Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 7 |

Information world
0

शिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी

राष्ट्राच्या जीवनाच्या दृष्टीने आणि त्याच्या प्रगतीच्या दृष्टीने कर्तबगार माणसे घडवावी लागतात. विशेषत: राजकीय क्षेत्रात तर अशी माणसे तयार करावीच लागतात. अशा कर्तृत्त्ववान जबरदस्त धुरिणांची ‘ शाळा ‘ शिवाजीमहाराजांनी तयार केली. त्यात योद्धे तयार झाले , राज्यकारभारी तयार झाले. त्यातूनच हिंदवी स्वराज्य तयार झाले. पुढे एकदा (इ. १६७७ फेब्रुवारी) गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह मराठ्यांंच्या मांदियाळीतील येसाजी कंकाचं विलक्षण धैर्य , शौर्य आणि कौशल्य पाहून शिवाजी महाराजांना म्हणाला , ‘ महाराज , हा येवढा येसाजी कंक आपण आमच्या पदरी द्या ‘

बादशाह येसाजीवर बेहद्द खूश झाला होता. म्हणून तो म्हणतोय , हा माणूस आमच्या पदरी द्या , तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिले , ते एका बखरीत नमूद आहे. ते म्हणाले , ‘ आम्ही मोतियांची माळ गुंफली. त्यातील मोती आपण मागता. कैसा द्यावा ?’ याचा अर्थ स्पष्ट आहे. अशी मोतियांची माळ तयार करणारे आपल्या इतिहासात तीन नेते डोळ्यासमोर राजकीय क्षेत्रात दिसतात. त्यातील पहिले नेते छत्रपती शिवाजी महाराज. दुसरे नेते बाजीराव (पहिले) पेशवे आणि तिसरे महात्मा गांधी. या तिघांनीही हुकमी शक्ती निर्माण केली.
पण हीच परंपरा खुंटली. आपल्याला राष्ट्र उभे करावयाचे आहे. हाच विचार खुंटला. म्हणूनच आपल्याकडे ‘ मॉब ‘ गोळा झाला आणि होतोय. सिलेक्टेड आणि इंटलेक्च्युअल असे नवीन पिढीत , एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही , युवानेते आज नजरेत येतात का ? सध्या तरी भीती वाटते आहे , की सगळ्या भारताचाच बिहार होणार काय ?
महाराजांनी आरमार अगदी नव्याने सुरू केले. हे काम केवढे कठीण होते! शून्यातून अथांग सागरात लढवय्ये आणि लढाऊ योद्धे आणि युद्धनौका निर्माण करावयाच्या होत्या. समोर शत्रू होता , युरोपीयन. सागरी सैनिक तर ‘ श्रीगणेशा ‘ पासून तयार करावयाचे होते. अवघ्या तीन वर्षात महाराजांनी या बाळ आरमाराला ऐरावताचे बळ आणले. आरमारी सैनिकांच्या तरबेज हत्यारबाजीच्या आणि तोफा बर्कंदाजीच्या उत्कृष्ट शिपाईगिरीच्या जोडीला , सागरी किल्ल्यांची आणि लढाऊ गलबतांची बांधणी करणारे कामगारही महाराजांनी उभे केले. जेम्स डग्लस याने आपल्या ‘ अराऊंड बॉम्बे ‘ या गंथात इ. स. १८८५ मध्ये लिहून ठेवले आहे , की ‘ अरे! तो शिवाजी महाराष्ट्राच्या भूभागात जन्माला आला. जर तो आणि त्याचे वाडवडील सागरी जीवनात जन्माला आले असते , तर तुम्हा युरोपीय लोकांना त्याने आफ्रिकेच्या अलिकडे पूवेर्ला (म्हणजेच कोकण किनाऱ्याकडे) फिरकूही दिले नसते. ‘
हे सारे महाराजांनी शून्यातून निर्माण केले. सैनिकी , आरमारी , डोंगरी वा राजकारभारी क्षेत्रात महाराजांनी जबर आणि तरबेज म्हणजेच जाणत्या युवकांची हुकमी शक्ती उभी केली. या हुकमी शक्तीला अतिशय महत्त्व आहे. त्याकरिता सर्व माणसांचीच मानसिकता आगळीवेगळी घडवावी लागते. त्याची ताकद यंत्रापेक्षा जास्त असते. कारण यंत्रच माणसांनी निर्माण केलेले असते. महाराजांनी ही सजीव आणि सुबुद्ध , तत्पर आणि विवेकी माणसांची शाळाच निर्माण केली.
रायगडावरच्या टकमक टोकाकडे आमचे नेहमीच विस्फारून लक्ष जाते. तो भयंकर कडा जणू आपल्याला बजावीत असतो , की ‘ पोरांनो , इथून चढायची हिम्मत होईल फक्त वाऱ्याच्या झोताला आणि उतरायची हिम्मत होईल फक्त पाण्याच्या धोधो धारेला. मी अजिंक्य आहे. सीतेच्या अंत:करणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य तेवढंच माझ्या या कड्यावरून चढून येणं शत्रूलाही अशक्य. कारण मी महाराजांचा कडा आहे आणि माझ्या खांद्यावर उभे आहेत तरबेज बलाढ्य , बुद्धिमान आणि इमानदार मराठी युवक. शिवसैनिक. ‘
हा टकमक्या कडा स्वराज्याशी दोह करणाऱ्या हरामखोरांचा कडेलोट करण्याकरिता महाराजांनी खास ठेवला होता म्हणे! पण शिवकाळात या कड्यावरून कोणाचाही कडेलोट केल्याची नोंद नाही. कारण स्वराज्याशी कोणी हरामखोरी केलीच नाही ना!



Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 7 |

|| शिवचरित्रमाला ||

शिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.


धार्मिक बाबतीत शिवाजीमहाराजांचे मन अतिशय उदार किंबहुना श्रद्धावंत होते. कोणत्याही धर्माच्या वा सांप्रदायाच्या प्रार्थनास्थळांचा , धर्मग्रंथांचा , रीतरिवाजांचा वा धर्मोपदेशक गुरुजनांचा त्यांनी सुलतानांप्रमाणे अवमान वा छळणूक कधीही केली नाही. त्या सर्वांचा त्यांनी आदरच केला. महाराज जेवढ्या आदराने आपल्या कुलगुरुंशी बोलत , वागत तेवढ्यात आदराने ख्रिश्चन , मिशनरी , धमोर्पदेशकांशीही वागत. मुसलमान साधुसंतांशीही त्यांचे वागणे अतिशय आदराचे असे. केळशी (जि. रत्नागिरी) येथील बाबा याकूत या संत अवलियांशी महाराज मराठी संतांइतकेच भक्तीभावाने वागत. काही ठिकाणच्या मशिदींना व्यवस्थेसाठी महाराजांनी अनुदाने दिलेली आहेत. अनेक किल्ल्यांवर मशिदी होत्या. त्यांचीही आस्था आणि व्यवस्था उत्तम ठेवली जात असे. चाँदरातीला चंददर्शन घडताच किल्ल्यांवरून तोफ उडत असे. बखरींतही महाराजांनी मुस्लिम सैनिकांबद्दल वेगळेपणा म्हणजेच भेदभाव दाखवल्याची एकही नोंद मिळत नाही.
पण महाराज धर्मभोळे , गाफील , ढिसाळ किंवा अंधश्रद्ध अजिबात नव्हते. पोर्तुगीज जेस्युईट मिशनरी दक्षिण रत्नागिरी भागांत अनेकदा सशस्त्रब्रससैन्य घुसखोरी करीत. तेथील मराठी बायकापोरांना गुलाम करून पळवून नेत. बाटवीत आणि स्त्रियांची जबरदस्तीने वाटणी करीत. गोवा इन्क्वीझिशनसारखे जुलमी राक्षसी प्रकार सतत चालू ठेवीत. ऑईल टॉर्चर , वॉटरटॉर्चर , फायरटॉर्चर यासारखे भयानक प्रकार या इन्क्वीझिशनमार्फत गोमांतकात चालू होते. हे सर्व प्रकार बंद पाडण्यासाठी संपूर्ण गोमांतके पोर्तुगीजांकडून जिंकून स्वराज्यात घेणे हाच एकमेव उपाय होता. महाराजांनी त्याकरिता प्रयत्न केले. थोड्या भागांत , थोड्या प्रमाणात त्यांना यशही आले. पण गोवा मुक्त होऊ शकला नाही. पण महाराजांनी एकदा बारदेशच्या स्वारीला वेळेला , मराठी बायकापोरांना आणि पुरुषांना जबरदस्तीनं गुलाम करणाऱ्या जेस्युईटांच्या सैन्यावर स्वत: जातीनिशी , योजनापूर्वक प्रतिहल्ला चढवला आणि त्यांचा पूर्ण बिमोड केला. त्यातील काही मिशनऱ्यांचे त्यांनी हात कलम केले. तेथे दयामाया केली नाही की , हे धमोर्देशक आहेत , संत आहेत हेही पाहिले नाही. याच्या नोंदी पोर्तुगीज दप्तरांत अधिकृत आहेत. डॉ. पांडुरंग पिर्सुलेर्कर आणि डॉ. ए. के. प्रियोळकर यांनी आपल्या गंथात हे नमूद केले आहे. पण महाराजांनी मिशनऱ्यांच्याच चांगल्या आणि लोकोपयोगी कार्याला पाठिंबाच दिला आहे. ६ जाने १६६४ या दिवशी फादर अॅम्ब्रॉस हा कम्युसिन ख्रिश्चन मिशनचा धमोर्पदेशक महाराजांना सुरत येथे स्वत: भेटावयास आला आणि त्याने ‘ आपण कृपा करून आमच्या प्रार्थनास्थळास , धर्ममठास आणि आमच्या हॉस्पिटलमधील गोरगरिब , दु:खी रुग्णांस त्रास देऊ नका. ‘ अशी विनंती केली. तेव्हा महाराजांनी काढलेले उद्गार (आणि त्याप्रमाणे आचरणही) फार लक्षात घेण्यासारखे आहेत. ते त्या फादरला म्हणाले , ‘ तुम्ही लोक गोरगरिबांच्याकरिता किती चांगले काम करता हे मला माहीत आहे. तुमच्या प्रार्थनास्थळांना आणि काम करणाऱ्या लोकांना (ख्रिश्चन मिशनऱ्यांना) आमच्याकडून अजिबात धक्का लागणार नाही. (आपणांस संरक्षणच दिले जाईल.) ‘
महाराज सर्वच धर्मातील संत सत्पुरुषांचे आशीर्वाद घेत होते. सर्वांच्याबद्दल अपार आदर ठेवीत होते. पण राजकारणात वा राज्यकारभारात त्यांचा सल्ला सहभाग घेत नव्हते. कोणताही साधुसंत त्यांचा राजकीय सल्लागार किंवा गुरू नव्हता. कोणत्याही साधुसंताने राज्यकारभारास किंवा राजकारणात हस्तक्षेप किंवा सल्लामसलत केल्याची एकही अधिकृत नोंद अद्याप मिळालेली नाही किंवा एकही अधिकृत कागदपत्र उपलब्ध झालेले नाही.
राजकारणांत अजिबात भाग घेतला नाही म्हणून कोणाही शिवकालीन संत सत्पुरुषाचे थोरपण कमी ठरत नाही. या सर्व संतांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक लोकजागृती , खऱ्या आणि डोळस श्रद्धेचा उपदेश , निर्व्यसनी आणि सदाचारी समाज निर्माण करण्याकरता त्यांनी आजन्म केलेले कार्य त्यांचे अत्यंत शुद्ध आणि साधे वर्तन आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कार्य म्हणजे पारतंत्र्याच्याही बादशाही काळात मराठी भाषेची त्यांनी केलेली अलौकिक सेवा हे होय.
वा. सी. बेंदे या थोर इतिहासपंडितांच्या संशोधनाने मराठी इतिहासाला एक गोष्ट ज्ञात झाली की , श्रीगोंद्याचे शेख महम्मदबाबा हे मालोजीराजे भोसले , म्हणजेच शिवाजी महाराजांचे आजोबा यांचे धामिर्क परम श्रद्धास्थान होते. मालोजीराजांची श्रद्धाभक्ती अहमदनगरच्या शाहशरीफ या थोर सत्पुरुषांवरही होती. त्यांच्याच आशीर्वादाने मालोजीराजांना पुत्र झाले , अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी याच शाहशरीफ या संतांचे नाव आपल्या मुलांना ठेवले. शहाजीराजे आणि शरीफजी राजे या दोन्ही मुलांना मालोजीराजांनी ती नावे ठेवली. ‘ तौ शाहशरीफ सिद्धनामांकिता उभौ ‘ अशी अगदी स्पष्ट नोंद परमानंदाने शिवभारतात केलेली आहे.
जर शिवपूर्वकाळात , नजिक हे थोर मराठी संतसाहित्यिक झाले नसते , तर मराठी भाषेचे , मराठी संस्कृतीचे , मराठी दैवतांचे आणि मराठी आयडेन्टीटीचे केवढे मोठे नुकसान झाले असते! हे संत समाजसुधारक होते. ते लोकशिक्षक होते. त्यांना कोणत्याही धनदौलतीची वा सत्ताधिकाराची अभिलाषा नव्हती. एकदाच फक्त चिंचवडच्या गणेशभक्त साधुमहाराजांनी शिवाजीमहाराजांच्या राज्यकारभारात जरा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराजांनी त्यांना नम्रतेनेच पण स्पष्ट शब्दांत असे सुनावले , की पुन्हा तशी चूक त्यांचे हातून घडली नाही. कोणत्याही साधुसत्पुरुषाने महाराजांकडे धनधान्याची मागणी केली नाही. साधुसंत म्हणजे ईश्वराचे सर्वात जवळचे नातलग. ते विरक्तच असतात. त्यावर धंदा करतात , ते लबाड धामिर्क दलाल. अशा दलालांना महाराजांनी जवळीक दिली नाही. तशी संधीच कोणाला मिळाली नाही

.
Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 7 |

|| शिवचरित्रमाला ||

शिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.


आपल्याला नेहमीच कुतुहल वाटत असते , की एवढा मोठा हा लोकनेता आणि सिंहासनाधिश्वर छत्रपती राजा वागत कसा होता , बोलत कसा होता , एकूण स्वभावानेच कसा होता! राजा कधी थट्टा विनोद करीत असे का , की सतत गंभीर होता ? शिवाजी महाराजांच्याबद्दल एक मामिर्क विधान श्रीसमर्थांनी केले आहे. ‘ शिवरायांचे कैसे बोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाचे सलगी देणे कैसे असे ?’ या प्रश्ानर्थक वर्णनातच महाराजांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे येते. महाराजांच्या चेहऱ्यावर सततच स्मितहास्य तरळत असे त्यांना भेटलेल्या युरोपीय वकिलांनी आणि प्रवाशांनी नोंदवून ठेवले आहे. या त्यांच्या स्मितहास्यातच महाराजांचे लोकसंघटनेचे यश आणि वर्म स्पष्ट होते. त्यांच्या एकूणच प्रचंड आणि अत्यंत अवघड अशा उद्योगात लोकसंपर्काला आणि प्रसंगी समोरच्या विरोधकालाही जिंकून घेण्याचे बळ होते. स्मितहास्य ही त्यांच्या बिझनेस स्कील आणि मॅनेजमेंटमधली सर्वात मोठी इन्व्हेंस्टमेंटमधली होती. मी हे इंग्लिश शब्द जाणूनबुजून वापरतो आहे. कारण ते आम्हा आजच्या पुरोगामी आणि पॉलिश्ड मंडळींना चटकन समजतात आणि अपील होतात!
महाराजांच्या या वागण्याबोलण्याबाबतची सर्वात पहिलीच नोंद अन् तीही पूर्ण विश्वसनीय अशी परमानंद नेवासकरांनी शिवभारतात करून ठेवली आहे. महाराज १५ – १६ वर्षाचे असतानाच त्यांनी सुरू केलेल्या स्वराज्यस्थापनेची चुळबूळ जागच्याजागीच मोडून काढण्यासाठी विजापूरच्या आदिलशाहने आपला एक बडा सरदार अंबाजी घोरपडे यांस सैन्यनिशी महाराजांविरुद्ध मावळात रवाना केले. वास्तविक घोरपडे सरदार महाराजांना धरावयास किंवा मारावयास किंवा निदान प्रचंड दमदाटी करावयास अन् गप्प बसवावयास आले होते. पण महाराजांनी त्यावेळी त्या छोट्याशा वयात सरदारसाहेबांशी भेट आणि मुलाखत घेऊन असे गोड भाषण केले आणि त्यांना पटवून दिले की , ‘ आम्ही बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करीतच नाही. बेवसाऊ पडलेल्या गडांचा आणि वाड्याघोड्यांचा नीट बंदोबस्त ठेवीत आहोत , तेही बादशाहांच्या हितासाठीच. ‘
परमानंदांनी महाराजांची ही पहेली मुलाकात सविस्तर लिहून ठेवली असती , तर किती बरे झाले असते! पण त्यांनी या बाबतीत एवढेच लिहिले आहे की , एखादा गारुडी नागाला ज्याप्रमाणे भुलवतो , झुलवतो अन् सफाईने परतवून लावतो , त्याचपद्धतीने मोठ्या कुशलतेने महाराजांनी घोरपड्यांना विनासंघर्ष , गोड बोलून परतविले. हे प्रकरण प्रत्यक्ष महाराजांच्याच तोंडून बदललेले , परमानंदाने नोंदविले आहे.
आपल्या देशात अनेक धर्म , सांप्रदाय , पंथ-उपपंथ पूवीर्पासूनच अस्तित्त्वात आहेत. भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय , शाक्तपंथ , गाणपत्य सांप्रदाय , शैव , वीरशैव , महानुभाव , नाथसांप्रदाय , हटयोगी , कर्मठवैदिक , दत्तसांप्रदाय , पुरी आणि गिरी गोसावी सांप्रदाय , श्वेतांबर आणि दिगंबर जैन धमीर्य , झरॅस्टरियन पारशी , यहुदीज्यु , सुफी सांप्रदाय , शिया- सुनी , जेस्युईट , शीख (नानक पंथीय) रोमन कॅथॉलिक , प्रोस्टेस्टंट , अघोरी भक्तीपंथ , पंचमकासादि आचार पाळणारे शाक्त इत्यादी आणखी काही पंथ सांप्रदाय आपल्या सर्व भेद पोटभेदांसह शिवकाळातही नांदत होते. त्यात अनेकांची प्रार्थनास्थळे आणि मठआखाडे इत्यादीही अस्तित्त्वात होते. पण शिवकालीन कागदपत्रांचा जास्तीतजास्त खोलवर अभ्यास करीत असतानाही वरील विविध भक्तीमागीर्यांच्यात जातीय दंगेधोपे आणि त्यातून रयतेचे होऊ शकणारे नुकसान कधीही घडलेले दिसून येत नाही. सर्वधर्मसमभावाची घोषणा न करताही हिंदवी स्वराज्याचे आचरण समभावी होते. सर्वांचे आचार , सणसमारंभ , उत्सव , मिरवणुका , यात्रा- जत्रा आनंदात चालत होत्या. या उलट मोगली राज्यात सत्ताधीश भेदभावाने आणि अन्याय अत्याचाराने वागल्याचे असंख्य पुरावे मिळतात. औरंगजेबाने सतनामी गोसाव्यांवर जसे अत्याचार केले , तसे शिया सांप्रदायिकांवरही केल्याच्या नोंदी आहेत.
जरा विषयांतर करून एक गोष्ट नमूद कराविशी वाटते , ती औरंगजेबाबाबत. औरंगजेब स्वत: कठोर धर्मव्रती होता. मूतीर्भंजनाच्याबाबतीत तर तो फार आग्रही होता. ‘ बना कदेर् मस्जिद तबा कर कुनिष्त ‘ असे औरंगजेबाचे शिलालेख सापडले आहेत. याचा अर्थ असा , मूतीर् नष्ट करून येथे मशिद तयार केली , असा आहे. बिदर (कर्नाटक) येथे श्रीनृसिंहाचे मंदिरभंग करून त्यावर कोरलेला त्याचा शिलालेख आजही अस्तित्त्वात आहे. त्याचे इतरही धर्मवेड प्रकार ऐतिहासिक पुराव्यांत उपलब्ध आहेत. पण एक गोष्ट विलक्षण होती , की औरंगजेबाने कोणत्याही जातीधर्माच्या संतसत्पुरुषांच्या समाध्यांना अजिबात धक्का लावलेला नाही किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान केलेला नाही. हा एक औरंगजेबी स्वभावातील गोड चमत्कारच म्हणावयाचा! महाराष्ट्रातील श्रीज्ञानेश्वर , श्रीदेव , श्रीचिंचवड , श्रीत्र्यंबकेश्वर , श्रीसासवड , श्रीसज्जनगड , श्रीदेवगिरी , श्रीपैठण या संतसत्पुरुषांच्या समाधीस्थळांवर औरंगजेबाची सत्ता प्रस्थापित झाली होती. पण त्याने तेथे असलेल्या समाध्यांना धक्का लावला नाही. इतकेच नव्हे , तर ऐतिहासिक मराठी थोर राजपुरुषांच्या समाध्या आणि वृंदावने असलेल्या रायगड , सिंहगड , वढू , इंदापूर , श्रीगोंदे , पुणतांबे इत्यादी ठिकाणी असलेल्या , तसे पाहिले तर शत्रूपक्षीय व्यक्तींच्या समाध्यांनाही त्याने हात लावला नाही. यातील त्याची नेमकी मानसिकता काय असावी ते समजत नाही. दारा शुकोह हा औरंगजेबाचा सख्खा थोरला भाऊ होता. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी औरंगजेबाने त्याला अतिशय क्रूरपणाने दिल्लीत ठार मारले. दाराची साधी कबर हुमायून बादशाहाच्या कबरीच्या प्रांगणात आहे आणि होती. औरंगजेबाने आयुष्याच्या अखेरच्या पर्वात एक आज्ञापत्र काढून दाराशुकोहच्या कबरीजवळ ‘ रोज दिवा लावत जा ‘ असा आदेश दिलेला सापडतो.
असो. हे झाले जरा विषयांतर. पण या सर्व पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्यातील सर्वधर्मांबाबतची आस्था , आदर आणि आचरण उठून दिसते. शिवाजीमहाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचे तरुणपण औरंगजेबाच्या कैदेत गेले. तेथे औरंगजेबाची एक मुलगी झिनतुन्निसा ही या शाहूराजांशी आईसारखीच वागली. शाहूराजांना इस्लामची दीक्षा द्यावी असे औरंगजेबाचे मनांत होते. हे ऐतिहासिक सत्य आहे. या झिनतुन्निसाने आपल्या बापाचा हा हट्ट मोडून काढला. त्यामुळे शाहूराजे स्वधर्मातच राहू शकले. एकूणच झिनतुन्निसाच्या उदार मातृतुल्य पेमाचा वागणुकीचा आदर छत्रपती घराण्यानेही सांभाळला. या झिनतुन्निसाच्या मृत्युनंतर (ती दिल्लीत खूप म्हातारी होऊन वारली. तिची कबर दिल्लीत आहे) छ. शाहूराजांनी तिची स्मृती म्हणून साताऱ्यात तिची एक प्रतिकात्मक समाधी कबर बांधली. त्या कबरीची व्यवस्था आजही अतिशय आस्थापूर्वक ठेवली जाते.
जाता जाता हेही सांगून टाकूया का ? त्यात शिवाजी महाराजांची संस्कृती दिसते. औरंगजेब आणि अन्य दक्षिणी बादशाही घराणी आणि या सर्वांचे सरदार दरकदार यांना शिवाजीमहाराजांनी लिहिलेली काही पत्रे आज उपलब्ध आहेत. त्यात महाराजांनी या सर्व शाही मंडळींना बहुमानाथीर् विशेषणांनी संबोधिले आहे. पण त्यांच्यासंबंधात महाराजांनी अन्य कोणलाही लिहिलेल्या पत्रात त्यांनी या शाही मंडळींना बहुमानानेच उल्लेखिले आहे. औरंगजेबाचाही उल्लेख ते तसाच करताना दिसतात. महाराजांची संस्कृती आणि सभ्यता राजकुलीन होती.

शिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .


इतिहासाच्या साधनांपैकी ‘ बखर ‘ हा
एक ऐतिहासिक साक्षीपुराव्याचा विषय अभ्यासकांत मानला जातो. पण त्याचा लेखनांत उपयोग करताना अतिशय चिकित्सेनेच करणे आवश्यक असते. शिवाजी महाराजांच्या जीवनासंबंधातील अनेक बखरी आज उपलब्ध आहेत. महाराजांच्या ऐन समकालातील एकही मराठी बखर उपलब्ध नाही. ‘ सभासदाची बखर ‘ मात्र त्यातल्या त्यात सर्वात जवळची आहे. महाराजांच्या मृत्युनंतर सुमारे १६ वर्षांनी कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासद या गृहस्थाने ती जिंजी येथे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सांगण्यावरून लिहिली.
हा कृष्णाजी अनंत सभासद छ. शिवाजी महाराजांच्या परिवारातील होता. तो ‘ मजालसी ‘ म्हणजे एक प्रकारच्या सल्लागार मंडळातील सभासद आहे. त्यामुळे अनेक शिवकालीन घटनांचा तो प्रत्यक्ष समकालीन साक्षीदार ठरतो. त्यामुळे त्याच्या लेखनावर ‘ समकालीन आधारग्रंथ ‘ म्हणून अभ्यासक विश्वास ठेवतात. या बखरीतही घटनांचा आणि कलानुक्रमाचा तसेच राजकीय संदर्भांचा कुठे कुठे घोटाळा उडालेला येतो. पण तरीही करणाऱ्यांच्या तो लक्षातही येतो. पण तरीही सभासद बखरीचे दोष लक्षात घेऊनही महत्त्व कायम राहतेच.
इतर अनेक बखरी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर वेगवेगळ्या काळात लिहिलेल्या आहेत. त्यांचा वापर अतिशय जपूनच करावा लागतोे. कारण त्यात ऐकीव , पारंपरिक आणि काल्पनिकही हकीकती सापडतात. म्हणून बखर वाङ्मय हे अतिशय जपून अभ्यासपूर्वक वापरण्याचे साधन आहे. ते निर्धास्तपणे एकदम स्वीकारताही येत नाही अन् एकदम केरातही टाकून देता येत नाही.
शिवकालावरील बखरींत लेखकांनी भाबड्या भक्तीने किंवा रागासंतापाने अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्याबद्दल भक्तीभावाने बखरकार विलक्षणच ‘ चमत्कार ‘ करताना दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे महाराजांना ते चक्क शिवशंकराचा साक्षात अवतारच मानतात. एक वेळ तेही समजू शकते. पण बुद्धिला अजिबात न पटणाऱ्या गोष्टी अंधश्रद्धेनेच लेखकांनी लिहून ठेवलेल्या आहेत. दैवी साक्षात्कार हा त्या लेखनातील मुख्य भाग दिसतो.
महाराजांच्या अंगात श्रीभवानी देवीचा वेळोवळी , पण महाकठीण प्रसंगी संचार होत असे असा बखरकारांचा विश्वास आहे. खरंच असे असते , तर महाराज आग्ऱ्याच्या भयंकर संकटात शिरले असते का ? स्वत: महाराजांनी म्हटले आहे की , ‘ मी आग्ऱ्यास यावयास नको होते. मोठी चूक झाली. ‘
महाराजांना स्वप्नात किंवा एकांती चिंतनात अवघड प्रश्ानंची सोडवणूक कशी करावी हे जर सूचित झाले असेल तर ते पूर्ण नैसगिर्क आणि संभाव्य ठरते. पण उठल्यासुटल्या ‘ देव अंगात येतो ‘ आणि बोलतो हे पटावयास जड जाते.
मी योगी स्वामी कुवलयानंद यांना या ‘ अंगात ‘ येण्याच्या मानसिक अवस्थेबद्दल योगशास्त्रात काही आधार किंवा शास्त्रीय स्थान आहे का , असे , विचारले होते. त्यांनी मला सांगितले की , समाधी साधनेच्या प्रक्रियेतील ज्या अनेक सूक्ष्म आणि मोठ्या अवस्था असतात त्यातील अंगात येणे ही एक अगदी प्राथमिक , शास्त्रीय आणि प्रामाणिक अशी भाववस्था आहे. पतंजली योगदर्शनात पतंजली ऋषींनी या भावावस्थेचा फक्त एकाच सूत्रात उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ असा होऊ शकतो की , अत्यंत उदात्त आणि उत्कट अशा कामात जर माणूस तितक्याच उदात्त आणि उत्कट भावनेने कार्यरत असेल , तर त्याला ‘ पुढे काय घडणार आहे ‘ याचा सूचक असा अंतर्मनातून विचार सुचतो. तो विचार त्याच्या तोंडूनही मोजक्या शब्दांत उमटलाही जाऊ शकतो.
भारतीय मानसशास्त्राचे पतंजली हे महान योगी होते. आता यापेक्षा अधिक सांगणे अवघड आहे. योग आणि मानसशास्त्र याच्या अभ्यासकांनीच यावर अधिकारवाणीने भाष्य करावे. मी थांबावे.
पण याबाबतीत संबंध येतो तो बखरींशी आणि बखरकारांशी. शिवाजीमहाराजांपेक्षाही साधुसंतांच्या बाबतीत बखरकारांनी विलक्षण थक्क करणारे कथा प्रसंग रंगवून लिहिले आहेत. ते लिहिताना आपण आपल्या आराध्य संत सत्पुरुषाचा नकळत अवमानच करीत आहोत , याचे भान बखरकारांना राहिलेले नाही. बखरकारांनी भाबड्या भक्तीभावात लिहून ठेवलेल्या काही कथा इतक्या विक्षिप्त आणि चक्क मूर्खपणाच्या आहेत , की त्या येथे सांगायचेही धारिष्ट्य होत नाही. त्यात या संतसजन्मांची केवळ अप्रतिष्टाच होत नाही , तर त्यांचे चारित्र्याहनन होते आहे याचे भान या बखरकारांना आणि भगत मंडळींना राहिलेले नाही. हे कार्य केवळ बखरकारच करतात असे नाही , तर समाजातील काही धूर्त मंडळीही करतात. म्हणूनच सध्याच्या काळातही कधी मारुतीच्या अंगाला घाम फुटतो तर कधी गणपती दूध पितो.
हे सर्व सांगण्याचा एकच हेतू आहे की , सर्वच बाबतीत पण विशेषत: ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत आपण अंधश्रद्ध आणि भाबडे असता कामा नये. शिवाजीमहाराज हे एक माणूस होते. त्यांनाही संकटे आणि भावभावनांना तोंड द्यावे लागत होते. ते त्यांनी कसे दिले याचा अभ्यास झाला पाहिजे.

शिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.


स्वराज्य निर्माण होण्यापूर्वी बादशाही अमलात न्याय देण्याचे काम काझी या नेमलेल्या व्यक्तीकडे असे. तो देईल तो न्याय. त्याला नियमावली ( पिनल कोड) नव्हते. या काझीकडेच कोणाचे धर्मांतर करावयाचे असेल , तर तेही काम अधिकृतपणे असे. काझी काय योग्यतेचा असेल अन् त्याची मनस्थिती काय असेल त्यावर न्याय कसा मिळणार , की अन्यायच होणार हे अवलंबून असे. पण असेही दिसून येते , की आदिलशाही आणि निजामशाही राज्यांत काझी मंडळींनी प्रक्षोभक म्हणा वा अन्यायकारक म्हणा , असे न्यायनिवाडे लोकांना फारसे दिलेले दिसत नाहीत.
पण काझी पद्धतच मुळात एकांगी आणि सदोष होती. जिजाऊसाहेब शिवाजीराजांसह पुण्यात वास्तव्यास कायमच्या आल्या. ( इ. १६३७ ) आणि भोसले जहागिरीचे रुपांतर आदर्श राज्यकारभारात करावयास आऊसाहेबांनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी गाजावाजा न करता वा कोणताही भडकपणा न देता ‘ काझी ‘ हे पद बंद केले. प्रारंभीच्या काळात तर काही वषेर् जिजाऊसाहेब स्वत:च न्यायदानला बसत असत. न्याय देणाऱ्या व्यक्तीची बौद्धिक आणि मानसिक वृत्ती तराजूसारखी समतोल असावी लागते. जिजाऊसाहेबांची तशी होती. समाजातील अनेक तंटेबखेडे त्यांनी समतोल न्याय देऊन सोडविलेले दिसतात. त्यांनी दिलेली काही निवाडपत्रे (जजमेंट) आज उपलब्ध आहेत.
सिंहगडावरती श्रीअमृतेश्वर कालभैरवाचे देऊळ होते. आजही आहे. या देवळांत न्यायाधीश म्हणून बसून जिजाऊसाहेबांनी न्यायनिवाडे जनतेला दिलेले सापडतात. या उपलब्ध निवाडपत्रांत एक नोंद शेवटी नोंदलेली दिसते. ती म्हणजे , ‘ तुम्हांस हा निवाडा जर अमान्य असेल , तर गोतमुखे (ज्युरी) तुम्ही निवाडा मागावा ‘ यावरून न्यायपद्धती निदोर्ष आणि जनतेचे नुकसान न होऊ देण्याकडे कशी सावध राहील याची दक्षता जिजाऊसाहेब घेताना दिसतात. यावेळीही जिजाऊसाहेबांचे पिनलकोड नव्हतेच. पण समतोल विवेक आणि साक्षीपुरावे लक्षात घेऊन हे काम चालत होते. हीच परंपरा प्रगल्भ होत होत वाढत्या स्वराज्यात न्यायदान सुरू झाले.
न्यायाधीश हे अष्टप्रधानातील एक मंत्रीपदच आहे. निराजी रावजी नासिककर या पंडितांकडे हे सरन्यायाधीशपद होते. धामिर्क बाबतीतील न्यायनिवाडे देणे वा मार्गदर्शन करणे अष्टप्रधानातील ‘ पंडितराव ‘ या मंत्र्यांकडे असे. अतीगंभीर स्वरूपाच्या शारीरिक शिक्षा संबंधित आरोपीला द्यायची असेल , तर तो अधिकार छत्रपतींकडेच होता. मृत्युदंडासारखी गंभीर शिक्षा अन्य खालच्या श्रेणीतील , न्याय देणाऱ्या व्यक्तीस वा पंचायतीस देता येत नसे. साक्षीपुरावे अपुरे आणि अधुरे असतील तर दिव्य करण्याचा निर्णय छत्रपती देत. हे दिव्य करण्यास सांगण्याचा अधिकार छत्रपतींसच असे. पुढच्य काळात तो पेशव्यांनीही वापरला.
जरा विषयांतर करूनही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. प्रख्यात आदिलशाही सरदार अफझलखान याने दिलेले काही न्यायनिवाडे उपलब्ध आहेत. त्यात अफझलखानाने कोणावरही अन्याय केलेला दिसत नाही. स्वत:ला कातिल-ए-काफीरान (म्हणजे काफरांची कत्तल करणारा) म्हणवून घेणारा अफझलखान न्यायाधीश म्हणून न्याय देताना जातीय पक्षपात करीत नाही असे दिसते , हेही नमूद केले पाहिजे.
एखादा जमीनजुमल्या बाबतचा किंवा वतनांबाबतचा जटील प्रश्ान् निर्माण झाला , तर त्याबाबतीतला निर्णय असाच चिकित्सेने छत्रपती देत असत. त्याचा सविस्तर कागद लिहून तयार केला जात असे. त्याला महजर असे म्हणत. त्यावर समाजातील विविध थरांतील प्रमुखांचे शिक्के आणि साक्षी असत. काही अशा महजरांवर प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांचीही साक्ष आहे. उदाहरणार्थ पालीच्या खंडोबासमोर झालेला खराडे घराण्याचा महजर पाहा.
न्याय आथिर्कदृष्ट्या गोरगरिबांना वा कोणालाही महागडा पडू नये , अशी दक्षता स्वराज्यात घेतली जात असे. जिंकणाऱ्याला ‘ शेरणी ‘ आणि दावा हरणाऱ्याला ‘ हरकी ‘ द्यावी लागे. पण त्यात अतिरेक होत नसे.
स्वराज्याच्या सार्वभौम राजचिन्हांत तराजू राजसिंहासनाशेजारी एका सोन्याच्या भाल्यावर टकावलेला असे. तराजूही सोन्याचाच असे. तराजू हे न्यायाचे प्रतीक होते. याचा अर्थ स्पष्ट आहे , की स्वराज्यातील न्याय समतोल होता. तेवढाच स्वराज्यातील व्यापार समतोलच राहावा ही अपेक्षा आणि अलिखित आज्ञाही होतीच ना!
या न्यायदानात संबंधित वादी-प्रतिवादींना प्रश्ान् विचारले जात. शिवापूरच्या देशपांडे घराण्यातील दिवाणी खटल्यातील संबंधितांना स्वत: शिवाजी महाराजांनी विचारलेले प्रश्न आजच्या नामांकित वकिलांनाही मामिर्क वाटतात. या उलटतपासणीत महाराजांची तर्कशुद्ध आणि बिनतोड बौद्धिक पातळी लक्षात येते. सुपे परगण्यांत संभाजीमामा मोहिते यांनी केलेला अन्याय आणि खाल्लेली लाच महाराजांनी कठोरपणे निपटून काढलेली दिसेल. वशिले आणि लाचलुचपत यांना महाराजांच्या तराजूत पासंगालाही जागा नव्हती.
पूवीर्पासूनच चालत आलेले काही देवदेवस्थानांचे अधिकारही महाराजांनी रद्द केले. त्यांत ‘ पडत्या भावाने शेतकऱ्यांकडून धान्य आणि अन्न पदार्थ खरेदी करण्याचा अधिकार काही धर्मस्थळांना होता. ‘ पडता भाव म्हणजे बाजारभावापेक्षा खूपच कमी किमंतीत पण वतनी हक्काने माल खरेदी करण्याचा अधिकार. असा अधिकार चिंचवडच्या देव संस्थानास होता. महाराजांनी तो अधिकार रद्द केला. कारण देताना महाराजांनी म्हटले , की ‘ यांत शेतकऱ्यांचे आणि गरिबांचे नुकसान होते. ‘ पण त्याच धर्मस्थळाला महाराजांनी आवश्यक तो धान्य , अन्य शिधा आणि वस्तू स्वराज्याच्या सरकारी कोठारातून देण्याची विनामूल्य व्यवस्था केली , हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
काही कठोर गुन्हा करणाऱ्यांना लहानमोठ्या शिक्षा दिल्या जात असत. त्यात मृत्युंदड वा गंभीर शारीरिक शिक्षाही दिल्या जात होत्या. पदाजी शिळमकर या माणसाला महाराजांनी डोळे काढण्याची शिक्षा दिल्याची नोंद आहे. त्याचा गुन्हा तेवढाच गंभीर असला पाहिजे. पण तो गुन्हा लक्षात येत नाही. तुरुंग होते. अंधार कोठड्याही होत्या. पण कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षताही होती. जेजुरीच्या गुरव घडशी भांडणात एकाला सिंहगडावर विनाचौकशी , अनधिकृतपणे तुरुंगात किल्लेदाराने डांबल्याबद्दल महाराज फार रागावले. त्या निरपराध माणसाची त्वरित सुटका केली. असेही प्रकार क्वचित घडत. पण क्वचितच. स्वराज्यात न्यायाची प्रतिष्ठा सिंहासनाच्या शेजारीच होती.

शिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.


मराठी राज्य निर्माण झाले. ते हळूहळू वाढतही गेले. शिवाजीमहाराजांना इतरेजन मात्र बंडखोर समजत होते. प्रस्थापित बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करून निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला दख्खनी पातशाहीतील लोक आणि दिल्लीच्या मोगलाईतील लोक सार्वभौमत्त्वाचा मान देत नव्हते. इतकेच नव्हे , तर आमच्यातीलही बरेच स्वजन महाराजांना राज्यकर्ता समजत होते. त्यांना राजा मानत नव्हते. तो सार्वभौमत्वाचा साक्षात्कार जनतेला होण्याची नितांत आवश्यकता असते.
आमची भूमी , आमचा ध्वज , आमचे पंतप्रधान , आमची संसद , आमचे आरमार , आमचा समुद आणि आमचे राष्ट्रपती याच्यापुढे जगातील सर्व गोष्टी आम्हाला दुय्यम आहेत , असल्या पाहिजेत. त्यांची अप्रतिष्ठा होता कामा नये. ती प्रतिष्ठा प्रथम आम्हीच सांभाळली पाहिजे. ती पोस्टाच्या तिकिटावरच्या चित्रापासूनच ते संसदेवर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजापर्यंत आमच्या हृदयांत , आमची आम्हालाच उदात्ततेने जाणवली पाहिजे. कधीकधी लहानमोठ्या अशा घटना घडतात , की या उदात्ततेला धक्का बसतो. आपल्या मनातही सुरुंगासारखा स्फोट होतो. नुकतेच घडले. एका शेजारच्या राष्ट्राचे अध्यक्ष आमच्या देशात पाहुणे म्हणून आले. त्यांचे अगदी योग्य असे आम्ही स्वागतही केले. पण ते ज्या विमानातून आले , त्या विमानावर जो आमचा राष्ट्रध्वज लावलेला होता , तो उलटा लावला गेला होता.
आणखी एक आठवण. पण जरा वेगळी. पंडित नेहरुंच्या काळात एका युरोपीय देशात , जगातील सर्व राष्ट्रांत जे कोणचे अतिशय उदात्त , भावनेने भारावलेले राष्ट्रीय गीत (राष्ट्रगीत नव्हे) तेथील जनता प्रेमाने गाते , अशी एकूणएक राष्ट्रप्रेमी गीते एकत्र करून त्यांची भाषांतरे छापण्याचा उपक्रम त्या युरोपीय राष्ट्राने योजला. त्या राष्ट्रात असलेल्या आमच्या राजदूताकडेही अशा अखिल भारतीय पातळीवर लोकादरांस आणि प्रेमास पात्र ठरलेले राष्ट्रविषयक गीत त्या युरोपीय राष्ट्राने मागितले. आमच्या राजदूताने कोणचे गीत दिले ? आमच्या राजदूताने एका हिंदी सिनेमातील एक प्रेमगीत पाठवून दिले! आता ही सगळीच कहाणी दळत बसायची का ? जाऊ द्या. पण असे का होते ? कारण आमचे मनच ‘ स्वदेशी ‘ झालेले नाही.
शिवाजी महाराज लहानसान गोष्टीतही स्वराज्याची अस्मिता आणि प्रतिष्ठा कसे जपत होते याचे द्योतक असलेले महाराजांचेच एक पत्र उपलब्ध आहे. गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहा बादशाहास भेटावयास महाराज जाणार होते. ही भेट राजकीय होती. आजच्या भाषेत बोलायचे तर राष्ट्रीय पातळीवरची होती. म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती महाराज गोवळकोंड्याच्या बादशाहाला भेटावयास जाणार होते. तेव्हा ‘ आम्ही बादशाहांस भेटावयास कोणत्या पद्धतीने येऊ ‘ हे महाराजांनी आपल्या मराठी राजदूताच्यामार्फत गोवळकोंड्याच्या वजीरांस आणि बादशाहास स्पष्ट शब्दांत कळविले आहे. महाराजांच्या राजदूताचे नाव होते प्रल्हाद निराजी नासिककर. महाराज म्हणतात की , ‘ आम्ही बादशाहांस भेटावयास येऊ , त्यावेळी आमची सर्व राजचिन्हे आमच्या समवेत भेटीचे वेळी असतील ‘ छत्र , मोचेर्ले , सोन्याच्या मुठीच्या चवऱ्या , ध्वज , माहिमरातब , गुर्ज (राजदंड) इत्यादी सर्व राजचिन्हे समवेत आणि धारण करून आम्ही येऊ. शाही नौबत (छत्रपतींची राजदुंदुभी) , निरंकुश स्वारीचा हत्ती त्यात असेल.
हे सर्व सुचविण्यात आणि त्याप्रमाणे घडविण्यात महाराजांचा कोणता हेतू होता ? बडेजावाने मिरविण्याचा आणि आपला डामडौली दिमाख करून गोवळकोंडेकरांना दिवविण्याचा किंवा हिणविण्याचा होता का ? अजिबात नाही. पण एक सार्वभौम स्वतंत्र महाराजा आपल्या राष्ट्राच्या वतीने तुमच्याकडे भेटीस येत आहे याची जाणीव त्यांना आणि आपल्यातील आंधळ्या सुजनांनाही देण्याकरता हा रिवाज महाराज जाणीवपूर्वक आचरीत होते. जगातील सर्वच सार्वभौम देश हा रिवाज पाळतात. आमचे हिंदवी स्वराज्य नव्यानेच जन्माला आलेले असल्यामुळे आम्हाला जाणीव नव्हती , ती देण्याची अशी गरज होती , इतकेच. पण त्याला केवढा अर्थ आहे. महाराजांची आणि कुतुबशाहाची भेट अशाच पद्धतीने घडली.
पुढची एक आठवण सांगावीशी वाटते. श्रीमंत थोरले बाजीराव हे दिल्लीकरांचा मुलुख जिंकत जिंकत चंबळा नदी ओलांडूनही पुढे गेले. पण दिल्लीच्या बादशाहाच्या बाबतीत त्यांच्या भावना जरा उणेपणानेच व्यक्त झाल्या. पुढे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी तर आपल्या राजदूतामार्फत दिल्लीच्या मोगल बादशाहाला आहेर म्हणून सोन्याची किल्ली अर्पण केली. गोष्ट किरकोळ वाटेल , पण राष्ट्रीय भावनेचा विचार केला , तर ती गंभीर आहे. सोन्याची किल्ली नजराणा म्हणून देणे म्हणजे आमच्यावरचे आपले वर्चस्व आम्ही मान्य करतो आणि सर्वस्वाच्या अधिकाराची ही किल्ली आपणास अर्पण करतो असा त्याचा अर्थ होता. येथे छत्रपतींच्या , पंतप्रधानांच्या आणि एकूणच हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौम प्रतिष्ठेला धक्का लागत होता. लागला.
आणखी एक गोष्ट सांगून टाकू काय ? पाहा कशी वाटते. इ.स. १९५२ साली ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ ( द्वितीय) यांचा राज्याभिषेक सोहळा लंडनमध्ये साजरा झाला. त्यावेळी भारत सार्वभौमच होता. पण कॉमनवेल्थचा सदस्य होता. जगातील अनेक देश कॉमनवेल्थचे सदस्य नव्हते , तरीही जागतिक रिवाजाप्रमाणे ब्रिटिश राणीचा आदर आणि अभिनंदन करण्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. भारताच्या वतीनेही भारताचे राजदूत ( हायकमिशनर) उपस्थित होते. रिवाजाप्रमाणे राणीला काही मौल्यवान आहेर करणे आवश्यक आणि योग्यच होते. पण तो आहेर कसा असावा आणि काय असावा याचा विचार आमच्या देशाने म्हणजेच परराष्ट्र खात्याने आणि परराष्ट्रमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता होती. पण तसा केला गेला नाही. आमच्या भारताच्या राजदूताने राणीला गुलाब फुलांचे छत्र अर्पण केले. काय बोलावे ?
हिऱ्यामोत्यांची भरलेली सोन्याची परात एकवेळ आहेर म्हणून राणीला दिली असती , तरी चालले असते. पण सार्वभौमत्वाचे सवोर्च्च प्रतीक म्हणजे छत्र. ते द्यावयास नको होते. पाहा पटते का!
आपल्या राष्ट्राच्या अस्मितेला थोडासुद्धा धक्का लागता कामा नये , याची दक्षता सर्वांनीच अगदी परदेशांत प्रवासाकरता किंवा विद्याथीर् म्हणून अभ्यासाकरता जाणाऱ्या प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता असते. राष्ट्रीय चारित्र्याला त्यातूनच उजाळा मिळतो. नम्रता असावी. लाचारी नसावी.

शिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.


शिवाजीमहाराजांच्या मनावर अगदी लहानपणापासूनच धामिर्क संस्कार झालेले समजून येतात. त्यांच्या वयाची पहिली सहा वर्षे तर शहाजीराजांच्या सहवासात खूप धावपळतीतच गेली. शहाजीराजे निजामशाहीच्या रक्षणासाठी आणि राज्यकारभारही चालविण्यासाठी सतत शहाजहानच्या मोगली फौजेशी झुंजत होते. घोडदौड आणि लढाया यांतच त्यांचा काळ जात होता. जिजाऊसाहेब , तुकाऊसाहेब आणि कुटुंबिय मंडळी यांनाही सतत राजांच्या सांगाती राहावे लागत होते. छावणीचा मुक्काम पडेल , तेवढीच स्थिरता या कुटुंबाच्या वाट्याला येत होती. जिजाऊसाहेब या तर देवधर्मात रमणाऱ्याच होत्या. त्यांच्या सहवासात तोच भाव आणि स्वभाव चिरंजीव शिवाजीराजांच्यात उतरला. जिजाऊसाहेबांची विशेषत: भक्ती भवानीदेवीवर आणि गणपतीवर होती. शंभूमहादेव हे तर त्यांचे कुलदैवतच होते. शंभूभट राजोपाध्ये आणि अन्य काही आश्रित पुजारी आणि शागीर्द मंडळी , पुराणिक , ज्योतिषी आणि नित्यनैमित्तिक सणवार समारंभ आणि धामिर्क विधी यथासांग सांभाळणारी मंडळी राजकुटुंबाबरोबर असायचीच. या सर्व वातावरणाचा परिणाम आणि आईची शिकवण शिवाजीराजांच्या मनावर सतत संस्कार करीत राहिली.
पण एवढे सर्व असूनही शिवाजीराजे हे धामिर्क कर्मकांडात वा भाबड्या देवभोळ्या व्रतवैकल्यात अजिबात गुरफटलेले दिसत नाहीत. ते श्रद्धावंत निश्चित होते पण भिक्षुकी कर्मकांडात तासन्तास घालवणाऱ्या आणि नवसासायांसावर , शकुन अपशकुनांवर आणि मानीव शुभअशुभ भविष्यांवर त्यांचा विश्वास नसावा , असेच कागदोपत्री प्रत्ययास येते. त्यांची कारस्थाने आणि रणांगणे वद्यपक्षातील तिथ्या मिथ्यांना झालेली दिसतात. उदाहरणार्थ पन्हाळ्याची मोहिम वद्य त्रयोदशीला आहे , तर सुरतेवरची दुसरी स्वारी ऐन आमावस्येला आहे. समुदावरच्या स्वाऱ्या भरतीओहोटी पाहून आखलेल्या दिसतात. अन् अमुक अंतराच्या पलिकडे समुद प्रवास केला , तर धर्मच बुडतो ही भोळसट कल्पना महाराजांच्या मनात चुकुनही फिरकत नाही. त्यांचे आरमार आणि व्यापारी नौका मस्कतपर्यंत बिनधास्त जात. महाराजांनी , सौदागर करतात तसा व्यापार केला नाही. पण व्यापार करणाऱ्या कोकण किनाऱ्यावरील आपल्या लोकांना विरोधही केला नाही. संरक्षणच दिले.
महाराज रोज मितकाल पूजाअर्चा करीत असत. त्यांचे राजोपाध्ये , वैदिक पुजारी आणि भोपे व्यवस्थेस असत. केशव पंडित पुरोहित हा संस्कृतज्ञ विद्वान पुराणिक महाराजांना शक्य असेल तेवढ्या वेळेत पौराणिक ग्रंथातील विषय वाचून दाखवित असे. ( या केशव पंडिताने दंड निती नावाचा स्वत: एक ग्रंथही लिहिला.)
महाराजांच्या रोजच्या पूजेत एक सुंदर शिवलिंग म्हणजे बाण होता. महाराज मोहिमेवर वा प्रवासास जात , तेव्हाही हा बाण त्यांच्या बरोबर असे. अखेरपर्यंत हा बाण त्यांच्या सन्निध होता. हा बाण , म्हणजेच हे शिवलिंग अंदाजे पाऊण किलो वजनाचे आहे. बाणाचा रंग काहीसा भस्मीसावळा आहे. अर्थात हा बाण पाषाणाचा आहे. त्यावर अंगचीच जानव्यासारखी रेषा आहे. हा बाण इ. १६९९ पासून इ. १६७७ पर्यंत सिंहगडावर राजाराम महाराजांच्या समाधीपाशी नित्यपूजेत ठेवलेला होता. त्याची रोज पूजाअर्चा व नित्यनैमित्तिक उत्सवविधी साताऱ्याचे महाराज छत्रपती यांच्या राजघराण्यातूनच होत असे. इ. १९७७ मध्ये हा बाण श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे राजमातासाहेब यांनी सिंहगडावरून साताऱ्यास आणविला आणि आपल्या अदालत राजवाड्याच्या देवघरात तो ठेवून त्याची पूजाअर्चा चालू ठेवली. सध्या हा बाण साताऱ्यास अदालत राजवाड्यात देवघरातील पूजेतच आहे. शिवाजीमहाराजांच्या नित्य पूजेतील ही पवित्र ‘ स्मृती ‘ आज अतिशय आस्थापूर्वक सांभाळली जात आहे , म्हणून आवर्जून ही माहिती येथे नमूद करीत आहोत.हा शिवबाण महाराजांना कुणी दिला ?
कोठून मिळाला ? की , परंपरेनेच भोसले राजघराण्यात तो सांभाळीत आलेला आहे ? यातील काहीच नक्की सांगता येत नाही.
महाराजांनी प्रतापगडावर इ. १६६१ च्या श्रावण महिन्यांत अष्टभुजा महिषासुरमदिर्नी भवानीदेवीची स्थापना केली. त्यांची आणि सर्वच राजघराण्याची या देवीवर अपार भक्ती होती. महाराज स्वत:ला या भवानीदेवीचे ‘ भोपे ‘ म्हणजेच देवीचे सेवक समजत असत. आरतीचे वेळी महाराज भोपे म्हणून आरती करीत. अर्थात या उपचारात कवड्याच्या माळा , मळवट आणि हाती पेटलेला पोत आलाच. नवरात्रात आणि प्रत्येक महिन्याच्या पौणिर्मेस यथासांग पूजा आणि पालखीची प्रदक्षिणा होत असे. (परंपरेने हे सर्व आजही चालू आहे.)
या पूजाअर्चा आणि शिखरशिंगणापुरावरील शंभू महादेवाच्या व्यवस्थेत अतिशय आस्था आणि पावित्र्य सांभाळले जाई. पण त्यात उत्सवबाजीचे अवडंबर कधीच नसे. त्याला साधेपणा आणि मर्यादा होती. महाराजांच्या देवभक्तीला बुवाबाजी वा क्षेत्रबाजी चिकटली नाही. महाराज राज्यकतेर् तत्पर आणि सावध छत्रपती बनले. मठाधिपती झाले नाहीत. स्वराज्याच्या प्रचंच नेटका साधून त्यांनी परमार्थ केला. प्रतापगड , शिखर शिंगणापूर , तुळजापूर , पंढरपूर , जेजुरी , चिंचवड , मोरगांव , सप्तकोटीश्वर , श्रीशैलभ , पुणे कसबा गणपती आणि करवीर महालक्ष्मी आदि देवस्थानांविषयी त्यांची भक्ती आणि आस्था उत्तुंग होती. ती अबोल होती. त्यात जाहिरातबाजी नव्हती. हे सर्व देवतार्चन ते मितस्वरूपात करीत होते. पण त्यांचे सवोर्श्च दैवत होत , स्वराज्य आणि देवता होती सर्व प्रजा.
महाराज धामिर्क होते. श्रीभवानीचे ते भक्तही होते. पण मग त्यांचा आहार , व्यवहार आणि नैवेद्य काय होता ? नेमके म्हणावयाचे तर ते मांसाहारी होते का ? अपेयपान ते करीत होते का इत्यादी अनेक प्रश्ान् आपल्या डोळ्यापुढे येतात. पण त्या संबंधाचे अधिकृत पुरावे अजिबात मिळत नाही. हौस म्हणून किंवा खाण्यापिण्याची आवड म्हणून महाराजांनी मुद्दाम कधी हरणासश्यांची शिकार केल्याची एकही नोंद मिळत नाही. व्यसन तर राहोच , पण क्वचित निमित्तानेही त्यांनी मांसाहार केल्याचे उदाहरण अजूनतरी मिळालेली नाही. ते पंढरपूरचे माळकरी वैष्णव नव्हते , पण अघोरी शाक्तही नव्हते. अत्यंत साधे आणि सात्विक जीवन जगणारे पण वेळ आली की रौद तांडव करणारे अन् शत्रूचा वा अपराध्याचा शिरच्छेद करणारे भवानीपुत्र होते. शैव होते. वारकरीही होते. या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा दुसरा कोण होता ? तो सर्वच धर्मांचा आणि सांप्रदायांचा आदर करणारा पालक होता.
महाराजांच्या देवघरातले देव निजीर्व सोन्याचांदीचे नव्हते. तेे सजीव रक्तमांसाचे होते. महाराजांचे हृदय हाच त्या देवांचा देव्हारा होता.

शिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.


शिवाजीमहाराजांचे एकूण आयुष्यच अवघे ५० वर्षे आणि दोन महिन्यांचे. अविश्रांत श्रम हेच या आयुष्याचे सार. ते श्रम केवळ शरीरालाच नव्हते तर मनाला आणि बुद्धिलाही गराडा घालून बसले होते. इ. १६४६ पासून ते इ. १६८० पर्यंत ३५ वषेर् या राष्ट्रनिर्मात्याला अव्याहत भयंकर वादळी आयुष्यच जगावे लागले. त्यांच्या जीवनात चमत्कृतीपूर्ण नाट्यमय घटना घडत गेल्या. आज हे सारे विषय तुम्हा आम्हाला दिपवून टाकतात. आपण त्यातील नाट्याचा रोमहर्षक आनंद लुटीत असतो.
त्यावर नाटके , कादंबऱ्या , चित्रपट आणि काव्ये महाकाव्ये रचीत असतो. पण त्यातील तळमळ , ध्येयवेड घामाची शिंपण आपण कधी एकांतात मनाची समाधी लावून विचारात घेतो का ? विचार केलाच तर एवढाच करतो , की शिवाजीमहाराजांचा पुतळा किती लाख रुपयांचा बनवायचा ? त्याची स्थापना कुठे करायची अन् कुणाच्या हस्ते करायची ? त्यांनी केलेले राष्ट्र आणि समाज उभारणीचे काम की , ते करण्याचा सक्रिय प्रयत्न आपण करतो का ? याचे प्रामाणिक उत्तर नकाराथीर्च असते. होतो फक्त जयजयकार!
सह्यादीच्या डोंगराळ दुर्गम प्रदेशात त्यांनी स्वराज्य मांडले. त्याची देखरेख ठेवण्याकरताही ते जातीने हिंडत असल्याच्या नोंदी सापडतात. ‘ राजेश्री गड किल्ल्यांच्या पाहणीस अमुक भागात गेले. ‘ अशा नोंदी सापडतात. प्रत्यक्ष लहानमोठ्या लढायांचा तपशील तर किती सांगावा ? त्यातीलच ही एक नोंद पाहा. महाराजांचा राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला. त्याची तयारीही रायगडावर सुरू झाली. रायगड कामाधामांत आणि तेवढ्याच लगीन आनंदात बुडून गेला होता. अन् त्यातच महाराजांच्या मनात वाई आणि भोरच्या जवळचा केंजळगड नावाचा किल्ला जिंकून स्वराज्यात घेण्याचा विचार आला. वाई आणि भोर या भागातील हा एकच डोंगरी किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात उरला होता. अन् महाराजांनी तो स्वत: जातीने हल्ला करून , लढून घ्यावयाचे ठरविले. माझ्या मनात विचार येतो. की हा किल्ला जिंकून घेण्याकरता महाराजांनी स्वत:च जाण्याची आवश्यकता होती का ?
तो कुणीही घेऊ शकला असता , तरीही महाराज स्वत: अचानक रायगडावरून ससैन्य गुपचूप निघाले का ? तो दिवस होता दि. २२ एप्रिल १६७४ या दिवसापूर्वी अवघ्या एकच महिना आधी म्हणजे दि. १९ मार्च १६७४ या दिवशी महाराजांच्या एक राणीसाहेब अचानक रायगावरच मृत्यू पावल्या होत्या. महाराजांचं या काशीबाई राणीसाहेबांवर अतिशय प्रेम होतं. त्या या गजबजलेल्या संसारातून अचानक निघून गेल्या. महाराज अतिशय दु:खी झाले. सरसेनापती प्रतापराव गुजर हे महाराजांचे अत्यंत जिव्हाळ्याचे योद्धे होते. तेही या आधी महिन्यापूवीर्च रणांगणात ठार झाले होते. (दि. २४ फेब्रु. १६७४ ) एका बाजूने राज्याभिषेकाची मंगल तयारी चाललेली होती अन् दुसऱ्या बाजूने महाराजांच्या काळजातून दु:खाचे अश्रू पाझरत होते.
हे दु:ख विसरण्याकरताच महाराजांनी ही दि. २२ एप्रिल ची केंजळगडची मोहिम काढली असेल का ? त्याचवेळी वार्धक्याने थकलेली मृत्यूच्याच दिशेने निघालेली आपली आई समोर त्यांना दिसत नव्हती का ? अन् राज्याभिषेकाचा दिवस अवघ्या सव्वा महिन्यावर आलेला महाराजांना दिसत नव्हता का ? तरीही महाराज केंजळगडच्या मोहिमेवर निघाले. दि. २४ एप्रिल १६७४ या मध्यरात्री महाराजांनी स्वत: ससैन्य केंजळगडावर हल्ला चढवला. धडाडून लढाई पेटली. महाराजांनी केंजळगड जिंकलाही.
चांगले झाले. तुमच्या आमच्या आजच्या शिवचरित्राच्या आनंदातही भर पडली. पण युद्धाच्या त्या अंधाऱ्या रात्री वैऱ्याच्या तलवारीचा फटकारा महाराजांवरच फिरला असता तर ? शिवचरित्र राज्याभिषेकाच्या आधीच संपले असते. पण तो राष्ट्रपुरुष त्या काळात तसा वागला. या त्यांच्या वागण्याचा आम्ही आज कधी विचार तरी करतो का ? फार फार तर एखादी कविता रचून मोकळे होतो. आपल्याला महाराजांचे रक्ताचे अन् घामाचे थेंब दिसतात. पण त्यांचे अश्रू कधी दिसतात का ?
एकांतात मनोसमाधी या चरित्राशी साधता आली तरच ते दिसू शकतील.
याच काळात पावसाळा समीप आलेला असतानाही (इ. १६७४ मे मध्य) महाराज चिपळूण जवळच्या दळवटणे या गावी आपल्या मराठी सैन्याची एक छावणी योजनापूर्व ठेवण्यासाठी स्वत: गेले होते. कोकणचा नकाशा भूप्रदेश आणि तेथील हवामान डोळ्यापुढे आणा आणि महाराजांची ही राज्यसाधनाची लगबगसुद्धा डोळ्यापुढे आणा. म्हणजे आज सुट्टीच्या काळात पत्ते कुटायची वा टीव्हीला मिठी मारून बसायची इच्छा थोडीतरी बाजूला राहील.
उपलब्ध ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने शिवाजीमहाराजांची डायरी आपल्याला लिहिता येतेय. लिहा. अन् स्वत:च शोधून पाहा की , महाराजांनी आराम विश्राम घेण्यात किती वेळ खर्च केलाय. विश्रांतीकरता म्हणून ते एकदा मनोहरगडावर आणि वर्धनगडावर राहिल्याची नोंद आपल्याला सापडेल. पण विश्रांतीकरता जाऊन राज्याची आणि राजकारणाचीच कामे तेथे उरकीत बसल्याचा आपल्याला सुगावा लागेल हा! आग्ऱ्याच्या कैदेत औरंगजेबाच्या कृपेने महाराज तीन महिने छान विश्रांती घेत होते. नाही! या पलिकडे महाराजांना विश्रांती गवसलीच नाही.
महाराजांचे असंख्य पुतळे. विविध शिल्पकारांनी घडविलेले आपण पाहतो. बहुतेक सर्वच पुतळ्यांत महाराजांच्या हाती तलवार दाखविलेली आणि ते घोड्यावर बसलेले आहेत , असेच आपण पाहतो. क्वचित एखाददुसराच पुतळा हात उंचावून उभा असलेला आपल्याला दिसतो. असं वाटतं , त्या पुतळ्यातील शिवाजीमहाराज हा उंचावून तुम्हा आम्हालाच सांगताहेत की ‘ पराक्रमाचे तमाशे दाखवा! ‘

शिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.


दिल्लीत औरंगजेब वैतागला होता ‘ शिवाजी ‘ नावाच्या दुखण्याला. इ. स. १६६० पासून त्याने महाराष्ट्रावर सतत स्वाऱ्या चालू ठेवल्या. मोगल , राजपूत , पठाण , अरब , रझाकी , इराणी अन् असेच अनेक लढवय्ये सेनापती आणि सैनिक तो स्वराज्यावर पाठवीत होता. युद्धसाहित्य आणि पैसा अपरंपार ओतीत होता. मनुष्यबळाला तोटा नव्हता , तरीही कोणालाही शिवाजी महाराजांच्या विरुद्ध यश मिळत नव्हते. मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान पठाण यांचा अपवाद सोडला तर बाकी सगळे सेनानी नापास होत होते.
एक गोष्ट लक्षात येते की , औरंगजेब स्वत: महाराजांविरुद्ध स्वराज्यावर कधीही चालून आला नाही. त्याच्या मनात सतत एक धास्ती होती की , माझाच पराभव झाला , तर काय होईल. म्हणून तो धोका पत्करत नव्हता. महाराज आग्ऱ्यात आणि आपल्या जबड्यात गवसले असतानाही पसार झाले. याचा त्याला अतिशय पश्चाताप होत होता. पश्चाताप ? होय पश्चाताप , तो त्याने आपल्या स्वत:च्या तोंडाने पुढे अनेकदा बोलून दाखवला आहे. त्याच्या नोंदी त्याच्या स्वत:च्या डायरीत आहेत. तो सतत पुढे बोलून दाखवीत असे की , ‘ मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठी भयंकर चूक केली. मी त्या शिवाजीला आग्ऱ्यात ताबडतोब ठार मारले नाही. ‘
इ.स. १६७० ते ७२ या तीन वर्षात मराठ्यांनी मोगलांना अक्षरश: हैराण केले. त्यावेळी दिलेरखान स्वत: मराठी मुलुखांवर आणि किल्ल्यांवर याच काळात दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंत कडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता. एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे.
दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ‘ मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी बांगडी ‘ असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला.
साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच… वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की , मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.
कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही , त्याचं गाव माहीत नाही , त्याचा ठाव माहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे.
आणि आम्हाला रामाजीही माहिती नाही आज अन् कण्हेरागडही माहीत नाही आज.
कदाचित पुढे मागे संशोधकांना या रामाजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रांतून मिळेल. अन् काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल.

Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 7 |

|| शिवचरित्रमाला ||

शिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.


महाराष्ट्राला विशाल सागरी किनारा लाभला आहे. निसर्गानेच अशी रचना केली आहे की , महाराष्ट्राच्या पश्चिमेला हा समुद आणि किनाऱ्यावरची जंगलमय कोकणपट्टी दक्षिणोत्तर पसरलेली आहे. पूवेर्स घाटावरचा देश , मधून बलदंड आणि नदीनाल्यांनी सजलेला सहस्त्रशीर्ष सह्यादी असे हे महाराष्ट्राचे रूप आहे. त्यात कोकणपट्टा समुदाच्या सान्निध्यामुळे अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तेवढाच तो सांभाळावयास जोखमीचाही ठरतो. कारण या पश्चिम समुदाच्या बाजूने सारे पश्चिमी जग कोकणावर हल्ले करावयास सतत टपलेले असावयाचे. युरोपीय अठरा टोपीवाले , क्रूर सत्ताकांक्षी अरब आणि दैत्यवृत्तीचे औबिसिनियन काळे हबशी यांची ग्रहणे कोकणपट्टीला सततच ग्रासत असत.
चाचेगिरी करणाऱ्यांची क्रूर धाड जवळजवळ रोजच कुठे ना कुठे पडतच असायची. पोर्तुगीज आणि सिद्दी यांनी कोकणच्या काही भागात आपली सत्ताच कायमची मांडली होती. त्यांच्या जोडीला आता (इ. स. १६६४ पासून पुढे) इंग्रज मुंबईत कायमचे सत्ताधारी होऊन बसले होते. शिवाजीमहाराजांनी या संपूर्ण कोकण कुंडलीचा सुरतेपासून कारवारपर्यंतचा पुरेपूर अभ्यास (सव्हेर्) केलेला दिसून येतो. आपल्या हिंदवी स्वराज्याची ही पश्चिम सरहद्द समुदाला बिलगलेली असणार अन् हा समुद अनेक शत्रूंनी सततच व्याप्त असणार हे ओळखून संपूर्ण कोकणपट्टाच विनाअपवाद स्वराज्यात असला पाहिजे , असा त्यांचा ठाम निष्कर्ष आणि निर्णय होता.
महाराजांना कोकणपट्टीवर माणसे फार फार चांगली मिळाली. उरणपासून कारवारपर्यंतच्या या कोकणात जवळजवळ साठ टक्के प्रदेश आणि किनारा महाराजांना या कोकणी माणसांनी जिंकून दिला. पण पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला पश्चिम ठाणे जिल्हा , गोमांतक आणि सिद्दींच्या ताब्यात असलेला मुरुड जंजिरा , त्याचप्रमाणे मुंबईची सात बेटे व्यापून बसलेल्या इंग्रजांना समूळ उखडून काढण्याची महाराजांची महत्त्वाकांक्षी धडपड शंभर टक्के कधीच यशस्वी होऊ शकली नाही. याचा अभ्यास झाला पाहिजे. का होऊ शकली नाही ? कोणचे बळ कमी पडले ? माणसे तर मासळीसारखी चपळ , पोलादासारखी कणखर , कोल्ह्यासारखी बुद्धिमान , चतुर वाघासारखी तिखट , सुसरीसारखी डाव साधणारी अन् मुत्सद्देगिरीत कलमी आंब्यासारखी गोड अशी महाराजांना लाभली होती. मग महाराजांपाशी असे काय कमी पडले , की त्यांना सिद्दी , फिरंगी अन् इंग्रजी वैऱ्यांना समूळ उखडता आले नाही ?
एक तर मराठी आरमार हजार वर्षानंतर अगदी नव्यानेच समुदात उतरले होते. आरमारावरची युद्धसामग्री शत्रूपेक्षा कमीच अन् नवी होती. आगरी , भंडारी , कोळी , गावित कुणबी इत्यादी सगळे कोकणी मराठे पार्थपराक्रमी होते. पण अभिमन्युसारखे जरा नवीनच होते. त्यामुळे वेळ खाणारी सागरी युद्धे महाराजांना जास्तच वेळ खर्च करून लढावी लागली. यश मिळत होते. पण गती कमी पडत होती. वेळच कमी पडत होता. त्यामुळे महाराजांची हयात संपली पण हे तीन परके शत्रू शिल्लक उरले.
आता यातून मुद्दा असा की , महाराजांचा आरमारी ध्येयवाद लक्षात घेऊन पुढे पेशव्यांनी या तीनही वैऱ्यांना कायमचे नष्ट करण्याचे ध्येय प्रथम क्रमांकाने डोळ्यापुढे ठेवावयास हवे होते. देशावरचा अखिल भारतीय स्वराज्य विस्ताराचा व्याप पेशव्यांनी स्वीकारल्यामुळे आरमाराकडे म्हणजेच सागरी सरहद्दीकडे पेशव्यांचे बळ कमी पडले. त्यातून पुन्हा आपसातील भांडणे आम्हाला बाधली. त्यामुळेच हे तीन वैरी आमच्या छाताडावर कायमचे बंदूकी रोखून टिकू शकले. कान्होजी आंग्रे आणि आंग्रे परिवार आनंदराव धुळप आणि धुळप परिवार हाही तेवढाच शूर होता. पोर्तुगीजांची उत्तर कोकण किनाऱ्यावर दाणादाण उडविणारा चिमाजी अप्पा , शंकराजी महादेव फडके , खंडोजी माणकर , अणजूरकर नाईक वगैरे मंडळीही तेवढीच कर्तबगार होती.
इ. स. १७५१ मध्ये तर पेशव्यांच्या एका हेरवाडकर सरदाराने गोव्यात फोंड्याजवळ खासा पोर्तुगीज गव्हर्नर जनरललाच रणात ठार मारले. इ. स. १७३७ मध्ये पेशव्यांनी जंजिऱ्याचा खासा सुलतान सिद्दी सात याला रणात उरण येथे ठार मारले. इतिहास घडला पण वर्तमान घडले नाही. टिकले नाही. याचे कारण नेमकेच सांगायचे झाले , तर छत्रपती शिवाजीमहाराजांचे धोरण आणि अनुकरण या मंडळींना साधले नाही. आपसात वैर अन् वैऱ्यावर खैर करीत राहिलो आम्ही. इ. स. १७५५ मध्ये आपसातील भांडणापायी नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेऊन सुवर्णदुर्गाजवळ आंग्ऱ्यांचे म्हणजेच स्वराज्याचे आरमार भगव्या झेंड्यासकट समुदात बुडविले.
इतिहासात आमच्या कोणच्या ना कोणच्यातरी अन् एकूण सर्वांच्याच चुका झाल्या. त्याचे परिणाम राष्ट्राला भोगावे लागले. ‘ हे राज्य एक आहे ‘ असे आज्ञापत्रात महाराजांचे मनोगत अमात्यांनी लिहून ठेवले आहे. म्हणजेच राष्ट्रीय एकतेचा , चारित्र्याचा आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षेचा महाराजांनी दिलेला धागा आणि आदेश आम्ही विसरलो. अजूनही विसरलेलेच आहोत. आपसातल्या भांडणांपायी , क्षुद मानापमानापायी , स्वार्थापायी अन् एकमेकांशी व्यक्तीगत आणि सामाजिक पातळीवरून भांडतो आहोत अन् भांडताना जयघोष मात्र शिवाजी महाराजांचा करतो आहोत. विवेक हरवला आहे. नित्य नवा दिन जागृतीचा उगवतच नाही. पण काय करावे ? कुणी चैनीत वारा खाण्यात गंुतलाय , कुणी चारा खाण्यात गुंतलाय. कुणी गुटखा खाण्यात गुंतलाय. वैतागलेल्या गरिबांना व्यवस्थित आत्महत्या करण्याइतके विष खरेदी करायलाही पैसे नाहीत. करंटे मिळाले सर्वही , जो तो ‘ दु ‘ र्बुद्धीच सांगतो.

शिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही


इतिहासाचा , विशेषत: शिवकालाचा अभ्यास करताना मराठी योद्ध्यांची चकित करणारी बहाद्दुरी प्रथम डोळ्यापुढे येते. मुत्सद्दी बुद्धिवंतांची ऊटपटांग चातुर्यवती प्रतिभा आपल्याला चक्रावून टाकते. विद्वानांची बुद्धिवंत लेखनशैली आपल्याला हलवून जागे करते. शाहिरांची ललकारी आपल्याला शहारून टाकते. पण किल्ल्यांची बांधकामे , अतिअवघड ठिकाणी केलेली मोठ्या दरवाजांची वा सांदिसापटीत बेमालूम केलेली चोरवाटांची रचना पाहून तुमच्याआमच्या मनातले आश्चर्यही थक्क होते.
टनावारी वजनांचे दगडी चिरे या कामगारांनी घडविले तरी कसे अन् पाचपाच पुरुष उंचीवर नेऊन ओळंब्यात जडविले तरी कसे हे समजत नाही. मणावारी वजनांच्या मोठमोठ्या तुळ्या आणि फळ्या अखंड मापात दारा झरोक्यांना या सुतारांनी कशा फिट्ट बसविल्या असतील ? अशा अवजड कामात स्वराज्यातले कामगार मजूर , बेलदार , पाथरवट , गवंडी सुतार , लोहार इत्यादी मंडळी अतिशय कष्टाळू , काटक आणि तरबेज होती. तेवढीच ती अंतर्मनातून कल्पक , अभिमानी आणि निष्ठावंत होती.
हे किल्ल्यांवरील अवघड काम करीत असतांना अनेकदा अपघातही होत आणि या कामगारांना प्राणाची किंमत मोजावी लागे. अनेकजण जायबंदीही होत. या सर्वच अज्ञात कामगारांशी महाराज अत्यंत मायेने कृतज्ञ असत. आज आपणही आपल्या आजच्या हिंदवी स्वराज्यात निरनिराळे राष्ट्रीय प्रकल्प साकार करीत आलो आहोत. कोयनेचे धरण म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली कामधेनूच आहे. हे धरण बांधताना कितीतरी कामगार कायमचे जायबंदी झाले आणि सुमारे चाळीस कामगार काम करताकरता झालेल्या अपघातात ठार झाले. या सर्वांची नावे कोयनेच्या बांधकामात एका शांत आणि एकांत जागी शिलालेखात कोरून ठेवली आहेत. आम्ही शाळा कॉलेजातील तरुण सहलीला कोयनेच्या धरणावर जातो.
या कार्यांगणी प्राण अर्पण केलेल्या या शूर धाडसी कामगारवीरांची तुम्हा आम्हाला आठवण होते का ? आम्ही त्या जलाशयाची रम्य गंमत आणि आनंद मनसोक्त लुटावा. तेथे गावं , नाचावं , खेळावं पण या कार्यांगणी पडलेल्या वा घायाळ झालेल्या कामगारवीरांना साष्टांग दंडवत घालण्यास विसरू नये. आज तुमच्या आमच्या कारखान्यांत आणि घरात कोयनेची वीज प्रकाशतीय , ती त्यांच्यामुळे. कारगिलच्या रणांगणावरील वीरांइतकेच याही वीरांचे मोल स्वगीर्य आणि अविस्मरणीय आहे.
अन् मग आता समजेल , की आज तीनतीनशे चारचारशे वर्षांहूनही वयोवृद्ध झालेल्या शिवकालीन गडकोटांची आणि त्यांच्या अज्ञात कामगारांची महत्ता किती थोर आहे , वंदनीय आहे , पूजनीय आहे. या गडकोटांवर वेडेवाकडे माकडचाळे कधीच करणार नाही. आमची नावे गावे त्यावर लिहून ठेवणार नाही. त्या चिऱ्यांचा आणि त्याच्या कामगार हिऱ्यांचा आम्ही मुजरा करून , दंडवत घालून आदरच करू. पूवीर् औरंगजेबासारख्या कर्दनकाळाशी टक्कर देत हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे हे तट आणि बुरुज केविलवाणे होऊन बसले आहेत.
तुम्हाआम्हा तरुणांची झुंड वेडीवाकडी , घाणेरडी गाणी गात येताना पाहून हे तटकोट अन् बुरुज मनातून भयभीत होऊन , असहाय्य नजरेने आपल्याकडे बघताहेत. अन् म्हणत आहेत , ‘ बाळांनो , नका रे आम्हा म्हाताऱ्यांची अशी टवाळी अन् मानहानी करू. ‘ अरे , एके काळी त्या थोरल्या राजानं आमच्या कडेखांद्यावर मायेने हात फिरविला. कुठं आम्हाला जखम झाली असली तर त्यानं ती चुन्यानं. अन् कुठं कुठं तर शिश्यानं बुजवली. आता तुम्ही आमच्याकरता काही केलं नाही तरी चालेल. पण आम्हाला तुमची नावं लिहून अन् आमचे चिरे खिळाखेळे करीत वरून ढकलून घायाळ करू नका. गुटखे खाऊन आमच्या अंगाखांद्यावर अन् तोंडावर थंुकू नका. सिगरेटी अन् ब्राऊनशुगर फुंकून थोटकं आमच्या अंगावर टाकू नका. पाया पडतो , देवा तुमच्या.
अन् खरंच नाही का हे ? एके काळी शिवाजीराजांच्या जिवलग कामगारांनी बांधलेल्या आणि जपलेल्या या तटाकोटांची अवहेलना आम्हीच करतो आहोत. वास्तविक हे तटकोट म्हणजे त्या शूर कामगारांची खडी स्मारके आहेत. आम्ही तरुणांनी या तटाकोटांवर ऑईल पेंटांनी आपली नावे लिहिण्याऐवजी ती , सूयोर्दयापासून सूर्यास्तापर्यंत पसरलेल्या विशाल आकाशात स्वराज्याचे वैमानिक बनून , पराक्रम करून नक्षत्रताऱ्यांच्या अक्षरांनी लिहिली पाहिजेत.
शिवकालीन कामगारांचे धैर्य कितीतरी वेळा दिसून आलेले आहे. कांसा बेटावरील पद्मदुर्ग बांधताना आणि खांदेरी बेटावरील तट बांधताना जंजिरेकर हबश्यांच्या आणि मुंबईकर इंग्रजांच्या तोफाबंदुकांना न जुमानता , न घाबरता कोकणच्या कामगारांनी हे दोन किल्ले उभे केले. ते मेले पण मरेपर्यंत बांधकाम करीत राहिले. अशीच मोलाची कामगिरी गलबतांचे बांधकाम करणाऱ्या कामगारांनी अन् लोहार सुतारांनी केली.
या साऱ्या बांधकामात कामगारांनी कुठे कुठे गणपती , मारुती , कालभैरव , भवानी , खंडोबा या देवदेवतांच्या मूतीर् कोरलेल्या आढळतात , तर कुठे सुसरी , मगरी आणि घोरपडी यांच्याही आकृती कोरलेल्या दिसतात. या त्यांच्या हौशी शिल्पकलेत त्यांचे लढाऊ मन व्यक्त होते.
एकदा मला एका (इ. १९६१ ) वषीर् भिईचा पोलादाचा आपला राष्ट्रीय कारखाना पाहण्याचा योग आला. सर्वत्र लोखंड दिसत होते. तेथे काम करीत असलेल्या माझ्या एका इंजिनीयर मित्राला मी विचारले ‘ हा कारखाना रशियन इंजिनीयर्सनी भारतासाठी उभारला , आता तो आपलीच सर्व यंत्रज्ञ , तंत्रज्ञ आणि कामगार मंडळी चालवीत आहेत. आपले हे सगळे कामगार अन् जाणकार लोक कसं काय काम करीत आहेत ?’
त्यावर त्या माझ्या मित्राने , काहीच शब्दात न बोलता अवतीभवती सर्वत्र पडलेल्या लोखंडी साहित्याकडे बोट फिरवीत माझे लक्ष वेधले. या लोखंडी वस्तूंवर खडूने असंख्य ठिकाणी लिहिले होते , ‘ रघुपति राघव राजाराम
जितना पैसा उतना काम. ‘
नव्याने नुकताच कारखाना सुरू झाला होता. पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलनेही सुरू झाली होती.
रघुपति राघव राजाराम , जितना पैसा उतना काम.
माझ्या मनाला कामगारांची मागणी उमजली , समजली पण त्याचबरोबर मनात आलं , की इथंच काय पण अवघ्या देशात आम्ही जितना पैसा उतना काम करतोच का ? तेवढं केलं तरी रघुपति राघव रामासाठी सेतू बांधणाऱ्या वानरांचं मोल आणि महत्त्व आम्हाला लाभेल.

शिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.


‘ शिवाजी महाराज ‘ हे दोन शब्द तुमच्या आमच्या मनाचे आणि तनाचे अविभाज्य घटक आहेत. अगदी जन्मापासून मरणापर्यंत या आपल्या राजाची साक्षात आठवण म्हणून त्याच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अशा , त्याच्या स्वत:च्या वस्तू , वस्त्रे , शस्त्रे , चित्रे , हस्ताक्षरे , पत्रे आणखी काही आज आपल्याला उपलब्ध आहे का ? असेल तर ते कोठेकोठे आहे ? ते सर्वसामान्य नागरिकाला विशेषत: तुमच्या आमच्या मुलांना पाहावयास मिळेल का ? निदान त्याची प्रकाशचित्रे तरी मिळतील का ? महाराजांची विश्वसनीय अस्सल नाणी कोणती ? त्यातील समकालीन अस्सल कोणती ? उत्तरकालीन पेशवाईतील शिवनाणी कशी ओळखायची ? इत्यादी कितीतरी कुतुहली प्रश्न आपल्याला पडतात. त्या सर्वांचीच उत्तरे चोख देता येत नाहीत. कारण त्याचे पुरावे उपलब्ध नसतात. पण जे काही आहे , ते समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा सगळ्या वस्तू वास्तूंना ‘ शिवस्पर्श ‘ असे नाव देता येईल. असे शिवस्पर्श आज किती उपलब्ध आहेत ?
महाराजांनी स्वत: जे काही हाताळले अन् वापरले असे आज नक्की काय काय आहे ? पहिली वस्तू म्हणजे त्यांची भवानी तलवार. या तलवारीबद्दल प्रचंड कुतुहल अन् तेवढेच प्रेम सतत व्यक्त होत असते. ही तलवार साताऱ्याच्या जलमंदिर राजवाड्यात श्रीमंत छत्रपती राजे उदयनमहाराज भोसले यांच्या खास व्यवस्थेखाली , अत्यंत सुरक्षित बंदोबस्तात ठेवलेली आहे. ही तलवार भवानी तलवारच आहे , हे सिद्ध करावयास पुरावे आहेत. ते पुरावे वेळोवेळी प्रसिद्धही करण्यात आले आहेत. येथे माझ्या मते या क्षणापर्यंत ही तलवार भवानीच आहे एवढेच निश्चित सांगतो. अन्य विश्वसनीय पुरावे येथून पुढे उपलब्ध झाल्यास विचार करता येईलच. निर्णयही घेता येईलच.
लंडन येथील बंकींगहॅम पॅलेसमध्ये छत्रपती महाराजांच्या खास शस्त्रालयातील एक तलवार राणी एलिझाबेथ यांच्या राजसंग्रहालयात आहे. प्रिन्स ऑफ वेल्स पदावर असताना इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड हे इ. १८७५ मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांना कोल्हापूरच्या श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराजांनी भेटीदाखल ज्या मौल्यवान वस्तू दिल्या , त्यांत एक अत्यंत मौल्यवान आणि सुंदर अशी तलवारही दिली. या तलवारीचे नाव कोल्हापूर दरबाराच्या दप्तरखान्यांत ‘ जगदंबा ‘ म्हणून नमूद आहे. ही तलवार रत्नजडीत मुठीची आहे. त्यावर बहात्तर माणके आणि अगणित हिरे जडविलेले आहेत. या तलवारीची जी घडण आहे , त्याला फिरंग किंवा पट्टापान किंवा सडक किंवा सॅबर असे नावे आहे. ही तलवार शिवकालीन नक्कीच आहे. पण ती भवानी नाही. पण ती छत्रपती महाराजांच्या खास शिलेखानातील आहे. म्हणून असे वाटते की , हीही जगदंबा तलवार शककतेर् शिवाजी महाराज छत्रपती (इ. १६३० ते ८० ) यांनीही स्वत: वापरली असेल की काय ? तशी शक्यता असू शकते. म्हणूनच साताऱ्यातील असलेल्या भवानी तलवारीप्रमाणे करवीर छत्रपती महाराजांच्या शिलेखान्यात असलेल्या आणि सध्या बंकींगहॅम पॅलेस , लंडनमध्ये असलेल्या या जगदंबा तलवारीबद्दल तेवढेच प्रेम आणि भक्ती वाटणे हा आमचा सर्वांचा स्वभावधर्मच आहे. ही तलवार (जगदंबा) कोल्हापूर महाराजांची आहे. ती पुन्हा छत्रपती महाराज कोल्हापूर यांच्या राजवाड्यात परत यावी अशी सर्व जनतेचीच इच्छा आहे. ही जगदंबा तलवार बंकींगहॅम पॅलेसमध्ये अतिशय शानदार दिमाखात ठेवलेली आहे. (मी स्वत: ती पाहिली आहे) तशी आस्था आणि व्यवस्था ठेवण्याची थोडीफार सवय आम्हाला लागली तरीही खूप झाले.
शिवाजी महाराजांचे वाघनख लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे. हे वाघनख उत्कृष्ट पोलादी आहे. हे लंडनला कोणी दिले ? त्याचा वेध आणि शोध घेतला , तर थोडा सुगावा लागतो. ग्रँड डफ हा इ. १८१८ ते २४ पर्यंत सातारा येथे इस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमलेला होता. छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या आणि इस्ट इंडिया कंपनीच्या संबंधातले राजकीय व्यवहार तो पाहत असे. तो हुशार होता. तो प्रथम हित पाहत असे , ते आपल्या इंग्लंड देशाचे आणि इस्ट इंडिया कंपनीचे. त्याला इतिहासाचीही आवड होती. साताऱ्यातील वास्तव्यात मराठ्यांच्या इतिहासावर आणि त्यातल्यात्यात शिवकालावर लिहिण्याची त्याने आकांक्षा धरली आणि ती पूर्ण केली. त्याने लिहिलेला ‘ हिस्टरी ऑफ मराठाज ‘ हा गंथ म्हणजे मराठी इतिहासावर लिहिला गेलेला , कालक्रमानुसार असलेला पहिलाच गंथ आहे. म्हणून त्याला मराठी इतिहासाचा पहिला इतिहासग्रंथ लेखक हा मान दिला जातो. तो अत्यंत सावध लेखक आहे. त्याने छत्रपती प्रतापसिंह महाराजांशी मैत्रीचे संबंध ठेवून आपले काम सुविधेने साधले. त्याने बहुदा याच काळात शिवाजीमहाराजांची वाघनखे प्रतापसिंह महाराजांकडून भेट म्हणून मिळवली असावीत. ही वाघनखे त्याने इंग्लंडला जाताना बरोबर नेली. ती त्याच्या वंशजांकडेच होती. चार धारदार नखे असलेले हे पोलादी हत्यार अतिशय प्रमाणबद्ध आणि सुबक आहे. हे हत्यार डाव्या हाताच्या बोटात घालून वापरावयाचे आहे. ग्रँड डफच्या आजच्या वंशजाने (बहुदा तो ग्रँड डफचा पणतू किंवा खापरपणतू असावा) व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमला हे हत्यार दान केले. अफझलखानच्या भेटीच्या वेळी महाराजांनी जे वाघनख नेले होते , तेच हे हत्यार. व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वस्तूसूचीमध्ये ही माहिती अगदी त्रोटक अशी सूचित केली आहे.
महाराजांची जी समकालीन चित्रे (पेन्टिंग्ज) समकालीन चित्रकारांनी काढलेली म्हणून आज उपलब्ध आहेत , त्यातील काही चित्रांत महाराजांचे हातांत पट्टापान तलवार म्हणजेच सरळ पात्याची तलवार म्यानासह दाखविलेली दिसते. तसेच पोलादी पट्टा हातात घेतलेलाही दिसतो. तसेच कमरेला कट्यार (म्हणजे पेश कब्ज) खोवलेलीही दिसते. पण महाराजांचा हा पोलादी पट्टा आणि कट्यार आज उपलब्ध नाही. तसेच त्यांची ढाल आणि हातावरचे संरक्षक दस्ते (म्हणजे मनगटापासून कोपरापर्यंत दोन्ही हातांचे संरक्षण करणारे , दोन्ही हातांची धातूंची वेष्टणे) आज उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे महाराजांचे पोलादी चिलखत आणि पोलादी शिरस्त्राण आणि कापडी चिलखत आणि कापडी शिरस्त्राण होते. पण आज त्यातील काहीही उपलब्ध नाही.
याशिवाय त्यांच्या खास शिलेखान्यात (शस्त्रगारात) आणखीही काही हत्यारे असतीलच. त्यात भाला , विटे , धनुष्यबाण , खंजीर इत्यादी हत्यारे असणारच. अफझलखानाचे भेटीचे वेळी त्यांनी प्रत्यक्ष वापरलेला बिचवा होता. परंतु आता यातील काहीही उपलब्ध नाही. बंदुका , तमंचे (म्हणजे ठासणीची पिस्तुले) , कडाबिना (म्हणजे नरसावयासारखे तोंड असलेले मोठे पिस्तुल यात दारूबरोबरच अनेक गोळ्या ठासून ते उडवीत असत. त्या काळची जणू ही अनेक गोळ्या उडविणारी मशिनगनच) अशी विविध प्रकारची हत्यारे राजशास्त्रालयात नक्कीच असणार. पण महाराजांच्या राजशास्त्रालयाचा आज कोणताही भाग उपलब्ध नाही. धातूच्या हत्यारांना ‘ गोडे हत्यार ‘ असे म्हणत. अन् दारू ठासून वापरण्यास हत्यारांना ‘ उडते हत्यार ‘ असे म्हणत. एकूण शिवस्पशिर्त हत्यारांबाबत सध्या एवढेच सांगता येते.

शिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श


महाराजांची चित्रकारांनी हातांनी काढलेली चित्रे काही उपलब्ध आहेत. त्यातील काही अगदी समकालीन आहेत. काही इ. १६८० नंतर पण नक्कीच पण नजिकच्याच काळात कॉपी केलेली असावीत. पण समकालीन चित्रे उपलब्ध आहेत आणि त्यावरून महाराजांचे रूप आपण पाहू शकतो , हाच आपला आनंद मोठा आहे. आता चित्रकार ज्या योग्यतेचा असेल , त्या त्याच्या योग्यतेप्रमाणेच चित्र तयार होणार. त्याची तुलना किंवा अपेक्षा आपण आजच्या कॅमेऱ्याशी करू शकत नाही. येथे मुद्दा असा , की महाराजांच्या अंगावर मस्तकापासून पावलांपर्यंत जी वस्त्रे दाखविलेली आहेत , ( याला सिरपाव म्हणतात) त्याचा आपल्याला थोडाफार परिचय होऊ शकतो.
पहिली व्यथा ही सांगितली पाहिजे की , या त्यांच्या वस्त्रांपैकी एकही वस्त्र विशेष आज उपलब्ध नाही. त्यांच्या मस्तकावरील पगडी किंवा पागोटे किंवा जिरेटोप जो चित्रात दिसतो , तो उत्तरेकडील आणि दक्षिणेकडीलही सुलतानी अंमलात दरबारी व्यक्ती जशा तऱ्हेचा वापरत असत , तसाच आहे. आज दिल्ली , राजपूत , कांगडा , लखनौ , गोवळकोंडा , तंजावर , विजापूर इत्यादी चित्रकलेच्या शैलीतील (स्कूल) अगणित चित्रे (मिनिएचर्स आणि म्युरल्स) उपलब्ध आहेत. त्यातील व्यक्तींची शिरोभूषणे आणि शिवाजी महाराजांचे शिरोभूषण यांत खूपच साम्य आहे. क्षत्रिय आणि विनक्षत्रिय शिरोभूषणांत थोडाफार फरक दिसतो. थोडक्यात सांगावयाचे झाले , तर महाराजांच्या शिरोभूषणाचे बादशाही शिरोभूषणाशी साम्य आढळते. तो त्या काळाचा परिणाम किंवा प्रभाव आहे.
महाराजांचा अंगरखा , जामा (कमरेचा छोटा शेला) चुस्त पायजमा (सुरवार) हा अशाच प्रकारचा बादशाही दरबारी पद्धतीचा दिसून येतो. रुमाल हाही पण त्यातीलच. अंगावरील शेला म्हणजेच उत्तरीय किंवा उपवस्त्र हे हिंदूपणाचे एक लक्षण होते. पण काही बादशाह आणि त्यांचे अहिंदू सरदारसुद्धा शेला किंवा उपरणे वापरीत असल्याचे जुन्या पेन्टिंग्जवरून सिद्ध होते. या बाबतीतही पालुपद हेच की महाराजांच्या वापरण्यातील एकही वस्त्रविशेष आज उपलब्ध नाही. हीच गोष्ट महाराजांच्या अंगावरील अलंकारांच्या बाबतीत म्हणता येते. कलगी , मोत्याचा तुरा , कानातील चौकडे , गळ्यातील मोजकेच पण मौल्यवान कंठे , दंडावरील बाजूबंद , बोटातील अंगठ्या , हातातील आणि पायातील सोन्याचा तोडा , हातातील सोन्याचे कडे , कंबरेचा नवरत्नजडीत कमरपट्टा पुरुषांच्या अशा कमरपट्ट्याला ‘ दाब ‘ असे म्हणत असत. शिवाजी महाराजांचे तीर्थरूप शहाजीराजे महाराजसाहेब ते तंजावराकडे दक्षिणेत असत. वेळोवेळी तेही शिवाजीमहाराजांकडे आणि जिजाऊसाहेबांकडे काही मौल्यवान वस्त्रे , वस्तू इत्यादी पाठवीत असत. अशी कृष्णाजी अनंत मजालसी याने नोंद केलेली आहे. आज या शिवकालीन वस्त्रालंकारांपैकी आणि अन्य आलेल्या नजराण्यांपैकी काही उपलब्ध नाही.
महाराज कवड्याची माळ श्रीभवानी देवीच्या पूजेच्या आणि आरतीच्या वेळी गळ्यात रिवाजाप्रमाणे , परंपरेप्रमाणे घालीत असत.
असेच अलंकार राणीवशाकडेही होते. त्याचप्रमाणे प्रतापगडच्या भवानीदेवीच्या आणि शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या अंगावरही होते. राज्याभिषेक करून छत्रपती म्हणून मस्तकावर छत्र धरण्यापूवीर् महाराजांनी स्वत: दि. २० मे १६७४ या दिवशी प्रतापगडावर जाऊन श्रीभवानीदेवीची षोड्षोपचारे यथासांग पूजा केली. त्यावेळी वेदमूतीर् विश्वनाथ भट्ट हडप हे पुजारी होते. श्रीभवानी देवीस महाराजांनी सोन्याचे आणि नवरत्नजडावाचे सर्व प्रकारचे अलंकार घातले. त्यात देवीच्या मस्तकावर सोन्याचे मौल्यवान झालरदार असे छत्र अर्पण केले. या छत्राचे वजन सव्वा मण होते. त्यावेळचे वजनाचे कोष्टक असे २४ तोळे म्हणजे १ शेर. १६ शेर म्हणजे १ मण. जुना तोळा सध्याच्या पावणेबारा ग्रॅमचा होता. श्रीच्या अंगावरील सर्व अलंकार आजच्या किंमतीने कोट्यवधी रुपयाचे भरतील. पण हे सर्व अलंकार इ. १९२९ मध्ये प्रतापगडावर झालेल्या पठाणी चोरीत चोरीस गेले. पुढे चोर सापडले पण चोरी संपलेली होती. महाराजांनी अर्पण केलेल्या श्रींच्या अलंकारांपैकी श्रींच्या पायातील , माणके जडविलेली दोन पैंजणे फक्त सध्या शिल्लक आहेत , असे समजते. ही चोरांची कृपाच म्हणायला हवी.
अशा चोऱ्या महाराष्ट्रात कितीतरी देवदेवस्थानात झालेल्या आहेत , हे आपण पाहतो आहोत. प्रतापगड , नरसिंगपूर , जेजुरी , कराड , औंध , पर्वती इत्यादी ठिकाणी चोऱ्या झाल्या. काय म्हणावे याला ? पूवीर् आमचे देव आणि देवता शूरवीरांना आणि वीरांगनांना पावत होत्या. विजय मिळत होते , वैभव वाढत होते. पण आता मात्र त्या चोरदरोडेखोरांनाच पावाव्यात का ? भक्त दुबळे बनले. देवांनी तरी काय करावे ? शिवस्पर्श एवढाच आज आपल्यापुढे ज्ञात आणि थोडासा उपलब्ध आहे.
नेहमी मनात विचार येतो , की शिवाजी महाराज ज्या ज्या गडांवर आणि गावाशहरांत फिरले आणि राहिले , अशा गावाशहरांची आणि गडांची आणि महाराजांच्या तेथील वास्तव्याची कागदोपत्रांच्या आधाराने तारीखवार यादी करता येईल. अवघड काहीच नाही. अशी यादी आपण करावी आणि अमुकअमुक ठिकाणी महाराज कोणत्या तिथीमितीस तेथे राहिले हे प्रसिद्ध करावे. म्हणजे त्या त्या ठिकाणच्या रहिवाशांना आणि विशेषत: तरुण विद्याथीर् विद्याथिर्नींना त्या शिवभेटीचा स्पर्शानंद घडेल. इतिहास जागता ठेवण्याकरिता या शिवस्पर्शाचा असा उपयोग झाला पाहिजे.

शिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती


हिंदवी स्वराज्याची सुरुवात शून्यातून झाली. अगदी गरीब अशा मावळी शेतकऱ्यांच्या , गावकामगारांच्या आणि कोणतीतरी मजुरी करणाऱ्या ‘ बिगाऱ्यां ‘ च्या संघटनेतूनच महाराजांनी आणि विलक्षण संघटन कौशल्य असलेल्या जिजाऊसाहेबांनी हा धाडसी डाव मांडला. माणसं म्हटली की , स्वभावाचे आणि गुणदोषांचे असंख्य प्रकार आलेच. या सर्वांना एका ओळंब्यात आणून , धाडसी आणि अति अवघड विश्वासाची कामे करवून घेणे , म्हणजे आवळ्याभोपळ्याची एकत्र मोट बांधण्याइतकेच अवघड काम होते. त्यात पुन्हा स्वाथीर् आणि गुन्हेगार प्रकृतीची माणसे थोडीफार तरी असणारच. आंबेमोहोर तांदळात खडे निघतातच की , ते शिजत नाहीत. आधीच वेचून काढावे लागतात. माणसांचेही तसेच. म्हणूनच या मायलेकरांनी या सर्व माणसांची निवडपाखड करून , जिवावरची कामंसुद्धा करवून घेण्यासाठी केवढं कौशल्य दाखवलं असेल ?
पण त्यात ही मायलेकरे यशस्वी ठरली. ती इतकी , की स्वराज्याची सर्वात मोठी धनदौलत म्हणजे ही माणसेच होती. ती सामान्य होती. पण त्यांनी असामान्य इतिहास घडविला. महाराजांची ही माणसं म्हणजे स्वराज्याची हुकमी शक्ती. एकवेळ बंदुकीची गोळी उडायला उशीर होईल , पण ही माणसं आपापल्या कामात निमिषभरही उडी घ्यायला उशीर करीत नव्हती. सबबी सांगत नव्हती. अखेर मोठी कामे , मोठ्या संस्था , मोठ्या राष्ट्रीय जबाबदारीच्या संघटना , गुप्त प्रयोगशाळा , गुप्त शस्त्रास्त्रांचे संशोधन आणि निमिर्ती… राजकारणाचे सर्वात महत्त्वाचे गुप्त खलबतखाने अशा सर्व ठिकाणी अशी हुकमी , विश्वासाची माणसेच लागतात. महाराजांनी अनेकांना पदव्या दिलेल्या आढळून येतात. त्यातील ‘ विश्वासराव ‘ ही पदवी किती मोलाची बघा! गायकवाड घराण्यातील कृष्णराव नावाच्या एका जिवलगाला महाराजांनी विश्वासराव ही पदवी दिलेली होती. युवराज संभाजीराजांना आग्रा प्रसंगात मथुरेमध्ये ज्यांच्या घरी महाराजांनी ठेवले होते , त्या मथुरे कुटुंबालाच त्यांनी ‘ विश्वासराव ‘ ही पदवी दिली होती. अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार अशा काही सरदारांना आणि मंत्र्यांना त्यांनी ‘ सकलराज्य कार्य धुरंधर ‘ आणि ‘ विश्वासनिधी ‘ या पदव्या दिल्या होत्या. अनेक कोहिनूर हिऱ्यांचा कंठा गळ्यात पडण्यापेक्षाही महाराजांच्या हातून अशा मोलाच्या पदवीची बक्षिसी भाळी मिरवताना या सगळ्या विश्वासू जिवलगांना केवढा अभिमान वाटत असेल! पदवी स्वीकारून नंतर सवडीनुसार , संधी साधून ती परत केल्याचे एकही उदाहरण नाही! महाराजांनीही पदव्यांची स्वस्ताई खैरात केली नाही.
महाराजांनी कौतुकाकरिता कर्तबगारांना मानाच्या सार्थ पदव्या दिल्या. बक्षिसे , पारितोषिके दिली नाहीत. वंशपरंपरा कोणालाही , कोणतेही पद दिले नाही. या चुका स्वराज्याला म्हणजेच राष्ट्राला किती बाधतात , याची आधीच्या इतिहासावरून महाराजांना पुरेपूर जाणीव झालेली होती. पैसे किंवा अधिकारपदे देऊन माणसांची खरेदी विक्री महाराजांनी कधीही केली नाही. ऐन अफझलखान प्रसंगी विजापूरच्या बादशाहाने अफझलखानाच्या मार्फत महाराजांचे सरदार फोडून आपल्या शाही पक्षात आणण्याचे कितीतरी प्रयत्न केले. पण फक्त एकच सरदार अफझलखानास सामील झाला. बाकी झाडून सगळे ‘ विश्वासराव ‘ ठरले. हुकमी जिवलग ठरले. त्यात कान्होजी जेधे , झुंजारराव मरळ , हैबतराव शिळमकर , दिनकरराव काकडे , विश्वासराव गायकवाड , हंबीरराव मोहिते , यशवंतराव पासलकर अशी ‘ पदवीधर ‘ बहाद्दरांची त्यांच्या पदव्यांनिशी किती नावे सांगू ? असे दाभाडे , मारणे , शितोळे , जगताप , पांगेरे , कंक , सकपाळ , महाले , प्रभूदेशपांडे अणि किती किती किती सांगू ? महाराजांचे हे सारे हुकमी विश्वासराव होते. यातील अनेक जिवलगांच्या अगदी तरुण मुलानातवंडांना अफझलखानाने अन् पुढे इतरही शाही सरदारांनी पत्रे पाठवून बक्षिसी , इनामे , जहागिऱ्या देण्याचे आमीष दाखविले. पण त्यातील एकाही बापाचा एकही पोरगा शत्रूला सामील झाला नाही. सगळ्या विश्वासरावांच्या पोटी विश्वासरावच जन्मले. वास्तविक त्या पोरांनी आपल्या बापाला म्हणायला हवं होतं की , ‘ बाबा , तुम्ही महाराजांच्याकडेच ऱ्हावा. म्या खानाकडं जातो. पुढं कुणाचं तरी ‘ गव्हन्मेर्ंट ‘ येईलच ना! आपलं काम झालं , म्हणजे झालं! ‘ असा अविश्वासू आणि बदफैली विचार कोणाही मावळी पोरानं केला नाही.
तरीही संपूर्ण शिवचरित्रात अन् नंतर छत्रपती शंभू चरित्रात आपल्याला अगदी तुरळक असे चारदोन काटेसराटे सापडतातच. पण लक्षात ठेवायचे , ते बाजी पासलकर , तानाजी , येसाजी , बहिजीर् , हिरोजी यांच्यासारख्या हिऱ्यामाणकांनाच.
आपल्या इतिहासात चंदन खूप आहे. कोळसाही आहे. यातील काय उगाळायचं ? चंदन की कोळसा ? पारखून सारंच घेऊ. अभ्यासपूर्वक. पण उगाळायचं चंदनच. कोळसा नाही. चंदनाचा कोळसा करून उगाळत बसण्याचा उद्योग तर कृतघ्नपणाचाच ठरेल. नकली दागिने जास्त चमकतात. अस्सल मंगळसूत्र पदराखाली झाकूनच असते.

शिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.


स्वराज्याचे एक विलक्षण मोलाचे सूत्र महाराजांनी आणि जिजाऊसाहेबांनी अगदी प्रारंभापासून , कटाक्षाने सांभाळले होते. ते म्हणजे , स्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळेल. लायकीप्रमाणे दाम मिळेल. लायकीप्रमाणे स्थान मिळेल. हेच सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग , सगेसोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटीशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला.
पण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का ? तसेही महाराजांनी केले नाही. त्यांचे थोडेेसेच पण फार मोठ्या योग्यतेचे नातलग अधिकारपदावर होते.
अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधते ते काही व्यक्तींवर. उदाहरणार्थ बहिजीर् नाईक. हा बहिजीर् रामोशी समाजातील होता. पण योग्यतेने राजकुमारच ठरावा , असा महाराजांच्या काळजाचा तुकडा होता. तो अत्यंत धाडसी , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत विश्वासू , तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्याचा , बहिरी ससाणा होता. महाराजांनी त्याला नजरबाज खात्याचा सुभेदार नेमले होते. सुभेदार म्हणजे त्या खात्याचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. हेरखात्याचा मुख्य अधिकारी होणे ही सामान्य गोष्ट आहे का ? त्याची बुद्धिमत्ता आणि चातुर्यप्रतिभा असामान्यच होती. अनुभवाने ती असामान्यच ठरली. वास्तविक रामोशी समाज हा लोकांनी ( अन् पुढच्या काळात ब्रिटीशांनी) गुन्हेगारच ठरवून टाकला. पण त्यातील हिरे आणि मोती महाराजांनी अचूक निवडले. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आणि दौडत्या सैन्यातही महाराजांनी रामोशी ‘ नाईक ‘ मंडळी आवर्जून नेमली.
जरा थोडे विषयांतर करून पुढचे बोलतो. स्वराज्य बुडून इंग्रजी अंमल आल्यानंतरच आमच्या पुरंदरच्या परिसरातला भिवडी गावचा एक तरुण होता , उमाजी नाईक रामोशी. त्याचे आडनांव खोमणे. सारे मराठी स्वराज्य बुडाले , म्हणजे आम्हीच बुडवले. हा उमाजी नाईक एकटा स्वराज्य मिळविण्याकरता इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठला. चार जिवलग मिळविले. आणि इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याकरता हा रामोशी आपल्या दोन पुत्रांनिशी उठला. त्याच्या एका मुलाचे नाव होते , तुका. दुसऱ्याचे नाव होते म्हंकाळा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की , या उमाजी नाईकाने उभारलेले बंड. इंग्रजांचे राज्य मोडून , शिवाजीराजा छत्रपतीचे राज्य स्थापन करण्याचा त्याचा तळमळीचा हेतू होता. शिवाजीमहाराजांना बाकी सारे जण विसरले. एका उमाजी नाईकाच्या काळजात महाराज विसावले होते. शिवाजीराजे या शब्दाचे सार्मथ्य किती मोठे होते आणि आहे हे एका रामोशालाच समजले. आम्हाला केव्हा समजणार ? होय. आम्हालाही माहिती आहे की , कॅप्टन मॅकींगटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने उमाजी नाईकाला पडकले अन् फाशीही दिली. पण त्याच कॅप्टनने उमाजी नाईकाचे चरित्र लिहिले. छापले. त्यात तो कॅप्टन म्हणतो , ‘ हा उमाजी म्हणजे अपयश पावलेला शिवाजीराजाच होता. ‘ मन भावना आणि त्याप्रमाणे कर्तबगारी ही जातीवर अवलंबून नसते. बहिजीर् नाईक आणि उमाजी नाईक हे सारखेच. एक यशस्वी झाला , दुसरा दुदैर्वाने अयशस्वी ठरला. दोघेही शिवसैनिकच.
दिलेरखान पठाणाशी पुरंदरचा किल्ला साडेतीन महिने सतत लढत होता. दिलेरखानला पुरंदर जिंकून घेता आला नाही. त्या पुरंदरावर रामोशी होते , महार होते , धनगर होते , मराठा होते , मातंग होते , कोळी होते , कोण नव्हते ? सर्वजणांची जात एकच होती. ती म्हणजे शिवसैनिक. चंदपूर , गडचिरोलीपासून कारवार , गोकर्णापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातील अगणित समाजसमुहातील माणसे महाराजांनी निवडून गोळा केली. त्यात धर्म , पंथ , सांप्रदाय , जाती- जमाती , भाषा , रीतरिवाज कधीही मोजले नाहीत. राष्ट्र उभे करावयाचे असेल , तर लक्षात घ्यावा लागतो , फक्त राष्ट्रधर्मच. अन् निर्माण करावे लागते राष्ट्रीय चारित्र्य. स्वराज्याचा पहिला पायदळ सेनापती होता नूर बेग. आरमाराचा एक जबर सेनानी होता दौलतखान. साताऱ्याजवळच्या वैराटगड या किल्ल्याचा किल्लेदार होता एक नाईक. एक गोष्ट लक्षात येते की , शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास म्हणजे सर्व समाज शक्तींचा वापर. मित्रांनो , महाराष्ट्राच्या एका महाकवीच्या ओळी सतत डोळ्यापुढे येतात. तो कवी म्हणतोय , ‘ हातात हात घेऊन , हृदयास हृदय जोडून , ऐक्याचा मंत्र जपून ‘ आपला देश म्हणजे बलसागर राष्ट्र उभे करूया. शिवरायांच्या तत्त्वज्ञानाचे आणि इतिहासाचे तरी दुसरे कोणते सार आहे ?

शिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व


शिवाजी महाराज हे स्वराज्य संस्थापक होते. पण तेही या स्वराज्याचे प्रजाजनच होते. राजेपण , नेतेपण आणि मार्गदर्शक गुरूपण या महाराजांच्या वाट्याला आलेल्या भूमिका होत्या. त्या त्यांनी आदर्शपणे पार पाडल्या. सत्ताधीश असूनही जाणत्यांच्या आणि कर्तबगारांच्या पुढे ते सविनय होते. अहंकार आणि उद्धटपणा त्यांना कधीही शिवला नाही. मधमाश्यांप्रमाणे शंभर प्रकारची माणसं त्यांच्याभोवती मोहोळासारखी जमा झाली. त्यांचा त्यांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे उपयोग केला. या साऱ्यांना सांभाळण्याचं काम सोपं होतं का ? जिजाऊसाहेब ते काम जाणीवपूर्वक ममतेने आणि मनापासून कळवळ्याने करीत होत्या. माणसांशी वागणं ही त्यांची ‘ पॉलिसी ‘ नव्हती. प्रेम हा त्यांचा स्थायीभाव होता. सध्याच्या काळात लोकप्रतिनिधित्त्व करणाऱ्या संसदेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या कार्यर्कत्यांनी जिजाऊसाहेबांच्या नेतृत्वाचा म्हणजेच मातृत्त्वाचाच अभ्यास करावा. त्या उत्कृष्ट संघटक होत्या.
शाही धुमाकुळात उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहरात त्या प्रथम राहावयास आल्यावर ( इ. १६३७ पासून पुढे) त्यांनी पुण्याभोवतीच्या छत्तीस गावात एकूणच कर्यात मावळात त्यांनी अक्षरश: दारिद्याने आणि हालअपेष्टांनी गांजलेल्या दीनवाण्या जनतेला आईसारखा आधार दिला. आंबील ओढ्याच्या काठावरील ढोर समाजाला त्यांनी निर्धास्त निवारा दिला. बेकार हातांना काम दिले , काम करणाऱ्या हातांना दाम दिले. प्रतिष्ठीत गुंडांचा सफाईने बंदोबस्त केला. प्रसंगी या अतिरेकी छळवादी गुंडांना त्यांनी ठार मारावयासही कमी केले नाही. उदाहरणार्थ फुलजी नाईक शिळमकर आणि कृष्णाजी नाईक बांदल. यांना शब्दांचे शहाणपण समजेना. त्यांना त्यांनी तलवारीनेच धडा दिला. त्यांच्या इतक्या कडकपणाचाही लोकांनी नेमका अर्थ लक्षात घेतला.
लोक जिजाऊसाहेबांच्या पाठिशीच उभे राहिले. कोणीही त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला नाही! याच शिळमकर , बांदल आणखीन बऱ्याच दांडगाईवाल्या माणसांच्या घरातील गणगोणाने महाराजांच्या सांगाती स्वराज्यासाठी बेलभंडार उचलून शपथा घेतल्या. ते महाराजांचे जिवलग बनले. हे सारे श्रेय जिजाऊसाहेबांच्या ममतेला आहे. त्याही अशा मोठ्या मनाच्या की , चुकल्यामाकलेल्यांच्या रांजणातील पूवीर्चे खडे मोजत बसल्या नाहीत.
जरा पुढची एक गोष्ट सांगतो. मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. त्यात महादजी जगदाळे तळबीड गावाजवळ महाराजांचे हाती जिता गवसला. महाराजांनी त्याचे हात तोडले. याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला. अशी ही आई होती.
उद्ध्वस्त झालेलं पुणं आणि परगणा जिजाऊसाहेबांनी संसारासारखा सजविला. पावसाळ्यात चवताळून सैरावैरा वाहणाऱ्या आंबील ओढ्याला त्यांनी पर्वतीजवळ पक्का बंधारा घातला. शेतीवाडीचा खडक माळ करून टाकणाऱ्या आणि जीवितहानी करणाऱ्या या आंबील ओढ्याला त्यांनी शिस्तीची वाहतूक दिली. लोकांना न्याय दिला. शेतकऱ्यांना सर्व तऱ्हेची मदत केली अन् माणसं महाराजांच्या धाडसी उद्योगात हौसेनं सामील झाली.
नुस्त्या घोषणा करून माणसं पाठीमागे येत नाहीत. जोरदार घोषणा ऐकून चार दिवस येतातही. पण पाचवे दिवशी निघूनही जातात. लोकांना भरवसा हवा असतो. त्यांना प्रत्यय हवा असतो. आऊसाहेबांनी मावळ्यांना शिवराज्याचा प्रत्यय आणून दिला. म्हणून मी म्हटलं , की सध्याच्या आमच्या या नव्या हिंदवी स्वराज्यातील निवडून येणाऱ्या अन् न येणाऱ्याही लोकप्रतिनिधींनी जिजाऊसाहेबांच्या कार्यपद्धतीच्या आणि अंत:करणाचा अभ्यास करावा. निवडून आल्यावर पाच वषेर् फरारी होण्याची प्रथा बंद करावी.
एका ऐतिहासिक कागदात आलेली एक गंमत सांगतो. कागद जरा शिवोत्तरकालीन आहे. पण लक्षात घेण्यासारखा आहे. त्यातील आशय असा तानाजी मालुसऱ्याच्या घरी रायबाचं लगीन निघाले. तो राजगडावर महाराजांकडे भेटायास आला. खरं म्हणजे लग्नाचं आवतण द्यावयासच आला. पण सिंहगड काबीज करण्याच्या गोष्टी महाराजांपुढे चाललेल्या दिसताच त्याने पोराच्या लग्नाचा विचारही कळू न देता , ‘ सिंहगड मीच घेतो ‘ म्हणून सुपारी उचलली. ही गोष्ट जिजाऊसाहेबांना गडावरच समजली. चांगलं वाटलं. पण थोड्याच वेळात त्यांना कळलं की , तानाजीच्या घरी लगीन निघालंय. पण तो बोललाच नाही. तेव्हा मी आणि महाराजही तानाजीला म्हणाले , की ‘ सिंहगड कोंढाणा कुणीही घेईल. तू तुझ्या पोराचं लगीन साजरं कर. ‘ तेव्हाचं तानाजीचं उत्तर मराठ्यांच्या इतिहासात महाकाव्यासारखं चिरंजीव होऊन बसलंय. तानाजी म्हणाला , ‘ आधी लगीन कोंढाण्याचं ‘.
नंतर कोंढाण्याची मोहिम निश्चित झाली. मायेच्या हक्कानं तानाजी आपल्या अनेक मावळ्यांनिशी जिजाऊसाहेबांच्या खाश्या ओसरीवर जेवण करायला गेला. तो अन् सारे पानावर जेवायला बसलेही. अन् तानाजी मोठ्यानं म्हणाला , ‘ आम्हाला आऊसाहेबानं स्वत:च्या हातानं पंगतीत वाढलं पाहिजे. ‘ केवढा हा हट्ट. जिजाऊसाहेबांनी चार घास पंगतीत वाढले. वाढता वाढता आऊसाहेब दमल्या. तेव्हा तानाजी सर्वांना म्हणाला , ‘ आई दमली , आता कुणी तिनं जेवायला वाढायचा हट्ट धरू नका. ‘ जेवणे झाली. तानाजीसह सर्वांनी आपापली खरकटी पत्रावळ उचलली अन् तटाखाली टाकली.
तानाजीनं निघताना आऊसाहेबांच्या पावलांवर आपलं डोक ठेवलं अन् दंडवत घातला. त्याने आपल्या डोईचं पागोटं आऊसाहेबांच्या पावलावर ठेवलं. आऊसाहेबांनी ते पागोटं उचलून तानाजीच्या डोईस घातलं आणि त्याचा आलाबला घेतला. ( म्हणजे त्याच्या कानागालावरून हात फिरवून आऊसाहेबांनी स्वत:च्या कानशिलावर बोटे मोडली) त्याची दृष्ट काढली.
नंतर तानाजी मोहिमेवर गेला. माघ वद्य नवमीच्या मध्यान्नरात्री सिंहगडावर भयंकर झटापट झाली. तानाजी पडला. पण गड काबीज झाला. तानाजीचं प्रेत पालखीत घालून सिंहगडावरून राजगडास आणलं आऊसाहेबांना माहीत नव्हतं. कोण करणार धाडस सांगण्याचं ? आऊसाहेबांनी पालखी येताना पाहून कौतुकच केलं. कौतुकाचं बोलल्या. पण नंतर लक्षात आलं , की पालखीत प्रेत आहे. आऊसाहेबांनी ते पाहून अपार शोक मांडला. या सगळ्या घटनांवरून जिजाबाई समजते. तिची मायाममता समजते. तिचं नेतृत्व आणि मातृत्व समजतं.
ही हकीकत असलेला कागद कै. य. न. केळकर यांना संशोधनात गवसला.

शिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर!


साल्हेर! आपल्या इतिहासात विशेषत: इ. १२९६ पासून पुढे रक्तपाताने लाल झालेली पानेच जास्त दिसतात. पण शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा प्रारंभ करून उघडउघड युद्धकांडच सुरू केले नाही का ? पण या स्वातंत्र्ययुद्धकांडाचा इतिहास वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते , की महाराजांनी करावे लागले तिथे युद्ध केलेच , पण शक्यतेवढा रक्तपात टाळण्याचाही प्रयत्न केला. या शिवस्वराज्य पर्वाला सुरुवात झाली. इ. १६४६ मध्ये. पण तोरणा , कोरीगड , पुरंदर हे किल्ले रक्ताचा थेंबही न सांडता त्यांनी स्वराज्यात आणले.
इतकेच काय , पण सिंहगडसारखा किल्ला सिद्दी अंबर वाहब या आदिलशाही किल्लेदाराच्या हातून ‘ कारस्थाने करोन ‘ महाराजांच्या बापूजी मुदगल नऱ्हेकर याने स्वराज्यात आणला. प्रत्यक्ष पहिली लढाई महाराजांना करावी लागली , ती दि. ८ ऑगस्ट १६४८ या दिवशी आणि या आठवड्यात. विजापूरचा सरदार फत्तेखान शिरवळ आणि पुरंदर या किल्ल्यांवर चालून आला. त्यावेळी महाराजांनी त्याच्या खळद बेलसरवर असलेल्या (ता. पुरंदर) छावणीवर पहिला अचानक छापा घातला. लढाई झाली. पण या गनिमी काव्याच्या छाप्यात रक्तपात किंवा मृत्यू त्यामानाने बेतानेच घडले. अंतिम विजय महाराजांचाच झाला. एकूण लढाया तीन ठिकाणी झाल्या. शिरवळ , बेलसर आणि पुरंदर गड.
पुढच्या काळातही झालेल्या लढायांचा अभ्यास केला , तर असेच दिसेल , याचे मर्म महाराजांच्या क्रांतीकारक युद्धपद्धतीत आहे. ती युद्धपद्धती गनिमी काव्याची , छाप्यांची , मनुष्यबळ बचावून शत्रूला पराभूत करण्याचे हे तंत्र म्हणजे गनिमी कावा.
पहिली खूप मोठी लढाई ठरली ती प्रतापगडाची. ( दि. १० नोव्हेंबर १६५९ ) या युद्धातही शत्रूची महाराजांनी कत्तल केली नाही. त्यांचा मावळ्यांना आदेशच होता की , ‘ लढत्या हशमास मारावे ‘ म्हणजेच न लढत्या शत्रूला मारू नये. त्याला निशस्त्र करावे. जरुर तर कैद करावे. पळाल्यास पळू द्यावे. कत्तलबाजी ही महाराजांची संस्कृतीच नव्हती. प्रतापगड विजयानंतर पुढे पाऊण महिना महाराज सतत आदिलशाही मुलुख आणि किल्ले घेत पन्हाळा , विशाळगड प्रदेशापर्यंत पोहोचले. हा प्रदेश दौडत्या छापेगिरीने महाराजांनी काबीज केला. शत्रू शरण आल्यावर आणि उद्दिष्ट साध्य झाल्यावर शरणागतांना ठार मारण्याची हौस त्यांना नव्हती. अकबराने राणा प्रतापांचा चितोडगड जिंकल्यावरही गडावरच्या राजपुतांची मोठी कत्तल केल्याची नोंद आहे. अशा नोंदी शाही इतिहासात खूपच आहेत. शिव इतिहासात नाहीत , हे सांस्कृतिक फरक होय.
एक तर महाराजांच्या चढाया आणि लढाया या अचानक छाप्यांच्या असल्यामुळे रक्तपात कमी घडले. त्यातही शरण आलेल्या लोकांना , शक्य असेल तर आपल्याच स्वराज्यसेनेत सामील करून घेण्याची महाराजांची मनोवृत्ती होती. उदाहरणार्थ अफझलखान पराभवानंतर खानाच्या फौजेतील नाईकजी पांढरे , नाईकजी खराटे , कल्याणजी जाधव , सिद्दी हिलाल खान , वाहवाह खान आदि खानपक्षाचे सरदार महाराजांना शरण आले आणि सामीलही झाले. अशी उदाहरणे आणखीही सांगता येतील.
मोठ्या प्रमाणावर मोकळ्या मैदानात महाराजांनी युद्धे करण्याचे शक्यतोवर टाळलेलेच दिसते. पण तरीही काही लढाया कराव्याच लागल्या. वणी दिंडोरीची लढाई ( दि. १५ नोव्हें १६७० ) आणि त्याहून मोठी लढाई साल्हेरची , ही लढाई नव्हे , हे युद्धच मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती. मराठी फौज त्यांच्या सुमारे निम्मीच. पण युद्ध घनघोर झाले. साल्हेरचे युद्ध क्रांतीकारक म्हणावे लागेल. कर्नाटकच्या शेवटच्या विजयनगर सम्राट रामराजाचा पराभव दक्षिणेतील सुलतानांनी राक्षसतागडीच्या प्रचंड युद्धात केला. (इ. १५६५ ) हे युद्ध भयानकच झाले. याला जंगे-ए-आझम राक्षसतागडी असे म्हणतात. यात रामराजासह प्रचंड कानडी फौज मारली गेली. सुलतानांचा जय झाला. या लढाईची दहशत कर्नाटकावर एवढी प्रचंड बसली की , विजयनगरचे साम्राज्य राजधानीसकट उद्ध्वस्त झाले. संपले. ती दहशत महाराष्ट्रावरही होतीच. पण महाराजांनी अतिसावधपणाने सपाटीवरच्या लढाया शक्यतो टाळल्याच. कारण मनुष्यबळ आणि युद्धसाहित्य अगदी कमी होते ना , म्हणून. पण साल्हेरचे युद्ध अटळ होते. जर साल्हेरच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला असता , तर ? तर १७६१ चे पानिपत १६७३ मध्येच घडले असते. पण प्रतापराव , मोरोपंत , सूर्यराव काकडे , इत्यादी सेनानींनी हे भयंकर लंकायुद्ध जिंकले. मराठी स्वराज्य अधिक बलाढ्य झाले. वाढले.
ज १७६१ चे पानिपत मराठ्यांनी जिंकले असते तर ? तर मराठी झेंडा अटकेच्या पलिकडे अन् खैबरच्याही पलिकडे काबूल कंदहारपर्यंत जाऊन पोहोचला असता. पाहा पटते का!
साल्हेरच्या युद्धात जय मिळाला , पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता , शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले , ‘ माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता. ‘
उपाय काय ? अखेर हा युद्धधर्म आहे. सूर्यराव काकडे हे पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार फार मातब्बर. त्यांच्या घराण्याला ‘ दिनकरराव ‘ अशी पदवी होती. सूर्यराव साल्हेरच्या रणांगणावर पडले. सूर्यमंडळच भेदून गेले. या काकडे घराण्याने स्वराज्यात अपार पराक्रम गाजविला. प्रतापगडचे युद्धाचे वेळी खासा प्रतापगड किल्ला सांभाळण्याचे काम याच घराण्यातील गोरखोजी काकडे यांच्यावर सोपविले होते. ते त्यांनीही चोख पार पाडले.
साल्हेरच्या युद्धाचा औरंगजेबाच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. तो दु:खीही झाला आणि संतप्तही झाला. उपयोग अर्थात दोन्हीचाही नाही.
कोणा एका अज्ञात मराठी कवीने चारच ओळीची एक कविता औरंगजेबाच्या मनस्थितीचे वर्णन करण्यासाठी लिहून ठेवलेली आहे ,
सरितपतीचे जल मोजवेना
माध्यान्हीचा भास्कर पाहवेना
मुठीत वैश्वानर साहवेना
तैसा शिवाजीनृप जिंकवेना!

Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 7 |

|| शिवचरित्रमाला ||

शिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे?


शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य तरळत असे , असे अनेक स्वकीय आणि परकीय भेटीकारांनी लिहून ठेवले आहे. आपल्याला आजही महाराजांच्या व्यक्तिमत्वाबद्दल कुतूहल असते. समर्थांनीही आवर्जून लिहिले आहे की , ‘ शिवरायाचे आठवावे रूप ‘. रूपानं महाराज कसे होते ? सावळे की गोरे ? काही युरोपीय भेटीकारांनीही महाराजांना गौरवर्णाचे म्हटले आहे. त्याअथीर् ते अगदी कोकणस्थी गोऱ्या रंगाचे नसले , तरी अधिक जवळ गव्हाळ रंगाचे असावेत. मुंबईच्या शिवछत्रपती म्युझियममध्ये ( पूवीर्चे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) महाराजांचे एक उभे रंगीत चित्र ( मिनिएचर) आहे.
त्यात महाराजांचा रंग सावळा दाखविलेला आहे. हे चित्र चित्रकाराने इ.स. १७०० च्या जरा नंतरच्या काळात चितारलेले असावे , असे तज्ज्ञांचे मत आहे. चक्क काळ्या रंगात पं. जवाहरलाल नेहरू यांचीही चित्रे चित्रकारांनी काढलेली आहेत. पण नेहरूंचे गोरे देखणेपण आपण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. चित्रकाराने काळ्या वा वेगळ्या रंगात चित्र काढले , ही त्या चित्रकाराची शैली आहे. तसेच महाराजांचे मुंबईचे हे चित्र आहे. हे चित्र मूळ साताऱ्याच्या छत्रपती महाराजांच्या वाड्यातूनच विश्राम मावजी या इतिहासप्रेमी गृहस्थांना मिळाले. हा राजघराण्याचा आणि छत्रपतींच्या राजवाड्याचा चित्र प्राप्तीधागा लक्षात येतोच. युरोपीय लोक सगळ्याच भारतीयांना ‘ काळे ‘ म्हणतात. पण त्यांनीही महाराजांना गौर रंगाचे सटिर्फिकेट दिलेले पाहून महाराजांच्या गव्हाळ मराठी गौरवर्णाची ओळख पटते.
महाराज आग्ऱ्याला गेले , तेव्हा त्यांना शहरात प्रवेश करताना परकालदास या नावाच्या राजपूत राजकीय प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहिले. त्यानेही आपल्या एका पत्रात महाराजांचे वर्णन लिहिले आहे. तो म्हणतो , ‘ शिवाजीराजे तेजस्वी आणि अस्सल राजपूतासारखे दिसतात. ‘ औरंगजेबाच्या दरबारात अपमान झाल्यामुळे महाराज संतापले. तेव्हा ते कसे धगागलेले दिसले , याचेही वर्णन राजपूत प्रतिनिधीच्या पत्रात सापडते. महाराजांच्या दृष्टीत विलक्षण त्वरा होती. महाराजांच्या सहवासात राहिलेल्या परमानंद गोविंद कविंदाने महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन शिवभारतात लिहून ठेवले आहे. एकाच वाक्यात सांगायचे तर त्याचे सार , महाराज राजकुलीन , तेजस्वी , तडफदार , प्रभावी आणि सावध व्यक्तिमत्त्वाचे होते. ऐतिहासिक कागदपत्रांतून आणि विशेषत: त्यांनी लिहिलेल्या पत्रांतील भाषेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यापुढे असेच जाणवते. राजेपणाचे त्यांचे दर्शन अगदी सहज जन्मजात दिसते. त्यात कृत्रिमता वा बनावट आव दिसत नाही. छत्रपती , सिंहासनाधीश्वर , क्षत्रिय कुलावतांस , महाराजा या राजविशेषणांचे ‘ बेअरिंग ‘ महाराज अगदी सहज , आपादमस्तक सांभाळत होते. राजेपण वा राणीपण एवढ्या तोलामोलाने व्यक्तिमत्त्वात सांभाळणे , हे योगसाधना करण्याइतकेच अवघड आहे.
महाराज तेजावरच्या प्रवासात असताना एका छावणीत पाँडिचेरीचा माटिर्न नावाचा फेंच प्रतिनिधी महाराजांस भेटावयास आला. भेटीच्या शामियान्यात तो थोडा आधीच उपस्थित झाला. या शामियान्यात महाराज नंतर प्रवेशले. माटिर्नने शामियान्यातील त्या सदरेचे (छोट्या दरबाराचे) वर्णन लिहून ठेवले आहे. प्रत्यक्ष महाराज शामियान्यात कसे प्रवेशले अन् त्यावेळी दरबारी लोक (मराठे सरदार) कसे उभे राहिले आणि त्यांनी कशी राजआदब सांभाळली ते लिहून ठेवले आहे. महाराज चालत राजमसनदीपर्यंत आले आणि बसले याचे फार सुंदर वास्तवपूर्ण चित्र त्याने शब्दांकित केले आहे. ते वाचताना समार्थांचेच शब्द आठवतात. ‘ शिवरायाचे कैसे बोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाची सलगी देणे कैसे असे ‘ त्याची चुणूक माटिर्नच्या शब्दांतून व्यक्त होते. आमची ‘ मराठा राजसंस्कृती ‘ खरोखर फार उदात्त आहे. आम्ही कोणी आज शिरपेच तुरे घालणारे राजेमहाराजे नाही. पण आम्ही आपापल्या आमच्या जीवनात मर्यादित राजेच आहोत ना ? ते खानदानी मराठी संस्कृतीचे देखणेपण अकृत्रिमरित्या आम्ही सांभाळलेच पाहिजे. ती आमची जबाबदारी आहे. शिवचरित्रातून आणि जिजाऊसाहेबांच्या चरित्रातून हे शिकता येते.
महाराजांच्या वेशभूषेबद्दल आपण पूवीर् पाहिलेच. परमानंद कविंदाने लिहिले आहे त्यात एक मामिर्क नोंद केली आहे. अफझलखानाच्या भेटीला जातानाचे महाराजांचे वर्णन करताना तो लिहितो की , ‘ महाराजांची दाढी कात्रीने नीटनेटकी केलेली होती. ‘ ही गोष्ट तशी अगदी किरकोळ आहे. पण त्यातून त्यांचा ‘ एस्थेटिक सेन्स ‘ दिसून येतो.
महाराजांची जुनी चित्रे उपलब्ध आहेत. त्यात ब्रिटिश म्युझियम लायब्ररी , लंडन येथील चित्रांत महाराजांनी थोडेसे उभे गंध कपाळावर लावलेले असावे की काय , असा भास होतो. पण अन्य चित्रांत गंध लावलेले कुठेही दिसत नाही. ही चित्रे प्रोफाइल आहेत. पण कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमधील म्युझियममध्ये आणि हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये महाराजांचे एकेक चित्र आहे. ही दोन्ही चित्रे समोरून , जरा कोनात काढलेली आहेत. अशा चित्रांना ‘ तीन चष्मी चित्र ‘ म्हणत. यात व्यक्तीचे दोन डोळे आणि एक कान दिसतो. कोल्हापूर आणि हैदराबाद येथील चित्रे अशीच तीन चष्मी आहेत. त्या चित्रांत महाराजांचे कपाळ समोरून दिसते , पण कपाळावर कोणत्याही प्रकाराचे वा आकाराचे गंध लावलेले दिसत नाही. सणसमारंभ , पूजाअर्चा वा राज्याभिषेकासारखा सोहळा चालू असताना महाराजांच्या कपाळावर नक्कीच गंध आणि कुंकुमतिलक असणारच. पण दैनंदिन जीवनात तसा होता की नव्हता , हे चित्रात वा कोणत्याही पत्रात दिसत नाही.
वेशभूषेच्या संदर्भात महाराजांच्या बाबतीत घडलेली एक गंमत सांगतो. महाराज एकदा राजापूर शहरात पालखीतून चालले होते. सांगाती थोडेफार सैनिक होते. रस्त्याने पालखी जात असताना दोन्ही बाजूंना नागरिक मंडळी स्वारी बघत होती. त्यातच एक- दोन इंग्रज उभे होते. राजापुरात ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी वखार होती , हे आपणांस माहीतच आहे. पालखी चालत असताना महाराजांचे सहज लक्ष त्या इंग्रज पुरुषांकडे गेले. इंग्रजांची वेशभूषा अर्थात इंग्रजीच होती. त्यांनी डोक्याला केसांचा टोप ( विग) घातलेला होता. महाराजांच्या मनात हे वेगळेच केस पाहून कुतूहल निर्माण झाले. महाराजांनी पालखी मुद्दाम त्या इंग्रजांच्या जवळून नेली. थांबविली. अन् त्यांनी त्या इंग्रजांच्या कानाशेजारी आपल्या हाताने केसात बोटांनी चाचपून पाहिले. अन् महाराजांच्या लक्षात आले की , हे केस वरून लावलेले आहेत. नैसगिर्क नाहीत. त्यांना गंमत वाटली. इंग्रजांनाही गंमत वाटली. पालखी पुढे गेली.
आग्ऱ्यात महाराजांनी आपल्या वकिलांमार्फत आग्ऱ्याच्या बाजारातून काही जडजवाहीर आणि मौल्यवान कापडचोपडही खरेदी केले होते. त्यावरून महाराजांना वेशभूषेबद्दल नक्कीच थोडीफार तरी आवड होती असे दिसते.
महाराजांच्या अंतरी नाना कळा होत्या. पण वेष बावळा नव्हता! नीटनेटकेपणा असलाच पाहिजे. साधेपणाही पाहिजे. बावळेपणा असता कामा नये.
महाराजांनी आपल्या खाश्या जिलेबीस ( म्हणजे सैन्याच्या खास राजपथकास) चेकसारखे पोषाख केले होते ? अशी नोंद आहे. म्हणजेच युनिफॉर्मची कल्पना त्यांच्या मनात निश्चित होती.

शिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.


चिंचवडच्या श्रीमोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराज आणि नातू नारायण महाराज देव या तीनही पिढ्यांतील गणेशभक्तीबद्दल भोसले राजघराण्यात नितांत आदरभाव होता. चिंतामणी महाराज आणि नारायण महाराज हे तर शिवाजीमहाराजांच्या अगदी समकालीन होते. श्रीमोरया गोसावी हे योगी होते. त्यांनी चिंचवडला संजीवन समाधी घेतली. या गणेशभक्तांबद्दल स्वराज्यस्थापनेपूवी र्च्या काही मराठी सरदार जहागीरदारांनी आपला भक्तिभाव चिंचवड देवस्थानाला जमिनी , पैसे , दागिने आणि काही इनामी हक्क प्रदान करून व्यक्त केला होता.
येथे नेमकेच सांगायचे , तर श्रीनारायण महाराज देव यांना कुलाबा कोकणातील काही बाजारपेठेच्या गावातून पडत्या भावाने तांदूळ , नारळ , सुपारी , मीठ इत्यादी कोकणी माल खरेदी करण्याचा हक्क मिळालेला होता. म्हणजे समजा , देवमहाराजांना काही खंडी तांदूळ हवा असेल , तर तो बाजारभावापेक्षाही खूपच कमी भावाने परस्पर शेतकऱ्यांकडून वा व्यापारी दुकानदारांकडून खरेदी करण्याचा हक्क श्रीदेवांना मिळालेला होता.
हा माल खरेदी करण्याकरता दरवर्षी श्रीदेवांचे कारकून आणि नोकर कोकणात जात असत. हा माल कोणा एकाच मालकाकडून सर्वच्यासर्व खरेदी न करता अनेकांकडून मिळून तो खरेदी करण्याचा विवेकी व्यवहार श्रीदेवांचे कारकून नक्कीच सांभाळत असत हे उघड आहे. अशा देणग्यांना आणि अधिकारांना (हक्क) प्रत्यक्ष बादशाही मान्यता घ्यावी लागे. ती निजामशाह किंवा आदिलशाह यांची असे. हे बादशाह तशी मान्यता देत असत. दरवर्षी श्रीदेवांचे नोकर कुलाबा भागात उतरून हा हक्क बजावीत आणि माल बैलांवर लादून घाटावर चिंचवडला आणीत असत.
श्री योगी मोरयागोसावी यांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वद्य षष्ठीस साजरी होत असे. अन् आजही होते. त्यानिमित्त यात्रेकरूंना भंडारा म्हणजे अन्नदान होई. हजारो लोक येथे भोजन करीत. श्रीदेव या भंडाऱ्याकरिता हा कोकणातील माल उपयोगात आणीत असत. पुढे (१६५७ पासून) स्वराज्याची सत्ता या कुलाबा भागात प्रस्थापित झाली. स्वराज्याचे कायदे सुरू झाले. दरवषीर्प्रमाणे श्रीदेवांचे कारकून चिंचवडहून श्रीदेवांच्या आज्ञेप्रमाणे कुलाबा भागातील माल पडत्या भावाने खरेदी करण्यासाठी कोकणात आले. तेथील मराठी स्वराज्याच्या सुभेदाराने या कारकुनांना सांगितले की , ‘ पडत्या भावाने तुम्हांस माल खरेदी करता येणार नाही ‘
श्रीदेवांची कारकून मंडळी विस्मितच झाली. बादशाही अमलात देवस्थानकरता आम्हाला मिळालेले हक्क मराठी स्वराज्य आल्यावर काढून घेतले जावेत ? काय आश्चर्य ? हे हिंदवी स्वराज्य श्रीच्या इच्छेने आणि आशीर्वादानेच निर्माण झाले ना ?
स्वराज्याच्या अंमलदाराने अशी बंदी घातली आहे असे या कारकुनांनी श्री देवमहाराजांना चिंचवडला पत्र पाठवून कळविले. श्री नारायणमहाराज देवही चकीत झाले. त्यांनी राजगडास शिवाजीमहाराजांकडे तक्रारीचे पत्र पाठविले की , ‘ देवकार्यासाठी मिळालेला पडत्या भावाने माल खरेदी करण्याचा हक्क शिवशाहीत रद्द व्हावा ? ये कैसे ?’
महाराजांनी श्रीदेवांचे हे पत्र आल्यावर उत्तर म्हणजे राजाज्ञापत्र चिंचवडास पाठविले की , ‘ स्वराज्यात असे हक्क कोणासही दिले जाणार नाहीत. पूवीर् दिलेले असतील , तर ते अमानत म्हणजे रद्द करण्यात येतील. कारण पडत्या भावाने माल खरेदी केला , तर शेतकऱ्यांचे वा दुकानदारांचे नुकसानच होते. म्हणून हा हक्क रद्द करण्यात आला आहे. तसेच त्यावरील जकातही वसूल केली जाईल माफ होणार नाही. ‘ या राजाज्ञेची अमलबजावणीही झाली. स्वराज्याचा कारभार असा होता.
पण महाराजांची श्रीगणेशावर आणि देवस्थानावर पूर्ण भक्ती होती. महाराजांनी श्री नारायण महाराज देव यांना कळविले की , ‘ कोकणातून शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून जो आणि जितका माल आपण पडत्या भावाने खरेदी करीत होता , तेवढा माल श्रीचे अन्नदान आणि भंडाऱ्याकरिता सरकारी कोठारातून चिंचवडास विनामूल्य , दरवषीर् सुपूर्त केला जाईल. ‘ शिवाजी महाराज असे होते आणि हिंदवी स्वराज्य म्हणजे शिवशाहीही अशी होती. आचारशीळ , विचारशीळ , दानशीळ , धर्मशीळ सर्वज्ञपणे सुशीळ , सकळांठायी!
असाच एक प्रश्न् कोकणात मिठागरांच्या बाबतीत निर्माण झाला. हा प्रश्ान् गोव्याच्या धूर्त पोर्तुगीज फिरंग्यांनी निर्माण केला. स्वराज्यातील आगरी समाजाची आणि काही इतर समाजाचीही खायचे मीठ तयार करणारी मिठागरे होती. मिठागरे म्हणजे मिठाची शेती. त्याचे असे झाले की , या धूर्त पोर्तुगीजांनी त्यांच्या पोर्तुगीज देशात तयार होणारे मीठ गोव्यात आणावयास सुरुवात केली. हे पांढरे दाणेदार मीठ पोर्तुगीजांनी अगदी कमी किंमतीत कोकणात विकावयास सुरुवात केली. मीठ चांगले होते. ते अगदी स्वस्त भावात विक्रीस आल्यावर कोकणातच तयार होणारे आगरी लोकांचे स्वदेशी मीठ कोण विकत घेणार ? मुक्त बाजारपेठ स्वराज्यात असल्यामुळे पोर्तुगीज लोक आपले मीठ विकू लागले. याचा परिणाम उघड होता. तो म्हणजे स्वराज्यातील आमची मिठागरे तोट्यात जाणार आणि आगरी लोकांचा धंदा बुडणार. स्वराज्याचेही नुकसान होणार. हे महाराजांच्या त्वरित लक्षात आले. शिष्टमंडळे राजगडावर आणावी लागली नाहीत. महाराजांनी आज्ञापत्रे काढून या पोर्तुगीज मीठावर जबरदस्त कर बसवला. त्यामुळे गोव्याचे मीठ स्वराज्यात येणे ताबडतोब अन् आपोआप बंद झाले. स्वराज्यातील उद्योगधंद्यांना संरक्षण देण्याची महाराजांची ही दक्षता होती. ही दक्षता व्यापारपेठेत आणि करवसुली खात्यातही जपली जात होती.
चांभार म्हणजे चर्मकार. हे लष्काराच्या अतिशय उपयोगी पडणारे लोक. करवसुली आणि जकात स्वराज्यात रोख पैशांत घेतली जात असे. या चर्मकारांकडूनही तशीच घेण्यात येई. पण खेड्यापाड्यातील आणि सर्वच चर्मकारांना रोख पैसे कर म्हणून देणे शक्य होईना. महाराजांनी आज्ञापत्रक काढून आपल्या अंमलदारास लिहिले की , ‘ ज्यांना रोख रकमेने कर देता येणे शक्य नसेल , त्या चर्मकारांकडून तेवढ्या किंमतीचे जिन्नस सरकारात घ्यावेत. रोख पैशाचा आग्रह धरू नये. आपल्या शिलेदारांस कातड्याच्या खोगीरांची , पादत्राणांची आणि इतर कातडी वस्तूंची गरज असतेच. तरी ते जिन्नस घ्यावेत. ‘ त्याप्रमाणे चर्मकारांना मोठी बाजारपेठही मिळाली आणि त्यांची अडचणही दूर झाली. असा व्यवहार तराळ , मातंग , धनगर , लोहार , कुंभार वगैरे मंडळींच्या व्यवसायातही महाराजांनी अमलात आणला असावाच. मात्र त्या संबंधीचे कागद अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.
राजाचे लक्ष असे स्वराज्यावर आणि रयतेवर चौफेर होते. असे लक्ष बादशाही अंमलात नव्हते. उलट काही कर शाही धर्माचे नसलेल्या लोकांवर लादले जात असत. हा फरक स्वराज्य आणि मोगलाई यातील आहे.

शिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी


काशीहून गागाभट्ट नासिकला आले. महाराजांनी त्यांना आणण्याकरिता पालखी पाठविली. दरबारातील चार थोर मंडळी सामोरी पाठविली. सन्मानपूर्वक त्यांना रायगडावर आणण्यात आले. महाराजांनी मधुपर्कपूर्वक या महापंडिताचे गडावर स्वागत केले. त्यांचा मुक्काम गडावर होता. प्रवासात आणि गडावर गागाभट्टांना स्वराज्याचे रूप स्पष्ट दिसत होते. महाराजांनी आपल्या असंख्य कर्तबगार , शूर , निष्ठावंत आणि त्यागी जीवलगांच्या सहकार्याने निर्माण केलेले एक सार्वभौम राष्ट्र जाणत्या मनाला स्पष्ट दिसत होते.
या हिंदवी स्वराज्यात अनेक क्रांतीकारक घटना घडल्या होत्या , घडत होत्या. तेहरानपासून काबूलपर्यंत आणि खैबरपासून दिल्लीपर्यंत मराठी स्वराज्याचा दरारा सुलतानांना हादरे देत होता. दक्षिणेतील पातशाह्या निष्प्रभ झाल्या होत्या. इंग्रज , फिरंगी अन् सिद्दी आपले प्राण कसे वाचवायचे , याच चिंतेने ग्रस्त , पण दक्ष होते. अत्यंत शिस्तबद्ध अधिकारीवर्ग आणि राजकारणी मुत्सद्दी राज्यकर्तव्यात तत्पर होते. यादव , कदंब , शिलाहार , विजयनगर , वारंगळ , द्वारसमुद यांच्या उज्ज्वल परंपरेत आज रायगड आणि महाराज शिवाजीराजे निविर्वाद शोभत होते.
मग उणीव कशात होती ? कशातच नव्हती. फक्त एका अलंकाराची उणीव होती. तो अलंकार म्हणजे राजसिंहासन. छत्रचामरांकित राजसिंहास न. त्या सिंहासनाची स्वराज्याला नितांत गरज होती. कारण त्याशिवाय सार्वभौम चक्रवतीर् राज्याचा मान आणि स्थान जगातील आणि स्वदेशातीलही लोक देत नव्हते. देणार नव्हते. हा केवळ संस्कार होता. पण त्याची जगाच्या व्यवहारात अत्यंत मोठी किंमत होती. राज्याभिषेक हा उपभोग नव्हता. ते राष्ट्रीय कर्तव्य होते. जोपर्यंत सिंहासनावर राज्याभिषेक होत नाही , तोपर्यंत जग या थोर सूर्यपराक्रमी मी पुण्यश्ाोक महामानवाला ‘ राज्यकर्ता ‘ समजणार होते , पण ‘ भूपतिराजा ‘ म्हणणार नव्हते.
एक आठवण सांगतो. महाराज औरंगजेबाला भेटायला आग्ऱ्यास जाण्यास निघाले. ( दि. ५ मार्च १६६६ ) त्यावेळी स्वराज्यातील एक नागरिक महाराजांना भेटावयास राजगडावर आला. त्याचे नाव नरसिंहभट्ट चाकालेकर. हा कुणी महापंडित , अभ्यासक , विचारवंत , दष्टा , समाजधुरीण नव्हता. होता तो एक सामान्य भिक्षुक. पण तरीही त्यावेळच्या एकूण संपूर्ण समाजात शिक्षणाच्या दृष्टीने दोनच पावलं का होईना , पण थोडा पुढे होता ना! तो महाराजांना एक विनंती करावयास आला होता. विनंती कोणती ? तो म्हणतोय , ‘ महाराज , माझ्या जमीनजुमल्याचे आणि घरादाराचे सरकारमान्यतेची , तुमच्या शिक्कामोर्तबीचे कागदपत्र माझ्यापाशी आहेतच. पण आपण आता औरंगजेब बादशाहास भेटावयास जात आहात , तरी माझ्या या जमीनजुमल्यास औरंगजेब बादशाहाच्याही मान्यतेची संदापत्रे आपण येताना घेऊन या. ‘ हा त्याच्या म्हणण्याचा आशय.
काय म्हणावे या प्रकाराला ? कपाळाला हात लावून रडावे ? स्वराज्यात राहणारा , जरासा का होईना पण शहाणपण मिरविणारा एक वेदमूतीर् औरंगजेबाच्या मान्यतेचे कागदपत्र आणायला महाराजांनाच विनवतोय. त्याला महाराजांचा हा स्वराज्यनिमिर्तीचा प्रकल्प समजलाच नाही ? बाजी पासलकर , बाजीप्रभू , मुरारबाजी इत्यादी वीरपुरुष कशाकरता मेले , जळत जळत पराक्रम गाजविणारे मावळे कशाकरता लढताहेत अन् मरताहेत हे त्याला समजलेच नाही ?
नाहीच समजलं त्याला ? अन् असे न समजणारे अंजान जीव नेहमीच जगात असतात. त्यांना सार्वभौमत्त्व , स्वराज्याचे महत्त्व , स्वातंत्र्याचे अभिमानी जीवन अन् त्याकरिता आपलेही काही कर्तव्य असते , हे दर्शनानी अन् प्रदर्शनाने शिकवावे लागते. आम्ही जन्मजात देशभक्त नाहीच. आम्ही जन्मजात गुलामच. यातून बाहेर काढण्याकरिता त्या शिवाजीराजाने महाप्रकल्प मांडला. तो साऱ्या जगाला अन् आमच्याही देशाला समजावून सांगण्याकरिता , नेमका अर्थ त्याचा पटवून देण्याकरिता एका राजसंस्काराचे दर्शन आणि प्रदर्शन घडविणे नितांत आवश्यक होते , ते उपभोग म्हणून नव्हे , तर कर्तव्य म्हणून आवश्यक होते. ते म्हणजे सार्वभौम , छत्रचामरांकित सुवर्ण सिंहासनावर आरोहण. म्हणजेच राज्याभिषेक.
पण केवळ कर्तव्यातच अर्ध्यदान करण्यासाठी उभ्या असलेल्या त्या महान योगी शिवाजीराजांना सिंहासन , छत्रचामरे , राज्याभिषेक इत्यादी गोष्टींची अभिलाषा तर नव्हतीच , कधीच नव्हती. पण त्यांना त्याची आठवणही होत नव्हती. हा राजा शिबी राजाचा वारस होता. तो जनकाचा वारस होता. तो रघुराजाचा वारस होता. हे सारं अभ्यासपूर्वक , मनन आणि चिंतनपूर्वक समजावून घेण्याची बौद्धिक ऐपत आमच्यापाशी असायची आवश्यकता होती आणि आहे. कोणा बादशाहाने आम्हाला त्याच्या सेवेसाठी एखादी पदवी दिली , तर त्या पदवीचा आम्हाला अभिमान वाटावा ? पण अशी पदवीधर मंडळी बादशाही जगात त्यावेळी नांदत होती. ही मंडळी महाराजांच्या बाबतीत म्हणत होती , ‘ राजे आम्ही पातशाहाने आम्हास किताब दिले. मानमरातब दिले. ‘ अशा जगाला एकच उत्तर देणे आवश्यक होते. ते म्हणजे राज्याभिषेक.
या राज्याभिषेकाची विचारसरणी कोणाही विचारवंताला सहज पटण्यासारखी होती. महाराजांनाही ती तत्त्वत: नक्कीच पटलेली होती. पण राज्याभिषेकातील तो गौरव , ती प्रशस्ती , तो मोठेपणा महाराजांच्या मनाला रुचतच नव्हता. ते हिंदवी स्वराज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. पण स्वत: जीवन जगत होते. हिंदवी स्वराज्याचे एक साधे पण कठोर सेवाव्रती प्रजानन म्हणून. ते सविनय नम्र स्वराज्यसेवक होते. पण नरसिंहभट्ट चाकालेकरासारखी काही विचित्र , विक्षिप्त अन् अविवेकी उदाहरणे त्यांनी अनुभविली होती.
अखेर कर्तव्य म्हणूनच महाराजांनी राज्याभिषेकाला आणि सोहळ्याला , कठोर मनाने मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)