शिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…
त्याचे असे झाले की , दि. १६ मे रोजी औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले. तसे ते रोजच येत होते. त्यांचा मुद्दा एकच. या सीवाला ठार मारा. त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण. तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की , या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली. ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरत शहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आज (दि. १६ मे) मात्र सारेचजण आग्रह करू लागले की सीवाला ठार माराच.
आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की , ‘ होय. मी सीवाला ठार मारणार आहे! ‘ हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले. बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते. पण आश्चर्य असे की , ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला. त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने मीरबक्षीला कळवळून विनंती केली की , माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊन सादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी अर्ज लगेच तयार केला. दिला. तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही! त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.
मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की , ‘ आपण शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात. आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजीराजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे , तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा. मग शिवाजीराजांना मारा. ‘
हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की , सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ? दुसरी गोष्टी अशी की , रामसिंग म्हणतो की , ‘ मला प्रथम ठार मारा. मग सीवाला ठार मारा ‘ याचा अर्थ असाही उघडउघड दिसतोय की , मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की , ‘ रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा. ‘
शिवाजीराजांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. भेटला. बादशाह रामसिंगला म्हणाला , ‘ तुझा अर्ज मिळाला. मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगीशिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? तू या गोष्टीला जामीन राहतोस का ?
प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशाहाचा आपल्याबाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंगबरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ‘ भाईजी , तुम्ही बादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन. ‘
रामसिंगला हायसे वाटले. तो किल्ल्यात गेला. दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटला. जमानपत्र दिले. ते घेत बादशाह म्हणाला , ‘ रामसिंग , शिवाजीराजांना घेऊन काबूल कंदाहारच्या स्वारीवर जाण्याची तयारी कर. ‘
रामसिंगला हे सरळ वाटले. त्याने होकार दिला. रामसिंग किल्ल्यातून परतत असताना रादअंदाझखान उर्फ शुजाअतखान सुभेदार याने रामसिंगला म्हटले की , ‘ महाराज कँुवरजी , मैं भी आपके साथ काबूल आनेवाला हूँ! मुझे बादशाहका हुक्म हुआ है! ‘
हे ऐकले मात्र , आणि रामसिंग कमालीचा बेचैन झाला. यात बादशाहाचा डाव अगदी स्पष्ट होता की , काबूलच्या प्रवासात कुठेतरी घातपात करून शिवाजीराजांची अन् सर्वच मराठ्यांची कत्तल उडवायची. हा डाव राक्षसी होता. या कत्तलीत रामसिंगचीही आहुती पडणार होती. याच शुजाअतखानाने बादशाहाच्या हुकुमावरून अलवार येथे तीन हजार सत्नामी गोसावी बैराग्यांची कत्तल केली होती. अशा या क्रूरकर्म शुजाअतखानच्या जबड्यात महाराज , शंभूराजेसुद्धा सापडणार होते. आत्ता जणू ते मृत्युच्या ओठावर पावले टाकीत होते.
history of Shivaji Maharaj || शिवचरित्रमाला || part 4... |
शिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात?
स्वत:च्या घरट्यापासून महाराज आपल्या तीनशे जिवलगांनिशी हजार मैल दूर , अनोळखी मुलुखात एका भयानक शत्रूच्या पंज्यात सापडले होते. औरंगजेब , ज्याच्या काळजाचा डाव विधात्यालाही लागलेला नव्हता. तो औरंगजेब महाराजांचा चोळामोळा करण्याचे डाव आखीत होता.
राजगडावर राजाच्या आईला याची कल्पना तरी असेल का ? ती थकलेली आई उत्तरेकडे नजर लावून माझी पाखरे कधी परत येतील म्हणून वाट पाहात होती. पण स्वत:वर पडलेली स्वराज्याची जबाबदारी किंचितही ढळू न देता. याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्याचे मालवणच्या समुदात बांधकाम चालू होते. मराठी आरमारावरचे आगरी , कोळी आणि भंडारी दर्यासारंग पोर्तुगीजांवर , जंजिऱ्याच्या सिद्दीवर आणि मुंबईकर इंग्रजांवर कडक लक्ष ठेवून होते. ‘ हा शिवाजीराजा आग्ऱ्यात अडकला आहे. हीच संधी त्याच्या राज्यावर आणि आरमारावर गिधाडी झडप घालायला अगदी अचूक आहे. ती त्याची म्हातारी काय करील आपल्याविरुद्ध ?’ असा विचार या शत्रूंच्या मनात येणे अगदी सहज स्वाभाविक होते. पण त्या म्हातारीचे डोळे गरुडाच्या आईसारखे सरहद्दीवर अन समुदावर भिरभिरत होते. आरमारी मर्दांची तिला पुरेपूर पाठराखण होती. या आग्रा प्रकरणात एकही फितुरीचे वा कामचुकारपणाचे वा लाचखाऊपणाचे उदाहरण सापडत नाही. आपण विचार करावा. आपण तो कधीच करीत नाही.
आपण रमतो आणि दिपून जातो ते आग्रा प्रकरणातील महानाट्याने , त्यातील प्रतिभेने अन् त्यातील बुद्धिवैभवाने. या भयंकर राष्ट्रीय संकटकाळात स्वराज्यातली माणसे एका म्हातारीच्या नेतृत्त्वाखाली कशी वागली , कशी दक्ष राहिली याचा आपण विचारच करीत नाही. त्या काळाचा इतिहास पाहा. राज्यकर्ता संकटात सापडला किंवा राज्यापासून दहा पावले दूर गेला की त्याच्यामागे त्याच्या राज्यात बंडे झालीच म्हणून समजावे. फितुरी , हरामखोरी घडलीच म्हणून समजा. पण महाराज राजगडावरून निघाल्यापासून सव्वा सहा महिने हजार मैल दूर जाऊन पडले होते , तरीही स्वराज्याचा कारभार ती म्हातारी आणि तिची हजारो मराठी पोरंबाळं चोख करीत होती. यालाच म्हणतात राष्ट्रीय चारित्र्य. आठवतं का ? चीनने भारतावर आक्रमण केले. तेव्हा तेजपूरचे म्हणजे आपल्या सरहद्दीवरचे कमिशनरसकट सर्व अधिकारी पळून गेले म्हणे! इथं कळते आमच्या म्हातारीची योग्यता. आमच्या तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाची योग्यता. हुजूरपासून हुजऱ्यापर्यंत सर्वांचीच योग्यता.
तपशीलवार पुरावे देणारी कागदपत्रे नक्की बिकानेरच्या राजस्थानी पुरातत्त्व विभागात हजारांनी उपलब्ध आहेत. त्याचा अभ्यास करायला माणसे मिळत नाहीत. काय करावे ? आत्तापर्यंत डॉ. जदुनाथ सरकार , डॉ. महाराजकुमार रघुवीरसिंह आणि प्रा. गणेश हरी खरे आणि सेतुमाधवराव पगडी यांनी बरीचशी कागदपत्रे या दप्तरखान्यातून मिळवून प्रसिद्ध केली अहेत. तीही वाचायला अभ्यासक कुठे आहेत ? काय करावे ?
असू द्या! महाराज संचित होते. रामसिंहाने काबूलवरच्या स्वारीवर जाण्याचा दिलेला हुकुम महाराजांच्या कानावर घातला. त्याची स्वत:ची मनस्थिती केवढी बेचैन होती. औरंगजेबी डाव ऐकून महाराजही कमालीचे अस्वस्थ झाले. खैबरखिंडीच्या आसपास आपला खून पाडण्याचा हा डाव आहे हे उघड त्यांच्या लक्षात आले. पण काय करणार ?
औरंगजेबाने रामसिंगला असे सांगितले की , जखीरा आणि शिवंदी याची पूर्वतयारी करून , दरबारच्या ज्योतिषाने मुहूर्त दिला की तू सीवासह (शुजाअतखानासह) कूच कर. तोपर्यंत थांब. ‘
म्हणजे सुमारे आठवडाभर. तेवढेच मरण पुढे सरकले म्हणायचे! इथे एका गोष्टीची आठवण दिली पाहिजे. औरंगजेबाने आपल्या काही सरदारांना अशी आज्ञा देऊन ठेवली होती की , ‘ तुम्ही थोड्या थोड्या जणांनी दिवसातून केव्हा तरी एकदा जाऊन सीवाला भेटत चला. तो काय काय बोलतो ते मला नंतर सांगा. राजे. ‘ त्याप्रमाणे दोन वा तीन चार सरदार आळीपाळीने महाराजांना भेटावयास येतच होते. महाराज त्यांच्याशी अगदी चांगल्या खानदानी पद्धतीने बोलत वागत होते. रोज.
याच चारदोन दिवसांत एक बातमी. बहुदा ही बातमी मराठी वकीलाकडूनच महाराजांना समजली असावी. बातमी अशी की , औरंगजेबाने मिर्झाराजा जयसिंहाच्या नावाने तीन परगण्यांची जादा जहागीर बहाल केली. ही जहागीर मिर्झाराजांच्या एकूण सेवेबद्दल होती.
ही बातमी ऐकून महाराज चिडले. थोड्याच वेळात रामसिंह शामियान्यात त्यांना भेटावयास आला. तेव्हा महाराज चिडून त्याला म्हणाले , ‘ झालं तुमच्या बादशाही सेवेचं सार्थक ? आम्हाला (फसवून) इथे आग्ऱ्यात आणण्याची कामगिरी तुमच्या वडिलांनी केली. त्याबद्दल हे तीन परगणे तुम्हाला जादा जहागीर मिळाले. ‘
महाराज रागावले होते. रामसिंह हे पाहून अगदी व्याकूळ झाला. त्याचा त्यात काय दोष होता ? मिर्झाराजांनीही शिवाजीराजांना आग्ऱ्यात आणून बादशाहाच्या तडाख्यात अडकविले असाही काही भाग नव्हता. होता तो मिर्झाराजांचा सद्भावच. ही जहागीर मिर्झाराजांनी स्वत: मागितलेलीही नव्हती.
पण महाराज संतापले हेही सहज स्वाभाविक होते. रामसिंह मात्र व्याकुळ झाला होता. त्याला काय बोलावे ते समजेना. क्षणाभराने महाराजच शांत झाले. त्यांनीही जाणले. रामसिंह आपल्यावर किती प्रेम करतो आणि राजपुती शब्दाकरिता किती सावध राहतो हे त्यांनी ओळखले होते. महाराजांनीच रामसिंहला म्हटले , ‘ भाईजी , मी रागावलो. तुम्ही विसरून जा. ‘
आठवडाभरात जावे लागणार होते. खैबरखिंडीच्या जबड्यात!
शिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान
शिवाजीराजांना घेऊन काबूलच्या स्वारीवर जाण्याची तयारी रामसिंह करीत होता. बादशाहाचा लाडका क्रूर सरदार शुजाअतखान हा आपल्याबरोबर येणार आहे याचा धसका रामसिंहाला होताच. कूच करण्यास अजून पाच-सात दिवस लागणार होते. महाराज स्वत: या औरंगजेबी डावामुळे अस्वस्थ होते. त्यांनी एक वेगळेच रान यावेळी उठविले. कोणते ?
महाराजांकडे रोज दिवसातून अनेकदा शाही सरदारमंडळी भेटावयास यायची. आजपर्यंत (दि. १७ मे १६६६ ) महाराज या सरदारांशी छान हसून , गोडीने बोलायचे. पण काबूलच्या वातेर्ने चिडलेले महाराज , काबूलचा विषय न काढता या येणाऱ्या सरदारांशी औरंगजेबाबद्दल सरळसरळ टीकात्मक बोलावयास लागले. त्यात चीड होती. राजांचा आशय असा होता , ‘ बादशाहांच्या वतीने केवढी वचने दिली. पण इथे आल्यापासून तुमचे बादशाह आमचा सतत अपमानच करीत आहेत. आम्हाला दिलेल्या वचनांचं काय ? हाच शाही रितरिवाज आहे काय ? शब्दांची किंमत नाही ? आम्ही उघडउघड फसलो आहोत. हे बादशाही प्रतिष्ठेला शोभतं का ?’
भेटीस येणाऱ्या सरदारमंडळींशी हे असंच रोज अन् सतत महाराज वैतागून बोलत होते. ते सरदारही चकीत होत होते कारण अतिशय खानदानी नम्रतेने गोड बोलणारे महाराज बादशाहाबद्दलच वैतागून बोलताना पाहून त्यांना धक्काच बसत होता. बादशाहाबद्दल असं गुपचूप बोलण्याचं धाडसही कुणी करीत नसे. इथे तर महाराजांनी ती आघाडीच उघडली. या सर्व गोष्टींचा वृत्तांत हेच सरदारलोक बादशाहाला भेटून सांगत होते. आपल्याच विरुद्ध ऐन आग्ऱ्यात आपल्याच सरदारांना हा सीवा बिघडवतो आहे अशी भीती बादशाहालाच वाटायला लागली. हे सरदार बादशाहाच्याच हुकुमावरून महाराजांना भेटत होते. यातून बादशाहाच गोंधळला. कारण साऱ्या दरबारी लोकांत हा उघडउघड बादशाहाविरोधी प्रचार धुमसू लागला. बादशाहाला अशीही भीती वाटू लागली की , खैबरखिंडीकडील प्रवासमार्गावर कदाचित हे विरोधी प्रचाराचे भडक बंड अधिकच मोकाट सुटेल. खैबरखिंडीपर्यंत तरी या शिवाजीचा मुडदा पाडता येणार नाही. तोपर्यंत प्रचाराचा वणवा जनतेत पसरेल. त्यातून पुन्हा शाहजादा शुजा याचीही लटकती धास्ती बादशाहाच्या डोक्यावर होतीच. काय करावे ते त्याला कळेना. ‘ वचने देऊन बादशाहाने मला आग्ऱ्यात आणले. ही वचने मिर्झाराजांच्यामार्फत मला दिली गेली आणि आता माझी साफ साफ फसवणूक केली जात आहे. हे बादशाहांना शोभतं का ?’ हा महाराजांचा मुद्दा असंख्य कानांमनांपर्यंत रोज केवळ बेरजेने नव्हे तर गुणाकाराने पेटत चालला होता. बादशाह यामुळेच कमालीचा अस्वस्थ होता. सीवाला ताबडतोब ठार मारावे का ? अशक्य आहे. कारण राजपुताचा शब्द!
काबुलची मोहिम रद्द करावी का ? अशक्य आहे. कारण शाही प्रतिष्ठेला धक्का लागतोय. काय करावं ?
अखेर बेचैन बादशाहाने रामसिंहाला बोलावून जाब विचारला की , ‘ हा सीवा , आम्ही वचने मोडली , आमचा विश्वासघात झाला असे आमच्याविरुद्ध सतत बोलतो आहे. तुमच्या वडिलांनी सीवाला वचने तरी कोणची दिली होती ‘
रामसिंहाला त्याचे उत्तरही देता येईना. महाराज स्वत:ही वचनांचा तपशील सांगेनात. प्रचाराचा प्रचंड कांगावखोर कल्लोळ महाराजांनी शाही सरदारांच्या समोर चालूच ठेवला होता. बादशाहाच्या भोवती गांधील माश्यांचं मोहोळ उठलं होतं.
अखेर बादशाहाने उसने अवसान आणून रामसिंहाला असा हुकुम दिला की , ‘ काबूलच्या मोहिमेवर निघण्याचा बेत आम्ही हुकुम देईपर्यंत पुढे ढकला. ‘
ढकलला. किंबहुना रद्दच झाला. म्हणजेच महाराजांना बेमालूमरित्या खैबरखिंडीच्या आसमंतात गाठून ठार मारण्याचा शाही बेत आपोआप बारगळला.
प्रचाराचं सार्मथ्य काय असतं याचा हा तीनशे वर्षांपूवीर्चा साक्षात नमुना. केवळ शब्दांच्या तीरंदाजीने महाराजांनी हे औरंगजेबी कारस्थान शामियान्यात बसून हाणून पाडले. हत्याराविना महाराजांनी शब्दांची लढाई जिंकली.
yvfvbhf पण दोनच दिवसांत एक भयंकर प्रकार घडला. महाराज आपल्या शामियान्यात आपल्या काही मराठ्यांशी सहज बोलत बसले असता शामियान्याच्या दारावरचे मावळे पहारेकरी एकदम दचकून महाराजांकडे धावले. अन् म्हणाले , ‘ महाराज , हे पाहा काय! ‘ महाराज अन् सर्वचजण उठले , दाराकडे धावले. बाहेर पाहतांत तो शेकडो मोगली सैनिक आणि त्यांचा म्होरक्या कोतवाल सिद्दी फौलादखान महाराजांच्या छावणीला सैन्यानिशी गराडा घालीत होता. सुमारे दोन हजार मोगल असावेत. मराठी चिमुकली छावणी गराडली जात होती. कैद! महाराज या गराड्यात कोंडले जात होते. औरंगजेबाने महाराजांना उघडउघड कैद केलं होतं. तुरुंग नव्हता हा. बेड्या नव्हत्या हातात. पण ही कडक कैदच होती. महाराजांना धक्काच बसला. त्यांना भविष्य दिसून आले. पहिला आवेग अनावर झाला. त्यांनी शंभूराजांना पोटाशी कवळीले. एकूणच आपण या आग्रा प्रकरणांत मृत्युच्या जबड्यात अडकलो आहोत याची खात्री झाली. दि. २५ मे १६६६ .
शिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव
महाराजांची नजर कैद सुरू झाली. तीनशे मावळ्यांच्या मराठी छावणीलाही सैनिकांचा गराडा होता. महाराज , शेजारीच असलेल्या रामसिंगच्या निवासस्थानी या कैदेतूनही जात येत होते. त्यावरही फुलादखानचा पहारा होता. म्हणजेच पळून जाणे संभवतच नव्हते. महाराज चिंतेत पिचून निघत होते. रामसिंग तर दु:खी आणि अगतिक होता. शिवाय त्याच्या डोक्यावर राजपुताचा शब्द म्हणून महाराजांच्या सुरक्षिततेची तुळशीबेलाची पाने हेलावत होती. एकेक क्षण दिवसा दिवसासारखा जड जात होता. महाराजांच्या दोन वकीलांना मात्र छावणीबाहेर कोणाच्या भेटीगाठी किंवा (गुप्त राजकीय कामेधामे) यासाठी जाता येत असे. वकील या नात्याने त्यांना मोकळीक होती. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे ते वकील.
एकूण या कैद प्रकरणामुळे या वकीलांची आणि महाराजांच्या गुप्त हेरांची जबाबदारी पणाला लागत होती. छावणीतील वातावरण अतिशय गंभीर आणि चिंताक्रांत होते. आत्ता शिवाजीमहाराजांना बेमालूमरित्या कसे ठार मारायचे याचा विचार बादशाहाच्या डोक्यात चालू होता. आता हा सीवा पळून तर जाऊच शकणार नाही अन् घातपाती राजकारणं करूच शकणार नाही याची खात्री बादशाहाला होती. कारण रामसिंगाने जामीनपत्र दिलेले होते आणि फुलादखानचा कडक पहारा होता. शाही सरदारांचे पूवीर्प्रमाणे रोजचे ‘ शिवाजीदर्शन ‘ या कैदेतही चालूच होते. महाराज त्यांच्याशी पूवीर्प्रमाणे छान छान सात्त्विक भाषेत बिनराजकारणी विषय बोलत होते.
महाराज कैदेत पडले आहेत हे दक्षिणेत राजगडावर जिजाऊसाहेबांना समजलेच. त्यांची व्याकुळता कशी सांगावी ? अखेर त्या आई होत्या. मिर्झाराजा जयसिंहालासुद्धा हा औरंगजेबी कावा आणि राजांची कैद समजलीच. ते ही तेवढेच दु:खी झाले. त्यांचे राजकारण आणि अंत:करण करचळून गेले. औरंगजेबाला आपल्या पदरच्या शहाण्या माणसांचीही किंमत कधीच कळली नाही. मिर्झाराजांनी रामसिंगला गुप्त पत्राने कळविले की , ‘ दक्ष राहा. आपला शब्द शिवाजीराजांना तुळसीबेलासह आपण दिला आहे. ‘ मिर्झाराजांनी ओरंगजेबाला एक सूचक पत्र पाठविलेले उपलब्ध आहे. त्यात त्याने म्हटले आहे की , ‘ शिवाजीराजांना कैदेत ठेवल्यामुळे दक्षिणेतील त्याच्या राज्य कारभारावर कोणताही परिणाम झालेला नाही. (त्याची आई) इतका चोख राज्यकारभार करीत आहे की , त्यात सुई शिरकवावयासही जागा नाही.
आग्ऱ्यात कैदेचे दिवस मुंगीच्या गतीने उलटत होते. या काळात महाराजांनी औरंगजेबास काही पत्रे पाठविली. त्याचा सारांश असा की , मी आता बादशाहांच्या हुकुमाप्रमाणे बादशाहांची सेवा करणार आहे. पण या साऱ्या पत्रांना औरंगजेबाने थोडासुद्धा अनुकूल प्रतिसाद दिला नाही. त्याच्या डोक्यात एक वेगळीच कारस्थानी भट्टी पेटली होती. शिवाजीराजांना कसं आणि केव्हा कोंडून ठार मारायचं याचा विचार तो करीत होता. अन् या भयंकर मगरममिठीतून कसं आणि केव्हा सुटायचं याचा महाराज विचार करीत होते.
एके दिवशी तेजसिंह कछवा हा महाराजांशी बोलत बसला होता. हा तेजसिंह म्हणजे राजगड ते आग्रा या प्रवासात महाराजांच्या बरोबर असलेला मिर्झाराजांचा एक राजकीय सहकारी. महाराज तेजसिंहाला म्हणाले.
‘ मिर्झाराजांना बादशाहांचा स्वभाव माहित नव्हता का ? मग त्यांनी अशा भयंकर माणसाच्या विश्वासाची ग्वाही मला देऊन या कैदेच्या संकटात कशाला आणून टाकलं ? आता माझ्यावर केवढा कठीण प्रसंग आला आहे. ‘
महाराजांच्या या उद्गारावर तेजसिंह म्हणाला , ‘ आमचे दरबार (मिर्झाराजे) फक्त उदयराज मुन्शीचाच सल्ला घेतात आणि ऐकतात. इतर कोणाचेच ऐकत नाहीत. ‘ महाराजांचा स्वभाव नेमका वेगळा होता. ते त्यानुसार स्वत:चा निर्णय ठरवीत असत.
औरंगजेब कोणाचाही सल्ला घेत नव्हता. कुणी सल्ला दिलाच तरी स्वत:चाच निर्णय तो ठरवीत असे. अशीही त्यावेळची राजकारणातली यादी होती.
महाराजांच्या भोवती मावळे होते. महाराज शामियान्यात राहत होते. रामसिंगांचे मन कसे होते पाहा! त्याला महाराजांची अतिशय काळजी वाटायची. त्याने एकेदिवशी आपले सुमारे एकोणतीस अत्यंत विश्वासू आणि शूर लोक महाराजांच्या शामियान्याच्या भोवती रात्रंदिवस पहाऱ्यास ठेवले. याला म्हणतात पलंगपहारा. न जागो याही परिस्थितीत बादशाहाने एकदम महाराजांवर काही घातपाती हल्ला घातला , तर कडवा प्रतिकार करण्यासाठी आपली माणसं असावीत ही रामसिंगाची इच्छा.
बादशाहाकडे फुलादखानाने तक्रार कळविली की , ‘ माझा येथे कडक पहारा असतानाही या रामसिंहाने मला न विचारता आपली माणसे सीवाच्या शामियान्याभोवती पहाऱ्यावर नेमली आहेत. हुजूरनी याची दखल घ्यावी. ‘
यावर बादशाहाने रामसिंहाला बोलावून जाब विचारला. तेव्हा रामसिंह म्हणाला , ‘ हुजूर , शिवाजीराजांच्या बाबतीत आपण माझ्याकडून जमानपत्र लिहून घेतले आहे. म्हणून शिवाजीने निसटण्याचा प्रयत्न करू नये आणि घातपाती कोणतेही कृत्य करू नये म्हणून मी दक्षतेसाठी माझाही पहारा त्याच्यावर ठेवला आहे. ‘ बादशाहाला हे एकदम पटले. अंदर की बात त्याला कळलीच नाही.
औरंगजेबाच्या मनातील कुटील आराखडा निश्चित झाला. त्याने कोणापाशीही अक्षराने वाच्यता न करता ठरविली की या अशा पद्धतीने सीवाचा बिखो बुनियाद काटा काढायचा.
शिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.
राजकारणाचा खेळ हा आट्यापाट्यांच्या खेळाइतकाच सावधपणानं खेळावा लागतो. शिवाजीराजे आता आग्ऱ्याच्या कैदेतला हा खेळ आट्यापाट्यासारखाच अत्यंत सावधपणे आणि बुद्धिबळाइतक्याच प्रतिभेने खेळत होते. त्यांचे चौफेर सर्व क्षितिजांपर्यंत लक्ष आणि कान टवकारलेले होते.
महाराजांना आता पहिला मोठा प्रेमाचा अडसर आडवा येत होता तो रामसिंहाचा. कारण रामसिंहाने जमानपत्र बादशाहाला लिहून दिलं होतं. त्यामुळे जोपर्यंत जमानपत्र अस्तित्त्वात आहे तोपर्यंत रामसिंहाच्या जिवाच्या सुरक्षिततेची काळजी आता महाराजांना वाटत होती. पण स्पष्ट शब्दांत ते बोलूही शकत नव्हते. ते स्वत:ही रामसिंहाला वचन देऊन बसले होते. या काळात मिर्झाराजाचीही मुलाला म्हणजे रामसिंहाला दोन-तीन पत्रे आलीच की , ‘ तू काळजी घे. ‘
औरंगजेबाने एके दिवशी अगदी सहज सुभेदार फिदाई हुसेन खान याला म्हटले की , ‘ फिदाई , तुझ्या हवेलीचे जे बांधकाम चालू आहे ते लवकर पुरे कर. ‘
फिदाई हुसेन खान हा एक अतिशय सरळ सज्जन पण कर्तबगार माणूस होता. तो आग्रा सुभ्याचा सुभेदार होता. त्याची स्वत:ची एक भव्य हवेली यावेळी तो बांधत होता. औरंगजेबाच्या डोक्यात असा डाव घाटत होता की , ही त्याची हवेली बांधून पूर्ण झाली की , त्या हवेलीत अचानक शिवाजी-संभाजीराजे यांना चांगल्या जागी राहण्यासाठी नेऊन ठेवायचे. अगदी कडक बंदोबस्तात. अन् मग तिथेच खोटी नाटी कारणे सांगून राजांना मारून टाकायचे. हा पाताळयंत्री डाव इतर कोणालाही माहिती नव्हता. खुद्द फिदाईलाही तो माहित नव्हता. औरंगजेबाने आता एकमेव लक्ष केंदित केले होते या हवेलीच्या बांधकामावर. ते बांधकामही झपाट्याने चालू होते.
इथेच औरंगजेब चुकला. आपल्या या हवेलीतील हवेशीर राजकारणाच्या पलिकडे तो सीवा आणखीन काही भयंकर डावपेच आखीत असेल याची पुसटशीही कल्पना औरंगजेबाला आली नाही. राजकारण कधी आखलेल्या फुटपट्टीच्या रेघेने होत नसते. चाणक्यासारखी माणसे वळसे घेत घेत शेवटी शत्रूचा गळा अचूक आवळतात. महाराजांचं राजकारण नागीणीसारखे वळसे घेत चालू होते.
महाराजांनी पहिले प्यादे अडीच घरं हलविले. ‘ दक्षिणेतील माझे सर्व किल्ले ( म्हणजे सर्व स्वराज्यच की!) मी बादशाहांच्या स्वाधीन करून बादशाह सांगतील ती कामगिरी करणार आहे ,’ असा साळसूद आव ते आणीत होते. बोलूनही दाखवत होते.
आणि अचानक एके दिवशी महाराजांची तब्येत बिघडली. कसंसच होऊ लागलं. खरं म्हणजे काहीही होत नव्हतं. हे ढोंग होतं. आपण आजारी असल्याचे ते उत्तम अभिनयाने येणाऱ्या-जाणाऱ्या सरदारांना आणि सिद्दी फुलादखानलाही दाखवत होते. महाराजांचे दुखणे हळूहळू वाढतच होते. म्हणजेच पसार होण्याची बळकट तयारी चालू होती. वैद्य , हकीम आणि औषधे यांचीही रहदारी सुरू झाली होती. एकेका दिवसाने नाटक पुढे सरकत होते.
एके दिवशी महाराजांनी बादशाहाकडे आपला अर्ज पाठवला की , ‘ औषधोपचार चालू आहेत. पण बरे वाटत नाही. तरी गोरगरिबांस व फकिर- गोसाव्यांस दानधर्म करण्याकरिता मिठाई वाटण्याची मला परवानगी असावी. मी मिठाईच्या डाल्या हस्तस्पर्श करून येथून बाहेर पाठवीन. ती मिठाई बाहेर वाटली जाईल. फकीर , साधुसंतांचा मला दुवा मिळेल. त्याने तरी मला बरे वाटेल. तरी आपली परवानगी असावी. ‘
येथे एक आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट सांगतो. मिठाईचे पेटारे येणार आणि ती मिठाई पुढे वाटली जाणार ही एक अगदी साधी सरळ कल्पना होती. हा अर्ज बादशाहाकडे गेला. आश्चर्य असे की कोतवाल सिद्दी फुलादखानाने या कल्पनेबद्दल शंका व्यक्त केली आणि बादशाहास नम्रतेची सूचना केली की , ‘ या सीवाला ही मिठाईची परवानगी देऊ नका. मला धोका वाटतो. ‘
म्हणजे फुलादखानालाही यांत चुकचुकल्यासारखे काही वाटलेले दिसते. पण औरंगजेबाला त्यात काहीच वाटले नाही. त्याला शंभर टक्के खात्री होती की सीवा माझ्या कडेकोट कैदेत आहे. अन् लवकरच त्याची रवानगी फिदाईच्या हवेलीत व्हायचीच आहे. बादशाहाचे लक्ष अगदी पोपटाच्या डोळ्याप्रमाणे हवेलीच्या पूर्णतेकडे लागलेले होते.
एके दिवशी महाराजांनी रामसिंहाकडे ६५ हजार रुपये कर्जाऊ मागितले. औरंगजेबाने या कर्ज देण्या-घेण्याला मुळीच आक्षेप घेतला नाही. कारण त्यात औरंगजेबाचे काहीच जाणार नव्हते. त्याचे लक्ष होते फक्त हवेलीकडे. तो हवेलीतली हवा किल्ल्यात बसून खात होता.
मिठाईच्या पेटाऱ्यांची ये-जा सुरू झाली. महाराज हात लावीत होते. पेटारे बाहेर जाऊन मिठाई वाटली जात होती. रामसिंहाकडून घेतलेले कर्ज महाराज अचूक वापरीत होते.
एक दिवस महाराजांनी रामसिंहाला म्हटले की , ‘ भाईजी , माझ्याकरिता तुम्ही जमानतीत अडकलेले. तुम्हाला किती त्रास होतोय. आता तुम्ही बादशाहांना सांगून ही सर्व जबाबदारी काढून घेण्यासाठी जमानतीचा अर्ज रद्द करून घ्या. ‘ रामसिंहाला यातील गुप्त डावाची शंकासुद्धा आली नाही. उलट तो ‘ नाही , नाही महाराज. तुमची सर्वस्वी जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी जामीन अर्ज रद्द करून घेणार नाही ‘ असे निक्षून म्हणाला. त्यामुळे महाराजच अडचणीत अडकले. आता या भोळ्या बिचाऱ्याला मी कसं काय समजावून सांगू ? खरं बोलायची सोय नव्हती. कारण हा रामसिंह बादशाहाशी निष्ठावंत होता ना! त्या निष्ठेपाई त्यानी उलटाच काही प्रकार केला तर ? महाराज मधात पडलेल्या माशीसारखे अडकले होते. उडताही येत नव्हते अन् बुडताही येत नव्हते.
history of Shivaji Maharaj || शिवचरित्रमाला || part 4... |
शिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे
अखेर महाराजांनी रामसिंहाच्या विनवण्या करकरून जमानत अर्ज रद्द करवून घेण्याचे रामसिंहाकडून मान्य करून घेतले. रामसिंह औरंगजेबास भेटला. ‘ आता शिवाजीराजांची सर्व जबाबदारी फुलादखान पाहत आहेतच. फौजाही आहे. शिवाय राजांची प्रकृती अगदी ठीक नाही , तरी मला या जामीनकीतून आपण मुक्त करावे. ‘ ही रामसिंगची मागणी बादशाहाला फायद्याचीच वाटली. त्याचे लक्ष होते फिदाईच्या हवेलीकडे. बादशाहाने स्वत:च्या हाताने रमसिंहाची जमानत फाडून टाकली. रामसिंहला हायसे वाटले.
शिवाजीराजांना त्याहूनही हायहायसे वाटले. खरं म्हणजे महाराज प्रेमाच्या महाकठोर बंधनातून सुटले. अत्यंत अवघड अशी ही त्यांची पहिली सुटका.
महाराजांनी आता वेळोवेळी बादशाहाकडे अर्जी करून आग्रह केला की , ‘ मी आता इथेच कायमचा राहणार आहे. पण माझ्या बरोबरच्या लोकांना परत घरी जायला आपण परवानापत्रे द्यावीत. मला त्यांची आता येथे गरज नाही. गरजेपुरती मोजकी नोकर माणसे फक्त ठेवून घेतो. ‘
हेही बादशाहाला सहजच पटले. उलट आवडले. महाराजांची माणसे परवानापत्रे घेऊन ‘ कैदेतून ‘ बाहेर पडली आणि योजलेल्या ठिकाणी योजनेप्रमाणेच आग्रा परिसरात भूमिगत राहिली. ही परवाना घेऊन सुटलेली माणसे अतिशय सावध दक्षतेने आपापली कामे करीत होती. त्यात एक कुंभार सैनिक होता. त्याला आग्ऱ्यापासून काही अंतरावर निर्जन माळावरती कुंभाराची भट्टी पेटवून अहोरात्र राहावयास सांगितले होते. हा कुंभार तरुण कोणच्या गावचा होता ? त्याचे नाव काय होते ? वय काय होते ? इतिहासाला काहीही माहिती नाही. सांगितलेलं काम चोख करायचं एवढंच त्याला माहिती होतं. ही माणसे प्रसिद्धीच्या मागे नव्हतीच. ती सिद्धीच्या मागे होती. आपण करतो आहोत ते देवाचं काम आहे याच भावनेनं ही माणसे काम करीत होती. भट्टी पेटवून बसणं , एकट्यानं बसणं , निर्जन अनोळखी माळावर भुतासारखं बसणं सोपं होतं का ? तो काय खात होता ? कोण आणून देत होतं ? काहीही माहिती मिळत नाही. महाराज सुटून येतील , ते आपल्या पेटत्या भट्टीच्या खुणेवर येतील म्हणून ही भट्टी सतत पेटती ठेवण्याचं काम हा करीत होता. त्याचं अहोरात्र लक्ष महाराजांच्या येण्याकडे लागलेलं असायचं. किती साधी माणसं ही! कुणी कुंभार , कुणी न्हावी , कुणी महार , कुणी भटजी , कुणी रामोशी. पण याच सामान्य मराठ्यांनी असामान्य मराठी स्वराज्य निर्माण केलं. त्यांना कोणती पदवी द्यायची ? पद्मभूषण , पद्मश्री , पद्मविभूषण ? यांना पदवी एकच मराठा! असा एकेक मराठा तेतुका महाराजांनी मिळविला.
औरंगजेब लक्ष ठेवून होता फिदाईच्या हवेलीवर. अन् एकेदिवशी (बहुदा तो दिवस दि. १७ ऑगस्ट , शुक्रवार , १६६६ हाच असावा) औरंगजेबाने या पूर्ण झालेल्या हवेलीत शिवाजीराजांना अर्थात संभाजीराजांसह , नेऊन ठेवायचे ते उद्याच म्हणजे दि. १८ ऑगस्ट , शनिवार , सकाळी १६६६ यादिवशी हा त्याचा बेत अगदी गुप्त होता. त्याचे आयुष्यातले सर्वात मोठे राजकारण यांत भरलेले होते. दक्षिणेतील एक भयंकर शत्रू कायमचा संपणार होता. आता त्याला रामसिंहाचे वा इतर कोणाही रजपुताचे भय वाटत नव्हते. त्या हवेलीत महाराजांना कडेकोट बंदोबस्तात ठेवून सावकाशीने संपविण्याची त्याची योजना होती.
केवढा भयंकर आणि भीषण दिवस होता हा! महाराष्ट्राचे आनंदवनभुवन करण्याचे हजारो मराठी तरुणांचे स्वगीर्य स्वप्न चिरडले जाणार की गोवर्धन पर्वताप्रमाणे आकाशात उचलले जाणार हे या दिवशी ठरणार होते. मराठी संतांचे आणि कोवळ्या संतांनांचे आशीर्वाद सफल होणार की , औरंगजेबी वणव्यात जळून जाणार हे विधात्यालाही समजत नव्हतं. ज्ञानेशांचं पसायदान आणि श्रीनामदेवांची , ‘ आकल्प औक्ष लाभो तया… ‘ ही कळवळून केलेली आर्जवणी औरंगजेबासारख्या जल्लादाच्या कर्वतीखाली चिरफाळून जाणार याचा अंदाजही हिंदवी स्वराज्याच्या कुंडलीतील नवग्रहांना येत नव्हता. मराठ्यांचा हा कृष्ण तुरुंगाच्या काटेरी गजांतून सुखरूप यमुनापार होणार तरी कसा ? होणारा ? अशक्य. अशक्य. आजपर्यंत औरंगजेबाच्या मगरमुखातून कुणीसुद्धा सुटलेलं नाही. महाराज कसे सुटणार ? महाराजांना या उद्याच्या मरणाची आणि औरंगजेबाच्या आजच्याच रात्रीच्या काळोखात रंगणारी स्वप्न कशी समजणार ? काय , घडणार तरी काय ?
पण आग्ऱ्यात आपल्या अदृश्य डोळ्यांनी आणि अतिसूक्ष्म कानांनी वावरणाऱ्या महराजांच्या गुप्तहेरांनी ही महाराजांच्यावर पडू पाहणारी मृत्युची फुंकर अचूक पकडली. निश्चित पकडली. औरंगजेबाचा उद्याचा , म्हणजे शनिवार दि. १८ ऑगस्ट १६६६ , सकाळचा बेत मराठी गुप्तहेरांनी अचूक हेरला. वकीलांनी नक्कीच अचूक अंदाजला. औरंगजेबाचा डाव गुप्त होता. तरीही तो तितक्याच गुप्तरितीने हेरांनी हेरला. नेमका कसा ? नेमका कुणीकुणी ? हे सारंच इतिहासात गुप्त आहे. पण महाराजांना ही भयंकर खबर समजली. आता जे काही करायला हवं ते एका निमिषाचाही उशीर न करता , तातडीने , आजच्या आज , अंधारात करायला हवं , नाहीतर कायमचा अंधार. केवढा भीषण दिवस होता हा! दि. १७ ऑगस्ट १६६६ , शुक्रवार , श्रावण वद्य द्वादशी. उद्याची सकाळ कशी उगवणार ? मृत्युच्या उंबरठ्यावर की उगवत्या केशरी सूर्याच्या क्षितिजावर ?
महाराज सावधच होते. आता जे काही करायचं ते इतक्या तातडीनं अन् इतक्या काळजीपूर्वक की , यमालाच काय पण औरंगजेबालाही कळता कामा नये.
महाराज कोणचंही दुखणं झालेलं नसतानासुद्धा अतिशय आजारी होते. डाव्या डोळ्याची पापणीसुद्धा लवत नव्हती , तरीही भयंकर आजारी होते. अनेकांचं राजकीय आजारपण आम्ही नेहमीच पाहत आलेलो आहोत. पण महाराजांचे हे आग्ऱ्याच्या कैदेतील आजारपण अति राजकारणी होतं. आत्ता काय होणार ? रात्री काय होणार ? उद्या सकाळी ? नंतर ? काय , काय , काय ? विधाताच जाणे. नव्हे , दिल्लीत संचार करणारी गुप्त भुतंच जाणत होती. तीही सचिंत आणि थरथरत्या , धडधडत्या काळजाने.
चारच दिवसांपूर्वी म्हणजेच दि. १ 3 ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमी होऊन गेली होती.
शिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप
महाराज गेल्या महिना सव्वा महिन्यात अगदी पद्धतशीर आणि काळजीपूर्वक आजारी होते. हे आजारपणाचं नाटक त्यांनी आणि त्यांच्यापेक्षाही त्यांच्या जवळच्या मावळी सौंगड्यांनी छान साजरं करीत आणलं होतं. वैद्य , हकीम , औषधं याची गरज होतीच ना! ती महाराजांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी फुलादखानामार्फत आणि मराठी वकिलांमार्फत औरंगजेबाकडे जेव्हा जेव्हा मागितली गेली , तेव्हा तेव्हा ती मिळतही गेली. औरंगजेबाचं लक्ष होतं फक्त फिदाई हुसेनच्या हवेलीच्या बांधकामाकडे. ते बांधकाम पूर्ण होतच होतं.
याच काळात दक्षिणेत बीड-धारूर-फतहाबाद येथे असलेला मिर्झाराजा अतिशय चिंतेने व्याकुळ होता. कारण महाराजांना आग्ऱ्यास पाठवण्यामागे त्याचे जे विधायक राजकारण होते , ते औरंगजेबाने उधळून लावले होते. असा आपल्या मनात विचार येतो की , औरंगजेबाच्या ऐवजी येथे अकबर बादशाह असता , तर त्याने मिर्झाराजांच्या या राजकारणाचा किती वेगळा उपयोग करून घेतला असता ? पण औरंगजेबाचे राजकारण आणि अंत:करण उत्तमरितीने स्वार्थ साधणारेही नव्हते. त्याचे परिणाम त्याला आणि त्याच्या मोगल सल्तनतीला भोगावे लागले. अखेर मराठ्यांच्या हातूनच औरंगजेबही संपला आणि त्याची मोगल सल्तनतही संपली. खरं म्हणजे राजकारण म्हणजे एक योगसाधना असते. पण शकुनीमामा , दुयोर्धन , धनानंद , जयचंद आणि असे अनेक वेडे अदूरदशीर् प्राणी निर्माण झालेले आपण पाहतो. आजही पाहतो आहोत की ते पाहात असताना त्यांची फक्त ‘ न्युईसन्स व्हॅल्यू ‘ लक्षात येते. अन् पटतं की , काही लोकांचा तो धंदाच आहे. च्क्कश्ाद्यद्बह्लद्बष्ह्य द्बह्य ड्ड ड्ढह्वह्यद्बठ्ठद्गह्यह्य श्ाद्घ ह्यह्नह्वड्डठ्ठस्त्रह्मड्डद्यह्यज् त्यांचा शेवटही औरंगजेबी पद्धतीनेच होतो.
शुक्रवार दि. १७ ऑगस्टची दुपार म्हणजे औरंगजेबाच्या डोक्यात चाललेलं गहजबी तुफान होतं. तो वरून अगदी शांत होता.
महाराजांच्या डोक्यात आणि त्यांच्या सौंगड्यांच्या अंत:करणात यावेळी काय चाललं असेल ? न दिसू देता , कोणालाही संशयही न येऊ देता सारा डाव फत्ते करायचा होता. त्या त्या मराठी सौंगड्यांनी आपापली भूमिका किती सफाईने या रंगमंचावर पार पाडली असेल ? याचा विचार आज आमच्या आजच्या सामाजिक आणि राजकीय खेळांत आम्ही सूक्ष्मपणे करण्याची गरज आहे की नाही ? अहो , तालमी करूनही आम्हाला त्यातला अभिनयसुद्धा साधत नाही.
असू द्या! मिठाईचे येणारे पेटारे या शेवटच्या दिवशीही यायचे ते बिनचूक आले. ही वेळ संध्याकाळची , अंधारात चाललेली होती. हा सारा प्रसंग , हे सारे क्षण चिंतनानेच समजू शकतील. ज्या क्षणी महाराज पेटाऱ्यात शिरले , आणि तो पेटारा बंद झाला , तो क्षण केवढा चिंताग्रस्त होता. शामियान्यावरच्या मोगली पहारेकऱ्यांपैकी एखाद्याची नजर जर त्यावेळी त्या प्रसंगाकडे गेली असती , तर काय झालं असतं ? महाराजांच्या जागी चटकन पलंगावर शाल अंगावर घेऊन झोपणारा हिरोजी फर्जंद किती सफाईने वागला. पाहा! तो जरा चुकला असता तर ? पेटारे नेणारे वेषांतरीत मावळे गडबडले असते किंवा बावळटासारखे वागले असते तर ? हे सारेच प्रश्ान् अभ्यासकांपुढे येतात. त्याची उत्तरेही त्यांनाच शोधावी लागतात.
ही वेळ संध्याकाळची सात वाजायच्या सुमाराची होती. असे लक्षात येते. पेटारे नेणाऱ्या साथीदारांवर केवढी जबाबदारी होती! आपण काही विशेष वेगळे आज करतो आहोत असा किंचितही संशय पहारेकऱ्यांना अन् फुलादखानला येऊ नये , याची दक्षता या पेटारेवाल्यांनी किती घेतली असेल ? असा आम्हाला नाटका-सिनेमांत अभिनय तरी करून दाखवता येईल का ? ज्या क्षणी पेटारे शामियान्यातून आणि छावणीच्या परिसरातून बाहेर पडले असतील तेव्हा मावळ्यांना झालेला आनंद व्यक्त करण्याइतकीही सवड नव्हती.पेटारे निसटले.
अंधार दाटत गेला. नेमके महाराजांचे संबंधित पेटारे भट्टी पेटवून बसलेल्या कुंभाराच्या दिशेने धावत होते. याच दिशेने संबंधित मावळे घोडे घेऊन येत होते. महाराज ज्या क्षणी त्या पेटलेल्या भट्टीपाशी जाऊन पोहोचले असतील , त्याक्षणी त्या कुंभाराला काय वाटले असेल ? त्या जाळाच्या अधुऱ्या प्रकाशात या सगळ्या हालचाली , पसार होण्याची घाईगदीर् आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचे भाव कसे दिसले असतील ? फक्त कल्पनाच करायची. इतिहास येथे थबकतो. कारण याचा तपशील कुणीच लिहून ठेवलेला अजून तरी सापडलेला नाही. हे आपल्या अभ्यासाने आणि प्रतिभेने कलावंतांनी सांगायचे आहे. चित्रकरांनी चितारायचे आहे कवींनी आणि गायकांनी गायचे आहे. अभिनेत्यांनी रंगमंचावर सादर करायचे आहे. शिल्पकारांनी शिल्पित करावयाचे आहे. केवढा विलक्षण इतिहास घडलाय हा! आमच्या मनांत एकच शंका डोकावते , की यातील एकही मावळा फितुर कसा झाला नाही ? जहागीर मिळाली असती ना औरंगजेबाकडून चंगळ करायला अमाप दौलत मिळाली असती ना , शाही खजिन्यातून.
असं काहीच घडलं नाही. कारण राष्ट्रीय चारित्र्य. या प्रकरणातील प्रत्येकजण हा ‘ नायक ‘ होता. कुंभारापर्यंत यात खलनायक एकही नव्हता.
नेताजी सुभाषचंद बोस हे ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन निसटले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ते भारताबाहेर गेले. त्यांनी हिंदुकुश पर्वत ओलांडला. त्यांच्या डोळ्यापुढे ही आग्ऱ्याहून सुटकाच असेल काय ? आणि आमच्या तडाख्यातून हैदराबादचा लायकअली पसार झाला तेव्हा आमच्या डोळ्यापुढे फुलादखानचा वेंधळेपणा असेल काय ?
शिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच
महाराजांचे हे कठोर कैदेतून बेमालूमपणे निसटणे हा जगाच्या इतिहासातील एक विलक्षण चमत्कार आहे. या संपूर्ण आग्रा प्रकरणाचा खूपच तपशील इतिहास संशोधकांना मिळाला आहे. ही कथा म्हणजे एक विशाल सत्य कादंबरी आहे. ही एक दिव्य तेवढेच थरारक महाकाव्य आहे. प्रतिभावंतांची नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा स्तिमित व्हावी अशी ही सत्य कलाकृती आहे.
समजा , महाराज जर त्याच दिवशी निसटले नसते , तर काय झाले असते ? त्याच दिवशी ते निसटले हा केवळ योगायोग होता का ? कदाचित कुणी म्हणेल की , महाराजांना झालेला हा ईश्वरी साक्षात्कार होता. पण नेमके त्याच दिवशी (दि. १७ ऑगस्ट) निसटून जाण्याचे महाराजांनी तडकाफडकी ठरविले आणि ते पसार झाले. याच्या पाठीमागे मराठी हेरांनी करामतच असली पाहिजे. त्याशिवाय हे घडलेले चित्तथरारक नाट्य बुद्धिला उमगत नाही.
ते पेटाऱ्यातून गेले की वेषांतर करून गेले! मोगली कागदपत्रात ते वेषांतर करून गेले असे उल्लेख आहेत. पण सुमारे २ 3 ऑगस्ट म्हणजेच सुटकेनंतर एक आठवड्याने मोगलांच्या टेहळ्यांना अर्धवट जळून विझून गेलेले पेटाऱ्याचे अवशेष त्या माळावर आढळले. त्यावरून त्यांचीही खात्री झाली की , सीवा पेटाऱ्यातून पसार झाला आणि त्याने पेटारे जाळून टाकले. ‘ सेवो दखन्नी और सेवो के पुत्तो संभो दखणी पिटारा बैठकर भागोछे ‘ अशी राजस्थानी पत्रात नोंद आहे. अशाच पद्धतीने सुटून जाण्याची महाराजांची कल्पना मात्र त्यांच्या पूर्वतयारीवरून आग्ऱ्यात तयार करून घेतल्याचे दिसून येते. महाराज आपल्या बरोबरच्या मराठी साथीदारांसह नरवरपासून पुढे सटकले तेव्हा नरवरच्या मोगली ठाणेदाराला महाराजांनी आपल्याला मिळालेली , दक्षिणेत घरी जाण्याची परवानापत्रे दाखवली. त्या ठाणेदाराने महाराजांना सोडून दिले. ही पत्रे म्हणजे महाराजांनी तयार करून घेतलेली बनावट परवानापत्रे होती.
महाराज आग्ऱ्याहून एकदम दक्षिणेच्या मार्गाला न लागता ते उलटे उत्तरेकडे म्हणजेच मथुरेकडे दौडत गेले. ही त्यांची दौड एकूण ६० किलोमीटरची होती. मथुरेत मोरोपंत पिंगळे यांची सासुरवाडी होती. मोरोपंतांच्या पत्नीचे बंधू तेथे राहत होते. महाराजांना ते माहिती होते. राजगडापर्यंतची दौड चिरंजीव शंभूराजांना झेपणार नाही , म्हणून शंभूराजांना मोरोपंतांच्या मेहुण्यांच्या घरी छपवून ठेवायचे आणि आपण मराठी मुुलुखाकडे नंतर दौडायचे हा महाराजांचा आराखडा होता. त्यामुळे महाराजांची दौड १२० किलोमीरटने आणि वेळ जवळजवळ दहा तासांनी वाढणार होती , तरीही शंभूराजांच्याकरिता त्यांनी हे महागाईचे गणित पत्करले. मथुरेपर्यंतचा प्रवास ऐन काळोख्या रात्री दौडत करावा लागला. शंभूराजांचे वय यावेळी फक्त नऊ वर्षांचे होते. या नऊ वर्षाच्या मुलाला मोरोपंतांच्या मेहुण्यांच्या स्वाधीन करून महाराज अगदी त्वरित दक्षिणेच्या मार्गाला लागले. शंभूराजांच्या सांगाती महाराजांनी बाजी सजेर्राव जेधे देशमुख यांना ठेवले.
दक्षिणची दौड सुरू झाली. महाराज नरवरला पोहोचले. तेथे मोगलांचे लष्करी गस्तीचे ठाणे होते. या ठाणेदाराची महाराजांनी मुद्दाम धावती भेट घेतली. त्यांनी आपल्याजवळची दस्तके (परवानापत्रे) त्याला दाखवली. ठाणेदाराला प्रत्यक्ष शिवाजीराजांना पाहून काय वाटले असेल ? तो भयंकर सीवा , आपल्यासमोर पाचपंचवीस मराठी सैनिकांनिशी उभा आहे. याची प्रत्यक्ष प्रचिती त्या ठाणेदाराला स्वप्नासारखी वाटली असेल नाही! तो विस्मित झाला ? गोंधळला ? भारावला ? क्षणभर घाबरला ? तो भयंकर सीवा आपल्याला दस्तके दाखवून आपल्या परवानगीनेच जातो आहे या सुखद जाणीवेने आनंदला ? काय झाले असेल त्याचे ? त्याने महाराजांना पुढे जाण्यास म्हणजेच झपाट्याने पसार होण्यास मोठ्या आदबशीररितीने परवानगी दिली.
महाराज नरवरवरून निसटले. ते स्वत:हून या ठाणेदाराला दस्तके दाखवून पसार झाले. यात त्यांचा मिस्किल , थट्टेखोर स्वभाव दिसून येतो. ही थट्टा प्रत्यक्ष औरंगजेबाचीच होती.
तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वत: ‘ महाराज ‘ म्हणून शाल पांघरून झोपला. सुमारे पाच-सहा मावळे चिंताग्रस्त चेहऱ्यांनी भोवती होते. थोड्याचवेळाने चिंताग्रस्त चतुर उठले अन् शामियान्याच्या दारावर असलेल्या मोगली पहारेकऱ्यांना ‘ आम्ही महाराजांची औषधं आणावयास जातो ‘ असे सांगून बाहेर पडले. अशा प्रकारचा औषधासाठी जाण्यायेण्याचा रिवाज रोजच चालू होता. त्यामुळे हे लोक जात आहेत , ते नेहमीप्रमाणे औषधं घेऊन परतही येणार आहेत अशी स्वाभाविकच पहारेकऱ्यांची कल्पना झाली.
आणखी थोड्या वेळाने हिरोजी फर्जंद भोसले हा हळूच पलंगावरून उठला. त्याने याही घाईगदीर्त गंमतच केली. त्याने त्या पलंगावर कोणीतरी माणूस (म्हणजे शिवाजी महाराज!) झोपला आहे असे भासावे म्हणून उशाशी एक छोटेसे गाठोडे ठेवले. मधे लोड ठेवला आणि पायाच्या बाजूला दोन जोेड उभे करून ठेवले आणि यावर शाल पांघरली. अगदी साक्षात शिवाजीराजे गाढ झोपल्यासारखे वाटावे.
अन् स्वत: तंबूच्या बाहेर निघाला. त्याने दारावरच्या पहारेकऱ्यांना साळसूदपणे सांगितले की , ‘ मघा माणसं औषध आणायला गेली , ती अजून का येत न्हाईत , ते पाहून येतो ‘ हिरोजीही निसटला. आता त्या शामियान्यात कोणीही नव्हते. सगळे पसार!
दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला. एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती!
एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला. आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फुलादखानची ?
औरंगजेबाचे भयंकर क्रूर जल्लादही हे सारं समजल्यावर खळखळून , पोट धरून हसले असतील.
history of Shivaji Maharaj || शिवचरित्रमाला || part 4... |
शिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले
महाराज निसटल्यापासून जवळजवळ १२ तासांनी फुलादखानाला हा भयंकर प्रकार लक्षात आला. रामसिंगला धावत जाऊन फुलादने ही भयंकर वार्ता सांगितली. त्यावेळी रामसिंगने त्वरित उच्चारलेले एक वाक्य एका पत्रात सापडले आहे. रामसिंग म्हणाला , ‘ शिवाजीराजे गायब झाले ? पण सारी जबाबदारी तुमच्यावरच होती. ‘ या क्षणी शिवाजीराजांनी आग्रह धरून जमानपत्र आपणांस का रद्द करावयास सांगितले , याचा बोध रामसिंगला झाला. नरवरच्या ठाणेदाराने आग्य्रास बादशाहाकडे पत्र पाठवून कळवले की , ‘ हुजूर , जिल्लेइलाही बादशाहांच्या हुकुम पावला. परवानापत्र (दस्तक) असणाऱ्यांनाच दक्षिणेकडे जाऊ द्यावे. इतर कोणालाही जाऊ देऊ नये , या आपल्या हुकुमाची अमलबजावणी मी आधीपासूनच करीत आहे. कोणालाही दस्तकाशिवाय आम्ही जाऊ देत नाही. त्यांच्यापाशी बादशाही परवानगीचे दस्तक होते. म्हणूनच आम्ही त्यांना जाऊ दिले. नाहीतर त्यांनाही अटकाव करणार होतो.
ठाणेदाराचे हे पत्र औरंगजेबाला मिळाले. तो सुन्नच झाला. काय बोलणार ? एक प्रकारे ठाणेदार या पत्राने बादशाहाला कळवत होता की , हुजूर आपण काळजी करू नये. आपल्या दस्तकाप्रमाणेच शिवाजीराजांना आम्ही सुखरूप मागीर् लावले. सुन्न झालेल्या औरंगजेबाने ठाणेदाराच्या पत्रावर फक्त तीन अक्षरात फासीर्मध्ये स्वत: शेरा मारला आहे , ‘ नरवरचा हा ठाणेदार बेवकूफ आहे. ‘
हे पत्र सध्या आंध्र – हैदराबाद येथील पुरातत्व विभागात ह्यद्गद्यद्गष्ह्लद्गस्त्र २ड्डद्मड्डद्बद्गह्य श्ाद्घ ह्लद्धद्ग ष्ठद्गष्ष्ड्डठ्ठ या संग्रहात आहे. कै. प्रा. ग. ह. खरे यांनी ते प्रसिद्ध केले.
औरंगजेबाने ताबडतोब आग्रा शहरात लष्कर घातले आणि शहराची कसून झाडाझडती सुरू केली. त्याला एकच आशा वाटत होती की , तो सीवा नक्कीच आग्य्रातच लपून बसलेला असेल. तो या झडतीत सापडेल. ही झडती तीन दिवस (१८ ते २० ऑगस्ट १६६६ ) सतत चालू होती. सीवा सापडला नाही. पण दुदैर्वाने दि. २० रोजी महाराजांचे दोन वकील सापडले. रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि त्र्यंबक सोनदेव डबीर हे दोन्हीही वकील कसे काय सापडले कोण जाणे. पण या दोघांचे औरंगजेबाने महाराजांचा पत्ता काढण्यासाठी आतोनात हाल केले. त्या हालांना सहन केले. पण शिवाजी महाराजांच्या बद्दल एका अक्षरानेही माहिती सांगितली नाही. हे निष्ठावान चारित्र्य कसे घडले याचा आजच्या युवकांनी अभ्यास केला पाहिजे. त्यातूनच आपल्या आजच्या हिंदवी स्वराज्याचे कडवे नागरिक उभे राहणार आहेत.
औरंगजेबाने महाराजांचा शोध घेण्याचा सतत प्रयत्न केला. पण तो व्यर्थ गेला. महाराज आणि त्यांचे सर्व सौंगडी स्वराज्यात येऊन पोहोचले. अडकले फक्त दोन वकील. ते हाल सहन करीत होते.
औरंगजेबाने दक्षिणेत दिलेरखानाच्या छावणीत असलेल्या नेताजी पालकरास ताबडतोब कैद करून आग्य्रास पाठवण्याचा गुप्त हुकूम दिलेरला पाठवला. वास्तविक नेताजी शाही चाकर बनला होता. महाराजांच्या सुटकेशी त्याचा काहीही संबंध नव्हता. तरीही त्याला दिलेरने शाही हुकुमाप्रमाणे धारूरच्या किल्ल्यात अचानक कैद केले. त्याच्याबरोबर त्याची एक बायको , मुलगा जानोजी आणि काका कोंडाजी पालकर यांनाही कैद करण्यात आले आणि आग्य्रास रवाना करण्यात आले. वड्याचे तेल वांग्यावर.
या सर्व पालकरांना बादशाहाने बाटवले. नेताजीचे नवे नाव ठेवण्यात आले मोहम्मद मशीर्द कुलीखान. महाराज सुटल्यापासून पंचविसाव्या दिवशी (१२ सप्टेंबर १६६६ ) राजगडास येऊन पोहोचले. हजार दिवाळी दसऱ्यांचा आनंद राजगडावर राजापूरच्या गंगेसारखा एकदम उसळून आला. त्या आनंदाला सीमा नव्हती. यावेळी घडलेली एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. महाराज आग्य्राहून सुटले १७ ऑगस्ट रोजी. त्याच्याआधी दोनच दिवस , म्हणजे १५ ऑगस्ट रोजी जिजाऊ साहेबांनी सैन्य पााठवून कोल्हापूर परगण्यातला रांगणा गड हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला होता. ही घटना केवढी विलक्षण आहे ? शिवाजीराजे मृत्यू्च्या दाढेत आग्य्रात असतानाच इकडे महाराष्ट्रात त्यांची आई आणि मावळी सौंगडी एक अवघड मोहीम फत्ते करीत होते. महाराज सहा महिने स्वराज्यात नव्हते. ते मृत्यूशीच आग्य्रात जणू लपंडाव खेळत होते. या कालखंडात स्वराज्यातील वीतभरही भूमी शत्रूच्या ताब्यात गेली नाही. एकही फितूर निर्माण झाला नाही. कारभार बेशिस्त नाही. उलट स्वराज्य एका जबरदस्त किल्ल्याने वाढलेच. राष्ट्रधर्माचा हा मूतीर्मंत साक्षात्कार.
या साऱ्या प्रकरणात मिर्झाराजे , कुँवर रामसिंग व त्यांचे कुटुंब भयंकर औरंगजेबी कोपात भाजून निघाले. या साऱ्या प्रकरणाचा धक्का बसून मिर्झाराजे बऱ्हाणपूर येथे मरण पावले. औरंगजेबाने उदयराज मुन्शी याच्यामार्फत मिर्झाराजांवर विषप्रयोग करून त्यांना ठार मारले , असा कीरतसिंगने उदयराजवर आरोप केला. उदयराज स्वत: धर्मांतर करून मुसलमान झाला. रामसिंगला बादशाहाने दरबार बंद केला.
एवढे सगळे होऊनही रामसिंग बादशाहाचा निष्ठावंत सेवकच राहिला! रामसिंग संस्कृत भाषेचा पंडित होता. यावर अधिक भाष्य काय करावं ?
शिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच
राजगड आनंदाच्या डोहात डुंबत होता. साऱ्या मावळांत आनंदाचे तरंग उमटत होते. याच काळात एक कथा घडली.
गुंजण मावळात (ता. वेल्हे जि. पुणे) तांभाड नावाचं एक गाव आहे. महाराजांचा एक शिलेदार विठोजी नाईक शिळमकर हा या गावचा. महाराज आग्ऱ्याला गेले त्यावेळी त्यांच्या मांदियाळीत हा विठुजीही होता. तोही आग्ऱ्यात अडकला. तसाच तो महाराजांच्या सांगाती सुटलाही. पण सगळे सुखरूप आले , तोही आला. राजगडावर जसा आनंद उफाळला तसा विठुजी आपल्या घरी सुखरूप आल्यानंतर त्याच्या घरीही आनंद उफाळला. महाराज बहुदा याच आठवड्यात प्रतापगडावर भवानीदेवीच्या दर्शनास गेले. त्यांच्याबरोबर विठुजी चार दिवसांनी सगळे परतले.
विठुजीही आपल्या घरी परतला आणि चकितच झाला. सगळं घर आनंदात हलतडुलत होतं. म्हाताऱ्यांपासून रांगत्यांपर्यंत सगळेच आनंदात होते. विठुजीला जाणवलं की , हा आनंद काहीतरी वेगळा आहे. अन् मग घरात वडिलधाऱ्यांकडून त्याला समजलं , की विठुजीच्याच धाकल्या लेकीचं लगीन वडिलधाऱ्यांनी गेल्या चार दिवसांत ठरवून टाकलं. नवरामुलगा चांगला तालेवार कुळातला. देखणा. नाव म्हादाजी नाईक पाणसंबळ. बापाचं नाव गोमाजी नाईक. महाराजांचा तो उजव्या हाताचा सरदार. अशा तालेवार घरांत विठुजी शिळमकराची लेक लक्ष्मी म्हणून , म्हादजी नाईकाचा हात धरून प्रवेशणार होती. दोन्हीकडच्या वडिलधाऱ्यांची लगीन बोलणी झाली होती. पण कुंकू लागायचं होतं , सुपारी फुटायची होती. विठुजी नाईक घरी येण्याची वाट होती.
विठुजी नाईक आला. त्याला हे सारं समजलं. तोही आनंदला. सुखावला. घरच्यांनी त्याला सांगितलं.
‘ विठुजी , मुलांकडची माणसं चारसहा दिवसांनी पोरीला कुंकू लावायला येणार. सुपारी फुटणार तवाच लगनाची तिथीमिती ठरवायची. मांडवाची मुहूर्तमेढ , हळदी , साखरपुडा आणि बाकीचे सोपस्कर हेही ठरवायचं. ‘
विठुजी सुखावला. तरीही त्याचा चेहरा चिंतावला.
आठ दिवसांनी नवरदेवाकडची बुजरूख माणसं अन् गुरुजी हे सारं ठरवायला विठुजी नाईकाच्या घरी येणार होते. पण दोन दिवस आधीच विठुजीनं पाहुण्यांना सांगावा धाडला की , ‘ जरा कामांची अडचण आहे , आपण लगीन सुपारीसाठी मागाहून आठ-दहा दिवसांनी यावा. ‘
पाणसंबळ पाहुण्यांनीही मानलं. अस्ती अडचण माणसांना. सुपारी दहा दिवसांनी फोडू.
दोन्ही घरी आनंद. सडा सारवणं , आया-बायांची आणि करवल्यांची गोड वर्दळ. पण विठुजी मात्र चिंतावलेला.
हे ही दहा दिवस सरत गेले. अन् विठुजीनं व्याह्यांच्या घरी पुन्हा हात जोडून सांगावा पाठविला की , ‘ पाहुणे , जरा अडचणीनं खोळांबलोय. थोडं आठ दिस आणखीन थांबावं. ‘
पाहुणे सांगावा ऐकून जरा थबकलेच. खरं म्हंजी मुलीच्या बाजूनं बापानं जातीनं येऊन बोलायला हवं. लग्नाची तिथं धरायचा आग्रव करायला हवा. पण मुलीचा बाप नुस्ते सांगावे पाठवतोय. अन् लगीन तिथं पुढं पुढं ढकलतोय का ? ही काय रीत झाली ?
असं आणखीन एकदा झालं. मग मात्र चारचौघात कुजबुज सुरू झाली की , असं का करतायंत विठुजी नाईक ? गोमाजी नाईक पाणसंबळसुद्धा कसंनुसे झाले. पण त्यांचं मन खानदानी. गप्प राहिले. पण एकदा भैरोबाच्या पारावर अन् चावडीच्या सदरेवर माणसं कुजबुज लागली की , ती काय थांबती व्हय ? पाण्यात पडलेला तेलाचा थेंब जसा सईकन पसरतो , तसं झालं.
अन् विठुजी नाईकांची ही वाकडी चाल राजगडावर जिजाऊसाहेबांच्या कानावर गेली. कुणीतरी कुजबुजलंच. आऊसाहेबांचं डोकं पांढऱ्या केसाखाली जरा काळजावलं. त्यांनी गुपचुप विठुजीला बोलावू पाठवलं.
आऊसाहेबाचा निरोप आला. विठुजीचं मन जरा धसकावलंच. कशापायी हुकुमावलं असल आऊसाहेबानं ?
गडावर विठुजी दोन्ही हातानी मुजरे घालीत आऊसाहेबांच्या पुढं गेला. आऊसाहेबांनी म्हटलं , यावं यावं नाईक आणि आऊसाहेबांनी जरा काळजीच्या खालच्या आवाजातच विठुजीला पोरीच्या लग्नाचं पुसलं , का लग्नाची तीथी धरत न्हाईस ? लग्नासारखी गोष्ट. चारचौघात त्याचा चारतोंडी कालवा होऊ नये. बाळा. लौकीकाला बरं नाई. विठुजी चिंतावलेल्या आदबीनं. ‘ जी ‘ म्हणाला. नक्की तीथी धरतो म्हणाला.
पण हेही चार दिवस गेले. त्यामुळे आता मात्र पाहुणे पाणसंबळ जरा मनातनं बिघडलेच. विठुजी नाईक शिळमकर देशमुखांना आपली लेक आमच्या पाणसंबळ घरात द्यायची नाही का ? लगीन मोडायचंय का ?
अन् आऊसाहेबांनाही हे पुन्हा समजलं. त्यांनी तातडीचा हुकुम फेकला अन् विठुजीला राजगडावर बोलावू पाठवलं. विठुजी आला. आऊसाहेबांच्या पुढं अपराध्यासारखा आला. आऊसाहेबांनी त्याला रागे रागे कारण पुसलं. विठुजी कसाबसा कसनुसा बोलत आऊसाहेबांना म्हणाला , ‘ आऊसाहेब , कसं सांगू ? लग्नासारखी गोष्ट केवढी भाग्याची. पाणसंबळांसारख्या तालेवाराच्या घरात सून म्हणून माझी लेक जाणार ही केवढी भाग्याची गोष्ट. पण कसं लगीन करू ? घरी काय काय बी न्हाई. आग्ऱ्याला जाण्याच्या आधी दिलेरखान मोगलाची स्वारी गुंजण मावळापर्यंत आली. सारं मावळ तुडवून काढलं त्यानी. सत्यानाश केला. आता घरी कायबी न्हाई. लग्नात पोरीच्या अंगावर खणचोळी तरी घालायला हवी. चार पाहुणी येणार काय करू ? सावकारबी गवसेना. त्यांचंही मोगलांनी तळपट केलं. कसं करू आऊसाहेब ? पोरीच्या बाशींगला दोरा अपुरा पडतोय. ‘
अन् मग आऊसाहेब आणखीनच रागावल्या. अरे विठ्या , हे मला सांगता येऊ नये का तुला ? मी इथं गडावर कशासाठी बसलीय ? का नाही बोललास ? अरे तू या घरातला ना ?
विठुजीनं घरची रिकामी भांडी आऊसाहेबांच्या पुढं कधी वाजवली नाहीत हे ही खरंच. कारण आपल्या म्हातारीला किती त्रास द्यायचा ?
आऊसाहेबांनी कारभारी कारकुनाला हाक मारली. कारकुनाचं नाव नारोजी त्र्यंबक आणि म्हटलं ‘ नारूजी , आपल्या विठुजीच्या घरी लेकीचं लगीन निघालंय. लग्नाला जेवण जेवढं जेवढं लागतं , ते ताबडतोब तांभाडच्या शिळमकर वाड्यात गडावरून पोहोचतं करा. ‘
अशी होती राजाची आई. असा होता राजा आणि अशी होती प्रजा. लगीन वाजत गाजत सारं झालं.
या विठुजी नाईक शिळमकराला एका पत्रात स्वत: शिवाजीमहाराजांनी लिहिलंय , ‘ विठुजी नाईक , तुम्ही तर आमच्या कुटुंबातल्यासारखेच. ‘
मराठी माणसांची अशी राजाशी नातीगोती होती.
शिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण
महाराज आग्र्याच्या कैदेत आजारी पडले होते. ते आजारपण खोटं होतं. पण आग्ऱ्याहून परत आल्यानंतर मात्र महाराज खरंच आजारी पडले. अतिश्रमामुळे हे आजारपण महाराजांच्या वाट्याला आलं. पुढे जवळजवळ तीन आठवडे (सप्टेंबर १६६६ उत्तरार्ध) महाराज पडून होते. आजारी पडलेल्या महाराजांना पाहणं म्हणजे दुमिर्ळच दर्शन.
महाराजांच्या अंगात ज्वर होता. पण त्याच्याबरोबर डोक्यात चिंता होती की , माझा लेक अजून मथुरेहून परतलेला नाही. दुसरी चिंता त्याहून भयंकर होती. माझे दोन भाऊ औरंगजेबाच्या दाढेखाली अडकले आहेत. हाल सोसताहेत ते कसे सुटतील ? केव्हा सुटतील ?
त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे हे महाराजांचे दोन वकील २० ऑगस्ट , सोमवार १६६६ या दिवशी आग्रा शहरात फुलादखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले. कैद झाले. या दिवशी अमावस्या होती. हे दोन्ही वकील जणू यमदुतांच्या हाती जिवंत गवसले गेले. मग त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील.
हा तेव्हा त्यातील हालाचा एक औरंगजेबी प्रकार. या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल शिवाजीमहाराज कसे गेले , कुठे गेले , कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल , छळवणूक.
या दोघांची सुटका कशी करता येईल , याची चिंता महाराज करीत होते. महाराजांचे स्वत:चे आजारपण हळूहळू ओसरत गेले.
याच काळात महाराज राजगडावर येऊन पोहोचल्याच्या म्हणजेच त्यांच्या आग्ऱ्याहून सुटकेच्याही खबरा साऱ्या देशभर पसरल्या. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर होता जुआव नूनिस द कुंज कोंदि द साव्हिर्सेंति. याने पूवीर् महाराज आग्ऱ्यात कैदेत अडकल्याचे कळल्यानंतर लिस्बनला आपल्या पोर्तुगीज बादशहाला एक पत्र लिहून कळविले होते की , ‘ तो शिवाजी आग्ऱ्यास गेला असता औरंगजेबाने त्याला कैदेत डांबले आहे. (दि. २५ मे १६६६ ) तो आता कधीही सुटण्याची शक्यता नाही. औरंगजेब शिवाजीला मरेपर्यंत कैदेत ठेवील किंवा ठारच मारून टाकील. ‘ ही गोष्ट पोर्तुगीजांना आनंदाचीच वाटत होती. कारण त्यांचा सर्वांत मोठा शत्रू होता शिवाजी राजा.
पण हे पत्र लिस्बनला पोहोचायच्या आतच महाराज १७ ऑगस्ट १६६६ ला सुटले. ही गोष्ट या पोर्तुगीज गव्हर्नरलाही कळली. तेव्हा तो थक्कच झाला. (दु:खीही झाला) त्याने लिस्बनला आपल्या पोर्तुगीज बादशहाला यावेळी एक पत्र पाठविले आहे. त्या पत्रात साव्हिर्सेंति गव्हर्नरने लिहिले आहे की , ‘ तो शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून मरेपर्यंत सुटण्याची शक्यता नाही , असे मी पूवीर् आपणास लिहिले. परंतु तो शिवाजी अशा काही चमत्कारीकरितीने कैदेतून सुटला (आणि स्वत:च्या गडावर येऊन पोहोचलादेखील) आहे की , इकडचे सारे जग आश्चर्याने थक्क झाले आहे. खरोखर हा शिवाजी म्हणजे एक विलक्षण माणूस आहे. त्याची तुलना जर करायचीच असेल तर ती अलेक्झांडर दि ग्रेट किंवा ज्युलियस सीझर यांच्याशीच करावी लागेल. ‘ हा पोर्तुगीज शत्रूचा शिवाजी महाराजांच्याबद्दलचा अभिप्राय आहे.
महाराज याचवेळी म्हणजे ऑक्टोबर १६६६ मध्ये हवापालट करण्याकरिता म्हणून म्हणजेच विश्रांतीकरिता म्हणून सावंतवाडी आणि पणजी यांच्या पूवेर्ला ऐन सह्यादीच्या रांगेत , एक अतिअवघड किल्ला आहे , त्या किल्ल्यावर गेले. ते म्हणताना विश्रांतीकरिता जात आहेत , असे म्हटले. पण प्रत्यक्षात पोर्तुगीजांची सत्ता गोव्यातून उखडून काढण्याची योजना आखण्यासाठीच या मनोहर गडावर आले होते. यांत शंका नाही.
हा गड पोर्तुगीजांच्या उत्तर सरहद्दीवरती घनघोर जंगलात आहे. महाराजांची तुलना सिकंदर आणि सीझर यांच्याशी करणारा साव्हिर्सेंति हाच यावेळी पणजीस गव्हर्नर होता. या गव्हर्नरने महाराजांकडे रामाजी कोठारी याच्याबरोबर आग्ऱ्याहून (कैदेतून सुटून) सुखरूप परत आल्याबद्दल सदिच्छेचे पत्र आणि नजराणाही पाठविला. परंतु महाराज मनोहर गडावर येऊन राहिल्याचे रामाजीला समजले. त्याने मनोहर गडावर जाण्याचा प्रयत्नही केला. पण अवघड वाटा आणि घनदाट अरण्य यांमुळे त्याला या डोंगरी किल्ल्याचा मार्ग सापडला नाही. म्हणून तो पणजीस परत गेला.
महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा.
त्यातील मुख्य विषय असा की , ‘ मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. ‘
औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.
सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल ? येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता , ना सांगता , ना दाविता , अनुभव चित्ता चित्त जाणे!
शिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली
आग्र्याला महाराज गेले त्यावेळी त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त तीनशे माणसे असल्याची नोंद आहे. ही सर्व मंडळी सुटून सुखरूप घरी आली. यातील एकही माणूस दगावला नाही. एकाही माणसानं दगा दिला नाही. अत्यंत विश्वासू , धाडसी , कष्टाळू आणि निष्ठावंत असेच हे तीनशे सौंगडी सांगाती होते. फितवा फितुरीची शंकासुद्धा येत नव्हती. घडलेही तसेच. असे सहकारी असतात तेव्हा पर्वतप्राय प्रचंड कायेर् गोवर्धनासारखी करंगळीवरही उचलली जातात.
आग्रा प्रकरणात घडलेल्या एका गोष्टीची नोंद गमतीदार आहे. नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना महाराजांनी मथुरा येथे ‘ मथुरे ‘ या आडनावाच्या कुटुंबात ठेवले. संभाजीराजांच्या सांगाती बाजी सजेर्राव जेध देशमुख यांनाही ठेवले. कुणाला संशय येऊ नये म्हणून या मथुरे कुटुंबियांनी ‘ हा मुलगा आमचा भाचा आहे ‘ असेच वेळप्रसंगी म्हणत राहिले. शंभूराजांना त्यांनी जानवे घातले आणि धोतरही नेसविले. हे मथुरे कुटुंब मोरोपंत पिंगळ्यांचे सासुरवाड होते. बखरीतून काही कथा ही नोंदलेल्या सापडतात. निदान महिना सव्वामहिना शंभूराजे मथुरे यांच्या घरी राहिले. या काळात कोणा मोगल अधिकाऱ्यांना संशय आला म्हणे की , हा लहान मुलगा यांचा कोण ? तेव्हा कृष्णाजीपंत मथुरे यांनी उत्तर दिले की , ‘ हा आमचा भाचा आहे ‘ तेव्हा या मोगल अधिकाऱ्यांनी म्हटले , की एका ताटात जेवाल ? तेव्हा मथुरे यांनी ‘ होय ‘ म्हणून एका ताटात दही पोहे शंभूराजांबरोबर खाल्ले म्हणे! ही कथा खरी असो वा खोटी असो , पण शिवाजी महाराजांची माणसे कोणत्या विचारांनी आणि आचारांनी भारावलेली होती , याची द्योतक नक्कीच आहे.
संभाजीराजे यांना घेऊन मथुरे बंधू नंतर सुखरूप राजगडला येऊन पोहोचले. दिवस होता २१ नोव्हेंबर १६६६ . महाराजांनी या मथुरे बंधूंना ‘ विश्वासराव ‘ असा किताब दिला. यातच सर्व काही आले. महाराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची अठरापगड संघटना एखाद्या चिरेबंदी किल्ल्यासारखी बळकट आणि अजिंक्य बनली. त्यातूनच हे सार्वभौम हिंदवी स्वराज्य छत्रचामरांनिशी उभे राहिले.
महाराजांच्या बरोबर अनेक प्रकारची मंडळी होती. त्यात परमानंद गोविंद नेवासकर या नावाचा एक विद्वान संस्कृत पंडित होता. तो संस्कृत कवीही होता. महाराज त्याला साधूसंतांसारखा मान देत. आग्ऱ्याहून सुटायच्या आधीच महाराजांनी या परमानंदाला महाराष्ट्राकडे पाठविले. त्याच्यापाशी परवानापत्र होते. पण नंतर आठवडाभरातच महाराज आग्ऱ्याहून निसटले. सर्वत्र एकच कल्लोळ झाला. त्यावेळी हा परमानंद आग्ऱ्याहून राजस्थानमागेर् दक्षिणेकडे येत होता. तो दौरा या गावी अचानक जयपूरच्या राजपूत (पण मोगली सेवेत असलेल्या) सैनिकांच्या हाती गवसला. त्यांनी त्याला अटक करून ठेवले. या अटकेचाही फारसा बोभाटा झालेला दिसत नाही किंवा होऊ दिला नाही. यावेळी दक्षिणेत धारूर जवळ असलेल्या मिर्झाराजांना परमानंदाच्या अटकेची बातमी समजली. तेव्हा मिर्झाराजांनी हुकुम पाठविला की , शिवाजीराजांच्या परिवारातील या परमानंद कवीस अगदी सुखरूप जाऊ द्यावे. (म्हणचेच पोहोचवावे) त्याप्रमाणे परमानंद कवी सुखरूप सुटला. तो बहुदा या प्रवासात वाराणसी येथे जाऊन आला असावा. त्याने लिहिलेल्या ‘ अनुपुराण ‘ उर्फ ‘ शिवभारत ‘ या शिवचरित्र ग्रंथात असे म्हटले आहे की , ‘ काशीतील पंडितांनी शिवाजीराजांचे चरित्र माझ्या तोंडून ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे मी हे शिवचरित्र कथक केले. ‘ प्रणिपत्य प्रवक्षामि महाराजस्य धिमत: चरितं शिवराजस्य भरतत्स्येव भारतम् ‘ हे प्रथम शिवचरित्रकथन यावेळीच काशी येथे घडले असावे , असा साधार तर्क आहे. परमानंद नंतर स्वराज्यात सुखरूप पोहोचला. तो रायगड जिल्ह्यातील पोलादपूर या गावी राहत असे. त्याचा जीवनक्रम अध्यात्ममागीर् होता. त्याचा पुढे मृत्यू कधी झाला ते माहीत नाही. परंतु त्याची समाधी पोलादपूर या गावी आहे. पोलादपुरात परमानंदाचा एक मठही होता. परमानंद गृहस्थाश्रमी होता. त्याच्या मुलाचे नाव देवदत्त. तोही कवी होता. त्यानेही लिहिलेले काव्य रिसायतकार सरदेसाई यांनी प्रसिद्ध केले.
आग्ऱ्याच्या कैदेत असताना महाराजांनी रामसिंहाकडून सुमारे ६५ हजार रुपये कर्ज घेतले होते. ते महाराजांच्या सुटकेच्या आधीच. राजगडच्या खजिन्यातून एका रकमेने मिर्झाराजांच्या प्रतिनिधीमार्फत परत करण्यात आले. या साऱ्याच व्यवहारावरून आपलं खाजगी , सामाजिक आणि राजनैतिक आचरण शुद्ध ठेवण्याचा महाराजांचा निग्रह दिसून येतो.
शिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन
महाराजांचं मन केवळ राजकारणावरच केंदित नव्हतं. इतरही अनेक विषयांत ते लक्ष घालीत होते. त्यांना स्वत:ला संस्कृत आणि फासीर् या भाषा येत होत्या , असे म्हणण्यास ठाम पुरावा नाही. पण त्यांना या भाषांचं महत्त्व नक्कीच वाटत होतं. फासीर् , इंग्रजी , फिरंगी इत्यादी परकीय भाषांची राजकारणाकरिता जाणती माणसं जवळ ठेवणं. गरजेचंच होतं. त्याप्रमाणे मुल्ला हैदर उर्फ काझी हैदर , सोनो विश्वनाथ डबीर , रघुनाथपंत कोरडे , त्र्यंबकपंत डबीर इत्यादी फार्सी जाणकार महाराजांच्या पदरी होते. त्यातील बहुतेक सर्वांनीच राजकीय कामगिऱ्या उत्तमरितीने पार पाडलेल्या आहेत. या सर्व वकीलांचा परराज्यांशी सतत संबंध येत होता. पण कोणी लाच खाल्ली आहे वा स्वराज्यदोह केलाय असं उदाहरण नाही. फक्त एकच मनुष्य जरा वेगळा निघाला. तो म्हणजे वरील मुल्ला हैदर. हा फारसनवीस वकील अत्यंत बुद्धिमान आणि महा कारस्थानी व चतुर होता. पण तो पुढे औरंगजेबास जाऊन मिळाला.
संस्कृत भाषेवर जसे महाराजांचे प्रेम दिसून येेते तसेच आपल्या बोली मराठीवरही दिसून येते. शाहीर , पौराणिक कथानके आणि तात्त्विक शास्त्रीय गंथलेखन करणारे पंडित कवी महाराजांच्या आदरास पात्र होते. कवींद परमानंद , जयराम पिंड्ये , धुंडीराज व्यास , रघुनाथपंत अमात्य , बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर , केशव पंडित पुरोहित , संकर्षण सकळकळे , कवीराज भूषण , गागाभट्ट आदीकरून अनेक भाषाप्रभू महाराजांच्या वलयांत होते. त्यात प्रत्यक्ष युवराज संभाजीराजे यांचीही गणना होती. युवराज शंभूराजे उत्तम संस्कृततज्ज्ञ लेखक होते. वरील यादीतील प्रत्येकाने एक वा अनेक गंथ लिहीले आहेत. युवराजांनीही दोन संस्कृत पुस्तके लिहीली आहेत. संभाजीराजांना शिक्षण देण्यासाठी उमाजी पंडित या नावाचा शिक्षक नियुक्त करण्यात आलेला होता. संभाजीराजे यांनी संस्कृतमध्ये लिहिलेले एक प्रदीर्घ दानपत्र सापडले आहे. हे दानपत्र म्हणजे शंभूराजांचे थोडक्यात आत्मचरित्रच आहे. जयपूरच्या रामसिंह कछुवाहला त्यांनी लिहिलेली संस्कृत पत्रे उपलब्ध आहेत. स्वत: शिवाजी महाराजांनी लिहिलेली म्हणजेच चिटणीसांनी लिहून घेतलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. त्यातूनही महाराजांचे भाषाप्रभुत्त्व आणि तर्कशुद्ध विचारसरणी दिसून येते. लोकसाहित्याकडेही त्यांचे प्रेमाने लक्ष होते. अज्ञानदास शाहीरांनी अफझलखान वधावरचा लिहिलेला पोवाडा आज उपलब्ध आहे. या अज्ञानदासाला महाराजांनी गौरवपूर्वक एक शेर सोन्याचा तोडा आणि एक जातीवंत घोडा बक्षीस दिल्याची नोंद आहे.
महाराजांची मुदा संस्कृतमध्ये आहे. त्यांनी जिंकलेल्या आणि नव्याने बांधलेल्या अनेक किल्ल्यांना संस्कृत नावे दिली. उदाहरणार्थ प्रतापगिरी उर्फ प्रतापगड , चाकण उर्फ संग्रामदुर्ग , सिंधुदुर्ग , सुवर्णदुर्ग , शिवापट्टण आणि अशी अनेक. पदनामकोश म्हणजेच राज्यव्यवहारकोश. आपल्या भाषेचे आणि आपल्या राष्ट्रीय संस्कृतीचे महत्त्व महाराजांनी पुरेपूर ओळखले होते. संज्ञा बदलल्या की संवेदनाही बदलतात हे त्यांनी अचूक ओळखले होते. सागरध्यक्ष , राजमंडळ , अष्टप्रधान , शस्त्रागार इत्यादी राज्यव्यवहारात येणाऱ्या निरनिराळ्या अधिकाऱ्यांची , वस्तंूची आणि वास्तूची नावे संस्कृतप्रचुर ठेवलेली राज्यव्यवहार कोशात आढळतात. त्यांचे शिलालेखही संस्कृतमध्ये आहेत. रायगडावर विवेकसभा नावाची एक वास्तू होती. जाणकार शास्त्रज्ञांचा परामर्श घेण्यासाठी आणि चर्चा चिकित्सा करण्यासाठी ही विवेकासभा होती.
स्वराज्यात सर्वच धर्मांचा आणि कलाकारांचा आदर ठेवला जात होता. महाराजांचे सर्वात महत्त्वाचे धर्मकार्य म्हणजे स्वराज्याला बाधक ठरणाऱ्या भाबड्या रूढी त्यांनी बाजूला सारल्या. उदाहरणार्थ समुदपर्यटन. स्वराज्यकाळात आमची व्यापारी गलबते मस्कतपर्यंत जात होती. पश्चिम समुदावर मराठी आरमाराचा दरारा आणि वर्चस्व होते.
या सर्व उपलब्ध पुराव्यातून एकच गोष्ट निदर्शनास येते की , स्वराज्यातील प्रजा सुखी आणि निर्धास्त असली पाहिजे. येथे कोणावरही अन्याय होता कामा नये. गुणीजनांचा सन्मान राखला पाहिजे. स्वराज्य सुसंस्कृत असले पाहिजे. राज्यकर्ता सुसंस्कृत असला की , हे आपोआपच घडत जाते. या बाबतीत परदेशी समकालीन इतिहासकारांनी आणि प्रवाशांनी लिहून ठेवलेल्या हकीकती वाचनीय आहेत.
शिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…
राजकारणात ओळखायची असतात शत्रूपक्षाकडील माणसांची मन. शत्रूपक्षाकडे खजिना किती आहे आणि युद्धसाहित्य किती आहे हे समजावून घेण्यापेक्षाही महत्त्वाचं असतं शत्रूपक्षाकडे माणसं कशी आहेत. औरंगजेब हा समजायला सर्वांत अवघड माणूस. अगदी खरं सांगायचं तर महाराज शिवाजीराजे यांना सुद्धा आग्रा प्रकरणात औरंगजेब समजला नव्हता असं म्हणावं लागेल ते फसले आणि औरंगजेबाच्याच कैदेत पडले. तेही त्याच्या घरी जाऊन. महाराजांना फसवणं ही केवढी अवघड गोष्ट होती. पण मिर्झाराजांच्या वचनामुळे महाराज फसले. खरं म्हणजे मरणच त्यांनी ओढावून घेतलं होतं. पण प्रतिभेची एक चाणक्यभरारी मारून महाराज सुखरूप सुटले. आग्य्राला जाण्यापूवीर् मोगलांना द्यावे लागलेले तेवीस किल्ले आता जणू महाराजांच्या ध्यानी , मनी , स्वप्नी विनवीत होते की , महाराज औरंगजेबाच्या मगरमिठीतून तुम्ही सुटलात , आता तुम्ही आम्हालाही सोडवा.
औरंगजेबाच्या ध्यानीमनी हेच किल्ले सतत आक्रोश करीत होते , सुटून परत मराठी स्वराज्यात जाण्याकरता. औरंगजेब आग्य्रात बसून दक्षता घेता होता. तूर्त तरी तह कायम राखण्याचं वचन महाराजांनी औरंगजेबाला दिल होतं. म्हणून समुद शांत होता. पण त्या शिवसागराच्या तळाशी असलेला ज्वालामुखी गडगडत होता. त्सुनामी लाटांसारखा. औरंगजेबांची सूक्ष्म हालचाल त्याच्या मनाच्या आतल्या कप्यात चालू होती. म्हणजे त्याचं असं झाले , सिंहगड किल्ल्यावरती यावेळी (१२ जून १६६५ पासून पुढची चारवर्ष) औरंगजेब दिल्ली-आग्य्राहून लक्ष ठेवीत होता. यावेळी औरंगजेबाचा किल्लेदार सिंहगडावर होता सर्फराजखान. त्याचीच सिंहगडावरती किल्लेदार म्हणून दिलेरखानाने आणि मिर्झाराजांनी नेमणूक केली होती.
दोन वर्षे (१६६६ ऑक्टोबरपर्यंत) तोच औरंगजेबचा झेेंडा सिंहगडावर सांभाळीत होता. पण अचानक १६६६ च्या नोव्हेंबरात औरंगजेबाने उदयभान राठोड याला तातडीने दिल्लीहून सिंहगडाकडे रवाना केले , किल्लेदार म्हणून का ? का – ते समजायला औरंगजेब समजावून घ्यायला लागेल. वास्तविक हा सर्फराजखान अतिशय शूर होता. कडवा , निष्ठावंत सरदार होता. अन् सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो मुसलमान होता. तरीही औरंगजेबाने त्याला काढून उदयभान राठोडला सिंहगडचा किल्लेदार नेमला. का ? सर्फराजखानापेक्षाही काही जास्त गुण उदयभान मध्ये होते ? होय. होते. तेच समजावून घ्यायचेत.
हा उदयभान राजपूत आहे याचं नाव उदयभानसिंह राठोड असे आहे. अजमेरपासून सुमारे २५ किमीवर भिनाय या नावाचं एक ठाणं आहे. तो या भिनायचा राहणारा त्याला दोन मुलगे होते. तरुण. बिशनसिंग आणि किशनसिंग. सारं घराणंच दिल्लीच्या तख्तापुढे इमानदारीनं कमरेइतकं वाकलेलं. उदयभान सिंहगडावर किल्लेदार म्हणून आला. या सिंहगडाच्या बरोबर दक्षिणेला अवघ्या २० किमीवर एक सिंह डोळे वटारून बसला होता. त्याचं नाव शिवाजीराजा. सिंहगड आणि राजांचा राजगड असे समोरासमोर जणू वाघसिंहासारखे शेपट्या आपटीत होते. म्हणजे उदयभानला सिंहगड किल्याचा किल्लेदार म्हणून बादशहांनी जबाबदारी आपल्यावरच का सोपविली याची पुरेपूर जाणीव झाली. आजही आपण सिंहगडावरच्या बालेकिल्यातील श्ाीकोंडणेश्वर महादेवाच्या देवळापाशी उभं राहून राजगडाकडे नजर टाकली तर असा भास होतो की , आपल्या शेजारी उदयभान किल्लेदाराच उभा आहे अन् तो सारखा टक लावून राजगडाकडे बघतो आहे.
कदाचित उदयभानचीही सिंहगडावरील नेमणूक पाहून असं आपल्या कल्पनेत चित्र तरळतं की , औरंगजेबाची लाडकी लेक झेबुन्निसा हीच बापाला विचारतीय , ‘ अब्बाजान आपण सर्फराजखानासारख्या नेकजात , बहाद्दूर सरदाराला काढून या उदयभान राजपूताची त्या जागेवर का नेमणूक करत आहोत ? हा सर्फराजाच्या रुस्तमीचा आणि वफादारीचा अपमान नाही का ? तो काय कमी आहे उदयभानापेक्षा ?’
अन् मग आपल्या अभ्यासातून दिसणारा औरंगजेबही तिला उत्तर देताना दिसू लागतो की , ‘ नहीं बेटा! सर्फराजखानाची बहादुरी कमी नाही. पण इस्लामच्या तख्यावर सर्फराजखानापेक्षा जास्त निष्ठा आहे. उदयभान राजपुताची. अगं , हे मोगली राज्य आपल्याला मिळालंय आणि टिकलंय या राजपुताच्यामुळेच. आणि पुढेही टिकणार असेल तरीही राजपुतांच्यामुळेच. तो भयंकर सीवा दिल्लीच्या या आलमगीरापुढे नजराणे घेऊन आला , तो कोणामुळे ? मिर्झाराजे जयसिंगामुळे आणि आमच्या हातावर मूठभर माती देऊन पसार झाला तो कोणामुळे ? तो आमच्याच एका फुलादखानामुळे दक्षिणेच्या इतिहासातही थोडं मागे पहा! याच सीवाचा बाप शहाजी भोसला आदिलशहाच्या कैदेत पडला तो कोणामुळे ? तो बाजी घोरपडे मुधोळकर यांच्यामुळे आणि सुटला तो विजापूरी सरदार फत्तेखान याच्या चुकीच्या युद्धपद्धतीमुळे. फत्तेखानाचा सीवाने साफ पराभव केला आणि शहाजी भोसला कैदेतून सुटला तर लक्षात ठेव बेटी , आम्हा आलमगीरांची राज्ये चालतात ती इथल्याच लोकांच्या इमानदारीवर आणि पराक्रमावर म्हणून आम्ही सिंहगडावर किल्लेदारी दिली आहे उदयभान राठोडला. सर्फराजला काढून
history of Shivaji Maharaj || शिवचरित्रमाला || part 4... |
शिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड
अशी आपली समजूत आहे की कोंढाण्याचे नांव सिंहगड असे ठेवले गेले ते तानाजी मालुसरे यांनी गड घेतला पण स्वत: तानाजी मारले गेले म्हणून. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की , शिवाजीराजांनी कोंढाणा गडाचे नांव सिंहगड असे ठेवले ते त्याही पूर्वीच. इ.स १६६४ च्या आधीपासूनच. म्हणून आपण त्याचा उल्लेख ‘ सिंहगड ‘ यांच नावाने करीत आहोत.
उदयभान राठोड हा सिंहगडावर किल्लेदार म्हणून दाखल झाला. त्याचा करडा , कठोर अंमल सुरू झाला. तो मुळचाच क्रूर किंवा संतापी स्वभावाचा असेल की नसेल हे माहीत नाही. पण सिंहगडाच्या राखणदारीची जोखीम शिरावर आल्यावर तो भयंकर कठोरपणे वागत राहिला यात शंका नाही. त्यातलीच ही एक हकिकत पहा.
सिंहगडाच्या उत्तर पायथ्याशी घनदाट झाडी होती.अतकरवाडी , थोपटवाडी , डोणजे , खानापूर इत्यादी लहान-लहान खेडी विखुरलेली आहेत. एके दिवशी हा उदयभान किल्लेदार गडाच्या उत्तर तटावरून कठोर नजरेने पाहणी करीत फिरत होता. त्याचेच मोगल पहारेकरी ठिकठिकाणी तटावर गस्त घालीत होते. उदयभानचे लक्ष तटावरून गडाच्या पायथ्याकडे गेले. तो टवकारून बहिरी ससाण्यासारखा पाहू लागला. अन् त्याचे लक्ष गेले एका कोणा मराठी खेडुताकडे. तो खेडूत घरच्या चुलीसाठी जळण म्हणून काट्याकुट्या गोळा करीत होता. तो कुणी मराठा सैनिक नव्हता. हत्यारबंद शिपाईही नव्हता. एक गरीब संसारी मराठा खेडूत. उदयभानचे लक्ष त्याच्यावर गेले. गडावरून तो ठिपक्याएवढा दिसला असेल. पण उदयभानने एकदम आपल्या पहारेकरी मोगल शिपायांना फर्मावले , ‘ पकडो ! गिरफ्ता करो! ‘
मोगली पहारेकरी गडावरून पुणे दरवाजाने गडाबाहेर धावले. त्यांनी पायथा गाठला. झाडी-झुडपात घुसून त्यांनी त्या मराठी खेडुताला पकडले. तो खेडुत व्याकुळतेने सांगत होता , की मी गनीम नाही. मी गरीब आहे. घरासाठी सरपण वेचतोय. पण त्याचं ऐकतो कोण ? मोगलांनी त्याला धरून गडावर चालविलेच. त्याला उदयभानापुढे आणले. काट्याचा नायटा करतात तो असा. तू हेरगिरीच करीत आहेस असा गहजब उदयभानाने चालू ठेवला. हा हा म्हणता ही हेरगिरीची खबर गडाच्या पायथ्याशी आणि सभोवार मराठी खेड्यापाडयांत पसरली. खरं म्हणजे तेवढ्याचसाठी हा खटाटोप उदयभानाने केला. काट्याचा नायटा केला. त्या गरीबाची चौकशी मांडली आणि शेवटी निकाल दिला , ‘ याचा गडावरून कडेलोट करा! ‘
त्याच्या आरोळ्या किंकाळ्या फुटल्या. साऱ्या मावळ मुलुखाचं काळीज भीतीनं दणाणल. उदयभानचा दरारा असा ढाण्यावाघासारखा गडाच्या घेऱ्यास पसरला.
सिंहगडाला तटावर पहारे होतेच. पण शिवाय गडाच्या चहुअंगास ठिकठिकाणी ‘ मेटे ‘ होती. मेटं म्हणजे त्या भागात सतत जागता पहारा ठेवणारी सैनिकांची चौकी. अशी एकूण आठ मेटे होती. या सर्व मेटांवरती एक मुख्य नाईक असायचा. त्याला म्हणायचे घेरेसरनाईक. याची जबाबदारी किल्लेदाराइतकीच मोठी समजली जायची. हे घेरेसरनाईकाचे मुख्य मेटं गडाच्या पश्चिमेच्या अंगास होते. आणि आजही तेथे मराठी वस्ती आहे.
अवघा गड कळकी , आवळी , बेहेडा , पिंपळ आणि कावीर्च्या घनदाटीत घेरला गेला होता. अशा या सिंहगडावर अंमल होता आलमगीराचा. वास्तविक गडावर असायचे स्वराज्याचे शिलेदार , थोपटे , डिमळे , मुजमले , पवार , मते , कोंडे , पायगुडे , पासलकर आणि किती घराण्यांची नावं सांगू ? ही सारी शिवाजीराजांची माणसं.
एखादी गोड आठवण औक्षात घडली तर अत्तराच्या फायासारखी आपण कानामनांत जपतो. त्याहून गोड घडली तर काळजाच्या कोंदणात जपतो. या गडाच्याच काळजात एक आठवण ताजी होती. ती म्हणजे मिर्झाराजा जयसिंह आणि दिलेरखान पठाण यांनी स्वारी केली तेव्हाची. या दोन मोंगल सेनापतींच्या हुकुमाने सर्फराजखान नावाच्या मोंगल सरदाराला सिंहगडास वेढा घालण्याचा हुकुम झाला. सर्फराजचा वेढा सिंहगडाला पडला. यावेळी पुरंदरालाही दिलेरखानाने वेढा घातला होता. झुंजी सुरू झाल्या होत्या. कोंढण्याचा वेढा आधाशी वाघाच्या भुकेनं रेड्यावर झडप पडावी तसा चालू होता. यावेळी प्रत्यक्ष जिजाऊ साहेब गडावर होत्या आणि त्यांच्या सांगाती शिवाजी महाराजांच्या एक राणीसाहेबही होत्या. म्हणजे या सासू् – सुना गडात असल्यामुळे गडावरच्या मावळ्यांना गेंड्यांच बळ आलं होतं. महाराजांच्या कोणत्या राणीसाहेब यावेळी इथे होत्या , त्यांचे नाव मात्र समजू शकलेले नाही. जिजाऊसाहेब स्वत: गडावरून मोगलांशी प्रत्यक्ष लढाई करत होत्या अशीही नोंद नाही. पण त्यांचे नसते अस्तित्वही गडावरच्या मावळ्यांना देवघरातल्या कुलदैवतासारखे जाणवत होते.
सर्फराजखानाचा हा वेढा सतत सव्वातीन महिने चालू होता. शेवटी ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात मिर्झाराजांना व दिलेरखानला हा गड द्यावा लागला. देणं भागच होतं. जिजाऊसाहेबांना गडावरच्या सर्वांनीशी झेंड्याडंक्यासह गडावरून उतरावे लागले. ही ती काट्यासारखी काळजात कुरूप करून बसलेली आठवण आऊसाहेबांच्या , महाराजांच्या अन् तानाजी मालुसऱ्यासकट अवघ्या मावळ्यांच्या मनात खुपत होती.गड होता उदयभान किल्लेदाराच्या कब्जात.
शिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर
आग्र्याहून सुटल्यानंतर महाराज नार्व्याच्या जंगलात विश्रांतीसाठी म्हणून , दक्षिण कोकणातील हणमंत्या घाटाजवळच्या मनोहर गडावर सुमारे महिनाभर राहिले. हा मुक्काम इतक्या आडवाटेवर आणि अवघड असलेल्या या गडावर करण्याचं कारण काय ? गोवा येथून थोड्या अंतरावरच होता. पोर्तुगीजांची गोव्याची सत्ता पूर्ण उखडून टाकून पूर्ण गोमंतक स्वराज्यात समाविष्ट करावा ही त्यांची इच्छा होती. पोर्तुगीज आणि सिद्दी वा इंग्रज वा मोगल हे सारे परकीय होते. उघडउघड शत्रू होते. आक्रमण करून त्यांनी या देशाचे लचके तोडले होते. या सर्वांची कायमची हकालपट्टी करावी हीच महाराजांची महत्त्वाकांक्षा होती. आमच्या देशाची , आमच्या हक्कांची संपूर्ण भूमी आमच्याच ताब्यात असली पाहिजे ही महाराजांची भूमिका होती. अन् त्यात वावगं काय होतं ? जगातही असाच न्याय आहे ना ? महाराजांनीही हीच महत्त्वाकांक्षा ठेवली होती. वेळोवेळी संधी साधून फिरंग्यांच्या ताब्यात असलेला बारदेश-गोवा जिंकून घेण्याकरिता त्यांनी आजपर्यंत प्रयत्न केेलेही होते. ते थोडेसे यशस्वीही झाले होते. पण फिरंग्यांना पूर्णपणे उखडून काढण्याची इच्छा अजून अपुरीच राहिली होती.
महाराज मनोहरगडावर मुक्कामास आहेत याची खबर गोव्याचा गव्हर्नर द विसेंदी याला समजली होती. औरंगजेबासारख्या कर्दनकाळाच्या दाढेतून हा मराठा राजा सुटलाच कसा याचा त्याला विलक्षण अचंबा वाटत होता. त्याने आपल्या बादशाहाला , लिस्बनला हा अचंबा पत्र लिहून व्यक्तही केला. वास्तविक विसेंतीची मनातून अपेक्षा अशीच होती की , हा शिवाजी आग्ऱ्याहून सुटूच नये. तो कैदेतच मरावा किंवा आलमगिराने त्याला मारावे. पण काय करणार ? राजा तर सुटला. आला. थोडा आजारीही पडला अन् त्यातून बरा होऊन हवापालट करण्यासाठी मनोहरगडावर येऊन राहिला आहे , आता त्याच शिवाजीला सुटकेबद्दल शुभेच्छा आणि सद्भावनेचा आहेर ( नजराणा) पाठविणे त्याला अगत्याचे वाटले. रामाजी कोठारी या नावाच्या आपल्या एका वकीलाबरोबर त्याने हे पत्र आणि नजराणा मनोहरगडाकडे रवानाही केला. परंतु या रामाजी वकीलाला मनोहरगडाचा अवघड रस्ता गवसलाच नाही. तो परत गेला.
महाराज लगेच मोगलांच्या विरुद्ध उठाव करणार नव्हते. स्वराज्याची सर्व व्यवस्था अधिक बळकट करून नंतर संधीची वाट पाहात महाराज काही काळ थांबणार होते. किती काळ ? योग्य संधी मिळेपर्यंत.! परंतु खूप दमल्यानंतरही हातपाय पसरून जांभया देत बसणं हे महाराजांच्या प्रकृतीतच नव्हतं. ते मनोहर गडावरून राजगडाकडे (बहुदा राजापूर , अणस्कुरा , विशाळगड , वासोटा , प्रतापगड या मार्गाने) परतले. त्यांच्या मनात घोळत होते गोमांतकाच्या पूर्ण मुक्ततेचे विचार.
या ठिकाणी एक गोष्ट सांगितलीच पाहिजे. ती म्हणजे , स्वराज्यातून पुरंदरच्या तहाने औरंगजेबाने जे २ 3 किल्ले आणि मुलुख कब्जात घेतले होते त्यातील कोणत्याही किल्ल्यावर वा ठाण्यावर बादशाहाने मराठी माणूस अधिकारी पदावर नेमलेला दिसत नाही. उलट असे म्हणावेसे वाटते की , महाराजांच्या आग्रा कैदेच्या कालखंडातसुद्धा कोणीही मराठी माणूस औरंगजेबाकडे चाकरीची भीक मागायला गेलेला दिसत नाही. इथे जाता जाता हेही लक्षात घ्यावं की पेशवाई बुडाल्याबरोबरच इंग्रजांच्याकडे मराठी कारकुनांच्या आणि चाकरमान्यांच्या रांगा नम्रतेने मान वाकवून उभ्या राहिल्या.
लोहगडावर राजा गोपाळदास गौड , माहुली गडावर राजा मनोहरदास गौड , सिंहगडावर उदयभान , पुरंदरावर शेख रझीउद्दीन अशी काही मोगली अधिकाऱ्यांची नावे सांगता येतात.
या बाबतीत असेही म्हणता येईल की , शिवाजीराजाकडून घेतलेल्या गडांवर आणि मुलुखांवर मराठी माणसे न नेमण्याची खबरदारी औरंगजेबाने घेतली. ते दूरदशीर्पणाचे श्रेय औरंगजेबास द्यावयास हरकत नाही.
आग्ऱ्यात अडकलेली सर्व माणसे अगदी परमानंद कवी , डबीर , कोरडे वकील आणि शेवट पलंगावर झोपलेला हिरोजी फर्जंदसुद्धा स्वराज्यात सुखरूप परत पावले. हे आग्रा प्रकरण म्हणजे स्वराज्य उभारणीच्या मार्गावर निर्माण झालेले केवढे भयानक संकट होते. या काळात अडकलेली माणसे सुटून आली. पण स्वराज्याच्या नित्यनैमित्तिक कामात अडकलेली माणसं जिजाऊसाहेबांच्या नेतृत्त्वाखाली अधिक कणखररितीने कामात अडकली.
महाराजांनी आपली नजर राजगडावरून पोर्तुगीजांच्या सरहद्दीवरती वळविली. त्यांच्या मनात एक अफलातून राजकारण आकार घेत होतं. या फिरंग्यांना उखडून काढण्यासाठी एक विलक्षण उत्तपटांग डाव महाराजांच्या मनात आला. महाराज मोठी फौज घेऊन ( कदाचित दहा हजार असावी) कुडाळवर आले आणि त्यांनी थेट सप्तकोटीश्वराचे नावेर् गाव गाठले. म्हणजे महाराज जुन्या गोव्यापासून अवघ्या 3 ० कि. मी.वर येऊन पोहोचले. गव्हर्नर विसेंतीची छातीच दडपली. पण भयाने नाही , तर जबाबदारीने. कारण हा भयंकर शत्रू अलेक्झांडरसारखा , ज्युलियस सीझरसारखा समोरच ठेपला होता.
महाराजांनी एकदम जुन्या गोव्यावर किंवा सेंट एस्टोवा किल्ल्यावर झडप न टाकता ते नार्व्याच्या जंगलात फक्त तळ ठोकून बसले. पण नुस्तं बसणं हा हेतू नव्हता. त्यांनी एका बाजूने सप्तकोटीश्वराची पूजाअर्चा चालू केली आणि संधी साधून आपल्या फौजेतील लोक वेगवेगळ्या संख्येनं आणि वेषांनी गोव्याच्या मुलुखांत घुसवावयास सुरुवात केली. घुसखोरी!
याच वेळी सागरी मार्गाने आणि देशावरच्या भीमगड किल्ल्याच्या मार्गाने , तसेच सरळसरळ कुडाळ ओरसच्या मार्गानेही मराठी कुमक गोळा करीत करीत गोव्याच्या गव्हर्नरचा गळा आवळण्याचा महाराजांचा हा अफलातून डाव होता. मग काय झालं ?
यावेळी गोव्याचा फिरंगी गव्हर्नर आजारी होता. तबियत सुधारत नव्हती. तरीही तो दक्ष होता. इ. स. १६६७ ऑक्टोबर.
शिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त
गोमांतकात ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत कदंब घराण्याचे राज्य होते. अनक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी , त्यातून खळाळणाऱ्या नद्या , लगतच्या सह्यादीवरून कोसळणारे धबधबे आणि अशा या नंदनवनाहुनही सुंदर असलेल्या गोमांतकावर राज्य करणारे कदंबराजे हे सुसंस्कृत , कलाप्रिय आणि तेवढेच शूर होते. थोडेसे का होईना पण त्यांचे आरमारही होते.
या कदंब घराण्याची जी राजदैवते होती , त्यात दिवाडी येथे सप्तकोटीश्वर शंकराचेही मंदिर भव्य आणि अतिसुंदर होते. कदंब राजे स्वत:ला ‘ गोपकपट्टणाधिपति सप्तकोटीश्वर लब्ध वरप्रसाद ‘ अशी पदवी अत्यंत अभिमानाने मिरवीत असत. पुढे कदंबांची राजवट यादवांनी बुडविली. आणि नंतर यादवांची राजवट सुलतानांनी बुडविली. आधी विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यात गोवा गेला. त्यांच्याकडून वास्को-द-गामा या पोर्तुगीज दर्यावदीर् सरदाराने दि. १५ फेबुवारी १५१० या दिवशी गोवा जिंकून घेतले. तेव्हापासून पोर्तुगीज सत्ता ही गोव्यात मूळ धरून बसली. या पोर्तुगीजांना धर्मवेड लागलेलं होतं. स्वधर्माचा म्हणजेच ख्रिश्चॅनिटीचा प्रचार करण्याचा त्यांना क्रूर छंद जडला होता. सत्ता स्थिरावल्यावर त्यांनी इ. १५६५ या वषीर् योजनापूर्वक गोमांतकातील साडेसहाशे मंदिरे फोडली. असंख्य लोक सक्तीने बाटविले. अनेकांनी आपापल्या देवमूतीर् मोठ्या धाडसाने लपतछपत पळविल्या आणि सध्याच्या फोंडेमहालात ठिकठिकाणी त्या स्थापिल्या. ज्येस्युईट ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदूंचा भयंकर धर्मछळ मांडला. यावर डॉ. ए. के. प्रिओळकर यांचा अभ्यासपूर्ण असा ग्रंथ आहे. गोवा इन्क्वीझिशन. या छळवादाला गोमांतकीय लोक थरथरा कापीत असत. हा छळवाद जेथे चाले त्याला म्हणत व्होडलेघर. म्हणजे यमाचे घर.
इ. स. १५६५ च्या या ज्येस्युईट कल्लोळात दिवाडीला असलेला हा सप्तकोटीश्वरही सापडला. फिरंग्यांनी सप्तकोटीश्वराचे मंदिर पाडून टाकले आणि या देवाची जास्तीत जास्त अवहेलना करण्याकरिता वा या देवात देव नाही हे दाखवून देण्याकरिता ते शिवलिंग शेताच्या बांधावर नेऊन ठेवले. त्यात हेतू असा की , जाणाऱ्या येणाऱ्यांचेही पाय त्या देवाला लागावेत. ही परिस्थिती इ. १६०५ पर्यंत या देवाची होती. ती १६०५ मध्ये साकळीच्या सूर्यराव देसाई यांच्या प्रयत्नाने थोडी पालटली आणि त्यावेळच्या गोव्याच्या गव्हर्नरने देसायांना नावेर् येथे जांभ्याच्या खडकांत लहानश्या कोनाड्यात हा देव नेऊन ठेवावयास परवानगी दिली.
खडकांत कोनाडा कोरून सप्तकोटीश्वराची स्थापना देवाच्या भक्तमहाजनांनी आणि देसाई यांनी केली. ती जागा आणि तो कोनाडा आजही अस्तित्त्वात आहे. या कोनाड्यासमोरच नारळीच्या झावळ्यांचा मांडव घालून देवाची अर्चना करण्याची रीत सुरू झाली. प्राचीन भव्य मंदिर गेले. उरले ते झोपडीसारखे देऊळ किंवा देवळासारखी झोपडी.
शिवाजीराजे नार्व्यास आले आणि त्यांनी आपला तळ या मंदिरानजिकच जंगलात ठोकला. ते स्वत:ही नित्यनैमित्तिक श्रींची अर्चना करीत होते. एकेदिवशी महाराज श्रींसमोर पुजेसाठी बसले. स्थानिक पुजारी पूजेचे मंत्र सांगत होता. एवढ्यात वाऱ्याची जरा मोठी फुंकर देवापुढच्या झावळ्यांच्या मांडवावर पडली.
त्यातील एक झावळी सटकन निखळली आणि पूजा करीत असलेल्या शिवाजीराजांच्या अंगावर पडली. बाकी झाले काहीच नाही पण देवाच्या अंगावरचे फूल सहज ओंजळीत पडावे तशी ही मांडवावरची झावळी राजांच्या अंगावर पडली. तेव्हा तो पुजारी राजांस म्हणाला , ‘ महाराज श्री सप्तकोटीश्वराने आपणांस प्रसाद दिला आणि आज्ञाही दिली की , आपण येथे श्रीचे मोठं कायमस्वरूपी मंदिर बांधावे. ‘
महाराजांच्या मनात सप्तकोटीश्वराचे मंदिर बांधण्याचे विचार घोळतही असतील इतकंच काय , पण अवघे गोमांतक भूमी स्वतंत्र करून सुंदर करावी हाही विचार त्यांच्या मनात होताच की! पण महाराजांनी पुजाऱ्याचा अन्वयार्थ आनंदाने मनावर घेतला आणि खरोखरच नजिकच जमीन साफ करून मंदिर बांधावयास राजांनी प्रारंभही केला.
क्षण उलटत होते. दिवस पालटत होते. राजांचे सैनिक रात्री अपरात्री चोरट्या पावलांनी आणि झाकल्या रूपांनी गोव्याच्या फिरंगी अमलात प्रवेश करीत होते. राजांनी मांडलेलं हे रणांगण खरोखर अत्यंत कल्पक आणि बिनतोड होतं. ते थोडक्यात असं , नार्व्याच्या उत्तरेकडून म्हणज्ेाच सिंधुदुर्ग , कुडाळ या दिशेने मराठी सैन्य पुढे सरकावे.
ऐन समुदातून दर्यासारंग , मायनाक व्यंटाजी भाटकर आदि आरमारी मराठ्यांनी संकेताच्या दिवशी समुदमार्गाने आगवादच्या किल्ल्यावर आणि जुन्या गोव्यावर आरमारी हल्ला चढवावा. सप्तकोटीश्वराच्या पश्चिमेस असलेल्या सह्यादीच्या माथ्यावरील भीमगड किल्ल्यावरूनही मराठी सैन्य असेच गोमांतकात उतरावे आणि प्रत्यक्षात स्वत:पाशी असलेल्या सैन्यानिशी महाराजांनी गोमांतकावर झेप घ्यावी. हे एकाच वेळी अचानक व्हावे. असा हा व्यूह महाराजांच्या मनात तरळत होता. पावले पडत होती.
पण घात झाला. आत घुसलेल्या मराठी सैनिकांचा पोर्तुगीज गव्हर्नराने अचूक वेध घेतला आणि एकेदिवशी त्याने हे सारे सैनिक , निदान सापडले तेवढे सैनिक कैद केले. आपला डाव फिरंग्याने अचूक ओळखून उघडा पाडल्याच्या खबरा महाराजांस नावेर् येथे समजल्या. त्यांना अतिशय राग आला आणि आपल्या लोकांच्यानिशी आणि व्यूहात ठरविलेल्या भोवतालच्या मराठी सैन्यानिशी गोव्यावर हल्ला करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पण गव्हर्नरने आपल्या सर्व ठाण्यांची आणि किल्ल्यांची युद्धाच्या दृष्टीने जय्यत तयारी केली होती. किंबहुना ती करूनच नंतर त्याने घुसखोर मराठ्यांना पकडण्यासाठी जाळे टाकले होते.
महाराजांनाही हल्ला करता आलाच असता. परंतु एकदम छापा घालून गोवा जिंकण्याची करामत त्यात साधता आली नसती. चिवट फिरंग्यांशी दीर्घकाळ युद्ध चालू ठेवावे लागले असते. महाराजांनी खेदाने पण विचारपूर्वक निर्णय घेतला की , फिरंग्यांशी बिघाड करो नये. थांबावे.
तसा प्रत्यक्ष युद्धास आधी प्रारंभ झालेला नव्हताच. महाराज थांबले. फिरंग्यांनीही महाराजांवर आपण होऊन हल्ला न चढविता फक्त संरक्षणात्मक भूमिका घेतली. त्यामुळे युद्धप्रसंग घडलाच नाही. महाराजांनी फिरंग्यांशी मैत्रीचा तह केला. गोमांतकाच्या पूर्ण मुक्तीचा मुहूर्त दुदैर्वाने पुढे गेला. महाराज नार्व्याहून परतले. मंदिर मात्र बांधून पूर्ण झाले. मंदिरावरती महाराजांच्या नावाचा शिलालेख कोरला गेला.
होय. गोमांतकाच्या मुक्तीचा क्षण साधला गेला नाही. पण महाराजांच्या मनाचे संपूर्ण देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे भव्य स्वप्न इतिहासात नोंदविले गेले.
शिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत
सुमारे चार वर्षे मालवण किनाऱ्याजवळच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग या पाणकोटाचे बांधकाम चालू होते. महाराजांच्या इमारत खात्यावरील अधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग तालेवारीने बांधून पूर्ण केला. किल्ल्यात आवश्यक त्या सर्व इमारती बांधून काढण्यात आल्या. सदर , धान्याची आणि बारुदगोळ्याची कोठारं , सैनिकांच्या करिता राहाण्याच्या अलंगा , श्रीभवानी आणि अन्य देवतांची मंदिरे , सरकारवाडा इत्यादी बांधकामे पूर्ण झाली. समुदात जणू नवीन शिवलंकानगरी थाटली गेली. किल्ल्याची वास्तुशांत महाराजांनी साजरी केली. त्यावेळी त्यांनी किल्ल्यास नाव दिले ‘ सिंधुदुर्ग ‘.
या वास्तुशांतीस म्हातारे , जानभट , अभ्यंकर उपस्थित नसावेत असे त्यांच्या अनुल्लेखावरून वाटते. पण त्यांचे भाचे दादंभट बिन पिलंभट उपाध्ये हे मात्र होते. पौरोहित्य त्यांनीच केले. समारंभ छान झाला. सर्व र्कत्यासर्वत्या कामगारांची महाराजांनी कौतुके केली. सुरतेहून आणलेली संपत्ती अशी सार्थकी लावली.
ते समयी महाराज दादंभट उपाध्ये यांस म्हणाले की , ‘ तुम्ही आता येथून पुढे कायमचेच किल्ल्यात राहाल काय ? देवदेवस्थानांची आणि किल्ल्यातील नित्यनैमित्तिक धामिर्क सणसमारंभांची सर्व व्यवस्था तुम्हीच पाहाल काय ‘ हे दादंभट उपाध्ये संसारी होते. तरुण होते. किल्ल्यात पूजेअचेर्साठी आणि अन्य धामिर्क उपचारांसाठी कायमचे राहायचे तर गोष्ट आनंदाचीच होती. पण कायमची बांधिलकी वाट्यास येणार होती.
किल्ल्यातल्या लष्करी अधिकाऱ्यांसारखीच ही धामिर्क जबाबदारी महाराज दादंभटास सुचवीत होते. किती तासांनी किंवा दिवसांनी दादंभटाने महाराजांना आपली इच्छा होकाराथीर्च कळविली याची नोंद नाही. पण असे वाटते , की त्याच दिवशी त्यांनी महाराजांची इच्छा आणि गडाची सेवा स्वीकारीत असल्याचे निवेदन केले असावे असा अंदाज आहे.
बहुदा दादंभटाने आपल्या पत्नीचा विचार घेतला असावा. घेतला की नाही कोण जाणे! पण दादंभटाने हे काम स्वीकारले. त्यांच्यावर सिंधुदुर्गासाठी युद्ध करण्याची संरक्षणात्मक जबाबदारी कधीच पडणार नव्हती. पण किल्ल्यातील सैनिकांचे मनोबल आणि धामिर्क बाबतीतील पावित्र्य पूर्ण उत्साहाने टिकविण्याची जबाबदारी निश्चित अंगी पडणार होती. सिंधुदुर्गावर किल्लेदार , महालदार , सर्व लष्करी कारखानदार , पहारेकरी , गस्तवाले आरमारी आणि पूजाअर्चा करणारे गुरुजी आपापल्या कामांत रंगून गेले. १८ टोपीकर फिरंग्यांच्या , श्यामल सिद्द्यांच्या आणि इदलशाही गनिमांच्या उरावरी सिंधुदुर्गाचे जबरदस्त बलवान आरमारी ठाणे महाराजांनी उभे केले.
सहज जाताजाता उल्लेख करावासा वाटतो की , हा सिंधुदुर्ग किल्ला अगदी अखेरपर्यंत कधीही शत्रूच्या कब्जात गेला नाही. अगदी इंग्रजी राज्य आल्यावरही सिंधुदुर्गावरती मालकी राहिली ती कोल्हापूरच्या छत्रपती महाराजांकडेच मराठी मनाला अभिमान वाटावा आणि त्याची छाती शीडासारखी फुगावी असाच हा सिंधुदुर्ग आहे.
पुढे घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करावयाचा आहे. इ. १६८० नंतर रायगडावर राज्याभिषिक्त झाले. संभाजी महाराज छत्रपती सतत नऊ वषेर् मोगलांशी झुंज देत देत त्यांनी स्वराज्य ताठ मानेने युद्धमान ठेवले. सिंधुदुर्गही तसाच बुलंद होता. पुढे दुदैर्वाने शंभूछत्रपती महाराज आलमगीर हाती गवसले गेले आणि त्याने छत्रपतींना ठारही केले. धाकटे राजारामराजे छत्रपती होऊन राज्य राखू लागले. अन् याच (इ. १६९१ ते ९८ ) काळात या सिंधुदुर्गावर सागरी मार्गाने औरंगजेबाने स्वारी पाठविली. म्हणजे आता सिंधुदुर्ग काबीज करण्यासाठी मोगली आरमार येणार होते. ते उत्तरेकडून येऊ लागले. सिंधुदुर्गाला खबरा आल्या.
किल्ल्यास तांब्रांचा परीघ पडणार हे निश्चित झाले. ते समयी किल्ल्यातील किल्लेदार मोहिते याने युद्धाची बईजवार तयारी केली. धान्य , दारुगोळा , आणि जरूर त्या युद्धसाहित्याचा साठा सिंधुदुर्गात भरला जाऊ लागला. मोगली हल्ला केव्हाही येवो , आम्ही आगरी , कोळी , भंडारी अन् अठरापगड कोकणी माणसं महाराजांची माणसं आहोत अशा अभिमानाने अवघा सिंधुदुर्ग मोगली सुसरी मगरींची वाटच पाहू लागला. त्यावेळी किल्लेदार मोहिते याच्या मनी एक कोवळा विचार आला की , एकदा गडास मोगलाई वेढा पडला म्हणजे तो किती दिवस चालेल हे काय सांगता येतंय ?
कदाचित वर्षामागून वर्षसुद्धा. म्हणून किल्लेदाराने दादंभट गुुरुजींस पुसलं की , गुरुजी मोगल येतात. झंुज लागणार. गनिमांचा आरमारी गराडा पडणार. आम्ही तर सिपाईच हो. आम्ही झुंजूच. पण तुमचे कैसे होईल ? एकदा गराडा पडला की मग बाहेर जाणे कठीण. तरी तुम्हांस आम्ही आत्ताच सुखरूप मालवणांस किंवा कडवाडांससुद्धा बायकामुलांनिशी पोहोचते करतो. काळजी करू नका. तरी विचार सांगावा. ‘ यांवर दादंभटाने ‘ किल्ल्यातील काम ‘ आम्हांवर सोपविले तेच कोणत्याही परिस्थितीत करीत राहण्याचा आपला विचार किल्लेदारास सांगितला.
मोगली आरमार आले. बारुदगोळा लोहाराच्या ठिणग्यासारखा चौफेर उडू लागला. गडाचं अवसान मोठं. गड किंचितही वाकेना. पण दिवसांमागून , महिन्यांमागून , वर्षही उलटलं. तरीही सिंधुुदुर्ग झुंजतच राहिला. किल्ला वाकला नाही. किल्ल्यातील अन्नधान्यही कमी होऊ लागले. तरीही किल्ला वाकला नाही.
पुढे तर किल्ल्यात पटकीची साथ उद्भवली. तरीही किल्ला वाकला नाही. किल्लेदारापासून ते रोज पूजाअर्चा करणारे लंगड्या दादंभटापर्यंत अवघा सिंधुदुर्ग दर्याभवानीच्या बळानं झुंजत राहिला. अखेर मोगल हरले. सिंधुदुर्ग बुलंद राहिला. बाका राहिला.
केवढं विलक्षण कथानक या सिंधुदुर्गाच्या भिंतीआड घडलं आहे. सिंधुदुर्गाच्या भिंती आणि दरवाजा वाट पाहतोय. एखाद्या मराठी प्रतिभावंत चित्रपट निर्मात्याची.
शिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ
स्वराज्याला प्रारंभ केल्यापासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत: राजगडावरच होते. राजगड हाच स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला करावा असे त्यांच्या मनात होते , म्हणूनच राजगडाचा वापर राजधानी सारखाच सुरू झाला. (इ. १६४६ पासून) त्या वेळेपासूनच राजगडाच्या तीनही माची आणि बालेकिल्ला बांधकामाने सजू लागल्या. सुवेळा , संजीवनी आणि पद्मावती अशी या तीन माचींची नावे. एवढी उत्कृष्ट बांधकामे महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच किल्ल्यावर सापडणार नाहीत. राजगड केवळ अजिंक्य होता.
वास्तविक स्वराज्याचे राज्यकारभारातील वेगवेगळे भाग सपाट प्रदेशावरती असणे हे राजाच्या प्रजेच्या आणि राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने जेवढे सपाटीच्या शहरात सोईचे होतात , तेवढे उंचउंच डोंगरमाथ्यावर होऊ शकत नाहीत. पण असे शहरात सपाटीवर राजधानी करणे क्रांतीच्या प्रारंभ काळात धोक्याचेही असते. शत्रू केव्हा झडप घालील आणि ऐन राजधानीलाच कधी धोका पोहोचेल याचा नेम नसतो. म्हणून उंच शिखरावर तटबंदीने अजिंक्य बनविलेल्या किल्ल्यावर राजधानी असणे गरजेचेच असते. राजगडचे बांधकाम सुमारे १० वषेर्ं चालले होते. जगातील उत्कृष्ट अशा डोंगरी लष्करी किल्ल्यात राजगडाचा समावेश करावा लागेल.
इ. स. १६४६ पासून ते आग्ऱ्याहून सुटकेपर्यंत स्वराज्याची राजधानी राजगड होती. अद्यापीही होतीच की , पण मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी आली तेव्हा महाराजांच्या प्रत्ययास एक गोष्ट आली की , मोगलांचे लष्कर राजगडाच्या पायथ्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे.
रायकरण सिसोदिया , दाऊतखान कुरेशी , सर्फराजखान इत्यादी मोगली सरदार राजगडाच्या उत्तरेस असलेल्या मावळात , म्हणजेच गुंजण मावळ आणि कानद मावळ या भागांत विध्वंसन करण्यासाठी मुसंड्या मारताहेत. या मोगली सरदारांनी प्रत्यक्ष राजगडावर हल्ले चढविले नाहीत. मोचेर् लावले नाहीत किंवा वेढा घालून बसण्याचेही प्रयत्न केले नाहीत. तशी एकही नोंद सापडत नाही. तरीही मोगली शत्रू राजधानीच्या पायथ्यापर्यंत येऊन जातो ही गोष्टही फार गंभीर होती. म्हणून महाराजांनी राजधानीचे ठिकाणच बदलावयाचा विचार सुरू केला.
नवी राजधानी कुठे करायची म्हटले , तरी ती डोंगरी किल्ल्यावरच करावी लागणार हे उघड होतं. जेव्हा कधी पुढे स्वराज्याचा सपाट प्रदेशावरतीही विस्तार होईल , तेव्हा एखाद्या शहरांत राजधानी करणे थोडे सोईचे ठरेल. पण जोपर्यंत उत्तर , पूर्व आणि दक्षिण या बाजूंना बादशाही अंमल अगदी लागून आहे , तोपर्यंत डोंगरातून बाहेर येणे आणि राजधानी स्थापणे हे धाडसाचे आणि लष्करी जबाबदारी वाढविणारे ठरेल.
म्हणून महाराजांनी राजधानीचा विचार नवीन केला. त्यांचे लक्ष रायगडावरच खिळले. कोकणच्या बाजूने समुदापर्यंत मराठी स्वराज्याचा विस्तार झालेला होता. रायगड उंच पर्वतावर असूनही विस्ताराने प्रचंड आणि संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अजिंक्य होता.
आणि महाराजांनी ‘ राजधानी ‘ करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे सुरू केली. त्यांनी रायगड राजधानी केली. यात त्यांची युद्धनेता या दृष्टीने अधिकच ओळख चांगल्याप्रकारे इतिहासाला होते.
रायगड सर्व बाजूंनी सह्यशिखरांनी गराडलेला आहे. एका इंग्रजाने या रायगडावर असा अभिप्राय व्यक्त केला आहे की , ‘ रायगडसारखा अजिंक्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही. ‘ दुसऱ्या एका इंग्रजाने रायगडाला ‘ त्नद्बड्ढह्मड्डद्यह्लश्ाह्म श्ाद्घ ह्लद्धद्ग श्वड्डह्यह्ल ‘ असे म्हटले आहे. हेन्री ऑक्झिंडेन , ऑस्टीन , युस्टीक इत्यादी अनेक पाश्चात्य मंडळींनीही रायगडचा डोंगरी दरारा आपापल्या शब्दांत लिहून ठेवला आहे.
हिराजी इंदुलकर या नावाचाही एक उत्कृष्ट दुर्गवास्तुतज्ज्ञ महाराजांच्या हाताशी होता. महाराजांनी याच हिराजीला राजधानीच्या रुपाने रायगडची बांधकामे सांगितली. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता रायगडाच्या म्हणजेच राजधानीच्या बेलाग सुरक्षिततेचा. त्या दृष्टीने रायगड सजू लागला. रायगड किती बलाढ्य आहे , हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरे लक्षात येते.
हळूहळू एकेक राज्यकारभाराचा विभाग राजगडावरून रायगडावर दाखल होऊ लागला. पुढे इ. १६७४ मध्ये महाराज प्रत्यक्ष ‘ सिंहासनादिश्वर छत्रपति ‘ झाले ते याच रायगडावर. त्यावेळी हिराजी इंदुलकरानी जी काही बांधकामे गडावर केली , त्याची नोंद एका शिलालेखात कोरली. हा शिलालेख आजही रायगडावर श्रीजगदीश्वर मंदिराच्या बाहेर आहे. तेथेच देवळाच्या पायरीवर त्याने पुढील शब्द कोरले आहेत.
‘ सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर ‘
रायगडावर चढून जाण्याची वाट अरुंद आणि डोंगरकड्याच्या कडेकडेने वर जाते. त्यामुळे चढणाऱ्याला धडकीच भरते. वर चढत असताना डावीकडे खोल खोल दऱ्या आणि उजवीकडे सरळसरळ कडा. असे हे बांधकाम गडाच्या माथ्यापर्यंत करताना केवढे कष्ट पडले असतील , याची कल्पनाही नेमकी येत नाही.
अशा उंच गडावर चिरेंबदी दरवाजे , बुरुज , चोरवाटा आणि संरक्षक मोचेर् पाहिले की , हिराजीने भीमाच्या खांद्यावर जणू चक्रव्यूहच रचला असे वाटते. त्याने एक सुंदर वास्तू , एक बलाढ्य लष्करी वास्तू आणि तेवढीच मोलाची कला , संस्कृती , विविध शास्त्रे यांची ‘ रायगड ‘ ही सरस्वती नगरीही उभी केली. हिराजी इंदुलकर हा निष्णात लष्करी वास्तुतज्ज्ञ होता स्वत: महाराज.
history of Shivaji Maharaj || शिवचरित्रमाला || part 4... |
शिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी
याच काळात (इ.स. १६६९ ) महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्दीकडे नजर टाकली. खरं म्हणजे त्यांची क्रुद्ध नजर सिद्दीवर प्रारंभापासूनच वटारलेली होती. हे जंजिऱ्याचे सिद्दी म्हणजे मूळचे आफ्रिकेतील अॅबिसेनियन. यांनाच हबशी म्हणत. वास्तविक हे भारतात आले नाहीत. गुलाम म्हणून व्यापारी लोकांनी त्यांना आणले. गुलामांचा व्यापार हा त्याकाळी सगळीकडेच तेजीत होता. या हबशी गुलामांची शरीरप्रकृती लोखंडासारखी भक्कम होती. त्यांचा रंग काळाभोर होता. महाराज आणि मराठी माणसं या हबश्यांना श्यामल म्हणत. हे सिद्दी केवळ गुलामगिरी करीत जगले नाहीत , तर युद्धातही जबर पराक्रम गाजविण्याची आपली शक्ती आणि कुशलता त्यांनी दाखवून दिली. दक्षिणेतल्या बहामनी , आदिलशाही कुतुबशाही , निजामशाही आणि दिल्लीच्या मोगलशाही सुलतानांच्या पदरी या हबश्यांनी लष्करात कामगिऱ्या करून दाखविल्या.
अहमदनगरच्या निजामशाही राज्यात एक जबरदस्त सिद्दी व्यादाचा फजीर् झालेला आपल्याला ठाऊक आहे. तो म्हणजे मलिक अंबर सिद्दी. हा प्रारंभी असाच गुलाम पोरगा होता. पण आपल्या कर्तृत्त्वाने तो निजामशाहीचा केवळ वजीरच नव्हे , केवळ सेनापतीच नव्हे , केवळ राज्यकारभारी प्रशासकही नव्हे तर नगरचा सवेर्सर्वा ठरला. महाराष्ट्राचा गनिमी कावा पुन्हा एकदा उजळून काढला तो या मलिकने. दिल्ली सल्तनतीला म्हणजेच जहागीरच्या फौजांना जबर तडाखे देऊन निजामशाही टिकविणारा हा मलिक अंबर गनिमी काव्याचा प्राचार्य वाटतो. शहाजीराजे भोसले हे एक उत्कृष्ट सेनापती म्हणून ( इ. १६१० पासून पुढे) गाजू लागले , ते याच मलिक अंबरच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्रातून तरबेज होऊनच. भातवडीची लढाई (इ. १६२४ ऑक्टोबर) शहाजी राजांनी शर्थ करून जिंकली. जहांगिरी आणि आदिलशाही यांच्या प्रचंड जोडफौजेचा एकाच युद्धात शहाजीराजांनी फडशा उडविला. यावेळी रणांगणावर मलिक अंबरने स्वत: भाग घेतला नव्हता. सर्व जोखीम त्याने शहाजीराजांवर टाकली होती. प्रचंड जय मिळाला. कोणाला ? खरं म्हणजे शहाजीराजांना. मराठ्यांना. पण श्रेय मिळाले मलिक अंबरला. मिळेना का! तो वजीरच होता ना. पण शहाजीराजे , म्हणजेच एक मराठा , एवढ्या झपाट्याने अस्मानात झळाळू लागल्याचे सहन होईना याच मलिक अंबरला. भोसल्यांचा मत्सर करू लागला. निजामशाहीतील आपल्याच हाताखालील मराठी सरदारांत भेद पाडू लागला.
पुढे या साऱ्या सुलतानी आणि हबशी राजकारणातून अचूक बोध घेतला , उगवत्या शिवाजीराजांनी! अगदी इ.स. १६४७ पासून महाराजांनी आपली पावलं अगदी अचूक टाकली ती आधीच्या इतिहासातून बोध घेऊन. एक निष्कर्ष महाराजांचा नक्कीच होता की , हे सिद्दी बेभरवशाचे आहेत.
मुरुडच्या सागरी किनाऱ्याजवळ बेटावर असलेला जंजिरा अशाच सिद्दी हबश्यांच्या पूर्ण स्वतंत्र सत्तेखाली होता. हे हबशी कामापुरते स्वत:ला निजामशाहीचे किंवा जरूर तेव्हा दिल्ली बादशहाचेही सेवक म्हणवून घेत. पण जंजिऱ्याच्या सिद्दींची प्रवृत्ती पूर्णपणे सार्वभौम महत्त्वाकांक्षेची होती. एका बेटावरती असलेलं तळहाताएवढं हे हबशी राज्य विलक्षण चिकाटीने आणि क्रूर जरबेने त्यांनी सांभाळलं होतं. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या किनारी भूमीवर आपल्या हबशी राज्याचा अंमल बसविण्याचा , म्हणजेच उगवत्या हिंदवी स्वराज्याला कोकणात कडवा विरोध सतत करण्याचा सिद्दीचा अखंड उद्योग चालू होता.
महाराज या ‘ श्यामला ‘ च्या दंगेखोरीमुळे कायमचे अस्वस्थ झालेले होते.
‘ हा जंजिऱ्याचा सिद्दी म्हणजे आमच्या (मराठी) दौलतीस लागलेला पाण्यातील उंदीर आहे ‘ असे ते म्हणत.
अगदी इ.स. १६५७ पासून सतत पुढे या हबश्यांच्या विरुद्ध महाराज लढाया करीत राहिले. पण आपल्या जंजिरा किल्ल्याच्या आणि आरमाराच्या बळावर सिद्दी कायमचाच झुंजत राहिला. बेटावरील हा किल्ला बळकट आहे. याचे बळ केवळ तटाबुरुजांच्या बलाढ्य बांधणीत नाही ; तर ते भोवती पसरलेल्या अथांग समुदामुळे आहे , हे महाराजांच्या केव्हाच लक्षात आलेले होते. पण हा पाण्यात डुंबत असलेला पाणकोट जंजिरा जिंकणे हे खरोखर जिकीरीचे काम होते. स्पेन , फ्रान्स किंवा अन्यही युरोपियन राष्ट्रांना अगदी थेट नेपोलियनपर्यंत जसे ब्रिटिश बेटांचे विरुद्ध विजय मिळविता आले नाहीत , अगदी तसेच या मुरुड जंजिऱ्याच्या बेटांविरुद्ध महाराजांना आणि पुढे शंभू छत्रपतींनाही यश मिळू शकले नाही.
केवळ समुद हीच या मुरुड जंजिऱ्याची ताकद होती काय ? त्याहीपेक्षा जबरदस्त ताकद या मुरुड जंजिऱ्यात असलेल्या हबशी लोकांच्या अतूट ऐक्यात होती. हे त्यांचे आपसातील ऐक्य आणि आपल्या नेत्यावरील त्यांची निष्ठा एवढी जबरदस्त होती की , या किल्ल्यात मराठ्यांचा कधीही चंचूप्रवेशही होऊ शकला नाही.
पुढच्याच काळातील एक गोष्ट सांगता येईल. इ.स. १७ 3 ७ मध्ये चिमाजीअप्पा पेशवे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांची जंजिऱ्याविरुद्ध मोहिम सुरू झाली. उरण येथे फार मोठी लढाई झाली. त्यात मराठ्यांनी जंजिऱ्याचा मुख्य नेता (सुलतान म्हटले तरी चालेल) सिद्दी सात याला युद्धात ठार मारले. नेता पडला. पण पाण्यातला जंजिरा तसाच झुंजत राहिला. हे एकीचे , शिस्तीचे आणि अनुशासनाचे बळ आहे.
महाराज जंजिऱ्यावरील मोहीम आताही मांडीत होते. (इ. १६६९ ) जंजिऱ्याचे तीन सिद्दी एकवटून प्रतिकारास उभे होते. सिद्दी कासम , सिद्दी खैरत आणि सिद्दी संबूळ ही त्यांची नावे.
Tags
Share to other apps
Copy
Post link