|| शिवचरित्रमाला ||
आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली. त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार ‘ शिवाजीराजे यांसी अर्जानी मोकास ‘ दिला. शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोटमोकासदार झाले. म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला , तरी वडीलकीच्या नात्यानं तो कारभार जिजाऊसाहेब पाहू लागल्या. त्यांची मायाममता मोठी. जरबही मोठी. स्वप्नही मोठे. जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली.
शिस्तीनं , काटेकोरपणे हुकुमांत वागणारी. कारभार चोख करणारी. निष्ठावंत आणि प्रामाणिक. अशी माणसं असली की , उत्कर्षच होत असतो. मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्ये असोत. उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी , भारदस्त , वयानेही बहुतेक साठी-सत्तरी ओलांडलेले. बाजी पासलकर , दादोजी कोंडदेव , गोमाजी नाईक , पानसंबळ नूरखानबेग , बंकीराव गायकवाड , येसबा दाभाडे , नारोपंत मुजुमदार आणि असेच तजरुबेकार आणखी काही. ‘ ज्यास जे काम सांगितले , ते त्याने चोख करावे ‘ ऐश्या ताकदीचे आणि युक्तीबुद्धीच्या ऐपतीचे हे सारे होते.
जिजाऊसाहेबांची तडफ वेगळीच होती. कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कुणी केले ? इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत. पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्रं सर्वांप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती. प्रत्यक्ष नजिकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रियांची एकेक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानांवर जात असणारच. आदिलशाहीतील बेगम बबुवाजीखानम , अहमदनगरची शाहजादी चाँदबिब्बी अन् त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळमुलुखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना ! कारीच्या कान्होजी जेध्यांची आई अनसाऊ जेधे ही त्यातलीच.
आसवलीच्या ढमाळपाटलांची आई रुपाऊ अन् अशा अनेक कितीजणी यमदूतांच्या नजरेला नजर भिडवून जगत आलेल्या बायका आऊसाहेबांना दिसत होत्या. आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच! असंच. मराठी रक्तात जन्मता:च असणार शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होत. एका बखरकारांनी लिहून ठेवलंय की , ‘ जिजाऊ सारखे कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले ‘ कितीही कठीण संकटं पुढं आली , तरी तिळमात्रही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती ही मराठ्याची मुलगी. आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त , उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता. याचं द्योतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुदा.
प्रतिश्चंदालेखे वधिर्र्ष्णुविश्ववंदिता साहसूनो शिवस्येषा मुदा भदाय राजते
केवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितलाय या राजमुदेत! सदैव प्रतिपदेच्या चंदासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुदा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरो. संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळविला म्हणे! तोच हा मंत्र असेल का ? शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवर हाच मंत्र राजमुदा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला. मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कुणी मराठा , कुणी माळी , कुणी साळी , कुणी तेली , कुणी रामोशी , कुणी महार , कुणी धनगर , कुणी ब्राह्माण तर कुणी मुसलमानही. अन् आदिलशहाच्या कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की , हा शहाजीराजाचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतो. मुहम्मद आदिलशहाने ही कुजबुज हसण्यावारी नेली. त्याचा विश्वासच बसेना की , शहाजीराजाचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारील! या आदिलशाही विरुद्ध ? कसं शक्य आहे ? पण ते सत्य होतं. खरोखरच बंडाची राजकारणं शिवबाच्या डोक्यात घुमत होती.
पण खरंच शक्य होतं का ? अशक्यच होतं. शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का ? नाही. दीडदोन लाखाची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशहाशिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहाही होता. भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवणारा मुघल बादशहा शाहजहान दिल्लीत होता. कोकणच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते. वर जंजिऱ्याचा सिद्दी होता. अन् शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाल कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच.
एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्याइतका शिवाजीराजांपाशी काय होतं ? सैन्य ? तोफखाना ? आरमार ? खजिना ? काहीच नव्हतं. पण या सर्वांहुनही एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजांत होती. कोणती ? आत्मविश्वास! कठोर ध्येयनिष्ठा! अन् नितांत श्रद्धा! अंधश्रद्धा नव्हे. भाबडी अश्रद्धाही नव्हे. बुध्दीनिष्ठ श्रद्धा. अभ्यासपूर्ण श्रद्धा. अन् याच भावनांनी भारावलेली मावळी भावंडे. अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारीत होते. न बोलत्या शद्बांत. कारण त्यांचे शद्ब इतिहासाच्या कागदपत्रांवर फारसे उमटलेच नाहीत.
पण ते नक्की एकेकाला बोलावत होते. त्यांचा एकेक शब्द मंतरलेला होता. महाराजांचं मनुष्यबळ बोटं मोजावीत इतक्याच मोजमापात वाढत होतं. शत्रू परातभर होता. मावळे चिमूटभर होते. पण वडिलांनी वापरलेला अन् सह्यादीने शिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता. कोणता ? गनिमी कावा!