकूण आठ लग्ने झाली. यातील काही लग्ने ही याच विचाराने साजरी झाली की , या विवाहामुळे स्वराज्याच्या सार्मथ्यात काही उपयोगाचे राजकारण किंवा समाजकारण घडणार आहे का ? नाईक-निंबाळकर , राजे महाडिक , राजे जाधवराव , गायकवाड , इंगळे , मोहिते इत्यादी घराण्यातील मुलींशी महाराजांचे विवाह झाले. ही सर्वच घराणी फार मोठ्या मानाची आणि राजकीय महत्त्वाची होती. ही सर्वच घराणी कोणा ना कोणातरी बादशाहाच्या पदरी सरदारी करणारी होती.
त्यामुळे या विवाहसंबंधामुळे ही घराणी केवळ भोसले राजांच्याच नात्यात गुंफिली गेली. स्वराज्याचे हे सर्व सासरे जबरदस्त लष्करी सरदार बनले. नाती गोती जोडतानाही जिजाऊसाहेबांनी आणि शिवाजीराजांनी स्वराज्याच्या हिताचा विचार केला. नवीन पिढीतही महाराजांनी हेच सूत्र कायम ठेवले. कोकणातील शिकेर्राजे , सुवेर्राजे , विचारेराजे या घराण्यांचाही महाराजांनी असाच विचार केला. यावेळी कोकणात डेरवण , गोंडमळा आणि कुटरे या भागात (तालुका चिपळूण) शिकेर्राजांचं घराणं फारच मातब्बर होतं. मंडळी शूर होती. खानदानी वजनदार होती. पण शिकेर्राजे आदिलशाह बादशाहाच्या पदरी कदीम इज्जतआसार सरदार होते. दाभोळचे वतन वा जहागिरी बादशाहानं शिर्क्यांना बहाल केलेली होती. शिर्क्यांच्यासारखं मातब्बर घराणं स्वराज्याच्या कामात सामील झालं पाहिजे हा विचार महाराजांच्या मनांत सतत वावरत होता.
अन् एक दिवस महाराजांनी आपल्या थोरामोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत हा आपला विचार लग्नसंबंध घडवून आणण्याच्या निमित्ताने बोलून दाखवला. त्यावेळी शिकेर् घराण्यातील प्रमुख आसामी होती पिलाजीराजे शिकेर्. पिलाजीराजांना गणोजीराजे या नावाचा मुलगा आणि जिऊबाई (उर्फ येसूबाई) ही मुलगी होती. महाराजांच्या मनांत साटंलोटंच करावं असं आलं. म्हणजे आपली मुलगी राजकँुवर उर्फ नानीसाहेब ही शिर्क्यांच्या गणोजीराजांना द्यावी आणि त्यांची मुलगी येसूबाई ही आपल्या संभाजीराजांना करून घ्यावी असं हे साटंलोटं करावं हा विचार महाराजांनी केला. नातेही जुळेल आणि राजकीय संबंधही जुळून येऊन कदाचित शिकेर्राजे हे आपल्या साऱ्या परिवारानिशी स्वराज्याच्या कामांत सामील होतील. ही अपेक्षा त्यांच्या मनी आली. पण यात एक फार मोठा अवघड असा पेच होता. तो म्हणजे शिर्क्यांच्या जहागिरी वतनाचा. ही त्यांची जहागीर कोकणातच होती. ती आदिलशाहीकडून त्यांना पिढीजात होती. शिकेर्राजे आणि भोसलेराजे यांचे नाते जमण्यात फारसा अवघड पेच येणार नाही. पण शिकेर्राजे स्वराज्यात येतील की नाही ही मात्र शंका होती.
अन् महाराजांनी लग्नाची बोलणी शिर्क्यांशी सुरू केली. नात्याने शिकेर् भोसले सोयरे झाले. लग्ने थाटात झाली. महाराजांची लेक शिर्क्यांची सून झाली. त्यांची लेक येसूबाई महाराजांची सून झाली.
चार दिवस उलटले. अन् महाराजांनी आपल्या मनीचे गूज पिलाजीराजे शिकेर् यांना बोलून दाखवले , की शिकेर् मंडळींनी स्वराज्याच्या सेवेत यावे. सवय लागलेली बादशाही सेवा सोडून इकडे येणे अवघडच होते. पण त्यालाही पिलाजीराजे शिकेर् यांनी मान्यता दिली. आनंदच कलमी आंब्यासारखा मोहरला.
पण यात सर्वात मोठा अवघड भाग होता. तो म्हणजे स्वराज्यात विलीन व्हावे लागणार होते. शिकेर् जहागिरी स्वराज्यात पूर्णपणे देऊन टाकावी लागणार होती. आणि शिकेर् हे स्वराज्याचे , त्यांच्या योग्यतेप्रमाणेच पण स्वराज्याचे पगारी नोकर बनणार होते. असे हे अवघड दुखणे न कण्हता सोसणे शिर्क्यांना जड जाणार होते. पण महाराजांच्या प्रभावामुळे म्हणा की शिर्क्यांच्या मनांत उदात्त भाव निर्माण झाल्यामुळे म्हणा , पिलाजीराजे शिकेर् यांनी आपले दाभोळचे आणि इतर काही असलेले बादशाही वतन स्वराज्यात विलीन करण्यास मान्यता दिली. खरोखर अतिशय आनंदाची पण तेवढीच थक्क करणारी गोष्ट होती. सर्वात सुखावले स्वत: शिवाजीमहाराज कारण स्वराज्यात कुणालाही जहागिरदारी वा सरंजामी वतने न देण्याचा अत्युत्कृष्ट रिवाज , अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांनीच चालू ठेवला होता.
शिर्क्यांचे शाही वतनदारी जीवनच बदलले. ते स्वराज्याचे शिलेदार आणि पगारी सरदार झाले.
चार दिवस उलटले. लग्नात अगदी छोटी छोटी असलेली मुले हळूहळू मोठी होऊ लागली. अन् पिलाजीराजे शिर्क्यांच्या मनात नकळत मोहाचं मोहोळ जमा होऊ लागलं. त्यांना आपल्या बादशाही वतनाची घडीघडी आठवण होऊ लागली. अन् एक दिवस तर त्यांना वाटू लागलं की , आपले स्वराज्यात विलीन झालेले दाभोळचे वतन आपलं आपल्याला हवंच. इतर कोणाला महाराज वतने देत नसतील , तरी व्याही या नात्यानं महाराजांनी आपलं पूर्वापार वतन आपल्याला द्यावंच.
हा विचार स्वराज्याच्या दृष्टीने घातकी होता. नव्हे , विषारी होता. कारण एकदा ही स्वराज्याची सरंजामशाहीमुळे तबीयत बिघडली , तर स्वराज्याला क्षयासारखा रोग जडेल. अन् एक दिवस हे स्वराज्य स्वार्थात बुजबुजून कोणाच्यातरी म्हणजे वतनदारी देणाऱ्या कोणा परक्याच्याही गुलामगिरीत पडेल.
अगदी शेवटी इंग्रज आले तेव्हा पेशवाईचे असेच झाले ना ? शिंदे , होळकर , गायकवाड , नागपूरकर भोसले , पटवर्धन आणि असंख्य लहानमोठे स्वराज्याचे सेवक आपल्या सरंजामी स्वार्थाकरिता इंग्रजांचे गुलाम बनलेच ना! हे ते विष होते. वतनदार हे तो राज्याचे दायाद. म्हणजे भाऊबंद. ते भाऊबंदकीच करणार. अन् स्वराज्य मात्र मरणार.
महाराजांनी उगवतीपासून मावळतीपर्यंत सारा विचार तोरणा काबीज केल्यापासूनच निश्चित ठरवलेला होता , की कोणास वतन , सरंजाम देणे नाही.
अन् आता तर शिकेर् राजांच्या मनांत हाच विचार आला आणि पिलाजीराजे शिकेर् यांनी महाराजांकडे पत्र पाठवून ‘ आमचे दाभोळचे सरंजामी वतन आमचे आम्हांस मिळावे ‘ अशी उघडउघड मागणीच केली आता!
व्याह्यांच्या या मागणीने महारज हादरले. धर्मसंकटच उभे राहिले. व्याह्यांना वतन द्यावे , तर आपल्या सर्व सरदारांवर त्याचा काय परिणाम होईल ? न द्यावे तर शिकेर् नाराज होतील रागावतील. संतापतील. अपमान मानतील आणि पुन्हा बादशाहाला जाऊन सामील होतील. कुणी सांगावं काय होईल ते!
महाराज चिंतेत पडले. अन् त्यांच्या मनांत एक धूर्त सोंगटी अडीच घरं तिरपी सरकली. त्यांनी पिलाजीराजांना पत्र लिहून कळवले. पत्र छान लिहिले. पत्रांत म्हटलं , ‘ दाभोळचे तुमचे अमानत ( म्हणजे स्वराज्यात विलीन झालेले) झालेले वतन तुम्हांस परत द्यावे ऐसे आमचे ठरले आहे. आमची लेक तुम्हां घरी दिली. तिला पुत्र झाल्यावरी त्याचे नावाने हे वतन द्यावे ऐसे आमचे ठरले आहे.
म्हणजे त्या लेकीला ( तिचे नांव राजकुँवर नानीसाहेब) पुढे मोठी झाल्यावर जेव्हा केव्हा पुत्र होईल , तेव्हा पाहता येईल!
शिकेर्राजेही जरा नाराजले. पण पुढे नक्की आपल्याला दाभोळ परत मिळणार या समाधानात सुखावले. लौकर नातू जन्माला येवो , हीच अपेक्षा राजांच्या मनांत दरवळत राहिली.
पण महाराजांनी मात्र कुणालाही सरंजाम न देण्याचा आपला राज्यकल्याणकारी हेतू ढळू दिला नाही.
शिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.
महाराजांचं लक्ष चौफेर होतं. पण सर्वात जास्त लक्ष
कोकण किनाऱ्यावर होतं. हाबशी , अरब आणि तमाम युरोपीय टोपीवाले कोणच्याक्षणी आपल्या या कोकण किनाऱ्यावर येतील , याचा नेम नव्हता. पोर्तुगीज आणि सिद्दी , इंग्रज आणि डच हे असेच आले नाहीत का ? सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज हे असेच अचानक आमच्या भूमीवर राज्य थाटून बसले नाहीत का ? म्हणून महाराज अतिशय सावध होते आणि या राज्य थाटून बसलेल्या परकीय गनिमांना तळामुळासकट उखडून काढण्याचा ते सतत विचार आणि प्रयत्न करत होते.
आताही महाराजांच्या मनांत जंजिरेकर हाबश्यांच्या विरुद्ध कडवा कावा करण्याचा विचार आला. पण पूर्वतयारी उत्तम करून आणि जय्यत तयारीनिशी.
जंजिऱ्याच्याच समुदात उत्तर दिशेला सुमारे पाच कि.मीवर एक बेट आहे. बेटाचे नाव कांसा. या बेटावर आपण सागरी किल्ला बांधावा , असा विचार त्यांचे मनांत आला. तो उत्तम नौकातळ ठरेल अन् उत्तरेकडून जंजिऱ्याला गळफास लावता येईल असा त्यांचा बिनचूक आरमारी विचार होता.
महाराजांचे एक जबर वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे लष्करी गुप्तता. सगळा डाव डोक्यात पक्का तयार ठेवायचा अन् मग अगदी संबंधितांना तो समजावून सांगायला अन् मग त्याची मोहिम सुरू करायची , हा महाराजांचा स्वभावच बनला होता. त्यांच्या आयुष्यात या गुप्ततेला अतिशय महत्त्व होतं. त्यामुळेच त्यांचा गनिमी कावा अधिकाधिक यशस्वी झालेला दिसून येतो. एखाद्या मोहिमेत समजा माघार घ्यावी लागली किंवा चक्क पराभवच झाला , तर लगेच पुढे काय करायचे याचे राजकारण बुद्धिबळाच्या डावासारखे त्यांच्या मनांत आधीच मांडलेले असे. यात क्वचित प्रसंगीच फसगत होतही असे. पण ती क्वचितच.
आताही महाराजांच्या मनांत कांसा बेटावर किल्ला बांधण्यासाठी जरा दीर्घकाळ खाणारी योजना आली. समोरच जंजिऱ्याच्या सिद्दीसारखा वाघ आ करून बसलाय. वायव्य दिशेला मुंबईकर इंग्रज बसलेत. आगरकोटला पोर्तुगीजांचे एक लष्करी पॉकेट आहेच. अशा परिस्थितीत दगडाधोंड्याचा एक लष्करी किल्ला बेटावर बांधायचा आहे. भोवतालचे शत्रू गप्प बसणार नाहीत. विरोध होईल. हा सारा विचार करून महाराजांनी कांसा बेटाची योजना स्वराज्यातील कोकणी किनाऱ्यावर पूर्वयोजनेने केली. म्हणजेच गवंडी , लोहार , सुतार , बेलदार , मजूर आणि बांधकाम करवून घेणारे जाणते सिव्हील इंजिनीयर्स हे आधीपासून निश्चित केले. अन् हे बांधकाम सुरू झाल्यापासून संपेपर्यंत उत्तम चालावे याकरता इतर बंदरातून सतत जरुर त्या साहित्याचा आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारी लहानमोठी गलबते सुसज्ज ठेवली. कामगारांना कोणत्याही बाबतीत तुटवडा किंवा हालअपेष्ट वा उपासमार होऊ नये याची जय्यत पूर्वतयारी महाराजांनी अगदी गुप्तरितीने आधी तयार ठेवली.
अन् एके दिवशी ही सर्वच यंत्रणा रात्रीचे वेळी आपापल्या जागेवरून ठरलेल्या योजनेनुसार कामाला लागली. कांसा बेटावर कामगार अचानक उतरले. आरमारी मचव्यांचा संरक्षणासाठी बेटाभोवती सुसज्ज गराडा पडला. औषधे , जळाऊ सरपण , निवाऱ्याकरता तंबूराहुट्या , शंभर प्रकारची कामेधामे करण्याकरिता लागणारे कामाठी मजूर , रात्री मशाली अन् तेलदिव्यांची व्यवस्था , स्वच्छ पाणी इत्यादी प्रत्येक गोष्टीची तरतूद आधी सुसज्ज ठेवली होती , ती कामाला लागली. अन् दुसऱ्याच दिवशी उजाडता उजाडता , जंजिऱ्याच्या किल्ल्यावरून हाबश्यांना दिसून आले , की कांसा बेटावर मराठे रातोरात अचानक उतरले आहेत. अन् अकस्मात त्यांनी किल्ला बांधायलाही प्रारंभ केला आहे. हाबशी थक्कच झाले.
इथे एक आठवण होते. दुसऱ्या महायुद्धात (इ. १९३९ ते १९४५ ) जर्मनीने काही देश उदाहरणार्थ नॉवेर् , इतके अचानक आणि अकस्मात काबीज केले , की त्या देशातल्या हवामानालाही उमगले नसावेत.
हीच अचानकता आणि आकस्मिकता महाराजांच्या लष्करी हालचालीत होती. नेहमीच होती.
कांसा बेटावरचे बांधकाम सुरू झाले. सिद्दीच्याही आरमारी दांडगाया सुरू झाल्या. पण बांधकाम निवेर्ध चालू राहिले. याचे मुख्य कारण सर्वचजण निष्ठेचे होते. आपापल्या कामांत तत्पर आणि तरबेज होते. त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट विनाविलंब पुरविणारी व्यवस्था चोख होती. भोवतीचे संरक्षक आगरी , कोळी , भंडारी आरमारी सैनिक सुसरीसारखे जागे होते.
याचवेळी एक विलक्षण घटना घडली. कांसा बेटावर पुरवठा करण्याकरिता महाराज गुप्तरितीने अत्यंत योजनापूर्वक ठिकठिकाणच्या बंदरांना हुकुम पाठवीत असत. मग तेथून तो माल सुखरूप बेटावर पोहोचण्याकरिता गलबते सिद्ध असत. ती गलबते योग्य वेळी निघत आणि योग्यरितीने बेटांवर पोहोचत. मधे आधे शत्रूने म्हणजे सिद्दींनी काही घातपात केला तरी इतर मार्गानी येणारी गलबते बेटावर पोहोचत. कामगारांची अडचण होत नसे.
एकदा महाराजांनी दौलतखान आणि दर्यासारंग या आपल्या आरमारी सरदारांना गुप्त हुकुम पाठवला की , ‘ केळशीचे बंदरात रसद (पुरवठा) तयार असेल. ती अमूक दिवशी , अमूक वेळेला तुम्ही तेथे पोहोचून ती ताब्यात घ्या. तुमच्या गलबतावर चढवा व कांसा बेटावर दक्षतापूर्वक पोहोचती करा. ‘
हे काम जोखमीचे युद्धकाळात तर फार फार दक्षतेने करण्याचे.
असाच हुकुम राजापूरजवळच्या प्रभावनवळांच्या सुभेदार जीवाजी विनायक यांस महाराजांनी गुप्तरितीने पाठवला. हे काम जोखमीचे. अन्नधान्य , सरपण व इतर साहित्य केळशीच्या बंदरात ठरल्या दिवशी वेळेलाच पोहोचविण्याची जबाबदारी जिवाजी विनायक यांच्यावर आली.
ठरल्यादिवशी , ठरल्यावेळीच हा माल नेण्यासाठी दौलतखान आणि दर्यासारंग मराठी गलबते घेऊन केळशीचे बंदर बिनचूक दाखल झाले. पण जिवाजी विनायक हे आलेलेच नव्हते. अर्थात रसदही तयार नव्हती. दौलतखान गोंधळला. ठरल्याप्रमाणे घडत नाही याचा अर्थच त्याला कळेना. एवढंच कळत होतं की यांत स्वराज्यकामाचा घात आहे. नुकसान आहे.
दौलतखानाने आणि दर्यासारंगने चार घडी वाट पाहिली , तरीही जिवाजी विनायकाचे मदतीचे काफिले येताना दिसेचनात. आता ?
शिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.
केळशीच्या बंदरात जिवाजी विनायक सुभे
दार यांची वाट पाहात दौलतखान आणि दर्यासारंग थांबले होते. सुभेदार जी रसद आणि युद्धसाहित्य घेऊन येणार होते , ते आलेच नाहीत. काय घोटाळा झाला कोण जाणे! पण अपेक्षेपेक्षा जास्त वेळ वाट पाहूनही सुभेदार न आल्यामुळे दौलतखानाने रायगडाकडे बातमी पाठवली की , ‘ आम्ही अगदी वेळेवर केळशीच्या बंदरात गलबते घेऊन थांबलो आहोत. पण जिवाजी सुभेदार अद्यापही आलेले नाहीत , तरी आम्ही काय करावे ? आज्ञा करावी. ‘
केळशीची ही खबर महाराजांस रायगडावर समजली. कोणतेही काम ठरल्याप्रमाणे वेळच्यावेळीच करण्याचा महाराजांचा शिरस्ता आणि कडक हट्ट होता. इथे तर ऐन युद्धकाळात कांसा बेटावर काम करणाऱ्या शेकडो मराठी लोकांच्याकरिता रसद पाठवण्यास थोडाही उशीर करून चालणार नव्हता. सुभेदार जिवाजींचा हा गलथानपणा किंवा बेखबरदारपणा पाहून महाराज संतापले आणि त्यांनी जिवाजी विनायक सुभेदार यांना असे झणझणीत पत्र पाठवले , की त्यातील एक एक अक्षर लवंगी मिरचीसारखे तिखट होते. महाराजांनी लिहिले होते , ‘ कांसा बेटावर हशम , कामाठी आणि आरमारी शिपाई काम करीत आहेत. जंजिऱ्याच्या श्यामलांस जबर शह देण्यासाठी आम्ही दांडा राजपुरीसारखी दुसरी दांडाराजपुरी कांसा बेटावर उभी करू पहात आहोत. तुम्ही मात्र बेदरकार दिरंगाईने बेफिकिर वर्तता ? तुमच्यामुळे दौलतखान आणि दर्यासारंग आरमारानिशी खोळंबून पडले. असे बेजबाबदारीने वागण्यासाठी गनिमानेच ( जंजिरेकर सिद्दीने) तुम्हांस काही ( लाचलुचपत) देऊन आपलेसे केलेले दिसते. बेदरकारीने म्हणत असला की , दुसरीकडून कोठून तरी कांसा बेटावरील कामास मदतीचा मजरा (तरतूद) होईल. ही अशी बुद्धी तुम्हांस कोणी दिली ? ब्राह्माण म्हणून तुमचा मुलाहिजा कोण ठेऊ पाहतो! बरा नतीजा (परिणाम) पावावा. बहुत काय लिहिणे ? तरी तुम्ही सूज्ञ असा. ‘
एकूण या प्रकरणात जिवाजी विनायकाचा गुन्हा स्पष्ट दिसून येतो. त्याने जर काही घोटाळा झालाच असेल , तर स्वार पुढे पाठवून केळशीस दौलतखानास खबर देणे जरुर होते , हे तर अगदी उघड आहे. पण त्यानेही काहीच कळवले नाही. त्यामुळे महाराजांनी संतापून ‘ तुमचा मुलाहिजा कोण ठेवू पाहतो. ‘ असा जाब पुसला. यावरून महाराजांचा स्वभाव , कडक शिस्त आणि विलक्षण तत्परता दिसून येते. या प्रकरणात जिवाजी विनायकांचे काय झाले ते समजत नाही. पण बहुदा महाराजांनी सुभेदारीवरून त्यांना बडतर्फ केले असावे असा साधार अंदाज आहे.
हीच शिस्त महाराजांच्या जीवनांत कडकपणे पाळली गेेलेली दिसून येते. कारवार स्वारीच्या वेळी (इ. १६६५ फेब्रु.) एका मराठी हेराने पाठविलेल्या गुप्त बातमीत चुका झाल्या म्हणून महाराजांना कारवारी मोहिमेत थोडा फटका खावा लागला. नुकसान झाले. महाराजांनी त्या चूक करणाऱ्या हेराला शिक्षा केली. नेतोजी पालकराने सेनापती पदावरून , शामराजपंत रांजेकरांना पंतप्रधानपदावरून आणि नरहरी गंगाधरांसारख्या बुद्धिमान मंत्र्याला मंत्रीपदावरून काढून टाकणारे महाराज कोणाही लहान आणि मोठ्या सरकारी नोकरदाराला मुलाहिजा ठेवीत नसत.
शिदोजी प्रतापराव गुजर हा पुढे सिंहगडचा किल्लेदार होता. (इ. १६७६ ) त्याने बेचौकशी जेजुरीच्या देवस्थानच्या नारायण महाराज देव यांच्या केवळ निरोपावरून गडावर तुरुंगात डांबले. हे महाराजांस समजले , तेव्हा महाराजांनी शिदोजी गुजराला जाब विचारला की , ‘ तू चिंचवडकर देवमहाराजांच्या सांगण्यावरून एका गरिबाला गडावर तुरुंगात डांबतोस ? हा अधिकार तुला कोणी दिला ? तू चाकर कोणाचा ? छत्रपतींचा की चिंचवडकर देवांचा ?’ त्या गरिबांस महाराजांनी पूर्ण मुक्त केले. शिदोजीस काही शिक्षा केली का याची माहिती मिळत नाही. पण नक्कीच शिक्षा वा जुर्माना ठोठावला असावा असे वाटते. हा शिदोजी गुजर म्हणजे प्रसिद्ध प्रतापराव गुजरांचा प्रत्यक्ष पुत्र होता. चिंचवडकर देव महाराज हे थोर गणेशभक्त साधुपुरुष होते. त्यांनाही महाराजांनी एक पत्र लिहून म्हटले आहे की , एका गरिबावर आपण का अन्याय केलात ? ‘ आमची बिरदे तुम्ही घ्या. (बिरदे म्हणजे बिरुदे , अधिकारपद) आणि आपली बिरदे आम्हांस द्या. ‘ म्हणजे याचा अर्थ असा की , तुम्ही छत्रपती व्हा आणि आम्ही चिंचवडास आरत्या धुपारत्या करीत बसतो! हे पत्र इतके बोलके आहे , की आमच्या आजच्या सर्व पक्षातील सर्व लहान आणि मोठ्या अधिकाऱ्यांनी त्याचा महिनाभर अभ्यास करावा.
कांसा बेटावरील किल्ल्याचे बांधकाम अतिशय कठीण अडचणींना तोंड देतदेत पुरे होत होते. थबकत नव्हते. सिद्दीच्या विरोधाला टक्कर देऊन महाराजांनी किल्ला बांधून पूर्ण केला आणि या किल्ल्याला नाव दिले. ‘ पद्मदुर्ग. ‘
महाराजांचे अनुशासन युरोपीय टोपीकरांपेक्षाही शिस्तबद्ध , वक्तशीर , योजनाबद्ध आणि उत्कृष्ट दर्जाचेच होते. म्हणूनच अस्ताव्यस्त खर्च , साहित्याची नासाडी आणि प्रजेचे हाल कधीही झालेले दिसत नाहीत. अचानक पाऊस आला आणि सरकारी धान्याची गोदामे भिजून सडून , रोगराईपण झाली आणि परिणाम प्रजेला भोगावे लागले , असे वृत्तांत सध्या आपण ऐकतो , तसे कधीही घडले नाही , घडत नसे.महाराजांचे आसूड हे असे भीडमुर्वत न ठेवता कडाडत होते.
शिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .
महाराजांना विद्वान पंडितांच्याबद्दल , कुशल कारागिरांच्याबद्दल आणि प्रतिभावंत कलाकारांच्याबद्दल नितांत प्रेम होते. त्यांचे सर्व आयुष्य राजकारणाच्या आणि रणांगणाच्या धकाधकीत गेले. जर त्यांना स्वास्थ्य लाभले असते , तर त्यांनीही कोणार्कासारखी अतिसुंदर आणि भव्य मंदिरे आणि प्राचीन राजांप्रमाणे नद्यांना सुंदर घाट बांधले असते. स्वराज्यापाशी तुडुंब पैसा नव्हता. राजापाशी शांत आणि निविर्घ्न वेळ नव्हता. पण हा मराठी राजा रसिक होता.
प्रतापगडावरचे श्रीभवानी मंदिर , गोव्यातील श्रीसप्तकोटीश्वर मंदिर , पुण्याचे श्रीकसबा गणपती मंदिर , पाषाणचे श्री सोमेश्वर मंदिर (अन् लगूनच असलेला राम नदीवरील घाट) महाराजांनी बांधलेले आपण आजही पाहतो आहोत. राजपूत राजांप्रमाणे आणि मोगल बादशाहांप्रमाणे महाल आणि प्रासाद महाराजांना बांधता आले नसते काय ? पण त्यांचे दोन्हीही हात ढाली तलवारीत गुंतलेले होते. त्यामुळे झाले ते एवढेच झाले. बराच पैसा खर्च करून सुंदर बांधलेले एक भव्य गोपुर मात्र आंध्रप्रदेशात श्रीशैलम येथे आजही उभे आहे. ते शैलमचे मंदिरास उत्तरेच्या बाजूस असलेले गोपुर महाराजांनी बांधले.
तिथे एक गंमत आहे. हे गोपुर बांधताना ते स्वत: एकही दिवस हजर राहू शकले नाहीत. वास्तुकलाकारांच्या हाती परवालीने पैसा ओतून या गोपुराचे काम करवून घेतले गेले. हे झालेले काम त्यांना स्वत:ला कधीही पाहता आले नाही. पण काम करणाऱ्या कुशल वास्तुकलाकारांनी बांधकाम अप्रतिम केलेले आहे. आपण या गोपुराच्या दारात उभे राहिलो , तर आपल्या डाव्या हातांस म्हणजेच पूवेर्कडे असलेल्या भव्य देवडीत (देवडी म्हणजे देवाचिये द्वारी , क्षणभरी उभे राहण्याकरता किंवा बसण्याकरिता असलेली सुंदर जागा) आपण पाहिले , तर त्या सायसंगीने दगडी भिंतीवर शिवाजीमहाराजांची मूतीर् कोरलेली आपणांस दिसेल. महाराज श्री शैलेश्वरास नम्रतापूर्वक भक्तिभावाने नमस्कार करीत आहेत. असे त्या शिल्पात दाखवले आहे. हे शिल्प तेथे काम करणाऱ्या , त्यावेळच्या कलाकार शिल्पकारांनी कोरलेले आहे.
महाराजांनी अनेक जुने किल्ले दुरुस्त केले आणि अगदी नव्याने आठ किल्ले बांधले. ते सर्वच किल्ले बलदंड आहेत. त्यातील राजगड किल्ला तर अतिशय देखणा आहे. राजपुतांनी प्रचंड अन् सुंदर महाल बांधले. जैसलमेर , जयपूर , जोधपूर , बंुदी , भरतपूर , दतिया , बिकानेर इत्यादी ठिकाणचे महाल स्वगीर्य सौंदर्याने नटलेले अहेत हे अगदी खरे. पण स्वातंत्र्याने मात्र त्यातला एकही महाल वा किल्ला कधीच सजला नाही. ती सार्वभौम स्वातंत्र्याची सजवणूक महाराजांनी किल्ले बांधून आणि लढवून सह्यादीच्या खडकाळ प्रदेशात मयसभाच उभी केली.
महाराजांनी शेतकऱ्यांसाठी बंधारे आणि विहिरी बांधल्या. शिवापूर आणि पाचाड (रायगड) येथे फळबागा सजवल्या. पण एवढेच. याहून अधिक काही करता आले नाही. जे दगडाधोंड्यात करता आले नाही , ते त्यांनी विद्वान प्रतिभावंतांकडून लेखणीने कागदावर करवून घेतले. राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. अमात्यवथीर् रघुनाथनामा , करो ति राज व्यवहाराकाशम् सारी मराठी भाषा फासीर् आणि अरबी भाषेने अल्लाउद्दीन खलजीपासून ते औरंगजेबापर्यंत गराडली गेली होती. राज्य व्यवहारातील बहुतेक शब्द हे फासीर् वा अरबीच होते. आपल्याच राज्यात आपलीच भाषा असली पाहिजे असा महाराजांचा मनोमन निर्णय होता. ‘ स्व ‘ या शब्दाचे महत्त्व आम्हाला कधी कळलेच नाही.
आजही आम्हाला ते कितपत कळले नाही. आजही आम्हाला ते कितपत कळले आहे ? परक्यांच्या भाषेत आम्ही आमच्या आवडीच्या माणसांवर प्रेम करतो. आमच्या भाषेत ते प्रेम आम्हांस जमतच नाही. आम्ही नकळत किंवा कळूनही अरब बनतो , इराणी बनतो. भाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. अहो आमचा बायकोवरही हक्क नाही. कारण ‘ बायको ‘ ( पत्नी) हा शब्द मराठी नाही. तो तुकीर् शब्द आहे. म्हणजे आमची बायको ही पण मराठी नाही. राज्य व्यवहारातील सर्व नामे क्रियापदे , विशेषणे आणि गौरवाची गाणी अन् शिव्याशाप आमच्याच भाषेत असले पाहिजेत. महाराजांनी पहिला प्रयत्न राज्यव्यवहार कोश तयार करून केला. प्राईम मिनिस्टरला पेशवा म्हणायचे नाही. त्याला पंतप्रधान म्हणायचे. कारकुनाला लेखक वा लेखनाधिकारी म्हणायचे. समुदावरच्या अॅडमिरल सरखेलाला आपल्या भाषेत सागराध्यक्ष म्हणायचे. अन् अशी शेकडो उदाहरणे या कोशात आहेत. एकदा संज्ञा बदलली की संवेदनाही बदलतात. त्यातूनच अस्मिता फुलतात. अन् मग त्या अस्मितांसाठी माणूस अभिमानाने प्राण द्यावयासही तयार होतो.
महाराजांनी अज्ञानदाससारख्या मराठी शाहिरांकडून आपल्या शूरवीरांचे पोवाडे तयार करवून घेतले. अन् गाणाऱ्या शाहिरांच्या हातात सोन्याचे तोडे घातले. खगोलशास्त्रावरती आणि कालगणनेवरती महाराजांनी बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर यांजकडून संस्कृतमध्ये करणकौस्तुभ नावाचा निखळ शास्त्रीय गंथ लिहवून घेतला. अशा सुमारे सतरा अठरा गंथांचा आत्तापर्यंत शोध लागला आहे. अधिकही असतील.
येथे एक आठवण द्यावीशी वाटते. महाराजांनी ही सरस्वतीची आराधना आपल्या लहानशा आयुष्यात केली. पेशवाईत इ. १७१३ पासून इ. १८१८ पर्यंत एकही गंथ लिहवून घेतला नाही.
|| शिवचरित्रमाला || |
शिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.
शिवाजीराजांनी प्रारंभापासूनच हे ओळखले होते , की स्वराज्य उभे राहील आणि वाढेल ते कोणत्यातरी जबरदस्त अभिमानामुळेच. मग तो अभिमान आपल्या इतिहासाचा , भाषेचा , भूमीचा किंवा परंपरेचा असो. देवदैवतांची भक्ती आणि परंपरेने चालत आलेल्या पौराणिक कथा यांचाही तो अभिमान असू शकतो. महाराजांच्या मनात या सर्वच गोष्टींचा अभिमान आणि आदर उदंड साठवलेला होता. पण या अभिमानापोटी महाराजांनी कोणत्याही परधर्माचा , रीतरिवाजांचा वा भाषेचा द्वेष कधीही केला नाही. कधीही कोणाचा अपमान किंवा छळणूक केली नाही. आपली भाषा ही श्रीमंत आणि सर्व विषयांतील ज्ञानांनी समृद्ध असावी हाच विचार महाराजांच्या मनांत आणि आचरणात कायम दिसून येतो.
संस्कृत भाषेवर तर त्यांच्या मनांत नितांत प्रेम आणि भक्ती होती. महाराजांचा शिक्का आणि मोर्तब ही अगदी प्रारंभापासून संस्कृतमध्येच होती. त्यांचे अधिकृत शिक्क्याचे पहिले पत्र किंवा सर्वात जुने पत्र सापडले आहे ते इ. १६३९ चे. म्हणजेच त्यांच्या वयाच्या नवव्या वषीर् त्यांचा संस्कृत शिक्का वापरला जाऊ लागला. कदाचित त्याही पूवीर् हा शिक्का वापरला जात असेल. पण इ. १६३९ पूवीर्चे असे संस्कृत शिक्क्याचे विश्वसनीय पत्र अद्याप उपलब्ध झालेले नाही. म्हणजेच इ. १६३९ चे महाराजांचे पत्र हे पहिलेच पत्र शिक्का मोर्तबीचे असले तरी वयाच्या नवव्या वर्षी महाराजांनी स्वत: युद्ध , अर्थपूर्ण आणि आपला ध्येयवाद व्यक्त करणारे कविताबद्ध संस्कृत भाषेतील शिक्का मोर्तब स्वत: तयार केले असेल असे वाटत नाही. ‘ प्रतिपच्चंदलेखेव वधिर्ष्णुविंश्व वंदिता शाहस्नो: शिवस्वैषा मुदा भदाय राजते ‘ आणि पत्रलेखन पूतीर्ची मुदा होती ‘ मर्यादेयंविराजते ‘ ही शिक्कामोर्तब अत्यंत उदात्त राजकुलीन आहे.
ही मुदा बहुदा जिजाऊसाहेबांच्या इच्छेप्रमाणे व मनोभावनेप्रमाणे कोणा जाणकार संस्कृत कवीकडून तयार करवून घेतली असावी. ‘ प्रतिपदेच्या चंदाप्रमाणे विकसित होत जाणारी ही शहाजीपुत्र शिवाजीराजे यांची मुदा विश्ववंद्य व कल्याणकारी आहे. ‘ हा या शिवराजमुदेचा आशय आहे. यातच शिवाजी महाराजांचा उदात्त , महत्त्वाकांक्षी आणि विश्वकल्याणकारी ध्येयवाद आणि आयुष्याचा संकल्प व्यक्त होतो. प्रत्यक्ष स्वराज्याच्या राजकारभारास प्रारंभ झाल्यापासून महाराज अधिकाधिक लक्ष आपल्या मराठी भाषेवर व मूळ मातृभाषा असलेल्या संस्कृतवर देताना दिसतात. त्यांच्या राजपत्रातून फासीर् भाषेतील शब्द कमी होऊन मराठी भाषा अखंडित लक्ष्मी अलंकृत राजश्रीया विराजित सकळ गुणालंकरण अशी श्रीमंत होत गेलेली दिसते. पुढे तर बाळाजी आवजी चित्रे उर्फ चिटणीस यांच्याकडून महाराजांनी ‘ लेखनप्रशस्ती ‘ या नावाचा एक निबंधच लिहवून घेतला. महाराजांचे सापडलेले शिलालेख संस्कृतमध्येच कोरलेले आहेत. रायगडावर जगदीश्वर मंदिरावर असलेला शिलालेख म्हणजे रायगडचे वर्णन करणाारे सुंदर संस्कृत भाषेतील एक गोड काव्यच आहे.
महाराजांचे पदरी अनेक संस्कृतज्ञ पंडित होते. परमानंद गोविंद नेवासकर , संकर्षण सकळकळे , धुंडिराज व्यास , रघुनाथ पंडित अमात्य , बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर , केशव पंडित पुरोहित , उमाजी पंडित , गागाभट्ट इत्यादी. याशिवाय पाहुणे भाषा पंडितही अनेक होते. जयराम पिंड्ये , गोरेलाल तिवारी , कवीराज भूषण , निळकंठ कवी कलश इत्यादी. अन् प्रत्यक्ष स्वराज्याचे युवराज संभाजीराजे हेही संस्कृतचे उत्तम पंडित होते. युवराज शंभूराजे संस्कृतभाषेत इतर पंडितांबरोबर संवाद चर्चा करीत असत. अशी ही रायगडची राजसभा विद्वत्जंग होती.
स्वराज्यात कोणालाही कोणत्याही भाषेत लेखन , वाचन आणि अभ्यास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. एका पुसटश्या उल्लेखावरून असा तर्क धावतो , की प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांना फासीर् भाषेचा परिचय असावा आणि संस्कृत भाषाही त्यांना येत असावी. रामायण महाभारतादि गंथांची ओळख , किंबहुना चिरपरीचय त्यांना नक्कीच होता. त्यांच्या काही पत्रांत या पौराणिक काव्यातले संदर्भ स्पष्ट दिसतात. स्वत: शिवाजीमहाराजांनी ओवी अभंगासारख्या चार सहा ओळी केलेली एक भक्ती युक्त रचना तंजावरच्या दप्तरखान्यात उपलब्ध आहे. अर्थात ते कितपत विश्वसनीय आहे हे आत्ताच सांगता येत नाही. अधिक पुराव्यांची गरज आहे.
याशिवाय शिवकाळात आणि शिवराज्यात अनेक संस्कृत मराठी , फासीर् , दख्खनची उर्दू आणि हिंदुस्थानी भाषेत लहानमोठ्या काव्यरचना वा ग्रंथरचना करणाऱ्यांची यादी तशी बरीच मोठी आहे. त्यातूनही आपणांस शिवचरित्राचा आणि इतिहासाचा अभ्यास करता येतो.
कलेच्या बाबतीत स्वराज्यात काय काय घडले , हे फार विस्ताराने सांगण्याइतके उपलब्ध नाही , तरी पण शिल्पकला , चित्रकला , संगीत , कापड-विणकाम , दागदागिने , होकायंत्रे , दुबिर्णी , चष्मे , रोगराईवरील औषधे , तोफा बंदुका , हुके (हातबॉम्ब) तमंचे (ठासणीची पिस्तुले) , कडाबिनी ( अनेक गोळ्या एकाचवेळी उडवण्याचे बंदुकीसारखे हत्यार) आणि तलवारी , कट्यारी , पट्टे , भाले , विटे , वाघनखे , बचीर् , तिरकामठे , बिचवे , गुर्ज इत्यादी पोलादी हत्यारे स्वराज्यात तयार होत असत.
तेवढीच परदेशातूनही आयात केली जात असत. रोग्यावर औषधोपचार करण्याकरिता पोर्तुगीज , फ्रेंच आणि इंग्रज डॉक्टरांनाही क्वचित प्रसंगी बोलावीत असत. कापडचोपड , पैठण , येवले या ठिकाणी भारी किंमतीचे तयार होत असे. पण किनखाप , गझनी , भरजरी तिवटे हे बहुदा उत्तरेकडून आणि बऱ्हाणपूर , औरंगाबाद , दिल्ली अशा बाजारपेठांतूनच येत असे. मराठ्यांना तलवारींची आवड मोठीच होती. युरोपीय देशातील आणि मस्कत , तेहरान , काबूल इत्यादी ठिकाणी तयार होणाऱ्या तलवारी फार मोठ्या प्रमाणात आजही जुन्या मराठी घराण्यांत अडगळीत पडलेल्या सापडतात.
महाराष्ट्रात कोणत्याही जाती समाजात शूर पुरुष होऊन गेलेले दिसतात. तसेच शाहीर कवी झालेलेही सापडतात. ईश्वराची सेवा आपापल्या इच्छेप्रमाणे आणि धर्ममताप्रमाणे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य येथे होते.
Tags
Share to other apps
Copy
Post link