दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून
माझी आजी
स्वयंपाकघरातून माजघरात
माजघरातून स्वयंपाकघरात
एखाद्या सम्राज्ञी सारखी
ठुमकत फिरायची!
ओझ्याने तिचे पाय भरून यायचे
दुखायचे, खुपायचे
घोटे काळे ठिक्कर पडायचे
कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त वहायचं.
पण नादाच्या भूलभुलैय्यातुन बाहेर न पडता
पैंजणाखाली फडके बांधून
जखमांना ऊब देऊन ती राज करायची!
माझ्या आईने पैंजण सोडून
नाजूक, हलक्या, तोरड्या घालायला सुरुवात केली
ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं
आपल्याच तोऱ्यात ती
स्वयंपाकघर, माजघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची
सगळीकडे मनमुराद फिरायची
अधनं मधनं का होईना, तोरड्या टोचायच्या.
साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे
पण सारे दुर्लक्षून
ती राजराणीसारखी भिरभिरायची!
मी तर ....
अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं
काहीच नको म्हणून
पैंजणाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं
हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता, घालता
घरच नव्हे तर अंगणही ओलंडून
मी बाहेर पाऊल टाकलं
पण कधी कधी माझ्याही नकळत
चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात
पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी
मी सारे सहन करते.
आता मात्र माझी मुलगी म्हणते
आई पैंजण नको, तोरड्या नको
चप्पल, बूट, सँडल नको
ते पकडणं नको घसरणं नको
काही काही काहीच नको
अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे
पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी
पुढल्या का होईना शतकाआधी!
(जाग)
नीलम माणगावे (१९५४) :
कवयित्री, लेखिका, संपादक व बालसाहित्यिक म्हणून परिचित. ‘स्त्रीवादी जाणीव’ हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य. ‘बाई’ म्हणून जगण्याची आस, खंत, चीड, उत्साह-आनंद तसेच असोशी, वेदना, कल्लोळ यांचा एक उत्स्फूर्त स्वरमेळ त्यांच्याकवितांमध्येनिनादत राहतो. त्यांच्या साहित्यातून विविध प्रतिमांच्या माध्यमांतून स्त्रीची जागृतावस्था व्यक्त होते. कवितेची बोली सहजसुंदर व प्रवाही आहे. अनुभवांचा सच्चेपणा आणि अनलंकृत भाषाशैली ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. ‘गुलदस्ता’, ‘शतकाच्या उंबरठ्यावर’, ‘जाग’ हे कवितासंग्रह. ‘तीच माती तेच आकाश’, ‘शांते तू जिंकलीस’, ‘निर्भया लढते आहे’ हे कथासंग्रह.
‘डायरी’, ‘जिद्द’ या कादंबऱ्या, ललित लेखन व बालसाहित्य प्रसिद्ध. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार’ या व अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित.प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांचे अडथळे पार करत स्त्री प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे. तिचा हा संघर्षमय प्रवास प्रतीकांच्या माध्यमातून चित्रित करताना कवयित्रीने स्त्रीच्याआत्मविकासाचा दृढनिर्धार या कवितेतून व्यक्त केला आहे. या कवितेची रचना मुक्तछंदात केलेली आहे.
आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मराठीत विषयी अजून माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा