‘हम लढाई करना चाहते नहीं, ऐसा बहाना बनाकर सीवाको धोका देना ‘ या आदिलशाहच्या हुकूमाप्रमाणेच अफझलखानाने महाराजांना ठार मारण्याचा घातकी डाव केला। पण हा डाव त्याच्यावरच उलटला. महाराज अत्यंत सावध होते. अफझलखानच महाराजांच्या हातून भयंकर जखमी झाला. संभाजी कावजी कोंढाळकर या मावळी शिलेदाराने खानाचा शिरच्छेद केला. महाराजांना संपवावयास आलेला खान स्वत:च संपला.
त्यास त्याचा अहंकार आणि गाफीलपणा सर्वस्वी कारणीभूत होता। खान आपल्याला निश्चित दगा करणार आहे , मारणार आहे. याच्या अगदी विश्वसनीय बातम्या प्रारंभापासूनच महाराजांना समजलेल्या होत्या. त्यामुळे ते अत्यंत सावध होते. त्यातून पुराव्यानिशी हेही सत्य आहे की , खानानेच महाराजांवर पहिला घाव घातला. अशा परिस्थितीत महाराजांनी जर बेसावध , भोळसट आणि आमच्या नेहमीच्याच भारतीय स्वभावाप्रमाणे वेंधळेपणा ठेवला असता तर ? तर महाराज मारले गेले असते. जगानेच ‘ हा सारा बावळटपणाचा परिणाम ‘ म्हणून महाराजांनाच दोष दिला असता. असली भारतीय वेंधळी उदाहरणे इतिहासात काय कमी आहेत ?
महाराजांच्या विचारसरणीवर आणि कृतीवर महाभारताचा , चाणक्यनीतीचा आणि योगेश्वर कृष्णनीतीचा फार मोठा परिणाम दिसून येतो। त्यांच्या दोन अन्य राजकीय घडामोडींतून हेच दिसून येते.
खानाच्या फौजेची मावळ्यांनी दाणादाण उडवली। पण हत्यार टाकून शरण आलेल्या शत्रू सैनिकांना त्यांनी ठार केले नाही. कोणाचीही विटंबना केली नाही. हाल केले नाहीत. नंतर सर्वांना सोडूनच दिले. ही आमची संस्कृतीच होती. महाराजांना खानाचे प्रचंड युद्धसाहित्य , खजिना , हत्ती , घोडे वगैरे घरपोच मिळावे , तसे मिळाले.
मोहीम फत्ते करून रात्री महाराज सैन्यानिशी पुढच्या मोहिमेला निघाले। ११ नोव्हेंबर १६५९च्या पहाटे , म्हणजेच खानाच्या दारुण पराभवानंंतर १५ तासांच्या आत महाराज वाईत येऊन दाखल झाले. ते आईला आणि कुटुंबियांना भेटायला प्रतापगडावरून राजगडाला गेले नाहीत. विजयदिन साजरा करण्यासाठी आणि अन्य जल्लोष गाजविण्यासाठी क्षणभरही न थांबता पुढील प्रचंड विजय मिळविण्यासाठी ते आदिलशाही मुलुखावर आणि किल्ल्यांवर तुटून पडले.
आम्ही उत्सवबाजांनी आज हे लक्षात घ्यावे। अवघ्या १५ दिवसांत (दि. २५ नोव्हेंबर १६५९ ) महाराज कोल्हापुरात , नेताजी पालकर विजापुरास , दौलोजी कोकणात राजापुरास आणि इतर चार मावळी सरदार शिरवळ , सासवड , सुपे आणि पुणे या ठाण्यांवर जाऊन धडकले. शिरवळ , सुपे ही चारही ठाणी मराठ्यांनी खानाच्या वधाच्याच दिवशी (दि. १० नोव्हेंबर) काबीज केली. राजापुरास खाडीत असलेल्या आदिलशाही लढाऊ गलबतांवर दौलोजी नावाच्या मराठी सरदाराचा छापा पडला. प्रत्यक्ष महाराजांनी नांदगिरी , वसंतगड , वर्धनगड , कराड , सदाशिवगड , भूषणगड इत्यादी शाही किल्ले काबीज केले. याच धडाक्यात पन्हाळगडासारखा अजिंक्य गड महाराजांनी २९ नोव्हेंबर रोजी घेतला. कोल्हापुरची महालक्ष्मी तीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर स्वतंत्र झाली.
अफझलखानाच्या आक्रमणाचा परिणाम काय ? स्वराज्य बुडालं नाही , वाढलं। दिरंगाई , आळस , चंगळबाजी अजिबात न होऊ देता हा प्रचंड विजय मराठ्यांनी मिळविला होता. आम्ही उत्सवबाजांनी हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतले पाहिजे. महाराजांचे नुसते जयजयकार आता पुरे!
नेताजी पालकराला थेट विजापुरावर सोडताना महाराज त्याला आज्ञा देत होते , ‘ सरनोबत , थेट विजापुरावर चालून जा। ते काबीज करा. अन् आदिलशाह बादशाहलाच ताब्यात घ्या.
‘ एवढी अफाट अन् अचूक झेप घेणारा दुसरा एखादा सेनापती वा राजा आपल्याला इतिहासात गेल्या एक हजार वर्षांत तरी सापडतोय का ? महाराजांच्या या उद्योगांत केवळ झोंडशाही नव्हती , क्रौर्य नव्हतं , तर त्या पाठीमागे उदात्त , उत्कट आणि उत्तुंग स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान होते। साधुसंत म्हणजे मानवतेचे महाउपासक. महाराजांच्या या पवित्र व पुण्यकरी कार्याला सर्व साधुसंतांचा आशीर्वादच होता. कोणाही अन् कोणत्याही धर्मातील संताने महाराजांच्या निषेधाचे पत्रक काढले नाही. त्यांना आशीर्वादच दिला.
आदिलशाहसकट राजधानी विजापूरही ताब्यात घेण्याची महाराजांची आकांक्षा होती। तसं घडलं असतं , तर महाराष्ट्रात केवढी क्रांती झाली असती पण सपाटीच्या प्रदेशात असलेले बळकट तटबंदीचे फार मोठे विजापूर शहर अवघ्या चार-पाच हजार स्वारांच्यानीशी काबीज करणे नेताजीला जमले नाही. सतत आठ दिवस नेताजी धडका देत होता. शहराच्या तटाबुरुजांवर शाही तोफखाना होता. माणूसबळ नेताजीपाशी अगदीच तुटपूंजे ठरत होते. अखेर त्याने माघार घेतली आणि तो महाराजांना सामील होण्यासाठी पन्हाळगडाकडे निघून गेला.
महाराजांचा स्वतंत्र तोफखाना नव्हता. धावत्या मराठी सैन्याबरोबर तोफखाना नेल्याचे एकही उदाहरण शिवचरित्रात नाही. कारण तोफाच नाहीत. मराठी किल्ल्यांवर तोफा असायच्या तेवढ्या होत्या. अशा या गरीब मराठी स्वराज्याने केवळ माणसांच्या आणि घोड्यांच्या जीवावर हे असे अवघड विजय मिळविले. युद्धसाधने कमी पैसा कमी , माणसे कमी , सारेच काही तोकडे आणि मुठभर. महत्त्वाकांक्षा मात्र एवढी अचाट होती की , त्यापुढे गगन ठेंगणे पडत होते.