ESSAY MARATHI मराठी निबंध - मराठी निबंधाचे प्रकार (Types of Essays)
नीट बांधलेला, नीट गुंफलेला, नीट जुळवलेला असतो तो निबंध. ‘विषयाला धरून मनातील विचार आणि भावना यांची सूत्रबद्ध गुंफण करणे’ निबंधलेखनात अभिप्रेत असते. निबंधलेखनात आत्माविष्काराला भरपूर वाव असतो. एखाद्या विषयाच्या संदर्भात आपल्याला जे जे म्हणून माहीत आहे, जितके जितके म्हणून माहीत आहे ते ते सगळेच्या सगळे एकत्र करून केलेले लेखन म्हणजे निबंध नव्हे, तर निबंध म्हणजे सुसंगत आणि योग्य विचारांची, कल्पनांची अर्थपूर्ण गुंफण होय. निबंध म्हणजे एखाद्या विषयासंबंधीचे स्वत:चे विचार सुसूत्र, सुसंबद्ध आणि सुबकतेने मांडून तो विषय ठरावी कमर्यादेत लिहून पूर्ण करणे होय.
संस्कृतमध्ये अवघ्या तीनच शब्दांत ‘निबंध’ या साहित्यप्रकाराचे नेमके वर्णन केले आहे. ‘निबध्यते अस्मिन इति’ अर्थात ‘जिच्यामध्येविषय गोवला जातो अशी वाङ्मयीन रचना म्हणजे ‘निबंध’ होय. निबंधात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन केलेले असते. ती एक मनोवेधक गुंफण असते. विविध विचारांचा ओघवत्या भाषेतील सुबोध आणि कलात्मक आविष्कार म्हणजे निबंध. निबंधात एखाद्या विषयावरील साधक बाधक माहितीची, विचारांची सूत्रबद्ध आणि सुसंगत मांडणी केलेली असते. निबंध लेखन ही एक कला आहे आणि प्रयत्नांनी ती साध्य होते.
मराठी निबंधाचे प्रकार
स्थूलमानाने निबंधांचे प्रकार खालीलप्रमाणे सांगता येतात.
(१) वर्णनात्मक निबंध (स्थल, ॠतू, निसर्ग, प्रवास, घटना इत्यादींचे वर्णन)
(२) व्यक्तिचित्रणात्मक निबंध (व्यक्तिवर्णनात्मक, व्यक्तिप्रधान, चरित्रात्मक)
(३) आत्मवृत्तात्मक निबंध (आत्मकथन, मनोगतप्रधान निबंध)
(४) कल्पनाप्रधान निबंध (कल्पना फुलवत केलेले लेखन, कल्पनारम्य निबंध)
(५) वैचारिक निबंध (विचारप्रधान, चिंतनपर, समस्याप्रधान, चर्चात्मक निबंध)
आता आपण निबंध प्रकारांची थोडक्यात माहिती घेऊया.
(१) वर्णनात्मक निबंध - (मराठी निबंधाचे प्रकार)
आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, वास्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब शब्दांत रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. आपण जे पाहिले, अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. एखादे दृश्य, सहल, घटना, सण, ॠतू, प्रवास, स्थळ यांचे खरे तर शब्दचित्रच रेखाटायचे असते.
लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी लागते. निबंधलेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशीलाने निरीक्षण करू शकतो. सूक्ष्म निरीक्षण हे वर्णनात्मक निबंधाचे शक्तिस्थान असते. वर्णनाला भाषिक अलंकारांचे पाठबळ तर असतेच शिवाय भाषा ओघवतीही असते. त्यामध्ये भावनांचे, कल्पनांचे, विचारांचे गहिरे रंग भरणेही तितकेच महत्त्वाचे असते. अधूनमधून भाषिक सौंदर्यकणांची उधळण हवीच. थोडक्यात, वर्णनात्मक निबंधात भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. नमुना विषय- आमची अविस्मरणीय सहल, वसंत ॠतू, मी पाहिलेला क्रिकेट सामना.
(२) व्यक्तिचित्रणात्मक निबंध - (मराठी निबंधाचे प्रकार)
‘व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा निबंध’ म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध होय. आता ही ‘व्यक्ती’ कोण असते? तर कुणीही असू शकते. अगदी आई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी-विक्रेती, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, कलावंत... अशी कुणीही. अट फक्त एकच, नेमक्या शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे हुबेहूब, चित्तवेधक, कलात्मक शब्दचित्र उभे करता आले पाहिजे. व्यक्तिचित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकाच्या डोळ्यांपुढे उभी राहिली पाहिजे.
अशा निबंधात त्या व्यक्तीचे संपूर्णजीवन-चरित्र
तपशीलवारपणे लिहिणे अपेक्षित नसते; तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी, सवयी, लकबी, रंगरूप, पेहेराव, स्वभाव, व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये यांचे वर्णन करणे आवश्यक असते. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या माहितीचा तपशील नव्हे, तर ते त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र असते. ते वाचून वाचकाला साहित्यिक आनंद आणि प्रेरणा मिळते. ‘व्यक्तिचित्रण’ मार्मिक शब्दांनी बहरलेले आणि विचारांनी फुललेले असले पाहिजे. नमुना विषय- माझे आवडते शिक्षक, माझी आई
(३) आत्मवृत्तात्मक निबंध - (मराठी निबंधाचे प्रकार)
अशा प्रकारच्या निबंधात जो कोणी आपली कथा लिहीत असतो तो आपल्याभावभावनांचे, सुखदु:खांचे, विचारांचे, अनुभवांचे कथन करत असतो. कडू-गोड आठवणींचा तो एक रम्य पट असतो. प्रगतिपुस्तकाचे, उत्तरपत्रिकेचे जसे आत्मकथन असू शकते तसेच एखाद्या पुतळ्याचेही असते. बोलणे, व्यक्त होणे महत्त्वाचे असते. कोण बोलत आहे हे जसे महत्त्वाचे; तसेच ते बोलणे ‘आतून’ येणेही महत्त्वाचे. त्या ‘व्यक्त होण्यात’ उमाळा असला पाहिजे.
‘काहीतरी’ वेगळे सांगण्याची उर्मी असली पाहिजे. त्या आत्मकथनाला भावनांचा स्पर्श लाभला पाहिजे. आत्मकथनात्मक निबंधात ‘मी’ महत्त्वाचा असतो, तो तर हवाच. तरच ते आत्मकथन; पण आत्मकथनात ‘मी’पणा नसावा. ‘नदीची आत्मकथा’ लिहिताना एखादी नदी प्रत्यक्षात समोर अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार नसते; तिथे ती बोलते आहे अशी कल्पनाच करावी लागते.
‘मी रस्ता आहे’ असं समजून रस्त्याची कैफियत, त्याचे मनोगत, गाऱ्हाणे, अनुभव शब्दबद्ध करणे हे तसे अवघड नाही. मात्र त्यासाठी विषयाशी प्रयत्नपूर्वक एकरूप व्हावे लागते. कल्पना, विचार आणि भावना या तिन्हींची सांगड घालून प्रथमपुरुषी एकवचनी भाषेत, स्वत:विषयी लेखन करणे म्हणजे
आत्मवृत्तात्मक निबंध होय. या प्रकारच्या निबंधांना मनोगत, कैफियत, कहाणी, आत्मकथन अशीही
नावे योजतात. अशा प्रकारच्या निबंधात ज्याचे ‘आत्मकथन’ करायचे,
त्याच्या अंतरंगात मनाने शिरून
आपण त्याची सुख-दु:खे, अनुभव यांच्याशी एकरूप होऊन कथन करायचे असते. या कथनात
कल्पनाविलासाला भरपूर वाव असतो. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगांचे संगतवार कथन करण्यापेक्षा काही निवडक प्रसंग चटकदार पद्धतीने लिहिणे परिणामकारक ठरते. आत्मचरित्रात्मक निबंध लिहिताना त्या-त्या व्यक्तीच्या अंतरंगात शिरावे लागते, म्हणजेच ‘परकाया प्रवेश’ करावा लागतो. तेव्हा आता ‘आइस्क्रीमचं मनोगत’ कसे लिहाल? जरा विचार करा बरं!
(४) कल्पनाप्रधान निबंध - (मराठी निबंधाचे प्रकार)
या प्रकारच्या निबंधात कल्पनाविलासाला महत्त्व दिले जाते. सहजसुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांच्या उत्तुंग भराऱ्यांनी हा निबंधप्रकार नटलेला असतो; परंतु त्याला न्याय देण्यासाठी कल्पना शब्दांत गुंफण्याची चांगली तयारी असावी लागते. ‘मी पक्षी झालो तर...’ हा विषय वाचताक्षणी ‘तोच लिहायचा’ असा मोह विद्यार्थ्यांना होतो; पण पाच-दहा वाक्यांनंतर आगळ्यावेगळ्या कल्पना सुचणे थांबले तर मात्र अडचण होते. ती होऊ नये यासाठी विविध स्वरूपाच्या कल्पना करण्याचा सराव, सवय असावी लागते. कल्पनेच्या दुनियेत रमण्याचा रियाज करावा लागतो. तसा तो फारसा अवघड नसतो. प्रयत्नातून तो साध्य होऊ शकतो.
एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी, चौथी... अशी एकापेक्षा एक सुंदर सुंदर कल्पनांची साखळी जोडता आली पाहिजे. अनोख्या कल्पनांनी नटलेला निबंध वाचकाला नक्कीच गुंतवून ठेवतो. नमुना विषय- मी अभिनेता/अभिनेत्री झालो/झाले तर...
(५) वैचारिक निबंध -( मराठी निबंधाचे प्रकार)
वैचारिक निबंध म्हणजे विचारांवर आधारलेला निबंध होय. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्यासंबंधीची साधक-बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. उदा., ‘काय श्रेष्ठ मन का मनगट?’ असा विषय दिला असेल तर ‘मन’ आणि ‘मनगट’ या दोन्ही बाजूंचे गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल-प्रतिकूल मते, त्यांचे खंडन-मंडन, साधक-बाधक चर्चा, एखाद्या विषयासंबंधीचे चिंतन या सर्व गोष्टी वैचारिक निबंधलेखनात असणे अपेक्षित आहे. त्यामुळे निबंध एकांगी होत नाही. तसेच तो पूर्वग्रहदूषितही होणार नाही.
अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंधलेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षाप्रत पोहोचणे अपेक्षित असते. निबंधाच्या विषयाचा परिपूर्णविचार कमीत कमी शब्दांत मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते.अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषयच हाताळावेत असे नाही. हलकेफुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. त्यासाठी लेखकाला विचारांची पद्धतशीर, तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी या निबंधामध्ये दृष्टान्त, दाखले, उदाहरणे देता येतात निबंधलेखनाची पूर्वतयारी
प्रास्ताविक- निबंधलेखनाची पूर्वतयारी जाणीवपूर्वक करावी लागते. त्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, मनन-चिंतन, शब्दसंपत्ती विकास आणि लेखनसराव यांवर भर दिला पाहिजे.
(१) श्रवण- (मराठी निबंधाचे प्रकार)
आतापर्यंत तुम्ही ‘श्रवण’ हे भाषिक कौशल्य बऱ्यापैकी आत्मसात केले आहेच. श्रवणातून शब्दसंपत्ती आणि विचारप्रक्रियेचा विकास होतो. त्यामुळे आता हेच कौशल्य आणखी वाढवायचे आहे. त्यासाठी सकस भाषणे, चर्चा ऐका. रेडिओ आणि दूरदर्शनवरील श्राव्य कार्यक्रम ऐका. वक्तृत्वस्पर्धांमधील भाषणे ऐका. आंतरजालावर उपलब्ध असलेली उत्तमोत्तम व्याख्याने ऐका. सुंदर, अर्थपूर्ण गाणी ऐका. तुम्ही बहुश्रुत व्हा. अशा श्रवणातून निबंधलेखनास उपयोगी पडेल अशी बरीचशी माहिती तुम्हांला मिळेल.
(२) संभाषण- (मराठी निबंधाचे प्रकार)
संभाषणातून भाषेच्या उपयोजनाची संधी मिळते. विचाराला चालना मिळते. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा वक्तृत्वस्पर्धांमध्ये, परिसंवादांमध्ये, चर्चांमध्ये सहभागी व्हा. आवडत्या विषयांवर बोला. शिक्षकांशी चर्चा करा. संधी मिळेल तिथे व्यक्त व्हा. त्यामुळे भाषेत सहजता, प्रवाहीपणा येण्यास मदत होईल. तो निबंध लेखनासाठी उपयुक्त ठरेल.
(३) वाचन-(मराठी निबंधाचे प्रकार)
भरपूर वाचन करा. दैनिक वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके, आवडीची पुस्तके वाचत राहा. आंतरजालावरही वाचनीय मजकूर उपलब्ध असतो, तो वाचा. पाठ्यपुस्तकातील गद्य-पद्य पाठांशी मिळतेजुळते लेखन, पूरक वाचन करत राहा. रसिक वाचक व्हा. वाचनाने भाषा विकसित होईल. शब्दसंपत्ती वाढेल. विचारांची मांडणी कळेल. विचाराला चालना मिळेल. सर्जनाची प्रेरणा मिळेल. निबंधलेखनासाठी निवडलेल्या विषयासंबंधाने वाचन करा.
(४) लेखन-(मराठी निबंधाचे प्रकार)
तुमच्या श्रवण, संभाषण, वाचन यांमध्येजे जे तुम्हांला आवडले, सुचले, पटले ते ते लिहून ठेवा. तुमच्या वाचनात, ऐकण्यात जी जी उपयुक्त माहिती येईल ती ती माहिती वहीत तत्परतेने लिहून ठेवा. ही माहिती फावल्या वेळात वाचत राहा. या माहितीचा वापर कोणत्या निबंधात, कसा, किती करता येईल याचा विचार करून ठेवा. आता हे सर्व करण्यासाठी मुद्दाम वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. येता- जाता, विश्रांतीच्या वेळी, फावल्या, रिकाम्या वेळी तुम्ही हे सर्व करू शकता. हे सर्व सहजपणे, आवडीने करण्याची सवय लावून घ्या. यालाच व्यासंगाची सुरुवात म्हणतात. तो वाढवत न्या. विविध विषयांची सखोल माहिती लिखित स्वरूपात सतत जवळ ठेवणे हे तुमच्या निबंधलेखनाचे बीजभांडवल आहे. लेखनाच्या सरावामुळे विचारांमध्ये नेमकेपणा येऊन शब्दांकनाचा सराव होतो.
(५) निरीक्षण- (मराठी निबंधाचे प्रकार)
आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करा. एखादे प्रदर्शन, मंडई, रेल्वेस्टेशन, ग्रंथालय, उपाहारगृह, बाजार, मेळावे, सभा, संमेलने अशा ठिकाणी कोणकोणत्या घडामोडी घडत असतात, तिथली माणसे, त्यांचे संवाद, त्यांचा पेहराव, हालचाली इत्यादी सहजपणे बघत राहा. निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे, क्रिकेट मॅचचे, रहदारीचे निरीक्षण करा. हे सर्व येता-जाता होऊ शकते. या निरीक्षणांमधून तुम्हांला साध्या साध्या गोष्टींमध्येही मोठा आशय गवसेल; जो निबंधलेखनाला उपयोगी पडू शकतो. विशेषत: वर्णनात्मक निबंधात हे निरीक्षण तुम्हांला खूपच उपयोगी पडेल.
(६) शब्दसंपत्ती विकास- (मराठी निबंधाचे प्रकार)
शब्दांचे माहात्म्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत असे सांगितले आहे.
जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।
शब्दांची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ।।
- ‘श्रीज्ञानेश्वरी’, अध्याय ४ था, ओवी क्र.२१५
‘जसे सूर्यबिंब दिसायला तळहाताएवढेच दिसते; पण त्रिभुवने उणी पडावीत इतका त्याचा प्रकाश असतो! अगदी त्याचप्रमाणे शब्दांचे व्यापकपणही तुमच्या अनुभवास येईल.’
उत्तम निबंधलेखनासाठी शब्दनिवडीचे महत्त्व सर्वांत जास्त असते, म्हणून तुम्ही शब्दांची संपत्ती मिळवा, वाढवा. शब्दश्रीमंत व्हा. या शब्दश्रीमंतीचा अचूक, नेमका, योग्य आणि परिणामकारक वापर केव्हा आणि कसा करायचा याचे कौशल्य आत्मसात करा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाबद्दल अनेक शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, तत्सम शब्द, सुंदर वचने, वाक्प्रचार, म्हणी, काव्यपंक्ती, संस्मरणीय अवतरणे, अालंकारिक वाक्ये, छोटेसे चुटके इत्यादींचा संग्रह तुमच्याकडे असला पाहिजे.
(७) सराव-(मराठी निबंधाचे प्रकार)
उत्तम निबंध लिहिता यावा यासाठी ‘लेखन सराव’ हवाच. एकाच निबंधाची सुरुवात वेगवेगळ्या पद्धतींनी कशी करता येईल, एकाच निबंधाचा समारोप वेगवेगळ्या प्रकारांनी कसा करता येईल, एकाच निबंधाचा मध्य वेगवेगळ्या मुद्द्यांनी कसा विस्तारित करता येईल याचा सराव करा. ‘करून तर पाहा!’ रोज आठ ते दहा वाक्येलिहिल्याशिवाय झोपू नका. प्रसंगी पाठ्यपुस्तकातला एखादा उतारा लिहा; पण लिहा. लिहिण्याचा सराव ही उत्तम निबंधलेखनाची सर्वांत उत्तम पूर्वतयारी आहे. स्वत:च्या शब्दांत, स्वत:चे अनुभव लिहिणे हा उत्तम सराव आहे.
थोडक्यात, उत्तम निबंधलेखनाची पूर्वतयारी करणे म्हणजे सर्वांगाने व्यासंगी होणे होय. लेखन विषय क्रमाक्रमाने कसा फुलवता येईल, तो सुसूत्रपणे कसा मांडता येईल, त्यासाठी स्वत:चे शब्द, स्वत:ची भाषा, स्वत:ची शैली कशी विकसित करता येईल याचा विचार केला पाहिजे, चिंतन-मनन केले पाहिजे. आपले लेखन सहज, सुलभ, प्रवाही, अर्थवाही शब्दांत कसे होईल, वाचकांना ते वाचावेसे कसे वाटेल हा विचार मनात सतत घोळू द्यावा.
उत्तम निबंधलेखन कसे करावे?
निबंधलेखन करताना खालील बाबी महत्त्वाच्या असतात.
- आकर्षक सुरुवात, एकात एक गुंफलेले सयुक्तिक मुद्दे, परिणामकारक शेवट.
- म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते इत्यादींचा सुयोग्य वापर.
- अवतरणांचा गरजेनुसार आणि प्रमाणशीर वापर.
- अर्थपूर्ण शब्दरचना.
- विरामचिन्हांचा आवश्यक तेथे वापर.
- परिच्छेद रचना.
- लेखननियमांनुसार सुवाच्य लेखन.
- प्रासादिक भाषाशैली
- पाल्हाळ आणि पुनरुक्ती होणार नाही, याबाबत घेतली जाणारी दक्षता.
- स्वत:च्या शब्दांत अभिव्यक्ती असावी. अन्य ठिकाणाहून मजकूर उतरवून काढलेला नसावा.
समारोप
याठिकाणी उत्कृष्ट निबंध कसा लिहावा यासंबंधीचे विवेचन केले आहे. मात्र सुरुवातीलाच असा निबंध लिहिता येईल असे नाही. अथवा यामधील सर्व अपेक्षा इयत्ता बारावीमधील निबंधलेखनासाठी जशाच्या तशा लागू होतील असेही नाही; परंतु भविष्यात महाविद्यालयीन स्तरावर, स्पर्धा परीक्षांसाठी अथवा एखाद्या स्पर्धेत सहभागी होताना हे विवेचन मार्गदर्शक ठरेल.
ESSAY MARATHI मराठी निबंध - मराठी निबंधाचे प्रकार (Types of Essays)
मराठी निबंध | LINKS |
---|---|
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा | www.nirmalacademy.com |
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
पहिला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
रम्य पहाट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी | www.nirmalacademy.com |
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझे आवडते शिक्षक - निबंध | www.nirmalacademy.com |
माझे आजोबा मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
आमचे शेजारी निबंध मराठी - | www.nirmalacademy.com |
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध | www.nirmalacademy.com |
शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आजी मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझे बालपण मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
ESSAY MARATHI | www.nirmalacademy.com |
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन | www.nirmalacademy.com |
माझा आवडता छंद मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध | www.nirmalacademy.com |
शेतकरी मनोगत मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
माझी आई निबंध मराठी निबंध | www.nirmalacademy.com |
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | www.nirmalacademy.com/ |
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | www.nirmalacademy.com |