Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 8 |

Information world
34 minute read
0

शिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय

माणसाला फुकट मिळालं की त्याची किंमत कळत नाही. त्याचा बाजारभाव समजतो , तसंच उपयोग आणि उपभोगही समजतो. पण महत्त्व आणि पावित्र्य समजत नाही. हिंदवी स्वराज्य असे नव्हतेच. कमालीच्या त्यागाने आणि अविश्रांत कष्टाने ते मिळविले गेले होते. मिळवणारी मावळी मंडळी अगदी साधी आणि सामान्य होती. पण त्यांचे मन हनुमंतासारखे होते. छाती फाडली , तर त्यात त्यांचा राजा , राज्य आणि ध्वजच दिसावा. एकेका घरातली एकेक माणसं इषेर्नं आणि हौसेनं कष्टत होती. मरत होती. अशीही असंख्य मावळी घरं होती की , त्या घरातील दोन-दोन किंवा तीन-तीन माणसं अशीच मरत होती. म्हणूनच एक अजिंक्य हिंदवी स्वराज्य एका राष्ट्रपुरुषाने उभे केले.

अजिंक्य स्वराज्य ? होय , अजिंक्य. महाराजांच्या मृत्यूनंतर एक कर्दनकाळ , औरंगजेब आपल्या सर्व सार्मथ्यानिशी हे स्वराज्य गिळायला महाराष्ट्रात उतरला. अखंड पंचवीस वषेर् तो इथे यमदूतासारखा राबत होता. काय झाले त्याचे ? हे स्वराज्य बुडाले का ? नाही. औरंगजेबच बुडाला. मोगली साम्राज्यही बुडण्याच्या मार्गाला लागले. हे कोणामुळे ? कोणाच्या शिकवणुकीमुळे ? हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीमुळेच ना! शिवचरित्रातून तेच शिकावयाचे आहे. नागपूर येथे धनवटे प्रासादावर शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा स्थापन करण्यात आला ; त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरू म्हणाले की , ‘ जगाच्या पाठीवर पारतंत्र्यात पडलेल्या एखाद्या राष्ट्राला स्वतंत्र व्हावयाचे असेल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समर्थ व्हावयाचे असेल , तर त्या राष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवावा. ‘
हे अक्षरश: खरे आहे जीर्णशीर्ण स्थितीतून , गुलामगिरीतून आपले राष्ट्र स्वतंत्र झाले. ते बलाढ्य करावयाचे असेल , तर आदर्श असावा महाराजांचा.
सतत २७ – २८ वषेर् अविश्रांत श्रम आणि त्याग केल्यानंतरच राज्याभिषेकाचा विचार रायगडावर अंकुरला. या निमिर्तीच्या कालखंडात अत्यंत गरजेची कामे आणि प्रकल्प महाराजांनी हाती घेतलेले दिसतात. भव्य महाल किंवा उपभोगप्रधान अशा कोणत्याही वस्तू- वास्तू निमिर्तीकडे लक्षही दिले नाही. जीर्णशीर्ण अवस्थेतून मराठी मुलुख अति कष्टाने स्वतंत्र होत आहे , आता पहिल्या दोन पिढ्यांना तरी चंगळबाजीपासून हजार पावलं दूरच राहिलं पाहिजे , असा विचार महाराजांच्या कृतीत दिसून येतो. महाराज चंगळबाजीला शत्रूच मानत असावेत. ‘ आत्ता , या क्षणी स्वराज्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे ‘ हाच विचार त्यांच्या आचरणात दिसून येतो.
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); मग राज्याभिषेक करून घेणं , ही चंगळबाजी नव्हती का ? नव्हती. ते कर्तव्यच होते. सार्वभौमत्त्वाची ती महापूजा होती. त्या राज्याभिषेक सोहाळ्याचा परिणाम वर्तमान आणि भावी काळातील सर्व पिढ्यांवर प्रभावाने होणार होता. तो कोणा एका व्यक्तीच्या कौतुकाचा स्तुती सोहळा नव्हता. ते होते स्वातंत्र्याचे सामूहिक गौरवगान. इंदप्रस्थ , चितोड , देवगिरी , कर्णावती , वारंगळ , विजयनगर , द्वारसमुद , पाटलीपुत्र , गोपकपट्टण (गोवा) श्रीनगर आदि सर्व भारतीय स्वराज्यांच्या राजधान्यांवर बंडाची स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी फुंकर या रायगडावरील राज्याभिषेकाने पडणार होती. पडावी अशी अपेक्षा होती. बुंदेलखंडातील भंगलेल्या सिंहासनावर आणि चेतलेल्या छत्रसालावर ही फुंकर आधीच पडलीही होती. बुंदलेखंडात एक नवे हिंदवी स्वराज्य आणि सिंहासन उदयाला आले होते.

सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या पैलतीरापावेतो , म्हणजेच आसेतु हिमाचल हा संपूर्ण देश स्वतंत्र , सार्वभौम , बलशाली व्हावा हे मनोगत महाराजांनी स्वत:च बोलून दाखविले होते ना!
राज्याभिषेकाचा मुहूर्तही ठरला. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ , शुद्ध त्रयोदशी , आनंदनाम संवत्सर , म्हणजेच ६ जून १६७४ . महाराज राज्याभिषिक्त छत्रपती होणार याच्या वार्ता हळुहळू सर्वत्र पोहोचू लागल्या.
याचवेळी घडलेली एक गंमत सांगतो. कॉस्म- द-गार्द या नावाचा एक पोर्तुगीज कोकणातून भूमार्गाने गोव्याकडे जात होता. त्याला या प्रवासात ही बातमी समजली. मार्गावरती तो एका खेड्याजवळच्या झाडीत विश्रांतीकरता उतरला. भोवतालची मराठी दहापाच खेडुत माणसे सहज गार्दच्या जवळ जमली. एक गोरा फिरंगी आपल्याला दिसतोय , एवढाच त्यात कुतूहलाचा भाग असावा. गार्दने त्या जमलेल्या लोकांना आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत म्हटले की , ‘ तुमचा शिवाजीराजा लवकरच सिंहासनावर बसणार आहे , हे तुम्हाला माहिती आहे का ?’ ही गोड गोष्ट त्या खेडुतांना प्रथमच समजत होती. पण आपला राजा आता रामाप्रमाणे सिंहासनावर बसणार , एवढे त्यांना नक्कीच उमजले अन् ती माणसं विलक्षण आनंदली. ही एक सूचक कथा मराठी मनाचा कानोसा घेणारी नाही का ? साध्या भोळ्या खेड्यातील माणसांनाही हा राज्याभिषेकाचा आनंद समजला , जाणवला होता.
आपण सार्वभौम , स्वतंत्र स्वराज्याचे प्रजानन आहोत , राज्यकतेर्च आहोत , सेवक आहोत याची जाणीव प्रत्येक लहानमोठ्या वयाच्या माणसाला होण्याची आवश्यकता असतेच. प्रथम हेच कळावे. नंतर कळावे , राष्ट्र म्हणजे काय ? माझे राष्ट्रपती कोण आहेत. पंतप्रधान कोण. माझी राज्यघटना , माझी संसद , माझा राष्ट्रध्वज , माझे राष्ट्रगीत इत्यादी अष्टांग राष्ट्राचा परिचय यथासांग व्हावा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे अर्वाचीन भरतखंडाचा पहिला स्वातंत्र्यदिन.
Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 8 |

|| शिवचरित्रमाला ||

शिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास


स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या निदान पहिल्या दोन पिढ्यांना उपभोगी , सुखवस्तू जीवन जगण्यास अवधीच मिळणार नाही. याच दृष्टीने शिवकालीन हिंदवी स्वराज्याची पहिली पन्नास वर्षे कशी गेली , याची बेरीज वजाबाकी योग्य तुलनेने आपण केली पाहिजे. आजच्या आपल्या स्वराज्याची गेल्या पन्नास वर्षांत सर्वच क्षेत्रात प्रगती निश्चित झाली आहे. पण गती मात्र कमी पडली , अन् पडत आहे हेही उघड आहे. याकरता इतिहासाचा अभ्यास आणि उपयोग केला पाहिजे. अशा अभ्यासासाठी शिवकाळात साधने फारच कमी होती. दळणवळण तर फारच अवघड होते. महाराजांची मानसिकता सूक्ष्मपणे लक्षात घेतली , तर असे वाटते की , युरोपीय प्रगत वैज्ञानिक देशांचा अभ्यास करण्यासाठी महाराजांनी आपली माणसे नक्की पाठविली असती. हा तर्क मी साधार करीत आहे. पाहा पटतो का! मराठी आरमार युरोपियनांच्या आरमारापेक्षाही सुसज्ज आणि बलाढ्य असावे असा त्यांचा सतत जागता प्रयत्न दिसून येतो. माझ्या तर्कातील हा एक महत्त्वाचा टप्पा.
राज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू झाली. हो , तयारी सुमारे वर्षभर आधी सुरू झाली. याच काळात पण प्रारंभी एक प्रकरण घडले. एक अध्यात्ममार्गी सत्पुरुष रायगडावरती आले. ते स्वत: होऊन आलेले दिसतात. त्यांना महाराजांनी मुद्दाम बोलावून घेतलेले दिसत नाही. यांचे नाव निश्चलपुरी गोसावी. त्यांच्याबरोबर थोडाफार शिष्यसमुदायही होता. त्यात गोविंदभट्ट बवेर् या नावाचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेले शिष्यही होते. त्यांनी राज्याभिषेकपूर्व रायगडावरील निश्चलपुरी गोसावी यांचे वास्तव्य आणि त्यात घडलेल्या घटना एक गंथ संस्कृतमध्ये लिहून नमूद केल्या आहेत. या ग्रंथाचे नाव , ‘ राज्याभिषेक कल्पतरू. ‘
रायगडावर आल्यावर निश्चलपुरींना दिसून आले की , गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. हे निश्चलपुरी स्वत: पारमाथिर्क साधक होते. ते तांत्रिक होते. म्हणजे मंत्र , तंत्र , उतारे , पशु बलिदान इत्यादी मार्गांनी त्यांची तांत्रिक योगसाधना असे. त्यांच्या मनांत एक कल्पना अशी आली की , शिवाजी महाराजांनी आपला संकल्पित राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने करून घेऊ नये , तर तो तांत्रिक पद्धतीने करून घ्यावा.
महाराज , राज्योपाध्ये बाळंभट्ट आवीर्कर आणि वेदमूतीर् गागाभट्ट यांच्या मनात सहज स्वाभाविक विचार होता की , प्राचीन काळापासून परंपरेने रघुराजा , प्रभू रामचंद , युधिष्ठिर इत्यादी महान राजपुरुषांना , महान ऋषीमुनींनी ज्या वैदिक पद्धतीने राज्याभिषेक केले , त्याच परंपरेप्रमाणे राजगडावरील हा राज्याभिषेक सोहाळा व्हावा. पण निश्चलपुरींना हे मान्य नव्हते. त्यांनी महाराजांना सतत आग्रहाने म्हटले की , ‘ मी सांगतो त्याच पद्धतीने म्हणजेच तांत्रिक पद्धतीने तुम्ही राज्याभिषेक करून घ्या. ‘
महाराजांना हे उगीचच धर्मसंकट पुढे आले. पण वाद न घालता महाराजांनी यात अगदी शांत , विचारी भूमिका ठेवली. प्राचीन पुण्यश्लोकराजपुरुषांचा आणि तपस्वी ऋषींचा मार्ग अवलंबायाचा की , हा तांत्रिक मार्ग स्वीकारावयाचा हा प्रश्ान् त्यांच्यापुढे होता.
महाराजांनी गागाभट्टांच्या प्राचीन वैदिक परंपरेप्रमाणेच हा राज्याभिषेकाचा राज्यसंस्कार स्वीकारावयाचे ठरविले. पण या सुमारे सात आठ महिन्यांच्या कालखंडात त्यांनी निश्चलपुरींचा थोडासुद्धा अवमान केला नाही. अतिशय आदरानेच ते त्यांच्याशी वागले. याच कालखंडात प्रतापराव गुजर सरसेनापती यांचा नेसरीच्या खिंडीत युद्धात मृत्यू घडला.( दि. २४ फेब्रु. १६७४ ) महाराज अतिशय दु:खी झाले. निश्चलपुरी महाराजांना म्हणाले , ‘ महाराज , ही घटना म्हणजे नियतीने तुम्हाला दिलेला इशारा आहे. सरसेनापतीचा मृत्यु म्हणजे अपशकुनच आहे , तरी तुम्ही माझ्याच पद्धतीने हा राज्याभिषेक करा. ‘
महाराजांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पण तयारी मात्र चालू होती. तशीच चालू ठेवली.
पुढच्याच महिन्यात दि. १९ मार्च १६७४ या दिवशी महाराजांच्या एक राणीसाहेब , काशीबाईसाहेब या अचानक मृत्यू पावल्या. याहीवेळी निश्चलपुरींनी महाराजांना ‘ हा अपशकुन आहे , अजूनही विचार करा ‘ असा इशारा दिला , तरीही महाराज शांतच राहिले. पुढे तर किरकोळ अपशकुनांची मालिका त्यांचेकडून महाराजांपुढे येत गेली. एके दिवशी गडावरील राजप्रासादाला मधमाश्यांचे आग्यामोहोळ लागले. हाही त्यांना अपशकुन वाटला. दुसऱ्या एका दिवशी आभाळात पक्ष्यांचा थवा उडत चाललेला पाहून त्यांनी महाराजांना म्हटले की , या मार्गाने हे पक्षी उडत जाणे हे अपशकुनी आहे. अर्थात महाराज मात्र शांतच आणि असेच अपशकुन ते मांडीत राहिले. त्यांनी सांगितलेला शेवटचा अपशकुन असा. एका होमहवनाचे प्रसंगी महाराज होमापुढे बसले होते. मंत्र चालू होते. महाराजांचे राजोपाध्याय बाळंभट्ट हे तेथेच बसले होते. एवढ्यात अचानक वरच्या पटईला ( सिलिंगला) असलेल्या नक्षीतील एक लहानसे लाकडी कमळ निसटले आणि ते राजोपाध्यायांच्या तोंडावरच पडले. त्यांना जरा भोवळ आली. थोडेसे लागले. पण धामिर्क कार्यक्रम चालूच राहिले. निश्चलपुरी महाराजांना म्हणाले की , ‘ हा अपशकुन आहे. अजूनही विचार करा आणि हे वैदिक सोहळे थांबवून माझ्या सूचनेप्रमाणे सर्व करा. ‘
पण तरीही महाराज शांतच राहिले. सर्व विधी , संस्कार आणि राज्याभिषेक सोहळा पूर्ण पार पडला. महाराज छत्रपती झाले.
निश्चलपुरी आपल्या मनाप्रमाणे न झाल्यामुळे फारच नाराज झाले आणि नंतर महाराजांना म्हणाले , ‘ तुम्ही माझे ऐकले नाहीत. हा तुमचा राज्याभिषेक अशास्त्रीय झाला आहे. तुम्हाला लौकरच त्याचे प्रत्यंतर येईल. ‘ असे म्हणून निश्चलपुरी रायगडावरून निघून गेले. हे प्रकरण आपणापुढे थोडक्यात पण नेमके विषयबद्ध सांगितले आहे. पण आपणही याचा अभ्यास करावा. या विषयावर विस्तृत लेखन केले आहे. समकालीन ‘ राज्याभिषेक कल्पतरू ‘ हा गोविंदभट्ट बवेर् यांचा गंथही उपलब्ध आहे. शिवाय अनेकांनी आपापली मते मांडली आहेत. या सर्वांचा आपण अभ्यास करून आपले मत ठरवावे.
महाराजांच्या या प्रकरणातील भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटते ? मला मात्र असे वाटते की , महाराजांच्या मनात निश्चलपुरींनाही नाराज करावयाचे नसावे. प्राचीन परंपरेप्रमाणे राज्याभिषेक करावा आणि नंतर वेगळ्या मुहूर्तावर निश्चलपुरी यांच्या म्हणण्याप्रमाणे तांत्रिक राज्यभिषेकसुद्धा करून टाकावा , असे वाटते. कारण तसा तांत्रिक राज्याभिषेक नंतर दि. २४ सप्टेंबर १६७४ , अश्विन शुुद्ध पंचमी या दिवशी महाराजांनी याच निश्चलपुरींकडून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे रायगडावर करवून घेतला. हा तांत्रिक विधी तसा फार थोड्या वेळातच पूर्ण झाला. निश्चलपुरींनाही बरे वाटले. पण दुसऱ्याच दिवशी (दि. २५ सप्टेंबर) प्रतापगडावर आकाशातून वीज कोसळली आणि एक हत्ती आणि काही घोडे या घाताने मरण पावले. यावर निश्चलपुरी काय म्हणाले ते इतिहासाला माहीत नाही. आपणास काय वाटते ?

शिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला


रायगडावर राज्यभिषेकाची तयारी अत्यंत योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध रीतीने सुरू होती. गागाभट्ट हे महापंडित राज्यभिषेक विधीचे प्रमुख अध्वर्यू होते. पण राजघराण्याचे धामिर्क विधीसंस्कार करण्याचे काम भोसल्यांचे कुलोपाध्याय आणि राजोपाध्याय आवीर्कर यांचेच होते. सर्व विधी या बाळंभट्ट राजोपाध्याय यांनीच उपाध्याय या नात्याने केले. मार्गदर्शक होते , गागाभट्ट. गागाभट्टांनी या सर्व राजसंस्कारांची एक लिखित संहिता संस्कृतमध्ये गंथरूपाने तयार केली. या गंथाचे नाव ‘ राजाभिषेक प्रयोग. ‘
या ‘ राजाभिषेक प्रयोग ‘ या हस्तलिखित गंथाची एक प्रत बिकानेरच्या ( राजस्थान) अनुप संस्कृत गंथालयात पाहावयास मिळाली. हीच प्रत प्रत्यक्ष गागाभट्टांच्या हातची मूळ प्रत असावी , असा तर्क आहे. प्रत्येक विधी कसा आणि केव्हा करावयाचा याचा तो तपशीलवार आराखडा आहे.
सुपारीपासून हत्तीपर्यंत आणि हळकुंडापासून होमकुंडापर्यंत , तसेच दर्भासनापासून सिंहासनापर्यंत सर्व गोष्टी दक्षतापूर्वक सिद्ध होत होत्या. ती ती कामे त्या त्या अधिकारी व्यक्तींवर सोपविण्यात आली होती. सोन्याचे बत्तीस मण वजनाचे सिंहासन तयार करण्याचे काम पोलादपूरच्या (जि. रायगड) रामाजी दत्तो चित्रे या अत्यंत विश्वासू जामदाराकडे सोपविले होते. जामदार म्हणजे सोने चांदी आणि जडजवाहीर याचा खजिना सांभाळणारा अधिकारी. अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने सिंहासनावर जडवून , अनेक सांस्कृतिक शुभचिन्हेही त्यावर कोरावयाची होती. सोन्याची इतर राजचिन्हेही तयार होऊ लागली.
चारही दिशांना राजगडावरून माणसे रवाना झाली. सप्तगंगांची आणि पूर्व , पश्चिम आणि दक्षिण समुदांची उदके आणण्यासाठी कलश घेऊन माणसे मागीर् लागली होती. हे पाणी कशाकरता ? रायगडावर काय पाण्याला तोटा होता ? अन् सप्तगंगांचं उदक आणि रायगडावरचं तळ्यातील पाणी काय वेगळं होतं ? शेवटी सारं ।।२ह्र च ना ? मग इतक्या लांबलांबच्या नद्यांचं पाणी आणण्याचा खटाटोप कशासाठी ? अशासाठी की , हा देवदेवतांचा आणि ऋषीमुनींचा प्राचीनतम भारतदेश एक आहे. या सर्व गंगा आमच्या माता आहेत. प्रातिनिधिक रूपाने त्या रायगडावर येऊन आपल्या सुपुत्राला अभिषेक करणार आहेत , हा त्यातील मंगलतम आणि राष्ट्रीय अर्थ.
विख्यात तीर्थक्षेत्रांतील देवदेवतांनाही निमंत्रणपत्रे जाणार होती. ती गेली. विजापूर , गोवळकोंड , मुंबईकर इंग्रज , जंजिरेकर सिद्दी , गोवेकर फिरंगी आणि औरंगजेब यांना निमंत्रण गेली असतील का ? रिवाजाप्रमाणे गेलीच असतील असे वाटते. पण एका इंग्रजाशिवाय आणि एका डच वकिलाशिवाय या राज्याभिषेकाला अन्य कुणाचे प्रतिनिधी वा पत्रे आल्याचा एकही पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण निमंत्रणे गेलीच असतील. इंग्रजांचा वकील हेन्री ऑग्झिंडेन आणि वेंगुलेर्कर डच वखारींचा प्रतिनिधी इलियड हे राज्यभिषेकास हजरच होते.
पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त आणि बडवे असलेले प्रल्हाद शिवाजी बडवेपाटील यांनाही एक पत्र गेले होते. ते पत्र या बडवे घराण्यात जपून ठेवलेले होते. पण त्यांच्या वंशजांनी ते पत्र एका इतिहास संशोधकास अभ्यासासाठी विश्वासाने दिले ते पत्र गहाळ झाले. काय बोलावे ?
अभिषेकाकरिता सोन्याचे , चांदीचे , तांब्याचे आणि मृत्तिकेचे अनेक कलश तयार करण्यात आले. ते शतछिदान्वित होते. म्हणजे शंभर शंभर छिदे असलेले होते. पंचामृत आणि गंगोदके यांनी या कलशातून महाराजांवर अभिषेक व्हावयाचा होता. प्राचीनतम भारतीय संस्कृतीचा , परंपरेचा आणि अस्मितेचा आविष्कार साक्षात डोळ्यांनी पाहण्याचे आणि कानांनी ऐकण्याचे भाग्य स्वराज्याला साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर रायगडावर लाभणार होते. विद्वानांना आणि कलावंतांना राज्याभिषेकाच्या राजसभेत शूर सरदारांच्या इतकेच मानाचे स्थान होते. गाणारे , नाचणारे , वाद्ये वाजविणारे कलाकार याकरिता गडावर आले आणि येत होते. स्वत्त्वाचा आविष्कार प्रकट करणाऱ्या अनेक गोष्टी यानिमित्ताने रायगडावर चालू होत्या. छत्रपतींच्या नावाची सोन्याची आणि तांब्याची नाणी पाडली जात होती. रघुनाथपंडित अमात्य आणि धुंडिराज व्यास या विद्वानांना राज्यव्यवहार कोश म्हणजेच राज्यव्यवहारात आपल्याच भाषेत शब्द देऊन त्याची एक प्रकारे ‘ डिक्शनरी ‘ तयार करण्याचे काम सांगितले होते. इ. १९४७ मध्ये आपण स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान पं. नेहरू यांनीही डॉ. रघुवीरसिंग या पंडितांना पदनामकोश म्हणजेच भारतीय शब्दात राज्यव्यवहाराची डिक्शनरी तयार करण्याचे काम सांगितले आणि त्यांनी केले , हे आपणास माहीतच आहे. शिवकालीन राज्यव्यवहार कोशातील हे शब्द पाहा. मुजुमदार हा फासीर् शब्द त्याला प्रतिशब्द दिला अमात्य , सुरनीसाला म्हटले पंतसचिव. सरनौबताला म्हटले सरसेनापती , इत्यादी.
राजमुदा होती तीच ठेवली. ‘ प्रतिपश्चंदलेखेव… ‘ या वेळी एक नवीन राजमुदा तयार करण्यात आली होती ; मात्र ती कधीही पुढे वापरली गेली नाही.
या निमित्ताने राजसभा आणि अन्य जरूर ती बांधकामे हिराजी इंदुलकर यांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सिद्ध केली. राजदुंदुभीगृह म्हणजे नगारखाना , भव्य आणि सुंदर उभा राहिला. आजही तो उभा आहे.
अनेक राजचिन्हे सिद्ध झाली. सोन्याच्या सुंदर दंडावर तराजू , सोन्याचा मासा , ध्वज , नक्षत्रमाळा , अश्वपुच्छ , राजदंड , अब्दागिऱ्या , मोचेर्ले , चवऱ्या , पंखे , कलमदान , सोन्याचे हातापायातील तोडे , जडावाचे कमरपट्टे इत्यादींचा जिन्नसखाना तयार झाला. यातील सोन्याचा मासा लावलेल्या राजचिन्हाला म्हणत माहीमरातब. स्वराज्याची सत्ता समुदावरही आहे याचे हे प्रतीकचिन्ह. या सर्व चिन्हांत मुख्य होते राजसिंहासन. ते उत्कृष्ट प्रकारे रामाजी दत्तो चित्रे यांनी कुशल सोनारांकडून तयार करवून घेतले होते. त्याला दोन सिंह होते. चार पाय होते. एक चरणासन होते. सिंहासनावर आठ सुबक खांबांची मेघडंबरी होती. छत्रपतीपदाचे मुख्य चिन्ह म्हणजे छत्र. तेही सुवर्णदंडाचे आणि झालरदार कनातीचे होते.
यानिमित्ताने एक नवे बिरुद म्हणजे पदवी महाराजांनी धारण केली. ती म्हणजे क्षत्रिय कुलावतांस. राजाची पदवी ही राष्ट्राचीच पदवी असते. हे हिंदवी स्वराज्याच क्षत्रिय कुलावतांस आहे हाच याचा आशय होता. चाणक्याचे वेळी नंद राजघराणे पूर्णपणे संपले. त्यातूनच एक विक्षिप्त कल्पना रूढ झाली , की भारतात आता कुणीही क्षत्रिय उरला नाही. उरले फक्त त्रैवणिर्क. ही कल्पना जितकी चुकीची होती , तितकीच राष्ट्रघातकीही होती. महाराजांनी आवर्जून ही क्षत्रिय कुलावतांस पदवी स्वीकारली ती , एवढ्याकरता की , हे राष्ट्र क्षत्रियांच्या तेजामुळे अजिंक्य आहे. किंबहुना या राष्ट्रातील प्रत्येकजण राष्ट्रासाठी शस्त्रधारी सैनिकच आहे. एका अर्वाचीन विद्वानाने या आशयाची दोन ओळीची कविता लिहिली.
स्वातंत्र्येण स्वधमेर्ण नित्यं शस्त्रच्छ जीवनम्
राष्ट्रभ्भवनोन्मुखताचा सौ महाराष्ट्रस्य संस्कृती:।
Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 8 |

|| शिवचरित्रमाला ||

शिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला


इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून रायगडास येण्यास निघाला. तो दि. १३ मे रोजी कोरलई जवळच्या आगरकोट या पोर्तुगीज ठाण्यात येऊन पोहोचला. त्याचेबरोबर आठ माणसे होती. त्यात एक श्यामजी नावाचा गुजराथी व्यापारी होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त होता दि. ६ जून १६७४ . म्हणजे हेन्री खूपच लौकर निघाला होता का ? कारण त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारीहिताची काही कामे शिवाजी महाराजांकडून मंजुरी मिळवून करावयाची होती.
हेन्री आगरकोटला दि. १३ मे रोजी दिवस मावळताना पोहोचला , तेव्हा आगरकोटाला असलेले प्रवेशद्वार म्हणजे वेस बंद झालेली होती. रहदारी बंद! हेन्रीला मुद्दाम ही वेस उघडून आत घेण्यात आले. तेव्हा त्याने आगरकोटच्या पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला सहज विचारले , की ‘ अजून दिवस पूर्ण मावळला नाही. तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ? त्यावर डे. गव्हर्नरने उत्तर दिले की , ‘ अहो , तशी काळजी आम्हाला घ्यावीच लागते. कारण तो शिवाजी केव्हा आमच्यावर झडप घालील अन् आगरकोटात शिरेल याचा नेम नाही. म्हणून आम्ही ही दक्षता घेतो. ‘ यातच शिवाजी महाराजांचा दरारा आणि दहशत केवढी होती हे व्यक्त होते.
नंतर हेन्री रायगडावर पाचाड या छोट्या गावी येऊन पोहोचला. रायगडच्या निम्म्या डोंगरावर हे पाचाड गाव आहे. हेन्रीची उतरण्याची व्यवस्था रामचंद निलकंठ अमात्य यांनी तेथे केली होती. दि. १९ मे १६७४ या दिवशीची ही गोष्ट. हेन्रीने मराठी अधिकाऱ्यांस विचारले की , ‘ शिवाजीराजे यांना लौकर भेटावयाचे आहे. पुढे राज्याभिषेकाच्या गदीर्त ते जमणार नाही. तरी ते आम्हांस केव्हा भेटू शकतील ?’ त्यावर अधिकाऱ्याने उत्तर दिले की , ‘ महाराज प्रतापगडावर श्रीभवानी देवीच्या दर्शनासाठी निघाले आहेत. चार दिवसांनी परततील. भेटतील. ‘
खरोखरच महाराज पालखीतून गडावरून प्रतापगडाकडे निघाले होते. राज्याभिषेकापूवीर् श्रीभवानी देवीचे दर्शन घेऊन तिला सुवर्णछत्र आणि अलंकार अर्पण करण्यासाठी महाराज प्रतापगडास गेले. दि. २१ रोजी त्यांनी श्रींची यशासांग महापूजा केली. विश्वनाथभट्ट हडप यांनी पूजाविधी समंत्र केला. श्रीदेवीस सोन्याचे छत्र आणि अत्यंत मौल्यवान असे अलंकार महाराजांनी अर्पण केले.
महाराज दि. २२ मे रोजी रायगडास परतले. हेन्री वकील वाटच पाहात होता. त्याच्याबरोबर नारायण शेवणी सुखटणकर हा दुभाषा वकील आलेला होता. आधी ठरवून हेन्री महाराजांचे भेटीस गेला. त्याने व्यापारविषयक सतरा कलमांचा एक मसुदा अमात्यांच्या हस्ते महाराजांस सादर केला. ईस्ट इंडिया कंपनीच्या काही मागण्या विनंतीच्या शब्दात त्यात होत्या. त्यात शेवटचे कलम असे होते की , ईस्ट इंडिया कंपनीची नाणी मराठी राज्यातही चालावीत! महाराजांनी हे नेमके कलम ताबडतोब नामंजूर केले. त्यांची सावधता आणि दक्षता येथे चटकन दिसून येते. बाकीची कलमे थोड्याफार फरकाने त्यांनी मंजूर केली.
हेन्री डायरी लिहीत होता. त्याने आगरकोटपासून पुढे रायगडावर झालेल्या आणि पाहिलेल्या राज्याभिषेकापर्यंत जेजे घडलेले पाहिलेले ते डायरीत लिहून ठेवले आहे. ही डायरी सध्या लंडनच्या इंडिया ऑफिस लायब्ररीत मला पाहावयास मिळाली. त्या डायरीत हेन्रीची साक्षेपी दृष्टी दिसून येते.
रायगड आणि पाचाड पाहुण्यांनी फुलू लागला. पाचाडास महाराजांनी एक मोठा भुईकोट वाडा बांधलेला होता तो मुख्यत: जिजाऊसाहेबांसाठी होता. या वेळी जिजाऊसाहेब खूपच थकलेल्या होत्या. त्यांची सर्व आस्था आणि व्यवस्था पाहण्यासाठी नारायण त्र्यंबक पिंगळे या नावाचा अधिकारी नेमलेला होता. राज्याभिषेक सोहाळ्यासाठी अर्थातच जिजाऊसाहेबांचा मुक्काम रायगडावरील वाड्यात होता.
हे दिवस ज्येष्ठाच्या प्रारंभीचे होते. अधूनमधून पाऊस पडतही होता. त्याच्या नोंदी आहेत. वैशाखात इंग्रजांचे इतर दोन वकील रायगडावर महाराजांच्या भेटीस येऊन गेले होते. त्यावेळी पावसाने त्यांना चांगलेच गाठले. त्या वकीलांच्या बाबतीत घडलेली एक गोष्ट सांगतो. ते वकील बोलणी करण्याकरता जेव्हा मुंबईहून रायगडावर येण्यास निघाले , तेव्हा मुंबईच्या इंग्रज डेप्युटी गव्हर्नरने वाटेवरच त्यांना एक लेखी निरोप पाठविला की , ‘ त्या शिवाजीराजाशी अतिशय सावधपणाने बोला. ‘ इंग्रजांची शिवाजीमहाराजांच्या बाबतीतली ही दक्षता फारच लक्षवेधी आहे नाही!
रायगडावरील धामिर्क विधींना लवकरच प्रारंभ झाला. श्रीप्राणप्रतिष्ठा आणि नांदीश्राद्ध इत्यादी विधी सुरू झाले. गागाभट्ट आवश्यक तेथे मार्गदर्शन करत होते. कुलउपाध्याय राजोपाध्ये मुख्य पौरोहित्य करीत होते. यावेळी निश्चलपुरी गोसावी हेही आपल्या शिष्यगणांसह गडावर होते. त्यांनी पूवीर्पासून केेलेल्या अपशकुनविषयक सूचना महाराजांनी शांतपणे ऐकून घेतल्या पण ठरविलेल्या संस्कारविधींत बदल केला नाही. अपशकुन वगैरे कल्पनांवर महाराजांचा विश्वासच नव्हता. ते अंधश्रद्ध नव्हते.
हेन्री ऑक्झिंडेन आपल्या डायरीत सर्व सोहाळ्याचे वर्णन विचारपूस करून लिहीत होता. डच प्रतिनिधी इलियड यानेही काही लिहिलेले सापडले आहे. पण आमच्या मंडळींनी या अलौकिक महत्त्वाच्या ऐतिहासिक सोहाळ्याचे यथासांग वर्णन करून ठेवलेले नाही. निदान अद्यापतरी तसे सापडलेले नाही. लौकरच महाराजांची मुंज होणार होती! या वेळी महाराजांचे वय ४४ वर्षांचे होते.

शिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा


दि. २९ मे १६७४ यादिवशी सकाळी महाराजांची मुंज करण्यात आली. म्हणजेच त्या महान विश्वामित्रप्रणित गायत्री मंत्राचा अधिकार संस्कारपूर्वक ‘ बटु ‘ स देण्यात आला. मुंजबटु ४४ वर्षांचा होता! महाराजांची यापूवीर्च आठ लग्ने झाली होती. त्यांना सहा मुली , दोन पुत्र आणि मुलींकडून काही नातवंडेही होती. इतका सगळा संसार झाला होता.
फक्त मुंज राहिली होती. साडेतीनशे वर्षांपूवीर्पासून स्वातंत्र्य हरपल्यामुळे महाराष्ट्रातील क्षत्रिय घराण्यांचेही अनेक मोलाचे पवित्र धामिर्क संस्कार लुप्त झाले होते. वास्तविक महाराजांचे भोसले घराणे अशाच थोर राजघराण्यांपैकीच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांच्या घराण्याला ‘ राजा ‘ ही क्षत्रिय पदवी परंपरेनी चालूच होती. महाराजांचे पणजोबा बाबाजीराजे भोसले यांनाही कागदोपत्रीसुद्धा राजे हीच पदवी वापरली जात होती. भोसले नातेसंबंध फलटणच्या पवार कुलोत्पन्न नाईक निंबाळकर या ज्येष्ठ राजघराण्याशी आणि जाधवराव आदि उच्चकुलीन क्षत्रिय घराण्यांशीही होते.
परंपरेने असे मानले जात होते की , हे भोसले घराणे चितोडच्या सिसोदिया घराण्याचीच एक शाखा महाराष्ट्रात आली , त्यातीलच ते आहे. स्वत: महाराजही तसेच म्हणत असत. पुढच्या काळात छत्रपती शाहू महाराजांना दत्तक पुत्र घेण्याची वेळ आली , त्यावेळी चितोडच्याच राजघराण्यातील एका मुलाला छत्रपती शाहू महाराजांच्या मांडीवर दत्तक द्यावयाचा विचार चालू होता. याचा अर्थच असा , की त्यावेळी चितोड महाराणा सिसोदिया घराणे आणि छत्रपतींचे भोसले राजघराणे हे एकाच रक्ताचे आहे हे मान्य होते.
मुद्दा असा , की शिवाजीमहाराज हे कुलपरंपरेनेच क्षत्रिय कुलावतांस होते. त्यांना धर्मशास्त्राप्रमाणेही वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करण्याचा अधिकार होता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर असाच ठरावा की , आयुष्यभर हातात तलवार घेऊन ज्याने रयतेचे रक्षण , पालनपोषण आणि स्वातंत्र्य हेच व्रत आचरिले , धर्म , संस्कृती आणि अस्मिता यांच्याकरिता रक्त आणि स्वेद सतत गाळले असा महापुरुष कोणत्याही जातीधर्मात जन्माला आला , तरीही तो क्षत्रिय कुलावंतांसच की! नाही का ?
मुंजीनंतर लग्न! शास्त्राप्रमाणे लग्नाचा विधी आता करणे आवश्यकच होते. येथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे , की यावेळी जर महाराजांनी आणखी एक नवे कोरे लग्न करावयाचे ठरविले असते , तर महाराष्ट्रातील कोणत्याही क्षत्रिय कुलावतांस घराण्यातील आईबापांनी आपली मुलगी महाराजांना वधू म्हणून दिलीच असती. पण तत्कालीन बालविवाह पद्धतीमुळे कोणत्याही नवऱ्यामुलीचे वय सात आठ नऊ फारतर दहा वर्षाचे असावयाचे.
महाराजांचे वय यावेळी ४४ होते. म्हणजे नव्या लग्नातील अशा बालिकेशी महाराजांनी लग्न करावयाची वेळ येणार. महाराजांच्या विवेकी मनाला हा जरठ कुमारी विवाह पटणे कधी शक्यच नव्हते. मुंजीनंतर लग्न झालेच पाहिजे हे राज्याभिषेकाकरिता आवश्यकच होते. पण मग आता ? महाराजांनी आणि शास्त्रीमंडळींनी यावर तोड काढली. ती म्हणजे राणी सोयराबाईसाहेब यांच्याशीच पुन्हा विवाह करावयाचा. म्हणजे विवाहसंस्कार करावयाचा. यावेळी सोयराबाईसाहेबांचा राजारामराजे हा पुत्र चार वर्षाचा झालेला होता!
सोयराबाईसाहेबांशी महाराजांचे दि. ३० मे रोजी लग्न करण्यात आले. पुतळाबाईसाहेब आणि सकवारबाईसाहेब या महाराजांच्या राण्यांशीही असेच विधीपूर्वक विवाह करण्यात आले. या एकूण मुंज आणि लग्न प्रकरणातून महाराजांचे जे विवेकी , सुसंस्कृत आणि सामाजिक मन दिसून येते , त्याचा आपण कधी विचार करतो का ? पुरोगामी सुधारणा तावातावाने मांडणारी मंडळीही बहुदा , निदान अनेकदा नेमके उलटे आचरण करताना आजच्या काळातही दिसतात. हे पाहिले की , शिवाजीमहाराजांच्या जोडीला विचाराप्रमाणेच सामाजिक आचरण करणारे म. फुले अन् अण्णासाहेब कवेर् यांच्यापुढे आपली मान आदराने लवते. ज्या काळात दलितांची सावलीही आम्हाला आगीसारखी झोंबत होती , अशा काळात ज्योतिबांनी आपल्या स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा पाणवठा दलितांना अन् सर्वांनाच मुक्त केला हेाता. आजच्याकाळात ही गोष्ट तुम्हाआम्हाला किरकोळच वाटेल. पण त्या काळात ती प्रक्षोभक होती.
इथेच एक गोष्ट सांगितली पाहिजे की , तत्कालीन रिवाजाप्रमाणे अनेकजणांच्या जनानखान्यात नाटकशाळा असतच. नाटकशाळा म्हणजे रखेली. पण महाराजांच्या राणीवंशात अशी एकही नाटकशाळा नव्हती. असती तरी कोणीही त्यांना दोष दिला नसता. पण नव्हतीच. या गोष्टीचाही आपण विचार केला पाहिजे. महाराजांची जी लग्ने झाली. (एकूण आठ) त्यातील सईबाईसाहेब आणि सोयराबाईसाहेब यांच्या पुढची सहा लग्ने ‘ पोलिटिकल मॅरेजेस ‘ असावीत असे दिसते.
उत्तरकालीन एका शिवादिग्विजय नावाच्या बखरीत ( लेखनकाल इ. १८१३ ) महाराजांच्या उपस्त्रिया म्हणून मनोहरबाई आणि मनसंतोषबाई अशी दोन नावे आलेली आहेत. त्याला समकालीन अस्सल कागदपत्रांचा अजिबात पुरावा नाही.
दि. ४ जून १६७४ या दिवशी महाराजांची सुवर्णतुळा करण्यात आली. यावेळी महाराजांचे वजन किती भरले हे हेन्री ऑक्झिंडेन या इंग्रज वकीलाने लिहून ठेवले आहे. १६० पौंड वजन भरले. हेन्रीने नक्कीच विचारणा करून ही नोंद केलेली आहे. आमच्यापैकी कोणीही अशी अन् अशाप्रकारची नोंद केलेली नाही येथेच त्यांच्या आमच्यातला फरक लक्षात येतो.
सोन्याप्रमाणेच इतर २३ पदार्थांनी महाराजांची तुळा करण्यात आली. याला ‘ तुलापुरुषदान ‘ असे म्हणतात. सोळा महा दानांपैकी हे तुलापुरुषदान आहे. हे सर्व नंतर सत्पात्र लोकांना दान म्हणून वाटून टाकावयाचे असते. तसे केले.
सुवर्णतुळेत महाराजांचे वजन १६० पैंड भरले , म्हणून हेन्रीने नोंदविले आहे. पण अभ्यासानंतर असे वाटते की , महाराजांचे वजन १६० पेक्षा कमी असावे. कारण महाराजांच्या अंगावर अलंकार आणि वस्त्रे होती. हातापायांत सोन्याचे तोडे होते. कमरेला शस्त्र म्हणजे तलवार आणि कट्यार असणारच. उजव्या हातात श्रीविष्णुची सोन्याची मूतीर् असणारच. या सर्वांचे वजन वजा करावे लागेल. असे वाटते की , ही वजाबाकी केली , तर महाराजांचे वजन सुमारे १४५ पौंड असावे. सोन्याच्या पारड्यात महाराजांचे शिवराई होन तुळेसाठी घातले होते. एका होनाचे वजन सामान्यत: अडीच ग्रॅम होते. त्यावरून हेन्रीने कॅल्क्युलेशन केले असावे. अन्य धामिर्क विधी चालूच होते. प्रत्यक्ष अभिषेक आणि नंतर राऱ्यारोहण होणार होते , दोन दिवसांनी दि. ६ जून १६७४ .

Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 8 |

|| शिवचरित्रमाला ||

शिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले!


राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या आप्तइष्ट मित्र , सेवक , अधिकारी , कलावंत , पंडित आणि पाहुणे यांची संख्या किती होती ? त्या काळाच्या मानाने ती प्रचंड होती. कुणी म्हटलंय , ८० हजार कुणी म्हटलंय ५० हजार गृहीत धरली तरी ती प्रचंडच आहे. आपल्या हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींना वंदन करण्यास एवढे लोक आले होते. आजही आम्हाला ऊर भरून आनंद होतो , की १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी दिल्लीत लाल किल्ल्याच्या समोर अवघ्या भारतातून सहस्त्र लोकगंगांचे प्रवाह खळाळत , धावत येतात. शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आणि आमच्या आजच्या स्वातंत्र्यसोहोळ्यांचे महत्त्व एकच आहे. आम्ही पूर्णपणे सार्वभौम स्वतंत्र आहोत या भावनेची आणि जाणीवेची किंमत किती मोठी आहे हे कोणत्या शब्दात सांगावं!
अरे , इंदधनुष्याचा तराजू घ्या , तो कल्पवृक्षाच्या फांदीला टांगा , त्याला एक पारडे लावा इंदसभेचे अन् दुसरे पारडे लावा नंदनवनाचे. अन् मग त्यातल्या एका पारड्यात विश्वातील सर्व सुख आणि सर्व वैभव टाका. अन् दुसऱ्या पारड्यात स्वातंत्र्य टाका. ते स्वातंत्र्याचं पारडं इतकं जड होईल की , सुखवैभवांचं दुसरं पारड आकाशात भिरकावलं जाईल. जगातील सारी स्वतंत्र राष्ट्र आपापल्या स्वातंत्र्याचं लेणं केवढ्या दिमाखात मिरवतात आणि जपतात. ब्रिटीश पोरं नाचत गात म्हणतात , ‘ ब्रिटन नेव्हर बी एस्लेव्ह ब्रिटन रुल्स द वेव्हज् ‘ आम्हीही शिवाजीमहाराजांप्रमा णे जन्मजात स्वराज्यानिष्ठच असणारच.
या राज्याभिषेक सोहाळ्यात एक विधी फार मामिर्क होता. तो म्हणजे शुभलक्षणी अश्वांच्या रथात धनुष्यबाण जोडून महाराज उभे राहिले , सरसेनापतीनी सारथ्य केलं आणि महाराज दिग्विजयास निघाले. म्हणजे नेमकं काय केलं ? या रथातून जनसमुदायाच्या उपस्थितीत महाराज रायगडावरच्या राजरस्त्याने सुमारे सातआठशे पावले गेले. हे दिग्विजयाकरता केलेले शिलंगण प्रतीकात्मक किंवा प्रातिनिधीक होते. या शिलंगणाचा आत्मा लक्षात घेतला पाहिजे. तो स्पष्ट आहे. स्वराज्याच्या विस्ताराकरीता साधर्माच्या रक्षणाकरीता प्रजाजनांच्या कल्याणाकरिता , पुरुषार्थ गाजविण्याकरिता राज्युधुरिणांनी सतत राष्ट्र जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सीमोल्लंघन केलेच पाहिजे. महत्त्वाकांक्षा धरलीच पाहिजे. त्या आकांक्षापुढे गगनांहूनही उत्तुंग असलीच पाहिजे. त्या आकांक्षेपुढे गगनही ठेंगणे ठरलेच पाहिजे. त्याकरिता हे प्रतीकात्मक प्रदर्शन आणि निदर्शन.
राज्यशास्त्राप्रमाणे आणि धर्माज्ञेप्रमाणे महाराजांनी भूमीपूजा , जलपूजा , ध्वजपूजा , शास्त्रपूजा , अश्वपूजा , गजपूजा , सवत्सधेनुपूजा , धनपूजा इत्यादी या सर्व देवतांच्या पूजा केल्या. सर्वात मोठी पूजा त्यांच्या हृदयाच्या गाभाऱ्यात चालू होती. अन् ती होती मातृपूजा.
किल्ले कोटांवरील , सुभे परगण्यांवरील आणि आरमारावरील ज्येष्ठ पदाधिकारी गडावर आले होते. राजदुंदुभी त्रिकाळ झडत होत्या. सारा रायगड आनंदाने दुधासारखा ऊतू जात होता. पण स्वराज्यात गावोगाव राहणाऱ्या अशा असंख्य विधवा स्त्रिया नक्कीच होत्या , की ज्याच्या पतींनी स्वराज्यासाठी रणांगणात प्राण अर्पण केले होते. त्या सकल सौभाग्यसंपन्न अखंडित लक्ष्मीअलंकृत विधवांना काय वाटत असेल या राज्याभिषेकाच्या वार्ता आणि वर्णन ऐकून ? आनंदच. मनातून त्या म्हणत असतील का , हे जगदंबे , ‘ क्षण एकच कर मजला सधवा ‘ एकच क्षण मळवट भरते , रायगडावर जाते , राजाला ओवाळते. घरी आल्यावर पदराने मळवट पुसते.
दिवस असे पावसाचे. मोठ्या मुश्किलीने पर्जनराजा वरुणाने आपले आनंदाश्रू रोखून धरले होते. सोहोळ्याचा विरस होऊ नये म्हणून पाऊस पडला नाही.
बांधकाम खात्याचे सुभेदार हिराजी इंदुरकर यांनी गडावर केलेली सर्व बांधकामे अतिशय भव्य सुबक पण साधी केली होती. राजसभेच्या प्रवेशद्वारावर दोन मोठी कमळे दगडावर कोरली होती. कमळ हे शांततेचे आणि लक्ष्मीचे प्रतीक. त्या कमळांच्याच जवळ दोन सिंह कोरले होते. त्या शिल्पातील सिंह आपल्या एकेका पायाखाली एकेक हत्ती दाबून रगडीत होता. अन् शेपटीतही एक हत्ती धरून तो भिरकावणार होता! हे कशाचे प्रतीक ? हे शक्तीचे प्रतीक. चार पादशाह्या अन् चार वैरी पायाखाली चिरडून शेपटीत जणू मुंबईकर इंग्रजांना पकडून हे स्वराज्याचे सिंह आपलं शक्तीप्रदर्शन करत आहेत असाच भास होतो.
राजसभेचे बांधकाम हिराजीने अतिशय कौशल्याने केले होते. त्या विशाल सभेत सिंहासनापाशी उभे राहून अगदी साध्या आवाजात काही बोलले , तरी साऱ्या दहा हजारांच्या राजसभेला स्पष्ट ऐकू जावे असे अॅक्सॉस्टीक्स हिराजीने साधले होते. या निमित्ताने हिराजीने केलेल्या बांधकामांचा तपशील सांगणारा एक सुंदर संस्कृत श्लोकबद्ध शिलालेख श्रीजगदीश्वराच्या मंदिराच्या नगारखान्याशेजारी भिंतीवर कोरला. त्यात त्याने शेवटची ओळ कोरलीय ,
‘ यावच्चंददिवाक रौ विलसत तावत् समुद्यजृंभते ‘
म्हणजे अस्मानात चंदसूर्य जोपर्यंत तळपताहेत , तोपर्यंत हे रायगडचे वैभव टिकेल.
मंदिराच्या प्रवेशपायरीवर त्याने पाचच शब्द शिलालेखात कोरले आहेत.
‘ सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुरकर ‘
राजाच्या आणि प्रजेच्या पायीचे धूलीकण आपल्या नावावर पडावेत हाच यातील हेतू.
आता राज्याभिषेक अगदी उद्याच्या पहाटेवर येऊन ठेपला. जिजाऊसाहेबांचे पहाटेचे स्वप्न पूर्ण होणार होते , खरे ठरणार होते.

शिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’


संत वाङ्मयातील ज्ञानेश्वरीचा वा श्रीतुकाराम महाराजांच्या गाथेचा सप्ताह चालावा किंवा शौर्यदर्शी खेळांचा महोत्सव साजरा होत राहावा किंवा एखादा यज्ञ चालावा तशाच प्रकारचा हा राज्याभिषेक सोहाळा रायगडावर चालू होता. आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग उमटत होते. अजि सोनियाचा दिनु , वषेर् अमृताचा घनु या वचनांची साक्षात अनुभववृष्टी रायगड अनुभवित होता. यज्ञ करणारा यजमान राजा प्राचीन काळी ज्या पद्धतीने आठ-दहा दिवस व्रतस्थ राहत असे , तसेच महाराज या सप्ताहात अहोरात्र व्रतस्थ राहिले होते. खरं म्हणजे , त्यांचं सारं आयुष्यच व्रतस्थ होतं.
राज्याभिषेकाचे विधी दोन प्रकारचे. प्रथम विधी अभिषेकाचा. त्यात पंचामृत आणि सर्व गंगोदके अन् समुदोदके यांनी अभिषेक हा अभिषेक म्हणजेच राज्याभिषेक. हा विधी राजवाड्यात आतील भागात , मोठ्या दालनात करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला अष्टप्रधान , राजमंडळातील सरदार आणि राजकुटुंबाचे नातलग उपस्थित राहणार होते. सर्वसामान्य मंडळींना या कार्यक्रमात स्थान अपेक्षित नव्हते. पण अभिषेकानंतर राऱ्यारोहण म्हणजेच सिंहासनारोहण हा विधी तमाम उपस्थितांसाठी खुला राहणार होता.
पहाटे सुमारे तीन वाजल्यापासूनच या सोहळ्यास प्रारंभ झाला. वार्धक्याने वाकलेल्या जिजाऊसाहेब हा सर्वच सोहाळा पहात होत्या. इलियड या डच प्रतिनिधीने म्हटले आहे की , राजाची वयोवृद्ध आई एका जागी बसून हे सर्व पाहत होती.
महाराजांच्या महाराणी साहेबांच्या आणि युवराजांच्या मस्तकावरून जेव्हा भारतातील सप्तगंगाच्या धारा घळघळल्या असतील , तेव्हा महाराजांना काय वाटले असेल ? गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी यातील एकही नदी स्वराज्यात नव्हती. फक्त गोदावरीचा जन्म त्र्यंबकेश्वरला होत होता. पण ही गंगा कशीबशी नासिकपर्यंत येते न येते तोच पूर्व दिशेस तिला मोगलाई पारतंत्र्यात प्रवेश करावा लागत होता. महाराजांच्या कानाशेजारून घळघळताना या गंगा राजाला म्हणाल्या असतील का , ‘ राजा , तू आम्हाला माहेरी आणलंस रे! खूप आनंद झालाय. पण आमचं सारं जीवन पारतंत्र्यात चाललंय रे! तू आम्हाला मुक्त कधी करणार! ‘
हे सारे विचार तुमचे आमचे आहेत. हे खरंच आहे. म्हणजेच या देशाचेही आहेत हे ही खरंच ना! महाराजांनी एकदा रावजी सोमनाथ पत्की या आपल्या अधिकाऱ्याशी बोलताना म्हटलं की , सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो हा आपला मुलुख पूर्ण स्वतंत्र करावा , अशीच माझी इच्छा आहे.
राज्याभिषेकाचा मंत्रतंत्रयुक्त सोहळा पूर्ण झाला आणि महाराज , महाराणी अन् युवराज वस्त्रालंकार धारण करून राऱ्यारोहणाकरिता राजसभेकडे जाण्यास सिद्ध झाले. त्यांनी कुलदेवतांना देवघरात नमस्कार केला. वडिलधाऱ्यांना आता नमस्कार करावयाचा. कोण कोण आणि वडिलधारे ? बाजी पासलकर ? कान्होजी नाईक जेधे ? सोनो विश्वनाथ डबीर ? आणखीन कोणी कोण ? पण ही सर्व वडिलधारी मंडळी केव्हाच स्वर्गवासी झाली होती. होत्या पुण्यश्लोक जिजाऊसाहेब. महाराजांनी त्यांना वंदन केले.
महाराज पहाटेच्या प्रकाशात अन् मशालींच्या उजेडात राजसभेत सिंहासनापाशी आले. पूवेर्कडे तोंड करून सिंहासनापाशी उभे राहिले. बरोब्बर समोर पूवेर्स दोन किल्ल्यांची शिखरे दूरवर , निळ्या आकाशावर दिसत होती. एक होता राजगड. दुसरा होता तोरणा.
स्वराज्याचा अगदी प्रारंभ याच दोन गडांच्या अंगाखांद्यावर महाराजांनी केला होता. आग्रा भेटीच्या राजकारणापर्यंत महाराजांनी सगळी राजकायेर् , कारस्थाने आणि मोहिमा या राजगडावरूनच केली होती. राजगड शुभलक्षणी ठरला होता. बलाढ्य तर होताच. पण राज्याभिषेक मान मिळत होता , रायगडाला राजधानीचा सन्मान लाथत होता , रायगडाला तो समोरचा राजगड किंचितही हेवादावा न करता , महाराजांचा रायगडावरचा सोहळा नगाऱ्यांच्या दणदणाटात आणि तोफा बंदुकांच्या धडधडाटा , खळखळून जणू हसत बघत उभा होता. रायगड म्हणजे राजगडाचा भाऊच. मन कसं भरतासारखं असावं. राजगडाचं तसंच होतं. पराक्रमाची शर्थ करणाऱ्या असंख्य मावळ्यांना रायगडावरील राज्याभिषेकाला उपस्थित राहता आलं नव्हतं. ते जमणारही नव्हतं. त्यांना आपापल्या जागीच गस्त पहारे करीत उभं राहावं लागणार होतं. कोणीही नियम मोडून रायगडाकडे धावत नव्हता. अन् यातच या मावळ्यांत असलेलं ‘ शिवाजीपण ‘ व्यक्त होत नव्हतं काय ?
विशाल मंदिर उभं राहणे हे महत्त्वाचे कळस कुणी व्हायचे अन् मंदिराच्या पायात कायमचे कुणी राहायचे. हा प्रश्ान् या मावळ्यांच्या दृष्टीने अगदी गौण. राष्ट्रनिमिर्ती याच आराधनेतून होत असते.
महाराज उभे होते. त्यांच्या उजव्या हाती सोन्याची विष्णुची छोटी मूतीर् होती. दुसऱ्या हाती धनुष्य होते. वेदमंत्रघोष चालू होता. मुहूर्ताची घटका बुडाली आणि कुलोपाध्याय अन् अध्वर्यू गागाभट्ट यांनी महाराजांना सिंहासनावर आरूढ होण्याची खूण केली. ते आरूढ झाले आणि एकच जयघोष निनादला , ‘ महाराज क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती की जय! ‘
प्रचंड आनंद कल्लोळ उसळला. फुले , अक्षता , लाह्या बत्तासे , बिल्वदळे , तुलसीपत्रे इत्यादींची मंगलवृष्टी सतत होत राहिली. वाद्ये आणि तोफा दणाणू लागल्या. कलावंत गाऊ नाचू लागले. चवऱ्या मोचेर्ले सिंहासनाशेजारी झळाळू लागले. भगवे झेंडे आणि राजचिन्हे डोलू लागली. सार्वभौमत्त्वाचा दिमाखात छत्र झगमगत होते. हा सोहळा पाहताना राजमाता जिजाऊसाहेबांना काय वाटलं असेल , ते कोणच्या शब्दात सांगायचं ? इथे सरस्वती आणि बृहस्पतीही अवाक् होतात. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टाहास. आपल्याच एका मनाला वाटतंय की , हा सोहाळा बघावयास प्रत्यक्ष शहाजीराजे महाराजसाहेब यावेळी हवे होते. पण लगेच सावध होणारे दुसरे मन म्हणते , नाही रे वेड्या , जर शहाजीराजे यावेळी असते , तर शिवाजीमहाराजांनी तीर्थरूप शहाजीराजांना आणि तीर्थरूप सकलसौभाग्यसंपन्न जिजाऊसाहेबांनाच हा राज्याभिषेक केला असता अन् त्यांच्या मस्तकावर छत्र धरले असते. चवऱ्या मोचेर्ले ढाळले असते. शहाजीराजे नव्हते , म्हणूनच तर महाराजांना स्वत:लाच छत्रपती व्हावं लागलं ना!
महाराज नंतर मिरवणुकीने हत्तीवरून देवदर्शनास गेले. परतल्यावर त्यांनी आऊसाहेबांना वंदन केले , अन् म्हणाले , ‘ आऊसाहेब ‘ हे सर्व तुमच्या आशीर्वादानेच प्राप्त जाहले! ‘
आणि सार्वभौम छत्रपती शिवाजीराजा आईशेजारी बसला , आता त्याचे तेच एकमेव आराध्य दैवत उरले होते.

शिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा


<p>राज्याभिषेकाच्या दरबारात इंग्रज वकील हजर होता. त्याने महाराजांस नम्रतेने नजराणा अर्पण केला. त्याने एक सुंदर खुर्ची गडावर आणली होती. ती त्याने दुसऱ्या दिवशी (दि. ७ जून) राजवाड्यात नेऊन महाराजांस नजर केली. सारा सोहळा अत्यंत आनंदात आणि वैभवात साजरा झाला. आलेल्या प्रत्येक पाहुण्यास कोणत्या ना कोणत्या स्वरूपात महाराजांनी प्रतिआहेर म्हणून काही ना काही देण्याची योजना केली होती. कडेवरील लहान मुलांच्या हातातही काही ना काही (बहुदा पैसे) देण्यात आले.</p>
<p>देवराई होन , प्रतापराई होन आणि शिवराई होन ही नाणी सोन्यात पाडण्यात आली होती. सर्वच नाण्यावर एका बाजूस &lsquo; श्रीराजा शिव &lsquo; आणि दुसऱ्या बाजूस &lsquo; छत्रपती &lsquo; अशी अक्षरे होती. शिवराई नाणे तांब्याचे होते. याशिवाय फलम आणि चक्र या नावाची दोन नाणी होती. या दोन नाण्यांचे कागदोपत्री उल्लेख वा हिशेब सापडतात. पण प्रत्यक्षात एकही फलम आणि चक्र नाणे अद्याप सापडलेले नाही. या नाण्यांचे एकमेकांशी कोष्टकात नेमके काय नाते होते तेही लक्षात येत नाही.</p>
<p>राज्याभिषेक सोहाळ्यात प्रत्यक्ष वापरलेली सुवर्ण सिंहासनापासून गळ्यातील कवड्याच्या माळेपर्यंत प्रत्येक वस्तूला केवढे ऐतिहासिक मोल आणि महत्त्व आहे! हे महान राष्ट्रीय धन आजपर्यंत प्राणापलिकडे जपले जावयास हवे होते. महाराजांच्या कमरेचा रत्नजडित &lsquo; दाब &lsquo; म्हणजे कमरपट्टा आजच्या किंमतीने कल्पनेपलिकडचाच ठरावा. इ. १८९० पर्यंत तो अस्तित्त्वातही होता. पण पुढे काय झाले ते इतिहासास माहीत नाही. पण ही सारी राष्ट्रीय संपत्ती आज असती , तर त्यातील प्रेरणा ही अनमोल ठरली असती.</p>
<p>आज श्रीमंत महाराज छत्रपती उदयनमहाराज यांनी मात्र अतिशय दक्षतेने शिवछत्रपती महाराजांची भवानी तलवार , सोन्याचा एक होन , महाराजांचे रोजच्या पूजेतील शिवलिंग (बाण) आणि श्री समर्थ रामदासस्वामींच्या लहान आकाराच्या पादुका राजवाड्यात सांभाळल्या आहेत. तसेच लंडनमध्ये बकींग हॅम पॅलेसमध्ये एक अतिशय मौल्यवान रत्नजडित मुठीची तलवार फारच चांगल्यारितीने ठेवलेली आहे. ती तलवार भवानी तलवार नाही. तिचे नाव जगदंबा असे आहे. पण तीही तलवार थोरल्या शिवाजी महाराजांचीच आहे , यात शंका नाही. तसेच महाराजांचे पोलादी. वाघनख लंडनमध्ये व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहे.</p>
<p>राष्ट्रीय महत्त्वाच्या वस्तू आणि वास्तू केवढ्या दिमाखात जपल्या जातात हे युरोपिय देशात पाहावे. विशेषत: रशिया आणि इंग्लंडमध्ये हा दिमाख आपल्याला विस्मित करणारा आहे. लंडनच्या टॉवर ऑफ लंडन या भुईकोट किल्ल्यात इंग्लिश राजा राण्यांचे जडावाचे दागिने आणि वस्त्रे फार फार दिमाखाने ठेवलेली आहेत. आपला कोहिनूर हिरा तिथेच आहे. इंग्लंडच्या राजाराणीला राज्याभिषेक जेथे केला जातो , तेथे सिंहासनाच्या पुढे ठेवलेले एक फरशीचा म्हणजे पाषाणाचा , जरा तुटलेला , पायरीसारखा तुकडा काही वर्षांपूवीर् अचानक नाहिसा झाला.</p>
<p>सारे इंग्लिश राष्ट्र कळवळले. अस्वस्थ झाले. एकच शोधाशोध युद्धपातळीवरून चालू झाली. पण चारदोन दिवसातच ती तुटकी फरशी सापडली. अन् मग आनंदीआनंद! आमच्याकडे कवींद रविंदनाथ टागोरांचे नोबेल पारितोषिक हरविले. आपणही यथाशक्ती हळहळले. पण चहाच्या कपातील चहासुद्धा हलला नाही. मग त्यात त्सुनामी लाटा कुठून उठणार ? रशियात साम्यवादी क्रांती झाली. झार राजाराणी संपले. कम्युनिस्ट राज्य आले. पण रशियाच्या राजघराण्याचे राजमुकुट , राजदंड आणि अन्य जडजवाहिरांचे अलंकार रशियाच्या राष्ट्रीय म्युझियममध्ये गुपितासारखे सांभाळून जपून ठेवले आहेत. ते फक्त रशियन नागरिकांनाच पाहण्याचा मान आहे. इतरांना ते पाहता येत नाहीत.</p>
<p>आता निदान या सर्व राजचिन्हांच्या प्रतिकृती करून त्या म्युझियममध्ये ठेवल्या पाहिजेत. महाराजांच्या उजव्या हाताचा , चंदनाच्या गंधात हात (पंजा) बुडवून कागदावर उमटवलेला ठसा सापडला आहे. म्हसवडचे राजे माने यांना महाराजांनी त्याकाळी &lsquo; पंजाच्या डौलाचे &lsquo; जे अभयपत्र पाठविले , त्या पत्राच्या माथ्यावर हा चंदनातील पंजा उमटवलेला आहे. तो साताऱ्याच्या म्युझियममध्ये आहे.</p>
<p>राज्याभिषेकाचा सोहळा पूर्ण झाला. काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ भरलेले असायचे. गडावरील हवा ही अशी पावसाळी. म्हणून महाराज जिजाऊसाहेबांना गडावरून खाली पाचाड गावात असलेल्या वाड्यात घेऊन आले. त्या अतिशय थकलेल्या होत्या. त्यांचं अंत:करण तृप्त होतं. महाराजांनी आपल्या दोन्ही मातांची सर्वस्व ओतून सेवा केली होती. थोरली माता ही जन्मभूमी , स्वराज्यभूमी आणि धाकटी माता प्रत्यक्ष जन्मदायी पुण्यश्लोक जिजाऊसाहेब. तिनेच या मातृभूमीला छात्रचामरांकीत गजराज राजचिन्हांकित सुवर्णसिंहासनाधिष्टीत क्षत्रिय कुलावतांस छत्रपती राजा दिला. सारे सारे मातृऋण फेडिले. आता अखेरच्या दिवसांतही राजा मातृसेवेत मग्न होता.</p>
<p>दिवसादिवसाने आऊसाहेबांची प्रकृती क्षीण होत होती.</p>
<p>रायगडावरील बाकीची कामेधामे कारभारी मंडळी पाहात होती. पाहुणे परतत होते. रायगड नकळत सुन्न झाला होता. ऐन पावसातही राज्याभिषेकाच्या मांडवझळा दाहत होत्या. राज्याभिषेकाचा आनंद कमी होत नव्हता. पण गंभीर होत होता.</p>
<p>अखेरच्या प्रवासासाठी जिजाऊसाहेबांनी प्रस्थान ठेविले होते. जणू रायगडाचे बुरुज मुक्या शब्दात आऊसाहेबांना विचारीत होते , &lsquo; आऊसाहेब , आपण निघालात! पुन्हा परत कधी येणार ?&rsquo;</p>

शिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान!


शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाल्यानंतर बहुधा दुसऱ्याच दिवशी जिजाऊसाहेबांना रायगडावरून खाली पाचाड गावातील वाड्यात आणण्यात आले. त्यांची प्रकृती बरी नव्हतीच. त्यांनी पाचाडला अंथरुण धरले. हे त्यांचे अंथरुण शेवटचेच होते. वार्धक्याने त्या पूर्ण थकल्या होत्या. त्यांचे वय यावेळी ७४ किंवा ७५ असावे. त्या आता कृतार्थ मनाने मृत्यूला सामोऱ्या जात होत्या.
शिवाजीमहाराजांपेक्षा जिजाऊसाहेबांचे जीवन खडतर गेले होते. त्यांनी आयुष्यभर चिंतेतच दिवस काढले. ती त्यांची चिंता होती. स्वराज्याची , रयतेची आणि शिवाजीराजांची. प्राणावर बेतणारी संकटे महाराजांवर येत होती. मृत्यूच्या ओठावरच महाराज स्वराज्यासाठी लपंडाव खेळत होते. मृत्यूने जीभ फिरवली असती तर हा आट्यापाट्यांचा डाव मृत्यूने त्यांच्या सवंगड्यांसह गिळून टाकला असता. पण प्रत्येकवेळी महाराजांचा जणू पुनर्जन्मच होत गेला. पण त्या पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूतीवेदना जिजाऊसाहेबांना सहन कराव्या लागल्या. त्या त्यांनी सहन केल्या , न कण्हता , न विव्हळता. जिजाऊसाहेब सतत चिंतेच्या चितेत उभ्या जळतच राहिल्या. आता शेवटचे जळणे त्या मानाने अगदीच शांत आणि शीतल ठरणार होते. या त्यांच्या अखेरच्या दहा-बारा दिवसांचा तब्बेतीचा तपशील कोणी लिहून ठेवलेला सापडत नाही. पण त्या नक्कीच शांत होत्या. कृतार्थ होत्या. प्रसन्न होत्या. त्यांनी अपार दानधर्म केला होता.
त्यांनी सर्वात मोठे दान या महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला दिले होते. त्यांनी सूर्यपराक्रमी छत्रपती या भूमीला दिला होता. त्यांच्या शिवनेरीवरील अंगाई गीतांचे वेदमंत्र झाले होते. त्यांच्या आसवांच्या सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांच्या हृदयाचे सिंहासन झाले होते. त्यांच्या मायेचे छत्र झाले होते. त्या तृप्त होत्या. दिवसा दिवसाने ज्योत मंदावत होती. तेल संपले होते. ज्योत जळत होती फक्त.
आपण जिजाऊसाहेबांच्या कथा अत्यंत आवडीने ऐकतो , सांगतो. पण त्या कथांच्यामागे केवढी व्यथा धगधगत होती , याचा आपण कधी विचार करतो का ?
कधीकधी मनात दडलेला कवी जागा होतो आणि विचार करू लागतो. ज्याक्षणी महाराज शिवाजीराजे सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाले आणि त्यांच्या मस्तकावर छत्र धरले गेले त्याक्षणी राजसभेत आनंदकल्लोळ उसळला. लोकांचे चौघडे झडू लागले. हे इतिहासाला माहितच आहे पण त्याक्षणी जिजाऊसाहेबांच्या डोळ्यांना समोर काय दिसले असेल ? काहीच दिसले नसेल आनंदाश्रूंच्या डोहात कलियामर्दन करणारा योगेश्वर त्यांना दिसला असेल. अर्जुनाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण दिसला असेल.
जिजाऊसाहेब आता निघाल्या होत्या. दहा वर्षांपूवीर् शहाजीराजे मरण पावले , तेव्हा त्या सती जायला निघाल्या होत्या. महाराजांनी त्यांना कळवळून गळामिठी घालून रडून आकांत करून परत आणले होते. पण आता मात्र ते अशक्य होते.
> दिनांक १७ जून , बुधवारचा दिवस मावळला रात्र झाली , अंधार दाटत गेला , काळोखाने पृथ्वी गिळली. एक ज्योत मंदमंद होत गेली आणि जिजाऊसाहेबांनी डोळे मिटले. महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या आऊसाहेब गेल्या. महाराजांच्या मनात त्याक्षणी जो आकांत उसळला असेल तो अंदाजाने तरी शब्दात सांगता येणे शक्य आहे का ?
ती अखेरची यात्रा निघाली असेल. आऊसाहेबांचा देह पालखीत ठेवला गेला असेल. कैलासाच्या दिशेने पालखी चालू लागली असेल. महाराजांनी अखेरचे दंडवत आऊसाहेबांना घातले असेल. त्यावेळी त्यांच्या ओठातून कोणते शब्द उमटले असतील ? इतिहासाला काहीच माहीत नाही. त्याला काहीच ऐकू आलेले नाही. पण असं वाटतं की , महाराज पुटपुटले असतील ,
‘ इष्ट कार्य प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच ‘ ज्वाला आकाशाला पोहोचल्या.

Shivaji Maharaj | शिवचरित्रमाला |- history of Shivaji Maharaj |part 8 |

|| शिवचरित्रमाला ||

शिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत !


सूर्यालाही तेजोवलय असते. महाराज शिवाजीराजे यांच्याही जीवनाला एक विलक्षण तेजोवलय होते. ते होते जिजाऊसाहेबांचे. कर्तृत्वाच्या प्रचंड दुदुभीनिनादाच्या मागे सनईचौघडा वाजत असावा तशीच शिवाजीमहाराजांच्या जीवनाच्या मागे जिजाऊसाहेबांची सनई निनादत होती. जिजाऊसाहेब हे एक विलक्षण प्रेरक असे सार्मथ्य होते. महाराजांना जन्मापासून सर्वात जास्त मायेचा आशीर्वाद लाभला तो आईचाच. त्यांना उदात्त, उत्कट आणि गगनालाही ठेंगणी ठरविणारी महत्वाकांक्षी स्वप्ने वयाच्या अगदी लहानपणापासूनच पडू लागली. ती आईच्या सहवासातच. महाराज लहानपणापासूनच खूप-खूप मोठे झाले.
त्यांचे प्रेरणास्थान पाठीवरून फिरणाऱ्या आईच्या मायेच्या हातातच होते. अगदी अलिप्त मनाने या आईच्या आणि मुलाच्या जीवनाचा अभ्यास केला तर जिजाऊसाहेबांची कधी दृश्य तर कधी अदृश्य, म्हणजेच कधी व्यक्त झालेली तर कधी अव्यक्त राहिलेली प्रेरक शक्ती अभ्यासकांच्या प्रत्ययास येते. प्रतिपच्चंद लेखेव ही महाराजांची विश्ववंद्य मुदा केव्हा निर्माण झाली? आज तरी या मुदेचे अस्सल पत्र इ. स. १६३९ चे सापडले आहे. पण जिजाऊसाहेबांच्या बरोबर बोट धरून शिवाजीराजे पुण्यास वडिलांच्या जहागीरीचा अधिकृत अधिकारी म्हणून आले त्याचवेळी, म्हणजे इ. स १६३७च्या अगदी प्रारंभी ही प्रतिपच्चंद लेखेव मुदा निर्माण केली गेली असली पाहिजे.
या मुदेतील नम्र पण उत्तुंग ध्येयवाद खरोखरच गगनाला गवसणी घालणारा आहे. शुद्ध, संस्कृत भाषेत असलेली ही कविताबद्ध मुदा प्रत्यक्षात कोणा संस्कृत जाणकार कवीकडून जिजाऊसाहेबांनी तयार करवून घेतली असेल. पण त्यातील अत्यंत नेटका आणि तेवढाच प्रखर आदर्श ध्येयवाद या बालशिवाजीराजापुढे अन् अवघ्या युवा विश्वापुढे कोणी मांडला असावा? जिजाऊसाहेबांनीच. या आईचे जेवढे काही कार्य आणि कर्तृत्व आपणास अस्सल कागदोपत्री उपलब्ध आहे ते वाचल्यावर आणि त्याचे चिंतन केल्यावर हे आपणास निश्चित पटेल. आपणच विचार करून ठरवा. वयाच्या अवघ्या कोवळेपणापासूनच महाराजांचे मन कसा आणि कोणता विचार करत होते?
तो विचार होता क्रांतिकारक बंडाचा. स्वातंत्र्याचा. आदिलशहा बादशहाचे पहिले फर्मान या स्वातंत्र्यबंडाच्या विरोधात सुटले ते दि. ११ एप्रिल १६४१ चे आहे. महाराज त्यावेळी अकरा वर्षाचे आहेत. इतक्या लहान वयात प्रचंड सुलतानी सत्तांविरूद्ध स्वातंत्र्ययुद्धाचा विचार आणि नेतृत्व करणारा जगाच्या इतिहासात शिवाजीराजांशिवाय आणखी कोणी आहे का? एक मुलगा हे बंड करतो आहे. या बंडाची प्रेरणा त्या प्रतिपच्चंद लेखेव मुदेत आहे. या मुदेमागे उभ्या आहेत जिजाऊसाहेब. पहा पटते का. घरातील वडिलधारी व्यक्ती म्हणून सर्व अधिकार जिजाऊसाहेबांच्याच हातात होते. राजांना शिकवित.. शिकवित सर्व कारभार त्याच पहात होत्या.
पण तो शिवाजीराजांच्या नावाने. न कचरता प्रत्येक भयंकर संकटला तोंड देणारी ही आई आणि तिची सतत कणखरपणे टिकून राहिलेली मानसिकता आपण विचारात घेतली तरच हे सारे पटेल. जिजाऊसाहेब जरूर त्याच वेळी राज्यकारभारात सल्लामसलत देताना दिसतात. अफजलखानाचा पुरता म्हणजे निर्णायक सूड घेण्याचा सल्ला राजांना देतात. प्रसंगी सिद्दी जोहारविरुद्ध युद्धावर जाण्याची स्वत: तयारी करतात, आग्ऱ्यास जाऊन राजकारण फते करून या म्हणून राजांना या अवघड राजकारणात पाठबळ देतात, आग्रा प्रसंगीचा स्वराज्याचा राज्यकारभार स्वत: जातीने सांभाळतात आणि प्रसंगी शाहीस्तेखानासारख्या अतिबळाच्या शत्रूविरुद्ध स्वराज्याची उत्तर सरहद्द सांभाळतात हे आपण पाहिले की या आईच कणखर मन आपल्या लक्षात येते.
अत्यंत साध्या आणि सात्विक आचार विचाराच्या या आईचा संस्कार किती प्रभावी ठरला हे शिवचरित्राच्याच साक्षीवरून लक्षात येते. महाराज आग्ऱ्याहून आल्यानंतर जिजाऊसाहेबांनी राज्यकारभारात प्रत्यक्ष कुठेच भाग घेतलेला दिसत नाही. पण आईपणाच्या नात्याने स्वराज्याच्या संघटनेवर त्यांची सतत पाखर दिसते. विठोजीनाईक शिळमकर वा तानाजी मालुसरे यांच्या बाबतीत त्यांनी दाखविलेली मायाममता अगदी बोलकी आहे. त्यांच्या उद्दात आचारविचारांचा प्रभाव तेजोवलयासारखा शिवाजीमहाराजांच्या जीवनात दिसून येतो. जिजाऊसाहेब मरण पावल्या आणि महाराजांचा आनंद कायमचा मावळला.
जिजाऊसाहेबांच्या मरणानंतर त्यांच्या खाजगी खजिन्यात पंचवीस लाख होन म्हणजे सुमारे एक कोटी रुपये शिलकीत ठेवलेले लक्षात आले. ही नोंदही बोलकी आहे. इंग्लडच्या इतिहासात, ‘ओ जॉर्ज, यू ट्राय टू बी ए रिअल किंग’ असं सांगणाऱ्या एका इंग्लिश राजमातेचं अपार कौतुक केलं जातं. वास्तविक या जॉर्जचा संघर्ष होता स्वत:च्याच पार्लमेंटशी. कोणा आक्रमक परकीय शत्रूशी नव्हे. नेपोलियनच्या आईचही कौतुक फ्रेंच चित्रकारांनी कलाकृतीत रंगविले. अशी आणखीही काही उदाहरणे देता येतील.
आमचे मात्र जिजाऊसाहेबांच्या उदात्त आणि प्रेरक अन् तेवढ्याच उपभोगविन्मुख अन् प्रसिद्धीविन्मुख चरित्राकडे जेवढे चिंतनपूर्वक लक्ष जावयास हवे आहे तेवढे गेलेले नाही. रायगडावर पाचाड येथे जिजाऊसाहेबांची समाधी महाराजांच्याच वेळी बांधली गेली. अगदी साधी समाधी. पण तीही पुढे कोसळली. फलटणच्या श्रीमंत मालोजीराजे आणि  श्रीमंत  सौ. लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी या समाधीचा जीणोर्द्धार केला. म्हणूनच ही समाधी आज आपल्यापुढे उभी आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)