अलंकार व त्याचे प्रकार - अलंकार, साहित्यातील भेद उदाहरण
आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जीवनातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात यांतील भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकांमुळे वेगळी ठरते, त्यातील एक घटक म्हणजे ‘अलंकार’ होय.
अलंकाराचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ हे दोन प्रकार आहेत. त्यांपैकी यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक, दृष्टान्त, चेतनगुणोक्ती हे अर्थालंकार आपण अभ्यासले आहेत.
अनन्वय, अपन्हुती, अतिशयोक्ती व अर्थान्तरन्यास हे अर्थालंकार अभ्यासणार आहोत.
(१) अनन्वय - (अलंकार, साहित्यातील भेद उदाहरण)
खालील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती सोडवा.
(१) आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
(२) ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच.
- वरील दोन्ही उदाहरणांतील उपमेये-
- वरील दोन्ही उदाहरणांतील उपमाने-
निरीक्षण केल्यानंतर वरील उदाहरणांत उपमेय व उपमान एकच आहेत, असे लक्षात येते. अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्ये
(१) उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते.
(२) उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते.
इतर अनेक अलंकारांमध्ये एखाद्या वस्तूची तुलना दुसऱ्या समान वस्तूशी करून आपण वर्णन करतो; पण कधी कधी उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते, की त्याला योग्य असे उपमानच मिळत नाही. अशावेळी उपमेय हे उपमेयासारखेच आहे असे सांगितले जाते. या ठिकाणी ‘अनन्वय’ अलंकार होतो. उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा ‘अनन्वय’ अलंकार होतो.
(अन्वय म्हणजे संबंध. अनन्वय म्हणजे तुल्य अन्वय (संबंध) मिळत नाही असा- अतुलनीय)
उदा., अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात- झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा ।
‘अर्जुनासारखा पराक्रमी अर्जुनच’, हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत ओळी अालेल्या आहेत. ‘अर्जुन’ हेच उपमेय व उपमान आहे.
(२) अपन्हुती-(अलंकार, साहित्यातील भेद उदाहरण)
खालील उदाहरणांचे निरीक्षण करा व कृती सोडवा.
उदा., न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील ।
न हे वदन, चंद्रमा शरदिचा ।।
अपन्हुती अलंकाराची वैशिष्ट्ये
(१) उपमेयाला लपवले जाते.
(२) उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते. म्हणजेच-
(३) उपमेयाचा निषेध केला जातो.
(४) निषेध दर्शवण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात.
अपन्हुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. वरील उदाहरणातील पहिल्या ओळीत ‘नयन’ हे उपमेय आहे. ‘कमळातल्या पाकळ्या’ हे उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत, असे सांगताना उपमेयाला लपवून, दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली आहे. उदाहरणातील दुसऱ्या ओळीत ‘वदन’ या उपमेयाचा निषेध करून तो ‘शरदॠतूतील चंद्र’ आहे असे म्हणून उपमानाची
स्थापना केली, म्हणून ‘अपन्हुती’ अलंकार झालेला आहे. उपमेयाचा निषेध करून उपमेय हे उपमानच आहे, असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ‘अपन्हुती’ अलंकार होतो.
(३) अतिशयोक्ती- (अलंकार, साहित्यातील भेद उदाहरण)
खालील उदाहरणाचे निरीक्षण करा व त्यातील आशयाच्या दृष्टीने असलेली असंभाव्यता अभ्यासा.
उदा., जो अंबरी उफळतां खुर लागलाहे ।
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे ।।
प्रस्तुत उदाहरणात नलराजाचा घोडा आकाशात इतका उंच उसळला, की त्याचा खूर चंद्राला लागला म्हणून चंद्रावर डाग पडला असे वर्णन केले आहे. अतिशयोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये
(१) एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे वर्णन केलेले असते.
(२) ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते.
(३) त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पनारंजकता अधिक स्पष्ट होते.
अलंकारांमध्येप्रत्येक गोष्टीचे वर्णन चमत्कृतिपूर्ण करायचे असल्यामुळे त्यात थोडी अतिशयोक्ती येतेच. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, व्यतिरेक या अलंकारात थोडी अतिशयोक्ती असतेच; पण केवळ अतिशयोक्तीच जिथे प्रामुख्याने केलेली असते तिथे ‘अतिशयोक्ती’ हा स्वतंत्र अलंकार मानला जातो.
प्रस्तुत उदाहरणात चंद्राला घोड्याच्या खुराचा डाग लागणे असंभवनीय असले तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे इथे ‘अतिशयोक्ती’ अलंकार झालेला आहे. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी ‘अतिशयोक्ती’ हा अलंकार होतो.
उदा., दमडिचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं
मामंजींची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.
दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा कितीतरी गोष्टी फुगवून सांगितल्या आहेत.
(४) अर्थान्तरन्यास-(अलंकार, साहित्यातील भेद उदाहरण)
खालील उदाहरणाचे निरीक्षण करा व अभ्यासा.
उदा., तदितर खग भेणे वेगळाले पळाले ।
उपवन-जल-केली जे कराया मिळाले ।।
स्वजन, गवसला जो, त्याजपाशी नसे तो ।
कठिण समय येता कोण कामास येतो?
नलराजाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरून पळाले. त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही. एवढी हकीकत सांगून झाल्यावर कवीने त्यावरून एक सामान्य सिद्धान्त सांगितला, की ‘कठीण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही.’
अर्थान्तरन्यास अलंकाराची वैशिष्ट्ये
(१) विशेष उदाहरणांवरून एखादा सर्वसामान्य सिद्धान्त सांगितला जातो.
(२) सामान्य विधानाच्या समर्थनार्थविशेष उदाहरणे दिली जातात.
(३) अर्थान्तर- म्हणजे दुसरा असा अर्थ. न्यास म्हणजे शेजारी ठेवणे.
या अलंकारात एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे म्हणजेच एक विशिष्ट अर्थ दुसऱ्या व्यापक अर्थाकडे नेऊन ठेवणे, म्हणजे ‘अर्थान्तरन्यास’ होय.
उदा., होई जरी संतत दुष्टसंग,
न पावती सज्जन सत्त्वभंग;
असोनिया सर्प सदाशरीरीं;
झाला नसे चंदन तो विषारी.
सज्जन सतत जरी दुष्टांच्या संगतीत आले तरी सज्जनांची सात्त्विकता नष्ट होत नाही, हा विशेष सिद्धान्त सांगितल्यानंतर कवी निसर्गातले एक सामान्य उदाहरण देतात. साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरीपण चंदनाचे
झाड मात्र विषारी बनत नाही.
(३) खालील कृती करा.
(१) कर्णासारखा दानशूर कर्णच.
वरील वाक्यातील-
उपमेय ..............
उपमान ..............
(२) न हे नभोमंडल वारिराशी आकाश
न तारका फेनचि हा तळाशी
पहिल्या ओळीतील-
उपमेय ..............
उपमान ..............
दुसऱ्या ओळीतील-
उपमेय ..............
उपमान ..............