शिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते. Shivcharitramala - history of Shivaji Maharaj

Information world
0

 || शिवचरित्रमाला ||


मोहम्मद आदिलशाहची प्रकृती चांगली नव्हती। शाह अर्धांगवायूसारख्या विकारानं लुळापांगळा झाला होता. त्याची तबियत ढासळत होती. त्याचवेळी गोलघुमट या प्रचंड इमारतीचं बांधकाम उंचउंच चढत होतं. लवकरच ते पूर्ण होणार होतं.

आपल्याला हे माहिती आहे ना ? की गोलघुमट ही इमारत म्हणजे याच मोहम्मद आदिलशाहची कबर. मोहम्मद आदिलशाह तक्तनशीन बादशाह झाला त्याचवेळी त्यानं स्वत:साठी स्वत:च हे कबरस्तान बांधावयास सुरुवात केली. निष्णात वास्तुकारागिरांनी ही इमारत बांधली. उच्चारलेल्या वा उमटलेल्या ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी या घुमटात घुमत होते. पण आजारी बादशाहच्या मनात एकच ध्वनी आणि असंख्य प्रतिध्वनी उमटत होते मऱ्हाठ्यांच्या बंडाचे. बादशाह बेचैन होता.

शिवचरित्रमाला  [ मराठी ] आइकन

एक गोष्ट त्यानं केली त्याने चार वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर शहाजीराजांची मुक्तता केली. शहाजीराजे दक्षिण कर्नाटकात आपल्या जहागिरीवर रवानाही झाले. म्हणजेच शिवाजीराजांच्यावरचं असलेलं दडपण आणि चिंता एकदम भिरकावली गेली. स्वैर संचार करावयास हे ‘ शिवाजीराजे ‘ नावाचे वादळ मुक्त झाले अन् सुसाट सुटले. गेल्या चार वर्षांत राजांनी आदिलशाही विरुद्ध बोटही उचलले नव्हते. 

ते एकदम पाच हजार स्वारांचं लष्कर घेऊन स्वराज्यातून म्हणजेच राजगडावरून थेट कर्नाटकाच्या दिशेनं सुटले. कर्नाटकाच्या उत्तर भागात मासूर या नावाचं एक जबर लष्करी ठाणं होतं. शिवाप्पा नाईक देसाई हा शाही ठाणेदार मासूरच्या किल्ल्यात होता
.
शिवाजीराजांचा भयंकर वादळी हल्ला या मासूरवर अचानक धडकला। त्या शिवाप्पा नाईकाला स्वप्नातही कल्पना नसेल की , ही मराठी चित्त्यांची झडप आपल्यावर येईल। कारण मासूरपायून शिरवळपर्यंत सर्व मुलुख आदिलशाहीचा होता। या एवढ्या मोठ्या प्रदेशात सर्वच ठाणी आदिलशाहीची. सातारा , कराड , मिरज , कागल , चिकोडी , तेरदळ इत्यादी सर्व ठाण्यांना टाळून शिवाजीराजांनी थेट मासूर गाठलं होतं. शिवाप्पाची अक्षरश: 

दाणादाण उडाली. त्याची फौज उधळली गेली. तो पळून गेला आणि महाराज हा तडाखा देऊन तेवढ्याच झपाट्यानं पुण्याकडे पसार झाले. मासूर त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं नाही ? लुटलं नाही ? मधल्या कोणच्याही ठाण्यावर हल्ला किंवा कब्जा केला नाही ?

नाही!नाही! का ? राजांना आदिलशाहीस हे दाखवून द्यायचं होतं की , हा शिवाजीराजा भोसला विसरभोळा नाही , गाफिल नाही , बावळट नाही। वडिलांच्या स्थानबद्धतेच्या काळात माझं बळ आणि माझी तरबेजी किती आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो आहे. माझ्या वडिलांचा झालेला अपमान मी विसरलेलो नाही. मासूरवरच्या हल्ल्याने आदिलशाही दरबार थक्क झाला. आता दरबारला चिंता होती पुढे काय काय होणार याची.

महिने उलटत गेले। महाराजांचे हेर मोगलाईतूनही खबरा आणीत होते. दिल्लीचा शाह शहाजहान आग्ऱ्याच्या किल्ल्यात आजारपण भोगीत होता. त्याचा थोरला शाहजादा दारा दिल्लीत होता. दुसरा पुत्र मुराद हा गुजराथेत सुभेदार होता. तिसरा पुत्र औरंगजेब हा दक्षिणेत बिदरला होता. आणि चौथा बंगालच्या बाजूस होता. त्याचं नाव सुजा.

शाहजानला इतर कोणच्याही वैऱ्यांपेक्षा आपल्याच मुलांची भीती वाटत होती. त्यातला थोरला पुत्र दारा हा सुसंस्कृत होता. बाकीचे सगळे क्रूर श्वापदाहूनही क्रूर प्राणी होते. सगळे टपले होते दिल्लीच्या तख्तावर. बहुतांशी सर्व राजपूत सरदार औरंगजेबाला अनुकूल होण्याची शक्यता होती. शाहजहान मरण्याचीही कुणी वाट पाहणार नव्हता. 

बंडासाठी जो तो तोफा बंदुका ठासून तयार होता. खरं म्हणजे परिस्थिती अशी होती की , दारूगोळ्याचं कोठारच उडवावं तसं बंड करून राजपुतांना दिल्लीच ताब्यात घेता आली असती. क्रांती! पण या राजपुतांना क्रांतीपेक्षा बादशाहाशी असलेली आपली नाती जास्त मोलाची वाटत असावीत. राजपुतांच्या मनात क्रांतीचे म्हणजेच स्वातंत्र्याचे विचार येतच नव्हते. त्यांच्या अंत:करणात क्रांतीचे विचार प्रेरित करणारी एकही जिजाबाई राजस्थानात जन्माला आलेली नव्हती. इतर कुठून ही क्रांती यावी ? 

क्रांतीची आयात आणि निर्यात कधी करता येत नाही. ती उगवावी लागते स्वत:च्याच मेंदूत मग ती उतरते हृदयात , मग ती शिरते मनगटात , 

अन् मग ती प्रकट होते तलवारीच्या पात्यातून. शिवाजीराजांना ही उत्तरेची ओळख पुरेपूर झालेली होती.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)